मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

राशिभविष्य - जानेवारी, २०२१.

दादा दामले

=========================================================

आपणांस,आपल्या कुटुंबियांस व आपलेकडील सर्वांस नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

---------------------------------------------------------------------------------------------------

सूचना - प्रत्येक राशीच्या राशिभविष्याच्या अखेरीस त्या राशीच्या जन्मनक्षत्रांसाठी त्या त्या जन्मनक्षत्राचा तारक मंत्र दिला आहे. आपल्या जन्मनक्षत्राच्या तारक मंत्राचा उपाय म्हणून मनापासून श्रद्धेने उपयोग केल्यास जीवनात येणाऱ्या अडचणी, अडथळे, व्याधी, पीडा, आजार व अन्य समस्या यांचे निवारण होते, असा अनेकांचा अनुभव आहे. आपणही तसा प्रयत्न करून पाहावा व आपणांसही तसा अनुभव आल्यास आम्हांस कळवावे.

==================================================================

(१) मेष - या राशीच्या मंडळींचा वर्तमान स्वभाव हट्टी, मानापमान फार, अकारण शारीरिक दगदग, श्रम शरीरपीडा देणारा असा झाला असावा, असे वाटते. नोकरदार मंडळींना नोकरीत मनस्ताप देणारा काळ आहे. मंगळाबरोबर हर्षल असल्यामुळे स्वभाव अधिकच अस्थिर, चंचल, लहरी, धाक, दडपण असह्य होणारा असा घडण्याची शक्यता दिसते. या राशीची लहान मुले तर अतिशय खोडकर झाली असण्याची शक्यता दिसते. पण हा हर्षल शास्त्रीय संशोधन कार्यक्षेत्र असणारांना अनुकुल व प्रगतिकारक होऊ शकेल. या राशीच्या धनस्थानी असलेला राहू आर्थिक चिंता निर्माण करीलसे वाटते. तसेच कौटुंबिक जीवनात कलह निर्माण करण्याची दाट शक्यता दिसते. या राशीच्या अष्टम स्थानी असलेला केतू अनारोग्यकारक असून काही मंडळींना त्वचारोगाचा तर काहींना मुखदंत रोगाचा

