मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

Blog

Warkari Parampara / About Pandharpur Pilgrimage

Posted on June 30, 2016 at 12:10 AM


खालील  माहिती श्री प्रशांत वोर्लीकार मुंबई ह्यांनी पाठविली आहे :

वारीची परंपरा ही श्री माऊलीच्याही पूर्वीपासून चालत

आलेली आहे. श्री माऊलींचे पणजोबा श्री त्र्यंबकपंत कुलकर्णी

हेसुद्धा आपेगाव ते पंढरपूर वारी करत. श्री माऊली, श्री

नामदेवमहाराज, श्री सांवतामाळी, श्री चोखोबा, श्री

तुकाराम महाराज आदी सर्व संतांची मांदियाळी त्यांच्या

काळात पंढरीच्या पांडुरंगाची वारी करीत असे. किंबहुना,

ज्या भागवत-धर्माची मुहूर्तमेढ श्री संतांनी रोवली त्याचा

विस्तार करण्यासाठी त्यांचे एकत्र भेटण्याचे ठिकाण व समय

म्हणजे पंढरीची आषाढ शुद्ध एकादशीची वारी असेच म्हणावे

लागेल.

आजच्या पालखी सोहळ्याची परंपरा ही जगद्गुरु संत तुकाराम

महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव तपोनिधी श्री नारायण

महाराज देहुकर यांनी इ.स. १६८५ साली म्हणजेच जगद्गुरु संत

तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनानंतर (इ.स. १६४९)  ३६

वर्षांनी सुरू केली. तुकोबारायांच्या पादुका श्री देहू

क्षेत्रावरून पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीत येऊन श्री

माऊलींच्या पादुकांसमवेत पंढरीस घेऊन जाण्याची परंपरा

अशी सुरू झाली. तपोनिधी श्री नारायण महाराज देहुकर

यांनीच वारी सोहळ्यात आणि संप्रदायात ‘ज्ञानोबा-

तुकाराम’ या भजनाची प्रथा सुरू केली. हा ऐश्वर्यपूर्ण पालखी

सोहळा इ.स. १६८५ पासून इ.स. १८३० पर्यंत एकत्रितपणे सुरू

राहिला. त्यानंतर पुढे देहुकर मोरे यांच्या सांगण्यावरून थोर

भगवद्भक्त व पूर्वाश्रमीचे श्रीमंत शिंदे सरकार यांचे पदरी

सरदार असणारे; परंतु नंतर विरक्त होऊन आळंदीस वास्तव्यास

असणारे श्रीगुरु हैबतबाबा यांनी इ.स. १८३१ पासून श्री

माऊलींच्या पादुकांची स्वतंत्र आषाढ वारी सुरू केली. आज

जो पालखी सोहळा आपणास दिसतो त्याचे हे विशेष स्वरूप

श्रीगुरु हैबतबाबा यांनीच सिद्ध केले.

सातारा जिल्ह्यातील आरफळ हे श्रीगुरु हैबतबाबांचे मूळ गाव.

पुढे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या दरबारात श्रीगुरु

हैबतबाबांनी सरदार म्हणून मोठा लौकिक प्राप्त केला.

त्यानंतर, मूळ गावाची भेट घडावी या हेतूने लवाजमा व संपत्ती

बरोबर घेऊन श्रीगुरु हैबतबाबा गावी यायला निघाले. मात्र

सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये भिल्लांनी त्यांची सर्व

संपत्ती हरण करून त्यांना व त्यांच्या बरोबरच्या लोकांना

गुहेमध्ये कोंडून घातले. श्री ज्ञानोबारायांचे निस्सीम भक्त

असणार्या श्रीगुरु हैबतबाबांनी अहोरात्र चिंतन आणि

हरिपाठाचा घोष सुरू केला. योगायोगाने एकविसाव्या

दिवशी भिल्ल नायकाची पत्नी प्रसृत होऊन तिला मुलगा

झाला. त्या आनंदाप्रीत्यर्थ भिल्ल नायकाने गुहेवरील शिळा

दूर केली तेव्हा श्रीगुरु हैबतबाबा व अन्य लोक

अन्नपाण्याअभावी निश्चेष्ट पडल्याचे त्याला दिसले. त्या

अवस्थेतही श्रीगुरु हैबतबाबांच्या मुखातून हरिपाठाचे अभंग

उमटत होते. हे पाहून त्या भिल्ल नायकाने श्रीगुरु हैबतबाबांची

पूर्ण शुश्रुषा करून त्यांची संपत्तीसह सन्मानाने मुक्तता केली.

श्री ज्ञानोबारायांच्या कृपाप्रसादानेच आपला जणू

पुनर्जन्म झाला या भावनेने श्रीगुरु हैबतबाबा आरफळला न

जाता थेट आळंदीस आले व अखेरपर्यंत ते श्री माऊलींच्या सेवेत

मग्न राहिले. रात्रभर श्री माऊलींच्या समाधीसमोर उभे राहून

भजन करण्याचा परिपाठ श्रीगुरु हैबतबाबांनी अखंड जपला.

पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणून श्रीगुरु हैबतबाबा

यांनी श्रीमंत शिंदे सरकार यांचे दरबारी सरदार असलेले श्रीमंत

अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे, हत्ती, तंबू वगैरे

लवाजमा, नैवेद्याची व्यवस्था, जरीपटका आदी सरंजाम घेतला.

त्यातील हत्ती वगळता बाकीचा सारा सरंजाम आजतागायत

चालू आहे. श्रीगुरु हैबतबाबा यांचा मूळ पिंड सरदार

घराण्याचा असल्याने, त्यांनी वारी सुरू करताना संपूर्ण

सोहळ्याला लष्कराच्या तुकडीसारखे शिस्तबद्ध स्वरूप दिले.

त्यांना सहकार्य श्री. वासकर, श्री. सुभानजी शेडगे,

खंडोजीबाबा वाडीकर, आजरेकर प्रभृतींचे होते. म्हणून आजही

या सर्व दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहेत. आजही वारी

सोहळ्यातील शिस्त, नियम, चालण्याचा क्रम, भजनाची पद्धत

इतर प्रथा, निर्णय घेण्याची पद्धत श्रीगुरु हैबतबाबा यांनी

इ.स. १८३१ पासून ज्या प्रकारे सुरू केली तशीच पाळली जाते.

पुढे, १८५२ साली पंच समितीची स्थापना झाली.

 राम कृष्ण हरी 

Categories: None