मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

Blog

Ganapati

Posted on September 13, 2016 at 12:20 AM

गणपती - माझा आणि तुमचा

त्याच्या मूर्तीकडे कितीही वेळा पाहून किंवा एकटक न्याहाळून समाधान झालंय असं सहसा घडत नाही. डोळे भरून पाहतच बसावं असं ते लोभस रूप, दिव्यत्वाची साक्ष देणारे ते ओजस्वी डोळे, भान हरपून जाईल असे तेजोवलय, नीटनेटकी ठेवलेली वळणदार सोंड, क्षणार्धात तुमच्या संकटांना हमखास नाहीसं करण्याची हमी देणारं ते स्मित, उदंड आशीर्वादाची उधळण करणारा तो गुबगुबीत हात आणि लहान मुलासारखा मोदकासाठी पुढे केलेला नाजूक हात, लाललाल मखमली पितांबर आणि मऊशार गादी. एका दृष्टिक्षेपातच 'सुखकर्ता' या विशेषणाला शंभर टक्के न्याय देणारा आणि संकटसमयी देवाचं नाव घ्यायचं झालंच तर डोळ्यासमोर सर्वप्रथम येणारा 'दुःखहर्ता', चौसष्ठ कलांचा अधिपती म्हणजेच माझा आणि तुमचा गणपती. त्याच्या मूर्तीरुपी अस्तित्वाने भारलेलं आणि मंगलमय झालेलं वातावरण म्हणजे आपल्या घरातला गणेशोत्सव.

हा गणपती आपल्या मराठी लोकांच्या फारच जवळचा असल्यासारखं मला नेहेमी वाटतं. बघा न, बोलता येऊ लागल्यावर ज्या पध्दतीने लहान मुलाला 'गंपती' बोलायला शिकवल्यापासून ते मोठे झाल्यावरसुद्धा आपणही कधी याला अहो जाहो केल्याचं आठवत नाही. तुमच्याकडे गणपती आणला का रे पासून त्याला वेळेवर नैवेद्य दाखव वगैरे सर्व एकेरीत. माझ्या माहितीप्रमाणे भारतातील इतर भाषिक गणपतीला गणेशजी, गणेश महाराज, श्रीगणेश असे संबोधतात. आपणच जणू गणपती हा आपल्या रोजच्या बैठकीतला असल्यासारखे अरेतुरे करत असतो. गणपती कधी आहे रे? याचा अर्थ गणेशोत्सव कधी आहे, गणपतीला कपडे शिवायचेत - म्हणजे या सणानिमित्त आपल्याला कपडे घ्यायचेत, गणपतीला रंग लावायचाय - म्हणजे घरी रंगकाम करावयाचे आहे, गणपतीची साफसफाई चाललीये - म्हणजे घर धुवायला काढलंय, गणपतीचं बुकिंग केल का? म्हणजे गावाला जायची तिकिटं काढली का हे सर्व अर्थ मराठी घरात अध्याहृतच असतात. काही दिवसांपूर्वी माझ्या ऑफिस मधले कामगार एकत्र पणे समोर येऊन ' सर, गणपतीला सुट्टी पाहिजे' असे म्हणताच ' घेऊन दे कि त्याला सुट्टी, गणपतीचं तो, मी कोण अडवणार' असला फालतू विनोद मी केल्याचं मला आठवतंय.

हिंदुस्थानात एकही चित्रकार असा नसेल कि ज्याला गणपतीचे नेहेमीपेक्षा वेगळे रूप चितारायचा मोह झाला नसेल. रझा नावाच्या एक मुस्लिम चित्रकाराने आपली बोटे रंगात बुडवून तबल्याच्या तालावर काढलेल गणपतीचं चित्र माझ्या घरी आहे. अगणित रंगाची उधळण करत काढलेली चित्रे असोत व कुंचल्याच्या एक फटकाऱ्याने काढलेले चित्र असोत पाहताक्षणी प्रेमात पडावे असे त्याचे रूप त्या कागदावर नक्कीच उमटलेले असते. सध्या काही उत्साही कलाकार तुमच्या नावाच्या किंवा आडनावाच्या अक्षरांनी गणपतीचे चित्र काढतात. मान खूपच तिरकी करून आणि अक्षरं जुळवत तुम्हाला ती वाचावी लागतात. "पै" किंवा जोंधळेगावकर अशा आडनावांचा गणपती कसा बनेल हा विषय माझ्या कुतूहलाचा आहे.