आजार त्रस्त करीलसे वाटते. शिवाय काही मंडळींना रक्तविकाराचा आजारही होणे संभवते. जपा. या राशीच्या भाग्यस्थानी असलेल्या रविमुळे मानसिक ताण, वडील मंडळींचा विरोध, शारीरिक अनारोग्य होणे संभवते. पण शुक्रामुळे काही मनोनुकुल घटना घडतील, थोरकृपा होईल व दिलासा मिळेल. मात्र हा शुक्र महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात या राशीच्या दशम स्थानी गेल्यावर प्रतिकुल होण्याची शक्यता आहे. रवि-बुध सुद्धा या महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या दशम स्थानी मकर राशीत गेल्यावर अनुकुल होतील व या राशीच्या नोकरदार मंडळींना लाभदायक होतील. तसेच मानसिक व कौटुंबिक सुखसमाधान देतील. गुरु ग्रह बौद्धिक व शास्त्रीय संशोधन कार्यक्षेत्र असणारांना अनुकुल व लाभदायक होईल. वरिष्ठ त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करतील. काही भाग्यवान मंडळींचा मानसन्मान होणेही संभवते. या राशीच्या लाभस्थानी असलेला नेपच्यून आर्थिक बाबतीत नुकसानकारक होणे संभवते. तसेच त्याच्यामुळे अर्थप्राप्तीस विलंब होण्याची शक्यता दिसते. काहींना कुमार्गी मित्रांमुळे मनस्ताप सहन करावा लागेल व त्यामुळे नैराश्य येण्याची शक्यता आहे. जपा. श्रद्धा असेल तर श्रीगणेश व श्रीहनुमान उपासना मन:शांती देईल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर श्रीगणेश अथर्वशीर्षाचे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी श्रीहनुमानचालिसा स्तोत्राचे पठण करा. शिवाय दररोज सकाळी स्नान करताना श्रद्धेने, मनापासून ज्यांचे जन्मनक्षत्र अश्विनी आहे त्यांनी “ओम अश्विनीकुमाराभ्याम नम: “ मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र भरणी आहे त्यांनी “ ओम यमाय नमः:” मंत्राचा व कृत्तिका जन्मनक्षत्र असणारांनी “ओम अग्नये नमः: “ मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(२) वृषभ - या राशीच्या प्रथम स्थानी राहू असून त्याच्यामुळे काही मंडळींना वातविकाराचा आजार त्रस्त करण्याची शक्यता आहे. शिवाय या राहूमुळे काही मंडळींचा काही कारणाने अपमान होणेही संभवते. त्याचा परिणाम म्हणून काहींच्या मनात सूडभावनाही निर्माण होईल. जपा. या राशीच्या सप्तम स्थानी केतू असून त्याच्यामुळे ज्यांची कोर्ट प्रकरणे आहेत त्यांना अपयश येणे संभवते. तसेच मनस्थिती अस्थिर राहील. शिवाय वैवाहिक जीवनातील सुखातही बाधा येणे संभवते. या राशीच्या अष्टम स्थानी रवि व शुक्र असे दोन ग्रह असून रविमुळे प्रतिकारशक्ती कमी होणे संभवते. त्यामुळे अनारोग्य, दु:ख, अपयश, संततिसुखात बाधा येणे संभवते. पण शुक्रामुळे या राशीच्या काही मंडळींना कमी श्रमात अपेक्षेपेक्षा अधिक धनलाभ होणे शक्य दिसते. ज्यांच्या जन्मकुंडलीत अचानक धनलाभ योग आहे अशापैकी काहींना असा अचानक धनलाभ होईल किंवा वारसा हक्काने धनलाभ होणे संभवते. हा शुक्र महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात या राशीच्या भाग्यस्थानी जाईल तेव्हा मनोनुकुल घटना घडतील. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात रवि या राशीच्या भाग्यस्थानी जाईल तेव्हा प्रतिकुल होईल व त्यामुळे मानसिक ताण, वडील मंडळींचा विरोध, त्यामुळे नैराश्य येणे, संभवते. या राशीच्या भाग्यस्थानी शनि -बुध -गुरु आहेतच. त्यांच्यापैकी शनिमुळे काही मंडळींना दूरच्या प्रवासाचे योग येतील. गुरूमुळे अध्यात्मात रस असणारांना आध्यात्मिक प्रगती करणे शक्य होईल. काहींना कीर्ती, प्रसिद्धी मिळू शकेल, काहींचा उत्कर्ष होईल. बुधामुळे मात्र प्रतिकुल अनुभव येतील. येथील बुध महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात या राशीच्या दशम स्थानी गेल्यावर अनुकुल होईल व कौटुंबिक सुखसमाधान लाभेल. या राशीच्या दशम स्थानी नेपच्यून आहेच. त्याच्यामुळे मनस्थिती अस्थिर राहील; पण तो मनोवैज्ञानिक आणि द्रव पदार्थ व्यापार असणारांना अनुकुल व लाभदायक होईल. या राशीच्या व्यय स्थानी मेष राशीत मंगळ व हर्षल असे दोन ग्रह असून ते दोघेही प्रतिकुल आहेत. मंगळामुळे आर्थिक चिंता, भांडणे, मानहानी होणे संभवते. शिवाय उष्णताविकाराचा आजार होणेही संभवते. हर्षलमुळे काहींना जिवावरच्या प्रसंगाशी किंवा बेअब्रूच्या प्रसंगाशी मुकाबला करण्याची पाळी येईल. जपा. श्रद्धा असेल तर श्रीगणेश व श्रीहनुमान उपासना अनुकुल होईल व दिलासा मिळेल. दररोज सकाळी स्नान करताना मनापासून व श्रद्धेने जन्मनक्षत्र कृत्तिका असणारांनी “ओम अग्नये नमः: “ मंत्राचा, रोहिणी जन्मनक्षत्र असणारांनी “ ओम ब्रह्माय नमः: “ मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र मृग आहे त्यांनी “ओम सोम सोमाय नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा. तसेच स्नान झाल्यावर श्रीगणेश .अथर्वशीर्षाचे पठण करावे. व रात्री झोपी जाण्यापूर्वी हनुमानचालिसा स्तोत्र वाचावे.

