मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

राशिभविष्य - मार्च, २०२१.

दादा दामले ( dadadamle@gmail.com)

=========================================================

सूचना - प्रत्येक राशिभविष्याच्या अखेरीस त्या राशीच्या जन्मनक्षत्रांसाठी त्या त्या जन्मनक्षत्राचा

तारक मंत्र दिला आहे. आपल्या जन्मनक्षत्राच्या तारक मंत्राचा उपाय म्हणून मनापासून, श्रद्धेने उपयोग केल्यास जीवनात येणाऱ्या अडचणी, अडथळे, व्याधी, पीडा, आजार व अन्य समस्या यांचे निवारण होते असा अनेकांचा अनुभव आहे. आपणही तसा प्रयत्न करून पाहावा व

आपणांसही तसा अनुभव येत असल्यास आम्हांस कळवावे.

==================================================================

(१) मेष - या राशीच्या प्रथम (लग्न) स्थानी याच राशीत हर्षल असून त्याच्यामुळे या राशीच्या मंडळीचा वर्तमान स्वभाव अस्थिर, चंचल, लहरी, धाक, दडपण सहन न होणारा असा झाला असावा असे वाटते. या राशीची लहान मुले तर अधिक खोडकर, खट्याळ, अशी झाली असावी, असेही वाटते. असे असले तरी हा हर्षल शास्त्रीय संशोधन कार्यक्षेत्र असणारांना उपयुक्त व प्रगतिकारक होईल. या राशीच्या धनस्थानी वृषभ राशीत मंगळ आणि राहू असे दोन ग्रह असून त्यापैकी राहूमुळे कौटुंबिक जीवनात कलह, आर्थिक चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळामुळे उष्णताविकाराचे आजार त्रस्त करतील. तसेच काही जणांना अनपेक्षितपणे येणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची जबाबदारी त्रस्त करण्याची शक्यता आहे. या राशीच्या अष्टम स्थानी वृश्चिक राशीत केतू असून या केतूमुळे वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबात कलह निर्माण होणे संभवते. काही मंडळींना रक्तविकार तर काहींना त्वचा रोगाचे आजार त्रस्त करतील. या राशीच्या दशम स्थानी मकर राशीत बुध -गुरु-शनि असे तीन ग्रह असून बुध ग्रहामुळे मानसिक, कौटुंबिक सुखसमाधान मिळेल. धनवृद्धी होईल. गुरु-शनि चिकित्सक बौद्धिक क्षेत्र नोकरी,व्यवसाय असणारांना अनुकुल, प्रगतिकारक व लाभदायक होतील. काही मंडळींना मानसन्मान लाभेल; तर काही मंडळींना नवे कार्यक्षेत्र मिळेल. या राशीच्या लाभस्थानी कुंभ राशीत रवि - शुक्र - नेपच्यून असे तीन ग्रह असून दिनांक ११ पासून दशम स्थानी असलेला बुध ग्रह या लाभस्थानी येत आहे. रवि -बुध -शुक्र हे तिन्ही ग्रह अनुकुल होणार असून रविमुळे काही मंडळींना नोकरीत बढती, क्वचित कोणास उच्च पद मिळणे संभवते, स्वतंत्र व्यवसाय असणारांच्या व्यवसायात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. शुक्रामुळे ऐषाराम, धनलाभ होईल व मन:शांती लाभेल. बुधामुळे मित्रलाभ, धनलाभ होईल व सुखसमाधान लाभेल. पण नेपच्यूनमुळे आर्थिक घोटाळे, आर्थिक नुकसान होणे संभवते. तसेच काही मंडळींना कुमार्गी मित्रांमुळे मनस्ताप सहन करावा लागेल व नैराश्य येईल. महिन्याच्या उत्तरार्धात लाभस्थानी असलेले रवि -शुक्र या राशीच्या व्ययस्थानी जात आहेत. त्यावेळी रविमुळे प्रतिकुल परिस्थिती निर्माण होईल व त्यामुळे शरीरपीडा, मानभंग होणे संभवते. पण शुक्रामुळे क्षणिक सुखसमाधान लाभेल. श्रद्धा असेल तर श्रीगणेश उपासना अनुकुल होईल व मन:शांती लाभेल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर “श्रीगणेशअथर्वशीर्षा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र अश्विनी आहे त्यांनी ”ओम अश्विनीकुमाराभ्यां नमः: “ मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र भरणी आहे त्यांनी “ओम यमाय नमः:” मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र कृत्तिका आहे त्यांनी “ओम अग्नये नमः: “ मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(२) वृषभ - या राशीच्या प्रथम (लग्न) स्थानी याच राशीत मंगळ व राहू असे दोन ग्रह आहेत. पैकी मंगळ नोकरदार मंडळींना प्रतिकुल होईल. त्याच्यामुळे स्वभाव हट्टी, मानापमान फार असणारा असा घडणे संभवते. त्यामुळे अकारण शरीरपीडा, दगदग, श्रम होतील व थकावट जाणवेल. जपा. शिवाय तो अनारोग्यकारक होणेही संभवते. राहूमुळे अपमान होण्याची शक्यता आहे. तसे घडले तर मनात सूडभावना प्रबळ होईल. जपा. या राहूमुळे काहीजणांना वातविकाराचा आजार त्रस्त करण्याची शक्यता आहे. या राशीच्या सप्तम स्थानी वृश्चिक राशीत केतू असून त्याच्यामुळे वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येणे संभवते. मनस्थिती अस्थिर राहील. या राशीच्या भाग्यस्थानी मकर राशीत बुध -गुरु-शनि असे तीन ग्रह असून बुध ग्रह प्रतिकुल होईल व त्याच्यामुळे भांडणे होणे, नियोजित कार्यात अडथळे येणे, दिरंगाई होणे संभवते. शनीमुळे काही मंडळींना दूरच्या प्रवासाचे योग येतील. पण तीव्र अशुभ असे काही घडण्याची शक्यता दिसत नाही. गुरु ग्रह पूर्णपणे अनुकुल असून त्याच्यामुळे उत्कर्ष होईल, कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. प्रवास