मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

Blog

Story of Shravan Fridays in Marathi

Posted on August 22, 2015 at 12:05 AM


This artcile/ story is shared by Ms. Sadhana Bendrey  Los Angeles

शुक्रवारची कहाणी...

जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. जिवती पूजनाचे हे व्रत श्रावण महिन्यात दर शुक्रवारी करतात. जिवती या व्रताची देवता आहे . ही लहान मुलांचे रक्षण करणारी आहे.

पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात. हल्लीच्या काळात छापील चित्रांचीही पूजा केली जाते.घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवतीमातेने त्यांचे रक्षण करावे अशी तिला मनोभावे प्रार्थना करायची अशी प्रथा आहे.

श्रावणी शुक्रवार व जिवती पुजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे.श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करून सवाष्णींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो.श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. ही पुजा संतती रक्षणार्थ मानली जाते.

जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार येईल त्या दिवशी देव्हा-याच्या भिंतीवर लावावा. श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच जिवतीची पुजा करावी.फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेला २१ मण्यांचा कापसाचा चौसर तिला घालावा. गंध, हळदि-कुंकू, अक्षता लावाव्यात. जिवतीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दुध्-साखरेचा व चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. स्वयंपाक वरण्-भात्-तूप, लिंबू, भाजी, पुरण, खीर, चटणी, कोशिंबीर, तळण, वाटली डाळ, आमटी असा करावा.ह्या दिवशी मुलांना वाण म्हणून "आरत्या" देतात त्या कराव्या.(आरत्या- कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकेरीत तळलेया पु-या.)देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा.सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी.जेवावयास बसण्यापुर्वी पानापुढे विडा दक्षीणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा-नारळाने ओटी भरावी.

जिवतीची पुजा करून तिला दिवा उतरावा.तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना पण दिवा उतरावा. .कुंकू अक्षता लावून चणे साखर फुटाण्याचे व आरत्याचे वाण द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, व दिर्घायुश्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी.परगावी जर मुलं असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्या सारखे होईल.

पुर्वी श्रावण महिन्यात दररोज त्या दिवशीच्या वाराची कहाणी वाचली जात असे. काही लोक अजूनही वाचत असतील. त्या वाराच्या दैवताची आराधना केल्यामुळे तो (किंवा ती प्रसन्न झाला (किंवा झाली. त्यांची कृपा कोणा भक्तावर झाल्यामुळे त्याला कशाची प्राप्ती झाली याची सुरस गोष्ट त्या कहाणी मध्ये असते.

शुक्रवाराची जिवतीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. “ अग अग सुईणी, मला नाळवारीसुद्धां एक मुलगा गुपचुप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन.” सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली.

गांवांत एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हां ही सुईण तिच्या घरीं गेली, तिला सांगूं लागली कीं, “बाई बाई, तूं गरीब आहेस, तुझं बाळंतपणाचं पोट दुखूं लागेल तेव्हां मला कळव, मी तुझं बाळंतपण फुकट करीन.”

तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली, “बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरांत एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचींच दिसताहेत. तेव्हां आपल्या घरापासून तों तिथपर्यंत कोणास कांही कळणार नाहीं असं एक गुप्त भुयार तयार करावं.

आपल्यास कांहीं दिवस गेल्याची अफवा उठवावी. “मी तुम्हांस नाळवारीचा मुलगा आणून देईन.” असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला, तिने जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणं डोहाळ्याचं ढोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरितां त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं. नऊ मास भरतांच बाळंतपणाची तयारी केली.

इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखूं लागलं. सुईणीला बोलावणं आलं त्याबरोबर “तुम्ही पुढं व्हा, मी येतें,” म्हणून तिने सांगितलं. ती धांवत धांवत राणीकडे आली, पोट दुखण्याचं ढोंग कर म्हणून सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरीं आली. “बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहींस, नाहीं बांधलेस तर भय वाटेल.” असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला.

सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला, आणि तिच्यापुढें ठेविला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगूं लागली. तिनं नशिबाला बोट लावलं. मनामध्यें दुःखी झालीं. सुईण निघून राजवाड्यांत गेली.

राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊं लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावणामासीं दर शुक्रवारीं जिवतीची पूजा करावी, आणि नमस्कार करून म्हणावं कीं, ‘जय जिवती आई माते! जिथं माझं बाळ असेल, तिथं खुशाल असो.” असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमीं वागूं लागली.

इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशीं बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशीं ही न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हां याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्रीं तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्रीं तिच्या घरीं आला. दारांत गाय-वासरूं बांधली होतीं. चालतां चालतां राजाचा पाय वासरांच्या शेपटीवर पडला. वांसराला वाचा फुटली. तें आपल्या आईला म्हणालं, “कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला?” तेव्हां ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जावयास भीत नाहीं, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय?” हें ऐकून राजा मागं परतला आणि घरीं येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली.

काशीस जाऊं लागला. जातां जातां एका ब्राह्मणाच्या इथें उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होतीं. पण तीं पांचवी-सहावीच्या दिवशीं जात असत. राजा आला त्या दिवशीं चमत्कार झाला. पांचवीचा दिवस होता. राजा दारांत निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणूं लागली, ‘ कोण ग मेलं वाटेंत पसरलं आहे ?” जिवती उत्तर करते, “ अग अग, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी कांहीं त्याला ओलांडूं देणार नाहीं.” मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होती. त्यांनीं हा संवाद ऐकला.

इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी जिवती आपापल्या रस्त्यांनीं निघून गेल्या. उजाडाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. “तुमच्यामुळें आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा.” अशी विनंती केली राजानं ती मान्य केली. त्याही रात्रीं याचप्रमाणं प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला.

इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढं काशींत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळीं ते घ्यायला दोन हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरीं जा. सार्‍या गांवांतल्या बायका पुरुषांस जेवायला बोलाव. म्हणजे याचें कारण समजेल.”

त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली.तो घरीं आला. त्या दिवशी शुक्रवार होता. त्याने गांवांत ताकीद दिली. “घरीं कोणीं चूल पेटवूं नये. सगळ्यांनीं जेवायला यावं,” ब्राह्मणीला मोठं संकट पडलं तिने राजाला निरोप धाडला. “मला जिवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन.” राजानं कबूल केलं. जिथं तांदुळाचं धूण होतं तें काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहींत. कारल्याच्या मांडवांखालून गेलीं नाहीं. दर वेळेस “जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असॊ,” असं म्हणे.

पुढं पानं वाढलीं. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढतां वाढतां ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढूं लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडांत उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. कांहीं केल्या उठेना. तेव्हां त्याची आई गेली. त्याची समजूत काढू लागली. तो म्हणाला, “असं होण्याचं कारण काय?” तिनं सांगितलं कीं, “ ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई.” असं सांगून सर्व हकीकत सांगितली.

नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्यासुद्धां आपण राज्य करूं लागला. तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

श्री जिवतीची आरती..

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।

सुखी ठेवी संतति विनंति

तव चरणी ॥ धृ. ॥

श्रावण येतांची आणूं प्रतिमा ।

गृहांत स्थापूनी करुं पूजना ।

आघाडा दूर्वा माळा वाहूं या ।

अक्षता घेऊनी कहाणी सांगू या ॥ १ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।

सुखी ठेवी संतति विनंती

तव चरणी ॥ धृ. ॥

पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।

सुवासिनींना भोजन देऊ ।

चणे हळदिकुंकू दूधही देऊं ।

जमुनी आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।

सुखी ठेवी संतति विनंति

तव चरणी ॥ धृ. ॥

सटवीची बाधा होई बाळांना ।

सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना ।

यासाठी तुजला करिती प्रार्थना ।

पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।

सुखी ठेवी संतति विनंति

तव चरणी ॥ धृ. ॥

तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।

वंशाचा वेल वाढूं दे ।

सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।

मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥

जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।

सुखी ठेवी संतति विनंति

तव चरणी ॥ धृ. ॥

(P.Pradhan)

Categories: None