(३) मिथुन- या राशीच्या षष्ठ स्थानी केतू आहे. तो सर्व दृष्टीनी अनुकुल असून त्याच्यामुळे आरोग्य उत्तम राहील. या राशीच्या सप्तम स्थानी धनु राशीत रवि व शुक्र आहेत. हा रवि केंद्रस्थानी असल्यामुळे अनुकुल असला तरी त्याच्यामुळे अनारोग्य होणे संभवते. हृदयविकार असणारांनी विशेष जपावे. काही मंडळींना पोटविकार त्रस्त करतील. पण या स्थानी असलेला शुक्र वैवाहिक जीवनातील सुखसमाधान देईल. तसेच प्रेमिकांचे विवाह होतील. जीवनसाथी/संगिनी कलाकार असण्याची शक्यता दिसते. येथील रवि -शुक्र अनुक्रमे दिनांक १४ व दिनांक २७ रोजी या राशीच्या अष्टम स्थानी जात आहेत. त्यावेळी रवि ग्रह प्रतिकुल होईल व त्याच्यामुळे अनारोग्य, मनस्ताप, अपयश, इच्छा आकांक्षा अपूर्ण , संततीपैकी कोणाच्या अनारोग्याची चिंता त्रस्त करील. पण या स्थानी आलेला शुक्र धनदायक असल्यामुळे ज्यांच्या जन्मकुंडलीत अचानक धनलाभ योग आहे अशापैकी काहींना असा अचानक धनलाभ होणे संभवते. काही मंडळीं ना वारसा हक्काने धनलाभ होऊ शकेल. पण काही मंडळींना अल्प श्रमात अपेक्षेपेक्षा अधिक अर्थलाभ होईल. पण या अष्टम स्थानी आधीपासूनच गुरु-शनि हे दोन ग्रह आहेत. येथील गुरु ग्रह अचानक धनलाभास अनुकुल असून शनि मात्र प्रतिकुल होईल व त्याच्यामुळे अपेक्षाभंग होणे, एखादा मोठा आजार होणे, असमाधानकारक घटना घडणे संभवते. या राशीच्या भाग्यस्थानी नेपच्यून असून त्याच्यामुळे अध्यात्मात रस असणारांना उपासनेद्वारे आध्यात्मिक प्रगती करणे शक्य होईल. काही मंडळींना सूचक स्वप्ने पडतील. काहींना परदेशगमनाची संधी मिळू शकेल. महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात अष्टम स्थानी असलेला शुक्र भाग्यस्थानी आल्यावर काही मंडळींना थोरकृपा किंवा गुरुकृपा प्राप्त होईल व सात्विक सुखसमाधान लाभेल. काही भाग्यवंतांना कीर्ती, प्रसिद्धी मिळणेही संभवते. या राशीच्या लाभस्थानी मंगळ व हर्षल असे दोन ग्रह असून मंगळ ग्रहामुळे मैत्रीत वितुष्ट येणे संभवते. जपा. कष्ट, मनस्ताप सहन करूनच अर्थप्राप्ती होईल. पण एखादी मौल्यवान वस्तू मिळणेही संभवते. हर्षलमुळेही मित्रांशी भांडणे होतील. जपा. पण या हर्षलमुळे अर्थलाभ होणेही शक्य आहे. या राशीच्या व्ययस्थानी राहू असून त्याच्यामुळे काहींना अर्थलाभ होईल तर काही मंडळींना परदेशगमनाची संधी मिळणेही संभवते. पण या राहूमुळे वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येणेही शक्य आहे. जपा. श्रद्धा असेल तर श्रीशिवोपासना व श्रीहनुमान उपासना मन:शांती देईल. दररोज स्नान झाल्यावर श्रीशिवलीलामृत स्तोत्राचे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी श्रीहनुमानचालिसा स्तोत्राचे पठण करा. शिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र मृग आहे त्यांनी “ओम सोमसोमाय नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र आर्द्रा आहे त्यांनी “ओम नम:शंकराय “ मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र पुनर्वसू आहे त्यांनी “ओम अदितीये नमः“ मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(४) कर्क - या राशीच्या पंचम स्थानी केतू असून त्याच्यामुळे या राशीच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडचणी, अडथळे निर्माण होणे संभवते. तसेच काही मंडळींना उदररोगाचा त्रास सहन करावा लागेल.

