मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

Blog

Bhulabai / Navratri

Posted on October 4, 2016 at 12:20 AM


हरवलेली भुलाबाई

भुलाबाई लेकी आल्यात या की ...

एक लिम्बू झेलू बाई दोन लिम्बू झेलू

अरडी ग परडी ग परड़ी एवढे काय ग? दारी उभा कोण ग .?.... साती दरवाजे लावा ग बाई आणि झाबरं कुत्र सोडा ग बाई ..

काही आठवले? मी भुलाबाई आणि भूलोजी बद्दल बोलतेय. भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यन्त घरोघरी भुलाबाई आणि भूलोजीचा मुक्काम असायचा आणि त्यांच्या बरोबर असायचा हळकुंड बाळा . भुलाबाई आणि भूलोजी म्हणजेच शंकर आणि पार्वती असं म्हणतात आणि हळकुंड म्हणजेच गणपति. त्यांची स्थापना झाली की मग पुढे छान आरास मांडली जायची .गल्लित जवळ पास राहणाऱ्या समवयस्क मुली एकत्र जमायच्या मग भुलाबाईची गाणी म्हंटली जायची , त्यांना खाऊ दिला जायचा आणि मग दुसऱ्या घरी गाणी म्हणायला निघायच्या. सर्वांकडे गाणे गाऊन आणि खाऊ खाऊन झाल्यानंतर सगळ्या आपापल्या घरी जायच्या. भुलाबाई देखील माहेरी येतात असं म्हणतात आणि त्यावेळी माहेरी आलेल्या माहेरवाशिणी आपल्या मैत्रिणींना आपले सासर कसे आहे , सासरची मंडळी , त्यांचे स्वभाव ,तिथले वर्णन गाण्याच्या माध्यमाने सांगायच्या.

आज माझ्या लेकीसाठी (प्रचितीसाठी भुलाबाई इंदौरहून मागावल्या , मुंबईत भोंडल्याची प्रथा त्यामुळे भूलोजी भुलाबाईची मूर्ति मिळणे अशक्य ,मग माझी मैत्रीण सौ सोनाली बापट हिने इंदौरहून भुलाबाईआवर्जून पाठवल्या. लहानपण आठवले. आई-वडिलांच्या मागे लागून लाल-हिरव्या रंगाचे टिपर्यांचे जोड पटेलच्या दुकानावरून आणले जायचे. उंच कोनाड्यात आरास करायची. गणपती हा मोठा सण तरी मला आणि माझ्या मैत्रिणींना ओढ लागायची ती -बाप्पांच्या विसर्जनानंतर घरात येणाऱ्या गुलाबाईची. पुराणिक आजी, केसकर काका यांच्याकडून गुलाबाईची मूर्ति आणायची, आम्ही मूली भुलाबाईची गाणी म्हणायला जायचो खूप मजा यायची ( इंदौर कड़े भुलाबाई ला गुलाबाई आणि भूलोजी ला गुलोजी असेही म्हणतात गाणी झाली की मग लपवलेला खाऊ ओळखावा लागत असे ती ही एक वेगळीच मजा. आमचा साधारण 15/20 मुलींच्या ग्रुप असे,प्रत्येकाच्या घरी जाऊन भुलाबाईची गाणी म्हणायची ,गोडा आणि तिखट पदार्थांची रेलचेल असायची इतके खाल्यावर घरी जाऊन जेवण नाहीच. महिनाभर हीच मजा. माझी आई भारी हौशी... हौस म्हणून माझी आई पण या उत्साहात सहभागी व्हायची. शाळेतून येताना रोज वेगळा खाऊ आणायची .माझ्या बहिणीही असायच्या. टिपर्यांच्या तालावर भुलाबाईची गाणी म्हणायची आणि दोन दोन मुलींची जोड़ी असायची टिपऱ्या खेळायला. दोघी -दोघी मुली हळकुंड बाळासाठी तळहाताचा पाळणा करायच्या. सगळे गाणे गाऊन निज निज माझ्या बाळा असा पाळणा म्हणून शेवटी पुष्पांजली म्हणायच्या "पुष्पांजली तुला अर्पिते प्रेम गुलाबाई अज्ञानाते दूर करुनी सन्मती मज देई". कोजागिरी पौर्णिमेपर्यन्त खूप मजा असायची .7 च्या आत घरात असं म्हणणाऱ्या आया गुलाबाई खेळण्यासाठी मात्र नियम बाजूला ठेवायच्या. कुठलं गाणं म्हटलं आणि कोणता खाऊ मिळाला हे विचारताना आई स्वतःच तिच्या बालपणीच्या भावविश्वात हरवून जायची. भुलाबाईची