योग येईल. अध्यात्मात रस असणारांना आध्यात्मिक प्रगती करणे शक्य होईल. काहींना कीर्ती, प्रसिद्धी मिळणेही संभवते. येथील बुध ग्रह दिनांक ११ पासून या राशीच्या दशम स्थानी जात आहे. या दशम स्थानी कुंभ राशीत रवि -शुक्र- नेपच्यून असे तीन ग्रह आहेतच. पैकी रवि -बुध अनुकुल होतील व त्यांच्यामुळे नोकरदार मंडळींना आर्थिक लाभ होईल, काही मंडळींना बढती, काहींचा मानसन्मान होईल, तर क्वचित कोणास एखादे उच्च पद मिळणेही शक्य आहे. बुधामुळे मानसिक व कौटुंबिक सुखसमाधान लाभेल. पण शुक्रामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायात अडचणी, अडथळे निर्माण होणे संभवते. नेपच्यून- -मुळे मनस्थिती अस्थिर राहील. पण हा नेपच्यून मनोवैज्ञानिक आणि द्रव पदार्थ व्यापारी यांना अनुकुल व लाभदायक होईल. महिन्याच्या उत्तरार्धात येथील रवि -शुक्र या राशीच्या लाभस्थानी मीन राशीत जात आहेत. त्यावेळी ते दोघेही या राशीच्या मंडळींना अनुकुल होतील व त्यांच्यामुळे सर्व प्रकारे सुखसमाधानच लाभेल. धनलाभ होईल, व मन:शांती लाभेल. या राशीच्या व्ययस्थानी मेष राशीत हर्षल असून तो प्रतिकुल होईल व त्याच्यामुळे सांपत्तिक अडचणी, शत्रुत्व, वाईट प्रसंग अशापैकी संकटाना तोड द्यावे लागेल. जपा. श्रद्धा असेल तर श्रीशिव शंकराची उपासना व श्रीहनुमान उपासना मन:शांती देईल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर “शिवलीलामृत स्तोत्रा”चे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी “हनुमानचालिसा स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र कृत्तिका आहे त्यांनी “ओम अग्नये नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र रोहिणी आहे त्यांनी “ओम ब्रह्माय नमः:” मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र मृग आहे त्यांनी “ओम सोम सोमाय नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(३) मिथुन - या राशीच्या षष्ठ स्थानी वृश्चिक राशीत केतू असून त्याच्यामुळे आचारविचार उच्च राहतील. मन उदार राहील, आरोग्य उत्तम राहील, इतरांचे सहकार्य लाभेल. या राशीच्या अष्टम स्थानी मकर राशीत बुध -गुरु-शनि असे तीन ग्रह असून गुरुमुळे ज्यांच्या जन्मकुंडलीत अचानक धनलाभ योग आहे अशापैकी काहींना असा अचानक धनलाभ होईल. काही मंडळींना वारसा हक्काने अचानक धनलाभ होईल. बुधामुळे नियोजित कार्यात यश मिळेल व कार्यसिद्धी होईल व सुखसमाधान लाभेल. पण शनि ग्रह प्रतिकुल असल्याने कोणास मोठा आजार होणे संभवते. कोणास दु:ख , त्रास, मनस्ताप, अपेक्षाभंग अशापैकी काही तरी सहन करावे लागेल. येथील बुध दिनांक ११ पासून या राशीच्या राशीच्या भाग्यस्थानी कुंभ राशीत जात आहे. या भाग्यस्थानी रवि -शुक्र- नेपच्यून असे तीन ग्रह आहेतच. पैकी रवि -बुध हे दोन ग्रह प्रतिकुल होणार असून त्यांच्यामुळे भय, निराशा, आजार, मानसिक ताण, वडील व्यक्तींचा विरोध सहन करावा लागेल. बुधामुळे वाद, भांडणे होतील. नियोजित कार्यात अडथळे येतील. कार्य दिरंगाई होईल. पण शुक्रामुळे गुरुकृपा, सुसंगती, थोरकृपा, ऐषाराम, सुखसमाधान लाभेल. काही भाग्यवंत मंडळींना प्रसिद्धी मिळू शकेल. नेपच्यून शुभ असून त्याच्यामुळे अध्यात्मात रस असणारांना उपासनेद्वारे आध्यात्मिक प्रगती करणे शक्य होईल. काही मंडळींना परदेशगमनाची संधी मिळेल. येथील रवि -शुक्र महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या दशम स्थानी मीन राशीत जात आहेत. तेव्हा रविमुळे या राशीच्या नोकरदार मंडळींना आर्थिक लाभ होतील. काही मंडळींना बढती, काहींना मानाचे स्थान तर क्वचित कोणास कीर्ती, प्रसिद्धी मिळण्याची शक्यताही दिसते. पण शुक्रामुळे स्वतंत्र व्यवसाय असणारांच्या व्यवसायात अडचणी, अडथळे, दु:ख निर्माण होण्याची शक्यता आहे. जपा. या राशीच्या लाभस्थानी मेष राशीत हर्षल असून त्याच्यामुळे मित्रांशी भांडणे होतील. सर्व काही अनिश्चित असेच घडेल. या राशीच्या व्यय स्थानी वृषभ राशीत मंगळ व राहू असे दोन ग्रह असून येथील मंगळ पूर्णपणे प्रतिकुल होईल. त्याच्यामुळे आर्थिक चिंता, अनारोग्य, भांडणे, गैरसमजुती, मानहानी, जुन्या प्रकरणांचा पुन्हा त्रास होणे संभवते. राहूमुळे अर्थलाभ, परदेशगमन योग येऊ शकेल. पण त्याच्यामुळे वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येण्याची शक्यताही दिसते. श्रद्धा असेल तर श्रीगुरुदेव दत्तात्रेयाची उपासना अनुकुल होईल व मन:शांती मिळेल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर “बावन्न श्लोकी गुरुचरित्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना “ ज्यांचे जन्मनक्षत्र मृग आहे त्यांनी “ओम सोम सोमाय नम:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र आर्द्रा आहे त्यांनी “ओम नम: शंकराय” मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र पुनर्वसू आहे त्यांनी “ओम अदितीये नमः” मंत्राचा मनापासून श्रद्धेने १०८ वेळा जप करावा.

