मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

ह्या येळेला आजी पण आली व्हती, मला लय बरं वाटलं. त्यादिशी गौतम मलाच सांगायला सारखं नाचाय, मला गोंधळात नाचाय शिकिवलं व्हतं.

बाया,बापे आन वाजंत्रीचं सामान मावल असा टेम्पू व्हता, मामा नी भाड्यानी आणला हुता. टेम्पूत पण आमी देवाचे गाणे म्हणत व्हतो, बापे माणसं दारू, चिलीम घेत व्हते, शेवंता तर बसूनच झोपली व्हती, मदीच जागी व्हायची अन "चांगभलं" आरडायची. मी आजीच्या मांडीवर डोस्क ठिवून हुते पण जागीच हुते.

गाडी थांबली मदीच आडरानात, मुतायला झाली आसंल कोणाला तरी म्हणून आमी मुकेच पडून ऱ्हायलो. वाटंच्या कडंला छोटं पडकं मंदिर हुतं, म्हसोबा आसंल आसं वाटलं. निस्ता अंधार, कायबी दिसत न्हवतं, तेवड्यात गौतम आन त्याच्या दोस्तांनी आमालापण उतराय लावलं अन म्हनला "घे लगीन करून देवाशी, तुझ्या आजीनी सांगितलंय. मी आजी कड पाह्यलं, आजी म्हणली घे ना उरकून, मोठी झाली नव तू आता, पैसा कमवायचा आसल अन भली जिंदगी पायजेल आसल तर व्हय ना मुरळी" ...

"मी म्हणले तू म्हणती तर करती लगीन देवाशी", अन त्या अंधारात, त्या पडक्या मंदिरात माझ्या गळ्यात माळ पडली देवाच्या नावाची, गौतमनच टाकली देवाच्या बाजूनी, समद्यास्नी खुसी झाली, आजीनी मटामटा मुके घेतले माझे, म्हनली, "देवाची सेवा करायची, न्हाय म्हणायचं न्हाय कशाला, देवाच्या नावानी रहायचं, तू दासी हायस त्याची आता."मी मान हालीवली. मामानी नारळ फोडला, खोबरं घेतलं वाटून परसाद म्हनून, माझ्या डोक्यात भंडारा अन कपाळावर कुकुचा मळवट भरला.

"खंडूबाच्या नावानं sss" ...
गौतम नी आवाज दिला न "चांगभलं" म्हणत आमी गाडीत बसलो....
मी मुरळी झाले ... देवाची बायकू !!

कडेवर ७ - ८ महिन्याचं बाळ घेऊन "ती" सांगत होती आणि आम्ही जीव कानात आणून फक्त ऐकत होतो.
डोळ्याच्या कडा जरा पाणवल्या तेव्हा थोडा वेळ तिच्या बाळाला मांडीवर घेतलं आणि विचारलं, " मुलीचं नाव काय ठेवलं?" म्हणाली "संगीता, पण मी आता हिचं नाव बदलणारे, त्यानी ठीवलय हिचं नाव, मला नको ते, हिचं नाव मी 'ज्ञानदा' ठीवणारे"

तिच्यावर नक्की काय अत्याचार झालाय, आयुष्याचा काय "खेळ खंडोबा" झालाय याची जाणीव खरंच तिला आहे का? असं वाटून जायचं, कि लहान वयात असे अनुभव आल्याने अकाली आलेल्या प्रौढत्वाने ती खंबीर झालीये याचा अंदाज मन घेत रहायचं.

हे मुल गौतमचंच आहे असं खात्रीने ती सांगते, गौतम आता फरार आहे तो आला तर त्याला पायाजवळ पण उभी करणार नाही, असं ती म्हणाली तेव्हा तिच्या डोळ्यात त्याच्या बद्दलचा राग दिसत होता. तिचं म्हणणं आम्ही शांतपणे ऐकून घेत होतो, फार सांभाळून, संयमाने काही खासगी प्रश्न विचारात होतो, सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी तोंडपाठ असल्यासारखी देत होती, काय सांगायचं काय नाही सांगायचं याचा सराव एव्हाना तिचा झाला होता. सराईत झाली होती ती, कि तिला इतका सराईत केलं होतं परिस्थितीनं ? की आणखी कुणी ?

वीटभट्टी कामगार असलेल्या आईवडिलांची हि चौथी मुलगी, राजश्री (नाव बदलले आहे), हातावर पोट असणाऱ्या कुटुंबात मुलांना पोसणे म्हणजे तारेवरची कसरत. राजाश्रीला आईवडिलांनी आजीकडे ठेवले होते(वडिलांची आई).आजीने ४ थी पर्यंत शिकून दिले आणि नंतर तिच्याकडून घरचे बाहेरचे कामं करून घेऊ लागली. हि आजी एका बुआ ला ओळखत असे, खंडोबाचा भगत होता तो,त्याला " बाप" म्हणायचे सर्व. सुपारी घेऊन वाघ्या मुरळीच्या जागरण गोंधळाचे कार्यक्रम घ्यायचा. त्यासाठी त्याचा एक ग्रुप होता. म्हातारीकडे एक लहान पोरगी आहे हे लक्षात आल्यावर त्याने म्हातारीच्या मनात देवदासी बनवण्याची युक्ती सांगितली. गरिबी आणि अंधश्रद्धे मुळे आजीने राजश्री ला देवदासी बनवण्याचा निर्णय घेतला.