स्थापना करण्याचा संबंध एकत्र कुटुंब पद्धतीशी निगडीत असावा असं मी कुठे वाचले होते, तरुण्यात येणाऱ्या मुलींमध्ये सर्जनशक्ति वाढावी संसार नेमकं काय याचे वर्णन ,नाती गोती म्हणजे काय? वैवाहिक जीवनाची पूर्वकल्पनाच म्हणा न ! तसेच आपली व्यथा गाण्यात मांडून सासुरवासाच्या दुःखाला महिलांनी वाचा फोडावी . दुःख सुसह्य व्हावे म्हणून ही प्रथा सुरु झाली असावी असे वाचण्यात आले होते .

कारल्याचे वेल लाव ग सूने मग जा आपल्या माहेरा माहेरा...

करल्याचे वेल लावले हो सासुबाई अता तरी धाड़ा माहेरा माहेरा,असे अनेक गाण्यांवरून सासुरवाशिणीची होणारी घुसमट सर्वांना कळायची. यादव राया राणी रुसुन बैसली कैसी खरंतर हे यादव कालीन गाणी आहे या गाण्यातही रुसलेली सून तिला मनवायला नथ घेवून गेलेली सासू. सुनेचे हटून बसणे यात ही आगळी गम्मतच आहे भुलाबाईच्या रुपात ती आपल्याला कळते .विदर्भ मध्यप्रदेश मध्ये अजून ही काही घरांमध्ये हा सण हौसेने साजरा करतात. काही वर्षापूर्वी या उत्सवाची कथा एका लेखात वाचली होती .एकदा शंकर पार्वती सारीपाट खेळतात सारीपाटाच्या डावात पार्वती जिंकते आणि शंकर पार्वतीवर रुसुन निघुन जातात ,पर्वती मग भिल्लीणीचे रूप घेऊन त्यांचा शोध घेते . शंकर भिल्ल रूपात तिला भेटतात भिल्ल शब्दाचा अपभ्रंश झाला आणि भिल्लीणीची भुलाबाई आणि भिल्लाचे भूलोजी झाले. हळूहळू काळमानानुसार भुलाबाईच्या स्थापना करण्याची प्रथा लोप पावत आहे .मनोरंजनाचे विपुल साधने आणि करिअर करण्याच्या नादात भुलाबाईची ही सुन्दर प्रथा खंडित झालेली दिसते .तरी देखील काही परम्परा व् संस्कृतीचा वारसा जपणारे लोकं अजुन 5 किंवा 10 दिवस भुलाबाईचा उत्सव साजरा करतात . इंदौर ला काही ठिकाणी भुलाबाईच्या गाण्यांची स्पर्धा अजुनही असते. असो बरेच वर्षानंतर मला देखील प्रचिती मुळे आपले बालपण जगायला मिळणार आहे. इतक्या वर्षांनी हरवलेली भुलाबाई मला पुन्हा सापडली आहे आणि आज हे वाचल्या नंतर सगळ्या मैत्रिणींना देखील लहानपण आठवेल असं माझं ठाम मत आहे.

सौ धनश्री संकेत देसाई 

नेरुळ

 

Categories: None