(४) कर्क - या राशीच्या पंचम स्थानी वृश्चिक राशीत केतू असून त्याच्यामुळे या राशीच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय तो अनारोग्यकारक होणेही संभवते. या राशीच्या सप्तम स्थानी मकर राशीत बुध - गुरु -शनि असे तीन ग्रह आहेत. पैकी बुध ग्रह प्रतिकुल असून त्याच्यामुळे दु:ख, भांडणे, वियोग अशापैकी घटना घडणे संभवते. शनीमुळे प्रवृत्ती शांत राहील. पण तो उशीरा विवाहयोग देतो. गुरुमुळे ज्यांचे प्रेमसंबंध आहेत त्यांच्या प्रेमसंबंधात वाढ होईल. नवे स्नेहसंबंध जुळून येतील. वाढत्या वयातील मंडळींना विवाहयोग येणेही संभवते. काही मंडळींना अर्थलाभ होईल. तर काहींना प्रवासयोग येईल. महिन्याच्या उत्तरार्धात येथील बुध या राशीच्या अष्टम स्थानी कुंभ राशीत जात आहे. त्याशिवाय या अष्टम स्थानी रवि, शुक्र व नेपच्यून असे तीन ग्रह आहेतच. तेथील रवि ग्रह प्रतिकुल होईल व त्याच्यामुळे इच्छा आकांक्षा अपूर्ण राहतील. दु:ख, अपयश सहन करावे लागेल. तसेच संततिसुखात बाधा येणे संभवते. भावनेच्या भरात काहीजण भरकटत जातील. काहीजणांची रोगप्रतिकारशक्ती कमी होईल. पण बुध ग्रह अनुकुल होईल व त्याच्यामुळे कार्यसिद्धी होईल, नियोजित कार्यात यश मिळेल व सुखसमाधान लाभेल. शुक्रामुळे कमी श्रमात अपेक्षेपेक्षा अधिक अर्थलाभ होईल. जन्मकुंडलीत योग असेल तर काही मंडळींना अचानक धनलाभ होणे संभवते. काही मंडळींना वारसा हक्काने असा धनलाभ होईल. पण या राशीच्या वृद्ध मंडळीना हा शुक्र प्रतिकुल होईल. नेपच्यूनमुळे जलभय, विषभय असल्याने जलप्रवास करू नका, खोल पाण्यात पोहू नका. तसेच बाहेरील उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. येथील रवि -शुक्र महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या भाग्यस्थानी मीन राशीत जात आहेत. त्यावेळी रवि ग्रह प्रतिकुलच होईल व त्याच्यामुळे कसले तरी भय, मानसिक ताण, आजार, वडील मंडळींचा विरोध सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पण शुक्र ग्रह अनुकुल होणार असल्यामुळे सुखसमाधान लाभेल, काही मंडळींना गुरुकृपा तर काहींना थोरकृपा प्राप्त होईल. काही मंडळींना प्रसिद्धी मिळणेही संभवते. या राशीच्या दशम स्थानी मेष राशीत हर्षल असून तो नोकरी-व्यवासायास अनुकुल होईल व

त्याच्यामुळे काही मंडळींना नोकरीत बढती मिळेल. स्वतंत्र व्यवसाय असणारांच्या व्यवसायात वाढ होईल. विशेष करून उच्च बौद्धिक कार्यक्षेत्र असणारांना तो प्रगतिकारक व यशदायक होईल. या राशीच्या लाभस्थानी वृषभ राशीत राहू व मंगळ असे दोन ग्रह असून राहूमुळे संततिविषयक चिंता त्रस्त करील. अधिकाराचा दुरुपयोग करून वाममार्ग धन मिळविण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. पण कटाक्षाने तो मोह टाळाच. होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही, जपा. जुगाराच्या नादी लागू नका. मंगळामुळे कष्ट-परिश्रमानेच अर्थलाभ होईल. मैत्रीत वितुष्ट येणे संभवते. पण काही भाग्यवान मंडळींना मौल्यवान वस्तूचा लाभ होण्याची शक्यता आहे. श्रद्धा असेल तर श्रीगुरुदेव दत्तात्रेयाची उपासना मन:शांती देईल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर “बावन्न श्लोकी गुरुचरित्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र पुनर्वसु आहे त्यांनी “ओम आदितीये नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र पुष्य आहे त्यांनी “ ओम बृहस्पतये नमः:” मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र आश्लेषा आहे त्यांनी “ ओम सर्पाय नमः” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(५) सिंह - या राशीच्या चतुर्थ स्थानी वृश्चिक राशीत केतू असून त्याच्यामुळे घरात कोणाशी पटणार नाही. कसली तरी चिंता त्रस्त करील. हा केतू विषभयकारक असल्यामुळे घरीदारी खाद्यपदार्थांची काळजी घ्या. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. या राशीच्या षष्ठ स्थानी मकर राशीत बुध -गुरु-शनि असे तीन ग्रह असून हे तिन्ही ग्रह दशम या नोकरी-व्यवसाय स्थानास पूरक होतील. पण येथील शनीमुळे गैरसमज, वाद, भांडणे होतील व शत्रुत्व निर्माण होणे संभवते. जपा. त्याच्यामुळे अनारोग्य होणेही शक्य आहे. पण या षष्ठ स्थानी गुरु असल्यामुळे आरोग्य चांगले राहील व नोकरचाकरांचे सुख लाभेल. बुधामुळे कार्यसिद्धी होईल , धनलाभ होणेही संभवते. काही मंडळींना कीर्ती, प्रसिद्धी मिळण्याची शक्यताही दिसते. या राशीच्या सप्तम स्थानी कुंभ राशीत रवि -शुक्र-नेपच्यून असे तीन ग्रह असून दिनांक ११ पासून या राशीच्या षष्ठ स्थानी असलेला बुध सप्तम स्थानी जात आहे. येथील रवि केंद्रस्थानी असल्यामुळे अनुकुल असला तरी त्याच्यामुळे जीवनसाथी/संगिनीला अनारोग्य होणे संभवते. विशेष करून पोटविकार त्रस्त करण्याची शक्यता दिसते. शुक्रामुळे वैवाहिक जीवनातील