पण हा केतु उपासनेस व गूढ अभ्यासास अनुकुल होईल. या राशीच्या षष्ठ स्थानी धनु राशीत रवि आणि शुक्र असे दोन ग्रह आहेत. येथील रवि दशम या व्यवसाय स्थानास पोषक होईल; हितशत्रू पराभूत होतील, सुखशांती लाभेल; भाग्योदयकारक होईल. पण तो अनारोग्यकारक असल्यामुळे काही मंडळींना हृदयविकाराचा त्रास होणे संभवते. याच स्थानी असलेला शुक्रही कलाक्षेत्रातील मंडळींना प्रतिकुल असून उच्च कलागुण असूनही प्रगती होत नही, कलागुण व्यक्त करण्यास अनुकुल संधीच मिळत नाही असा अनुभव येईल. पण येथील रवि -शुक्र . अनुक्रमे दिनांक १४ व दिनांक २७ पासून या राशीच्या सप्तम स्थानी मकर राशीत गेल्यावर रवि ग्रह अनारोग्यकारकच होईल. चिंता वाढतील व काहींना पोटविकाराचे अनारोग्य त्रस्त करील. जपा. पण हा रवि केंद्रातील असल्यामुळे भाग्योदयकारक होण्याची शक्यता आहे. याच स्थानी शनि -गुरु हे दोन ग्रह आहेतच. शनि स्वतः:च्या राशीतच असला तरी वैवाहिक जीवनातील सुखात बाधा निर्माण करील. काही मंडळींना अनारोग्याचा त्रास सहन करावा लागेल. गुरु ग्रह अनुकुल असला तरी तेथील शनीमुळे विवाह जुळून येण्यात अडचणी निर्माण होतील. वैवाहिक जीवनातील सुख अपेक्षेनुसार मिळणार नाही. प्रेमसंबंधात बाधा येऊ शकेल. बुधामुळे वाद, भांडणे होण्याची शक्यता आहे. पण महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात शुक्र ग्रह या स्थानी आल्यावर अनुकुल परिस्थिती निर्माण होईल. या राशीच्या अष्टम स्थानी कुंभ राशीत नेपच्यून असून दिनांक २५ पासून बुध ग्रह अष्टम स्थानी येत आहे. नेपच्यून जलभयकारक व विषभयकारक असल्यामुळे खोल पाण्यात पोहावयास जाऊ नका, जलप्रवास करू नका. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बुध ग्रह अनुकुल होईल व कार्यसिद्धी होऊन यश व सुखसमाधान मिळेल. या राशीच्या दशम स्थानी मेष या स्वतःच्या राशीत मंगळ असून सोबत हर्षलही आहे. येथील मंगळ स्वतंत्र व्यवसाय असणारांच्या व्यवसायात खळबळजनक घटना घडविण्याची शक्यता आहे. काही जणांना हातचे सोडून नवीन काही करण्याची ऊर्मि येईल, नोकरदार मंडळींना कामाचा ताण सहन करावा लागेल, वरिष्ठांचा त्रास सहन करावा लागेल. पण तो औषध विक्रेते आणि यांत्रिकतांत्रिक नोकरी व्यवसाय असणारांना अनुकुल व लाभदायक होऊ शकेल. हर्षल उच्च बौद्धिक व शास्त्रीय संशोधन कार्यक्षेत्र असणारांना अनुकुल व प्रगतिकारक होईल. या राशीच्या लाभस्थानी वृषभ राशीत राहू असून त्याच्यामुळे संततिविषयक एखादी चिंता त्रस्त करण्याची शक्यता आहे. तसेच या राशीचे नोकरीत जे अधिकारी असतील त्यांनी अधिकाराचा गैर उपयोग करून वाममार्ग धन मिळविण्याचा प्रयत्न केल्यास होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही. जपा. श्रद्धा असेल तर श्रीगुरुदेव दत्तात्रेयाची उपासना अनुकुल होईल व मन:शांती लाभेल. दररोज “बावन्न श्लोकी गुरुचरित्रा”चे पठण करा. तसेच दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र पुनर्वसू आहे त्यांनी “ओम अदितीये नमः: मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र पुष्य आहे त्यांनी “ओम बृहस्पतये नमः:” मंत्राचा, व ज्यांचे जन्मनक्षत्र आश्लेषा आहे त्यांनी “ओम सर्पाय नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(५) सिंह - या राशीच्या चतुर्थ स्थानी केतू असून त्याच्यामुळे कसली तरी चिंता त्रस्त करील. शिवाय हा केतू विषभयकारक असल्याने बाहेरच्या उघड्यावरच्या पदार्थांचे सेवन करू नका. शिवाय मन अस्वस्थ राहिले तर कोणाशी पटणार नाही. या राशीच्या पंचम स्थानी रवि -शुक्र असून रविमुळे संततिसुखात बाधा येणे संभवते. या राशीच्या नोकरदार मंडळींना वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल. प्रिय जनांपासून दूरत्व निर्माण झाल्यास मनस्थिती अस्वस्थ राहील. अनारोग्य होणेही संभवते. त्याशिवाय अपघातभय असल्याने सतत सावधानतेने आचरण करा. शुक्र ग्रह सर्व कलाकारांना अनुकुल असून आवडत्या कलेत प्रगती करणे सहज शक्य होईल. महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात हा शुक्र या राशीच्या षष्ठ स्थानी गेल्यावर प्रतिकुल होईल व कलेत प्रगती करणे अशक्य होईल. तसेच रवि ग्रह