सार्वजनिक गणपतीची वेशभूषा हा एक वेगळा विषय. या गणेशोत्सवानिमित्त कोणत्यातरी देवाच्या किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या रूपात गणपतीची मूर्ती बनवणारे आणि ती बनवून घेणारे भक्त पण अति उत्साहीच म्हणावेत. कृष्ण आणि रामाच्या रूपात ठीक आहे हो, पण साईबाबांच्या रूपात अंगावर त्यांच्यासारखे कपडे घातलेला, स्वामी समर्थांच्या रुपातला बसलेला गणपती किंवा अण्णा हजारे सारखा दिसणारा टोपी घातलेला गणपती असले भयानक प्रयत्न केल्याचे मी याचीडोळे पहिले आहे आहे. या वर्षी अजूनही 'पर्शा' च्या रुपातला सैराट गणपती दिसण्यात आला नाही हे माझ्यासारख्या भक्ताचे नशीबच म्हणावे. सार्वजनिक मंडळांसाठी घडवलेला शंकराच्या रुपातला रागीट गणपती तुम्ही फेसबुकवर पाहिलाय का ? नसेल तर शोधून पहा . दणकट असे आठ हात, प्रत्येक हातात एक धारदार शस्त्र घेतलेला , त्वेषात उभा राहिलेला असा काही भयानक आणि रागारागानं पाहणारा बनवलाय कि विचारता सोय नाही. शत्रूंच्या नायनाट करणारा वगैरे असला तरी इतक्या रौद्र रुपातला बाप्पा नाही पाहावत आम्हाला. नवसाला पावणारा सार्वजनिक गणपती हा तर एक मोठा विनोद आहे. खरंच नवसाला पावत असेल तर लालबागच्या परिसरात चाळीत राहणारा माणूस आज बंगल्यात दिसला असता आणि तो गणपतीपण विसर्जनाच्या त्रासातून वाचला असता...नवसाला पावतो तर कायमस्वरूपी देऊळच बांधा की. काहीही करून व्हीआयपी पास मिळवून अशा गणपतीचे दर्शन घायचे हे फ्याड वाढत चाललंय हल्ली ...जाऊदे , सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने याच्या वर अधिक न बोलणेच चांगले.

काही असो, गणपतीचा कोप होतो हे फारसे ऐकिवात नाही म्हणून किंवा गणपतीने मुबलक स्वातंत्र दिलय म्हणून त्याच्या रूपाचं काहीही करायचं हे मनाला पटत नाही. गणपती हा तोच आणि तस्साच असावा, लहानपणी गोष्टीत वाचलेला, शंकर पार्वतीने जन्माला घातलेला आणि आपल्या आजी आजोबानी आपल्या समोर मांडलेला, गुबगुबीत गादीवर लोड पाठीशी घेऊन मांडी ठोकून बसलेला, केविलवाणा चेहेरा करून मागणीची भली मोठी यादी मनात घेऊन नमस्कार करणाऱ्या भक्ताकडे पण मोहकपणे हसणारा, म्हटलं तर निरागस बाळासारखा आणि म्हटलं तर घरातल्या ज्येष्ठ पुरुषासारखा.

गणपतीच्या चरणी लीन होत, त्याच्या भक्तीत तल्लीन होत, त्याच्या रूपात एकरूप होत, त्याच्या ठायी असलेला एकतरी गुण आपल्याला स्पर्शून जावा आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याचे सार्थक व्हावे या पेक्षा दुसरं काय मागू याच्याकडे ?

समीर गुप्ते

samhere#sameergupte.blogspot.in#ganpati#mazaanitumcha#ganpatibappamorya#funwriting#enjoyreading#sameer6949@gmail.com

Categories: None