सुखसमाधान लाभेल. प्रेमिकांचे प्रेमविवाह होतील. पतिपत्नीपैकी कोणी कलाकार असल्यास अधिकच सुख मिळेल. पण बुध -नेपच्यून प्रतिकुल असल्यामुळे विविध कारणांनी वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. येथील रवि -शुक्र महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या अष्टम स्थानी मीन राशीत जात आहेत. येथील रवि पूर्णपणे प्रतिकुल होईल व त्याच्यामुळे दु:ख, अनारोग्य, अपयश, संततिविषयक चिंता, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, भावनेच्या भरात भरकटत जाणे अशापैकी घटना घडण्याची शक्यता आहे. जपा. पण महिनाअखेरीस शुक्र अनुकुल होईल व त्याच्यामुळे कमी श्रमात अपेक्षेपेक्षा अधिक अर्थलाभ होणे, जन्मकुंडलीत योग असेल तर अचानक धनलाभ होणे, किंवा वारसाहक्काने धनलाभ होणे अशापैकी काही मनोनुकुल घटना घडतील. या राशीच्या भाग्यस्थानी मेष राशीत हर्षल असून तो शास्त्रीय संशोधन कार्यक्षेत्र असणारांना प्रगतिकारक व यशदायक होईल. काही मंडळींना दूरच्या प्रवासाचे तर काहींना परदेशगमनाचे योग येतील. या राशीच्या दशम स्थानी वृषभ राशीत राहू व मंगळ असून

हा राहू शासकीय नोकरदार मंडळींना अनुकुल होईल व काही मंडळींना जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल बढती मिळेल, काहींचा सन्मान केला जाईल व हाती अधिकार, सत्ता मिळू शकेल. पण मंगळ ग्रह स्वतंत्र व्यापार-व्यवसाय असणारांना घडणाऱ्या खळबळजनक घटनांना सामोरे जावे लागेल. पण हा मंगळ औषधविक्रेते, यांत्रिकतांत्रिक व्यवसाय असणारांना अनुकुल होण्याची शक्यता आहे. श्रद्धा असेल तर कुलदैवताची उपासना मन:शांती देईल. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र मघा आहे त्यांनी “ओम पितराय नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वा आहे त्यांनी “ओम भगाय नमः:” मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तरा आहे त्यांनी “ओम आर्यमे नमः:”मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(६) कन्या - या राशीच्या तृतीय स्थानी वृश्चिक राशीत केतू असून त्याच्यामुळे व्यापारी मंडळींना स्त्री -ग्राहकांकडूनच अधिक अर्थलाभ होईल. पण हा केतू मानसिक दु:खदायक असल्याने या राशीच्या मंडळींनी आध्यात्मिक उपासनेकडे लक्ष द्यावे. या राशीच्या पंचम स्थानी मकर राशीत बुध -गुरु-शनि असे तीन ग्रह असून शनीमुळे स्वभाव स्वार्थी, संशयी, व्यवहारी असा घडण्याची शक्यता आहे. पण तो चिकाटीचा गुण देणारा व गुरु ग्रहासह असल्याने बौद्धिक कार्यास अनुकुल होईल व या राशीच्या विद्यार्थ्याना शैक्षणिक प्रगती करणे शक्य होईल. गुरु ग्रहामुळे सुखसमाधान मिळेल व अर्थलाभ होणेही संभवते. बुध ग्रह मात्र प्रतिकुल होणार असून त्याच्यामुळे संततीपासून त्रास होण्याची शक्यता आहे. या राशीच्या षष्ठ स्थानी कुंभ राशीत रवि -शुक्र- नेपच्यून असे तीन ग्रह असून दिनांक ११ पासून बुध ग्रह या स्थानी येत आहे. येथील रवि -बुध दशम या नोकरी-व्यवसाय स्थानास पूरक होतील. पण येथील रवि अनारोग्यकारक होणे संभवते. बुधामुळे कार्यसिद्धी होईल व अर्थलाभ होईल. क्वचित कोणास प्रसिद्धी मिळणेही संभवते. शुक्रामुळे सर्व प्रकारच्या कलाकारांना उच्च गुण असूनही कलेतील कर्तृत्व सिद्ध करण्यास संधीच मिळणार नाही. त्यामुळे काही कलाकार निराशेने व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे. काहींवर कसले तरी आळ येण्याची शक्यता आहे. नेपच्यूनमुळे काही मंडळींना उगीचच आपल्याला काही आजार झाल्याची भावना त्रस्त करील. काही मंडळींना काल्पनिक चिंता त्रस्त करतील. काहींना फसवणुकीचा त्रास सहन करावा लागेल. महिन्याच्या उत्तरार्धात येथील रवि -शुक्र या राशीच्या सप्तम स्थानी मीन राशीत जात आहेत. हा रवि केंद्रस्थानी असल्यामुळे अनुकुल असला तरी त्याच्यामुळे अनारोग्य होणे संभवते. विशेष करून पोटविकार त्रस्त करतील. पण शुक्रामुळे प्रेमिकांचे प्रेमविवाह होतील. वैवाहिक जीवनातील सुखसमाधान लाभेल. या राशीच्या अष्टम स्थानी मेष राशीत हर्षल असून तो अपघातकारक असल्यामुळे सतत सावधानतेने आचरण करा. या राशीच्या भाग्यस्थानी वृषभ राशीत मंगळ व राहू असे दोन ग्रह असून ते दोन्ही ग्रह प्रवासयोग देतील. पण प्रवासात त्रास. व मानहानी होणे संभवते म्हणून शक्यतो प्रवास करू नका. श्रद्धा असेल तर कुलदेवतेची उपासना व गुरुदेव दत्तात्रेयाची उपासना मन:शांती देईल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर “बावन्न श्लोकी गुरुचरित्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने उत्तरा जन्मनक्षत्र असणारांनी _”ओम आर्यमे नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र हस्त आहे त्यांनी “ओम सूर्याय नमः: “ मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र चित्रा आहे त्यांनी “ ओम त्वष्टे नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(७) तुळा - या राशीच्या धनस्थानी वृश्चिक राशीत केतू असून त्याच्यामुळे आर्थिक समस्या, चिंता त्रस्त करतील. या राशीच्या चतुर्थ स्थानी मकर राशीत बुध -गुरु-शनि असे तीन ग्रह असून बुधामुळे गृहसौख्य व मित्रसुख मिळेल; गुरुमुळे कौटुंबिक सुखसमाधान मिळेल, स्थावर खरेदीविक्रीचे व्यवहार होतील; पण नातलगांपैकी कोणाकडून तरी मनस्ताप दिला जाण्याची शक्यता आहे. जपा. शनि पूर्णपणे प्रतिकुल असून त्याच्यामुळे दु:ख, नैराश्य, गृहसौख्य हानी होणे संभवते. येथील बुध दिनांक ११ पासून या राशीच्या पंचम स्थानी कुंभ राशीत जात असून या पंचम स्थानी रवि -शुक्र- नेपच्यून असे तीन ग्रह आहेतच. . येथील रविमुळे महिन्याच्या पूर्वार्धात अनारोग्य, अपघात, नोकरीत वरिष्ठांचा जाच, कटुंबातील प्रिय जनांपासून दुरावा, संततीपैकी कोणाचे आजारपण अशापैकी कारणांनी नैराश्य येण्याची शक्यता आहे. बुधामुळे स्त्री, संततिपासून त्रास,भय निर्माण होणे संभवते. महिन्याच्या पूर्वार्धात शुक्रामुळे सर्व प्रकारच्या कलाकारांना आपल्या कलेतील प्रगतीचा आनंद प्राप्त होईल. नेपच्यूनमुळे मनस्थिती अत्यंत भावनाशील होईल; पण हा नेपच्यून अध्यात्मात रस असणारांना आध्यात्मिक प्रगती करण्यास अनुकुल होईल. तसेच गूढ संशोधन कार्यास अनुकुल होईल. येथील रवि -शुक्र महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या षष्ठ स्थानी मीन राशीत जात आहेत. त्यावेळी रवि दशम या नोकरी- व्यवसाय स्थानास पूरक होईल, हितशत्रू पराभूत होईल, शांति लाभेल, भाग्योदय होईल, पण काही मंडळींना हृदयविकाराचा आजार त्रस्त करण्याची शक्यता आहे. पण शुक्रामुळे या राशीच्या सर्व प्रकारच्या कलाकारांना उच्च गुणवत्ता असूनही आपल्या कलेतील कर्तृत्व प्रदर्शित करण्यास संधीच मिळणार नाही. या राशीच्या सप्तम स्थानी हर्षल असून त्याच्यामुळे जीवनसाथी/संगिनीचे आचरण लहरी, विक्षिप्त असे होईल व त्यामुळे पतिपत्नीत मतभेद, वाद, भांडणे होतील. त्यामुळे वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येईल. जपा. तसेच ज्यांचा भागीदारीत व्यापार-व्यवसाय असेल त्यांनी संशय, मतभेद अशापैकी कारणांनी भागीदारीत बाधा येणार नाही, याची काळजी घ्यावी. या राशीच्या अष्टम स्थानी वृषभ राशीत राहू व मंगळ असे दोन ग्रह असून येथील मंगळ अनारोग्यकारक होईल. मूळव्याधीसारखे उष्णताविकाराचे आजार होतील, हाडमोड होणेही संभवते. काही मंडळींना नैराश्य येईल. त्याशिवाय पाण्यापासून व विजेपासून धोका असल्याने जलप्रवास करू नका, खोल पाण्यात पोहावयास जाऊ नका. तसेच विजेची उपकरणे सावधानपूर्वक हाताळा. राहूमुळे काही मंडळींना अचानक धनलाभ होणे संभवते. पण त्याच्यामुळे वैवाहिक जीवनातील सुखात व संततिसुखात बाधा येण्याची शक्यता आहे. श्रद्धा असेल तर श्रीशिवशंकराची उपासना मन:शांती देईल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर “श्रीशिवलीलामृत स्तोत्राचे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र चित्रा आहे त्यांनी “ओम त्वष्टे नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र स्वाती आहे त्यांनी “ ओम वायवे नमः “ मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र विशाखा आहे त्यांनी “ओम इंद्राग्नये नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(८) वृश्चिक - या राशीच्या प्रथम (लग्न) स्थानी याच राशीत केतू आहे. तो सुखसमाधान, ऐषाराम देऊ शकेल. पण त्याच्यामुळे वाहनधोका संभवतो. जपा. या राशीच्या तृतीय स्थानी मकर राशीत बुध -गुरु-शनि असे तीन ग्रह असून बुधामुळे शत्रुत्व होणे, शत्रूपासून भय असणे संभवते. जपा. गुरु ग्रहामुळे यात्रा होतील, प्रवासयोग येईल, या राशीच्या लेखकांचे लेखन ग्रंथरूपात प्रसिद्ध होईल, पण भावंडांपैकी कोणाकडून तरी मनस्ताप दिला जाण्याची शक्यता आहे. जपा. शनि ग्रहही अनुकुल होईल व काहीजणांना उत्तम नोकरी, काहींना आवडते कार्यक्षेत्र मिळू शकेल. पण भावण्डविषयक एखादी चिंता त्रस्त करण्याची शक्यता आहे. या राशीच्या चतुर्थ स्थानी कुंभ राशीत रवि -शुक्र- नेपच्यून असे तीन ग्रह असून दिनांक ११ पासून बुध ग्रह या चतुर्थ स्थानी कुंभ राशीत येत आहे. रवि ग्रह प्रतिकुल होणार असून त्याच्यामुळे अनारोग्य, निराशा, कार्य दिरंगाई, कौटुंबिक त्रास, दु:ख, आर्थिक चिंता त्रस्त करण्याची शक्यता दिसते. बुधामुळे गृहसौख्य व मित्रसुख मिळेल, पण आर्थिक नुकसान होणेही संभवते. जपा. शुक्रामुळे शेतीवाडी असणारांना त्यापासून लाभ होईल, व ऐषाराम मिळू शकेल. नेपच्यूनमुळे घरगुती जीवनात गैरसमज, घोटाळे होणे संभवते. येथील रवि -शुक्र महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या पंचम स्थानी मीन राशीत जात असून रवि ग्रह प्रतिकुलच होईल व त्याच्यामुळे अनारोग्य, अपघात, नोकरीत