पोरगी म्हणजे पुरुषांना भोगायला बनवलेली वस्तू अशीच समजून सर्वांच्या डोक्यात सल्याने तोच डोस राजश्री ला पाजण्यात आला. राजश्री ची मानसिक तयारी केली गेली, तिचं वागणं बदललं, शिक्षणाबद्दल पराकोटीची घृणा आणि नकारात्मक भावना मनात बसली. सहकारी आणि सोबतच्या लोकांमुळे आता राजश्री गुटखा खाऊ
लागली, जीन्स- टी शर्ट घालू लागली, तिची नजर पार बदलून गेली होती, लहान मुलीच्या नजरेतली निरागसता कुठेच लुप्त होत गेली.

वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी लढणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांची त्याच संध्याकाळी भेट घेतली, ते शांतपणे सर्व सांगत होते आणि आमच्या मनात तयार झालेल्या चित्राची काळी बाजू आणखी गर्द होत जात होती.
राजश्री, देवदासी झाल्यावर हक्काने आणि राजरोस पणे गोंधळात नाचायला जाऊ लागली, तिच्याबद्दल सर्व बोलणी, बिदागी तिची आई, बाप ( बुआ) आणि गौतम करायचा, राजाश्रीला तिचा फुटकळ मोबदला मिळायचा. पण तो तिला मोठा वाटू लागला, पैशाची चटक लागत गेली.

ती एका भयान आणि अंधाऱ्या भूयाराकडे चालली आहे हे तिच्या लक्षात येणे कठीण होते. आजूबाजूची परिस्थिती, अशिक्षितपणा, अल्लड वय, प्रचंड गरिबी, तिला अनाहूतपणे हे सर्व करायला भाग पाडत होते.

वय वर्ष फक्त १३, सूत्रांकडून असं समजलं कि आजी च्या घरी काही अज्ञात व्यक्ती रात्रीचे यायचे, दारू आणि मटणाचा बेत व्हायचा, रात्रभर वस्ती व्हायची. याचा अंदाज काय बांधायचा ? आमचं मन तयार होत नव्हतं.
राजश्री ला भेटलो तेव्हा "गौतम ने जसं केलं तर आणखी कुणी केलं कं तुझ्यासोबत?" तेव्हा "न्हाय, फक्त गौतमच करायचा" असं ती म्हणाली होती. मग हे सर्व जे नंतर समजलं ते ? गुंगीचे औषध किंवा जबरदस्तीने ?
... हात पाय आणि मेंदू बधिर होत जाण्यापेक्षा या प्रश्नांचं उत्तर टाळणे सहज
शक्य होतं, आणि आम्ही तेच केलं.

राजश्री, गरोदर आहे आणि आता मुल पाडणे शक्य नाही हे समजताच आणि आपलं कारस्थान उघडं पडेल या भीतीने "बाप" ने गौतम चे कान भरले, हि मुलगी तुला जेल मध्ये पाठवेल, तुला जबरी शिक्षा होईल, हिने पोर वाढवून तुला फसवलाय, असं सांगून गौतम ला फरार केले.
गौतम आणि राजश्री यांचे प्रेमसंबंध होते असे राजश्री मान्य करते पण त्याच्या असं पळून जाण्याने त्याच्या मनात प्रेम बीम काही नव्हतं आणि आपली फसवणूक झाली आहे असं तिला कळून चुकलं.

"बाप" ने जे गौतम सोबत केले तेच राजश्री सोबत केले, आपले पितळ झाकून ठेवण्यासाठी राजश्रीच्या मनात गौतम बद्दल विष तयार केले, त्यांनीच तुला फसवलय, तुला अशी दोन जीवाशी सोडून गेला असं सांगून तोच तुझ्या बरबादीला कारणीभूत आहे असं सर्व तिच्या मनात टाकले आणि रचलेला हा खेळ अगदी तसाच घडत गेला.

राजश्री बाप आणि आजी यांच्या विरोधात काहीच बोलत नाही, ती उलट आजी कशी आहे, मला भेटायचं आहे असं म्हणते. निष्पाप आणि निर्मळ मनाला उमजतच नाहीये कि आपले कोण आणि परके कोण ?

जे तिचे आपले होते ते परके झाले आणि ज्याला आपले मानले तो फरार झाला होता.

राजश्रीच्या हातात आता फक्त तिच्या उदरातून आलेली, तिच्या हाडामासाची बनलेली तिची मुलगी होती ... आणि बाकीच्यांची सहानुभूती ... बस्स !

राजश्री तिच्या मुलीला शिकवायचं आहे म्हणते, तिचं जे झालं ते झालं, मुलीला मोठं करून स्वतःच्या पायावर उभं करायचं स्वप्न ती उराशी बाळगून आहे.

ती सध्या बाल सुधार केंद्रात आहे, बाप(बुआ)
आणि आजी पोलिसांच्या ताब्यात आणि गौतम फरार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या काही मुली राजश्रीला सुद्धा शिकवतात, ती आता पुन्हा वाचू आणि लिहू लागली आहे.

देवदासी बनवलेल्या एका मुलीला भेटून आल्यावर चा वृतांत !

अमोल गायकवाड
कायद्याने वागा - लोकचळवळ