महिन्याच्या उत्तरार्धात या राशीच्या षष्ठ स्थानी गेल्यावर नोकरी-व्यवसायास अनुकुल होईल, हितशत्रू पराभूत होतील. पण अनारोग्याचा त्रास होणे संभवते. या षष्ठ स्थानी शनि -गुरु-बुध आहेतच पैकी गुरु-बुध अनुकुल असून कार्यसिद्धी होईल, यश मिळेल व सुखसमाधान लाभेल.आरोग्य सुधारेल. महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात येथील बुध या राशीच्या सप्तम स्थानी गेल्यावर प्रतिकुल होईल व त्यामुळे भांडणे होणे व दु:ख होणे संभवते. या सप्तम स्थानी नेपच्यून आहेच. त्याच्यामुळे वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येण्याची शक्यता आहे. या राशीच्या भाग्य स्थानी स्वतःच्या स्वामित्वाच्या ,मेष राशीत मंगळ असून सोबत हर्षलही आहे. या मंगळामुळे प्रवासात मनस्ताप व मानहानी होणे संभवते. म्हणून शक्यतो प्रवास करू नका. पण हर्षल शास्त्रीय संशोधन कार्यास अनुकुल असून प्रगतिकारक आहे. त्याच्यामुळे काही मंडळींना दूरच्या प्रवासाची तर काही मंडळींना परदेशवारीची संधी मिळेल

या राशीच्या दशम स्थानी वृषभ राशीत राहू असून त्याच्यामुळे काही मंडळींना नोकरीत अधिकार पद

किंवा सत्तास्थान मिळू शकेल. क्वचित कोणाचा सन्मान होणेही संभवते. श्रद्धा असेल तर आपल्या कुलदैवताची उपासना मन:शांती देईल. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र मघा आहे त्यांनी “ओम पितराय नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वा आहे त्यांनी “ “ओम भगाय नमः:” मंत्राचा व ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तरा आहे त्यांनी “ ओम आर्यमे नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(६) कन्या - या राशीच्या तृतीय स्थानी केतू असून त्याच्यापासून त्रास होऊ नये म्हणून आध्यात्मिक उपासना करणे अगत्याचे होईल. नपेक्षा त्याच्यामुळे मानसिक दु:खाचा असह्य त्रास सहन करावा लागेल. पण या केतूमुळे या राशीच्या व्यापारी मंडळींना स्त्री ग्राहकांकडूनच अधिक अर्थलाभ होईल. या

राशीच्या चतुर्थ स्थानी धनु राशीत रवि व शुक्र असे दोन ग्रह असून रवीमुळे अनारोग्याचा त्रास सहन करावा लागेल. कार्य दिरंगाईमुळे नैराश्य येईल. तसेच कौटुंबिक त्रास, दु:ख सहन करावे लागेल. पण येथील शुक्रामुळे ऐषाराम, वैवाहिक सुख लाभेल. शेतीवाडी असणारांना लाभदायक होईल. पण महिन्याच्या उत्तरार्धात रवि व शुक्र या राशीच्या पंचम स्थानी गेल्यावर रवीमुळे अनारोग्य, अपघात होणे संभवते. संततीपैकी कोणाच्या आजाराची चिंता त्रस्त करील. नोकरीत वरिष्ठांचा त्रास सहन करावा लागेन, प्रिय जनांचे दूरत्व झाल्यामुळे नैराश्य येईल. पण शुक्रामुळे या राशीच्या सर्व प्रकारच्या कलाकारांना कलेचा आनंद चाखता येईल. या पंचम स्थानी प्रथमपासून बुध -गुरु-शनि आहेतच. पण बुधामुळे संतति, स्त्रीपासून मनस्ताप सहन करावा लागेल. शनीमुळे स्वभाव स्वार्थी, संशयी, व्यवहारी असा होईल. गुरूमुळे प्रेमसंबंधात वाढ होईल. अर्थलाभ होईल, विद्यार्थ्याना शिक्षणात प्रगती करणे शक्य होईल, सर्व सुख मिळेल. या राशीच्या षष्ठ स्थानी नेपच्यून असून महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बुध ग्रह या षष्ठ स्थानी येत आहे. येथील नेपच्यूनमुळे काही मंडळींना उगीचच एखादी आजारभावना त्रस्त करील. काही मंडळींना काल्पनिक चिंता त्रस्त करील. काहींना फसवणूक झाल्याचा त्रास होईल. पण बुध ग्रह या स्थानी आल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल व मनोनुकुल घटना घडतील. या