वरिष्ठांचा जाच, नातेवाईक मंडळींपासून फारकत, अस्वस्थ मनस्थिती, संततिविषयक समस्या अशापैकी घटना घडणे संभवते. पण शुक्रामुळे सर्व प्रकारच्या कलावंत मंडळींना त्यांच्या कलेत प्रगती करणे शक्य होईल व सुखसमाधान लाभेल. या राशीच्या षष्ठ स्थानी मेष राशीत हर्षल असून तो उच्च बौद्धिक कार्यक्षेत्र व शास्त्रीय संशोधन कार्यक्षेत्र असणारांना पूरक होईल. पण अशा कार्यक्षेत्रात असणारांनी सतत खोल विचार करत बसू नये. कारण तसे केल्यास मेंदूवर ताण पडेल व काही मंडळींना डोकेदुखीचा तर काहींना मेंदूविकाराचा आजार त्रस्त करील. मनस्थिती अस्वस्थ राहील व काही मंडळींना मुदतीचा ताप येणेही शक्य आहे. जपा. या राशीच्या सप्तम स्थानी वृषभ राशीत मंगळ व राहू असे दोन ग्रह असून राहूमुळे मनात कपटी विचार येतील, वाम मार्ग धन मिळविण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. पण तो विचार मनातून काढून टाका. नपेक्षा नुकसानच होईल. त्याशिवाय या राहूमुळे वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येईल. मंगळामुळेही जीवनसाथी /संगिनीचे अनारोग्य, वैवाहिक जीवनातील अन्य कटकटीमुळे वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येईल. तसेच ज्यांचा भागीदारीत व्यापार-व्यवसाय आहे त्यांनी गैरसमज, संशय, वादविवाद अशापैकी कारणांनी भागीदारीत बाधा येणार नाही, याची काळजी घ्यावी. श्रद्धा असेल तर श्रीगणेश उपासना मन:शांती देईल. दररोज सकळी स्नान झाल्यावर “:श्रीगणेश अथर्वशीर्षा”चे पठण करा. तसेच दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र विशाखा आहे त्यांनी “ओम इंद्राग्नये नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र अनुराधा आहे त्यांनी “ओम मित्राय नमः:” मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र ज्येष्ठा आहे त्यांनी “ ओम इंद्राय नमः:” मंत्राचा १०८ वेळा जाप करावा.

(९) धनु - या राशीच्या व्ययस्थानी वृश्चिक राशीत केतू असून त्याच्यामुळे या राशीच्या मंडळींचा स्वभाव लहरी, चंचल असा घडण्याची शक्यता आहे. या राशीच्या धनस्थानी मकर राशीत बुध -गुरु -शनि असे तीन ग्रह असून शनि ग्रह पूर्णपणे प्रतिकुल होईल व त्यामुळे आर्थिक संकटे येतील. शिवाय कुटुंबात अनिष्ट घटना घडण्याची शक्यता आहे. बुधामुळे दु:ख झाले तरी तो धनदायक होईल. गुरु ग्रह पूर्णपणे अनुकुल होईल व त्याच्यामुळे कुटुंबात शुभ घटना घडतील. व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ होईल. उत्तम अर्थलाभ होईल. या राशीच्या तृतीय स्थानी कुंभ राशीत रवि - शुक्र -नेपच्यून असे तीन ग्रह असून दिनांक ११ पासून बुध ग्रह या तृतीय स्थानी कुंभ राशीत येत आहे. येथील नेपच्यूनमुळे मनस्थिती अत्यंत भावनाशील होईल. त्यामुळे अध्यात्मात रस असणारांना उपासनेद्वारे आध्यात्मिक प्रगती करणे शक्य होईल. तसेच हा नेपच्यून गूढ संशोधन कार्यासही अनुकुल व यशदायक होईल. त्याच्यामुळे या राशीच्या काही मंडळींना जलप्रवासाची तर काही मंडळींना परदेशगमनाची संधी मिळेल. शुक्रामुळे काही मंडळींना भूमिलाभ होणे संभवते. काहींना धनलाभ, मान, प्रतिष्ठा असे काही मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यापारी मंडळीना स्त्री-ग्राहकांकडूनच अधिक अर्थलाभ होईल. रवि ग्रहही अनुकुल असून त्याच्यामुळे सर्व सुख, आरोग्य, धन -मान-प्रतिष्ठा असे सर्व काही मिळू शकेल. तुमच्या कार्यशैलीचा प्रभाव पाहून वरिष्ठ खूष होतील. पण बुधामुळें शत्रुत्व होणे, शत्रूपासून भय असणे संभवते.जपा. काही मंडळींवर राजद्रोहाचा आरोप येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. महिन्याच्या उत्तरार्धात येथील रवि -शुक्र या राशीच्या चतुर्थ स्थानी मीन राशीत जात आहेत. त्यावेळी रवि ग्रह प्रतिकुल होईल व त्याच्यामुळे अनारोग्य, कार्यदिरंगाई, कौटुंबिक त्रास, दु:ख, आर्थिक चिंता, अशापैकी कारणांनी गहिरे नैराश्य येईल. जपा. पण शुक्र ग्रह अनुकुल होईल व त्याच्यामुळे सुख, ऐषाराम,तर काहींना स्रीप्राप्ती होईल. तसेच ज्यांची शेतीवाडी आहे त्यांना त्यापासून लाभ होईल. या राशीच्या पंचम स्थानी मेष राशीत हर्षल असून त्याच्यामुळे बौद्धिक दृष्ट्या उच्च संशोधन कार्यक्षेत्रअसणारांना आपल्या कार्यात प्रगती करणे शक्य होईल. या राशीच्या षष्ठ स्थानी वृषभ राशीत मंगळ व राहू असून राहूमुळे स्वभाव धूर्त, कावेबाज होणे संभवते. पण त्याच्यामुळे हितशत्रू पराभूत होतील. शिवाय ज्यांचा अन्य जातिधर्माच्या मंडळींशी व्यावसायिक संबंध आहे अशा मंडळींना अशा संबंधामुळे लाभ होतील. मंगळ ग्रह अनारोग्यकारक होईल व त्याच्यामुळे ताप येणे, इजा होणे, फोड येणे, रक्तविकार, हृदयविकार बळावणे, त्याशिवाय चोरी होणे, अपप्रचाराचा त्रास होणे, आर्थिक नुकसान होणे संभवते. जपा. श्रद्धा असेल तर श्रीगुरुदेव दत्तात्रेयाची उपासना अनुकुल होईल व मन:शांती लाभेल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर “बावन्न श्लोकी गुरुचरित्रा “चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र मूळ आहे त्यांनी “ओम निऋतये नमः” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वाषाढा आहे त्यांनी “ओम उदकाय नमः:” मंत्राचा व ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तराषाढा आहे त्यांनी “ “ओम विश्वेदेवाय नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(१०) मकर - या राशीच्या लाभस्थानी वृश्चिक राशीत केतु असून तो अनुकुल होईल व तो सर्व प्रकारे सुखकारक होईल. त्याच्यामुळे हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल व अर्थलाभ होईल. तसेच प्रवासाचे खूप योग येतील. या राशीच्या प्रथम (लग्न)स्थानी याच राशीत बुध -गुरु-शनि असे तीन ग्रह असून बुध -शनि प्रतिकुल होतील व बुधामुळे मनस्थिती अस्थिर,चंचल होईल व त्यातून धननाश, मित्रद्रोह होणे संभवते. तसेच कुसंगतीची बाधा होईल. शनिमुळे कुटुंबातील प्रिय जनांपैकी कोणाचे स्थलांतर झाल्यामुळे बेचैन अवस्था होईल. स्वतः:च्या व जीवनसाथीच्या अनारोग्याची समस्या त्रस्त करील, नियोजित कार्यात अडचणी,अडथळे निर्माण होतील व त्यामुळे नैराश्य येईल. पण काहींना दूरच्या प्रवासाचे योग येणेही संभवते. गुरु ग्रह अनुकुल असला तरी मकर राशीत अशक्त असल्यामुळे अति उत्तम प्रकारे अनुकुल होणार नाही. पण तो बौद्धिक संशोधन कार्यक्षेत्र असणारांना काही प्रमाणात अनुकुल होईल. लेखन ग्रंथरूपात प्रकाशित होईल. या राशीच्या धनस्थानी कुंभ राशीत रवि -शुक्र- नेपच्यून असे तीन ग्रह असून दिनांक ११ पासून बुध ग्रह या राशीत धनस्थानी जात आहे. पैकी रवि -बुध -नेपच्यून हे तीन ग्रह प्रतिकुल होतील. केवळ शुक्रामुळे काही प्रमाणात सुखसमाधान मिळेल. येथील रवि -शुक्र महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या तृतीय स्थानी मीन राशीत जात आहेत. त्यावेळी ते दोन्ही ग्रह अनुकुल होतील व रविमुळे आरोग्य उत्तम राहील, नोकरीत वरिष्ठ तुमच्या कार्यशैलीवर प्रसन्न होतील., काही मंडळींना बढती, मानाचे स्थान मिळू शकेल. क्वचित कोणास एखादे उच्च पद मिळणेही संभवते. धनलाभ होईल व सर्व काही सुखकारक होईल. शुक्रामुळे काही मंडळींना भूमिलाभ होण्याची शक्यता आहे. काहींना मानाचे स्थान किंवा प्रतिष्ठा मिळू शकेल. धनलाभ होणेही संभवते. येथील शुक्रामुळे या राशीच्या व्यापारी मंडळींना स्त्री-ग्राहकांकडूनच अधिक अर्थलाभ होईल. या राशीच्या चतुर्थ स्थानी मेष राशीत असून हर्षल असून त्याच्यामुळे स्वभाव अस्थिर, चंचल होईल व त्यामुळे कोणाशी पटणार नाही, सतत तक्रारी करत राहाल व आहे त्या परिस्थितीत कशातही सुखसमाधान लाभणार नाही. वास्तुसुखही लाभणार नाही. या राशीच्या पंचम स्थानी वृषभ राशीत मंगळ व राहू असे दोन ग्रह असून ते दोघेही प्रतिकुल होतील. त्यांच्यामुळे अनारोग्य होईल, संततिपैकी कोणाच्या आचरणविषयक समस्या त्रस्त करतील. या राशीच्या गर्भवती स्त्रियांनी अकारण दगदग करू नये. उलट सांभाळूनच राहावे. असे असले तरी येथील राहू दलाली, कमिशनवर व्यवसाय असणारांना अनुकुल व लाभदायक होईल. श्रद्धा असेल तर “श्रीशिवोपासना “ व “श्रीहनुमान उपासना “ अनुकुल होईल व मन:शांती लाभेल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर “शिवलीलामृत स्तोत्रा”चे पठण करा. तसेच रात्री झोपी जाण्यापूर्वी “हनुमानचालिसा स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तराषाढा आहे त्यांनी “ओम विश्वेदेवाय नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र श्रवण आहे त्यांनी “ओम विष्णवे नमः:” मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र धनिष्ठा आहे त्यांनी “ओम वसवे नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(११) कुंभ - या राशीच्या दशम स्थानी वृश्चिक राशीत केतू आहे. त्याच्यामुळे या राशीच्या काही मंडळींना हातचे सोडून नवीन काही करण्याची ऊर्मि येईल. पण तो विचार त्यांनी मनातून काढून टाकावा. आहे ती नोकरीच सहनशील बनून करावी. तेच सुखाचे होईल. या राशीच्या व्ययस्थानी मकर राशीत बुध -गुरु-शनि असे तीन ग्रह आहेत. हे तिन्ही ग्रह या राशीच्या मंडळींना प्रतिकुलच होणार आहेत. बुधामुळे आजार, मानहानी, आर्थिक चिंता, नियोजित कार्यात अपयश अशापैकी घटना घडण्याची शक्यता आहे. गुरुमुळे कौटुंबिक त्रास, अपेक्षाभंग, प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. पण हा गुरु अध्यात्माची आवड असणारांना व सामाजिक कार्यात रस असणारांना अनुकुल व यशदायक होईल. शनि ग्रह पूर्णपणे प्रतिकुल असून त्याच्यामुळे मानहानी, अनारोग्य, मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. या राशीच्या मंडळीनी सर्व आर्थिक व्यवहार विचारपूर्वक व सावधानतेनेच करावेत. या राशीच्या प्रथम (लग्न) स्थानी रवि -शुक्र-नेपच्यून असे तीन ग्रह असून दिनांक ११ पासून व्ययस्थानी असलेला बुध ग्रह प्रथम स्थानी येत आहे. नेपच्यूनमुळे सध्या या राशीच्या मंडळींची मनस्थिती अतिशय कोमल झाली असल्यास मानसिक संवेदनाही अति जलद होत असण्याची शक्यता दिसते. त्यामुळे मनाविरुद्ध थोडे काहीही घडले तरी लगेच गहिरे नैराश्य येत असावे, असे वाटते. रविमुळे अनारोग्य, मनस्ताप, चिंता, थकवा, पीछेहाट अशापैकी घटना घडण्याची शक्यता आहे. रक्तदाब, हृदयविकार असणारांनी विशेष जपावे. बुधामुळे मनस्थिती चंचल होईल व त्यामुळे काही मंडळींना कुसंगतीची बाधा होणे संभवते. तसेच आर्थिक नुकसान होणे, मित्रद्रोह होणे संभवते. पण शुकामुळे वैवाहिक जीवनातील सुख मिळेल. येथील रवि -शुक्र महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या धनस्थानी जात आहेत. रविमुळे वाद, भांडणे होणे, नेत्रविकार होणे, आर्थिक नुकसान होणे, काही मंडळींना वाढत्या खर्चाची चिंता त्रस्त करणे संभवते. पण शुक्र ग्रह अनुकुल होईल व त्याच्यामुळे कौंटुंबिक जीवनात सुखसमाधान लाभेल. धनलाभ होईल. मन:शांती लाभेल. या राशीच्या तृतीय स्थानी मेष राशीत हर्षल असून तो उच्च बौद्धिक कार्यक्षेत्र असणारांना अनुकूल, प्रगतिकारक व यशदायक होईल. शिवाय त्याच्यामुळे काही मंडळींना परदेशगमनाची संधी मिळेल. या राशीच्या चतुर्थ स्थानी वृषभ राशीत मंगळ व राहू असून हे दोन्ही ग्रह कौटुंबिक जीवनातील सुखात बाधा निर्माण करतील. गैरसनाज, वाद, असमाधानकारक घटना, अन्य कटकटी, अपयश अशापैकी घटना घडतील व अस्वस्थ व्हाल. जपा. श्रद्धा असेल तर श्रीशिव शंकराची उपासना व श्रीहनुमान उपासना मन:शांती देईल. . दररोज सकाळी स्नान झाल्यावर “शिवलीलामृत स्तोत्रा”चे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी “हनुमानचालिसा स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र धनिष्ठा आहे त्यांनी. “ओम वसवे नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र शततारका आहे त्यांनी “ओम वरुणाय नमः:” मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वाभाद्रपदा आहे त्यांनी “ ओम अजैकचरणाय नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(१२) मीन - या राशीच्या भाग्यस्थानी वृश्चिक राशीत केतू असून त्याच्यामुळे या राशीच्या काही मंडळींचे आचरण “ वरून कीर्तन, आतून तमाशा “ अशा प्रकारचे धूर्त, ढोंगी असे होणे संभवते. त्याशिवाय या केतूमुळे संततिसुखात बाधा येणे संभवते. या राशीच्या लाभस्थानी मकर राशीत बुध -गुरु-शनि असे तीन ग्रह असून ते तिघेही अनुकुल असून बुधामुळे मानसिक सुखसमाधान,धनलाभ, मित्रलाभ असे काही मिळणे संभवते. गुरु ग्रहामुळे इच्छाआकांक्षा पूर्ण होतील. काही मंडळींना वाहनसुख मिळेल. काहींना धनलाभ होईल, तर या राशीच्या विद्यार्थ्याना शिक्षणात अपेक्षित यश मिळेल. विवाहेच्छूचे विवाह होतील. शनि ग्रह सर्वसाधारण्पणे शुभ होईल व त्याच्यामूळे आर्थिक वाढ होईल. पण या राशीच्या मंडळींच्या संततीस तो त्रासदायक होईल. या राशीच्या व्ययस्थानी कुंभ राशीत रवि -शुक्र -नेपच्यून असे तीन ग्रह असून दिनांक ११ पासून लाभस्थानी असलेला बुध या व्ययस्थानी येत आहे. येथील नेपच्यूनमुळे चिंता, मानसिक व्यग्रता, नैराश्य येणे संभवते. रवि -बुध संपूर्ण महिनाभर प्रतिकुल होणार असून त्यांच्यामुळे प्रतिकुल परिस्थिती निर्माण होणे, मानभंग, मनस्ताप होणे, शरीरपीडा, अनारोग्य होणे, पीछेहाट होणे संभवते. पण शुक्र ग्रह अनुकुल होईल व त्याच्यामुळे मधूनमधून मनोनुकुल घटना घडतील, सुखसमाधान लाभेल. विवाहितांना वैवाहिक जीवनातील सुखसमाधान लाभेल. या राशीच्या धनस्थानी मेष राशीत हर्षल असून त्याच्यामुळे स्वभाव अस्थिर, अविचारी असा होईल व त्यामुळे अविचाराने खर्च केला जाईल. हातून विचित्र आचरण घडेल. फटकळपणे बोलून अकारण समोरच्याचा अपमान केला जाईल. जपा. या राशीच्या तृतीय स्थानी वृषभ राशीत मंगळ व राहू असे दोन ग्रह असून राहू अनुकुल असला तरी त्याच्यामुळे बंधुसुखात बाधा येणे संभवते. मंगळही शुभ असून त्याच्यामुळे धैर्य, हिंमत, महत्त्वाकांक्षा वाढेल, हातून कर्तबगारी घडेल; पण त्याच्यामुळे इजा होणे संभवते. श्रद्धा असेल तर श्रीगुरुदेव दत्तात्रेयाची उपासना मन:शांती देईल. म्हणून दररोज सकाळी स्नान झाल्यावर “बावन्न श्लोकी गुरुचरित्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे अन्मनक्षत्र पूर्वाभाद्रपदा आहे त्यांनी “ ओम अजैकचरणाय नमः: “ मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तराभाद्रपदा आहे त्यांनी “ओम अहिर्बुध्न्याय नमः:” मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र रेवती आहे त्यांनी “ओम पूषाय नमः” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

=====ooooo0ooooo=====