राशीच्या अष्टम स्थानी मेष राशीत मंगळ व हर्षल असून मंगळामुळे उष्णता विकार बळावतील. त्यामुळे काही मंडळींना मूळव्याधीसारखा आजार त्रस्त करील. अपघाताने हाडमोड होईल. त्याशिवाय

वीज, पाणी यांपासून धोका असल्यामुळे विजेची उपकरणे सावधानतेने हाताळा. खोल पाण्यात पोहावयास जाऊ नका. तसेच जलप्रवासही करू नका. हर्षलही प्रतिकुल असून अपघातकारक आहे. जपा. या राशीच्या भाग्यस्थानी राहू असून त्याच्यामुळे काही मंडळींना प्रवासयोग येतील. श्रद्धा असेल तर श्रीगुरुदेव दत्तात्रेयाची उपासना अनुकुल होईल व मन :शांती लाभेल. दररोज नियमितपणे “बावन्न श्लोकी गुरुचरित्रा”चे पठण करा, तसेच दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तरा आहे त्यांनी १०८ वेळा “ ओम आर्यमे नमः:” मंत्राचा, हस्त जन्मनक्षत्र असणारांनी “ओम

सूर्याय नमः:” मंत्राचा व चित्रा जन्मनक्षत्र असणारांनी “ओम त्वष्टे नमः:” मंत्राचा जप करावा.

(७) तुळा - या राशीच्या धनस्थानी केतू असून त्याच्यामुळे आर्थिक चिंता निर्माण होणे संभवते. या राशीच्या तृतीय स्थानी धनु राशीत रवि व शुक्र असून येथील रवि महिन्याच्या पूर्वार्धात सर्व प्रकारे अनुकुल होईल. त्यामुळे या राशीच्या मंडळींनी महिन्याच्या पूर्वार्धातच जे काय साध्य करावयाचे ते साधून घेण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील. काहींना बढती, कोणाला मानाचे स्थान किंवा उच्च पद मिळण्याची शक्यताही दिसते. शुक्राच्या अनुकुलतेमुळे काही मंडळींना भूमिलाभ, धनलाभ असे काही मिळू शकेल. या राशीच्या व्यापारी मंडळींना स्त्री-ग्राहकांकडूनच अधिक अर्थलाभ होईल. महिन्याच्या उत्तरार्धात येथील रवि या राशीच्या चतुर्थ स्थानी गेल्यावर प्रतिकुल होईल व त्यामुळे कौटुंबिक त्रास, अनारोग्य, कार्य दिरंगाई होणे अशापैकी कारणांनी नैराश्य येण्याची शक्यता आहे. महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात शुक्र चतुर्थ स्थानी आल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल व सुखसमाधान लाभेल. शेतीवाडी असणारांना त्यापासून लाभ होईल. या चतुर्थ स्थानी प्रथमपासून बुध -गुरु-शनि आहेतच. पैकी बुध -गुरु हे दोन ग्रह अनुकुल होतील त्यांच्यामुळे कौटुंबिक सुख व गृहसौख्य लाभेल; पण शनिमुळे धननाश होणे संभवते व गुरूमुळे नातेवाईकाकडून मनस्ताप दिला जाणे संभवते. पण गुरुमुळे या राशीच्या मंडळींचे स्थावर खरेदीविक्रीचे व्यवहार अपेक्षेनुसार पार पडतील. पण येथील शनि पूर्णपणे प्रतिकुल असल्यामुळे गृहसौख्यात बाधा येणे संभवते. येथील बुध दिनांक २५ पासून या राशीच्या पंचम स्थानी जात आहे. त्यामुळे संततीविषयक समस्या चिंता निर्माण करतील. या पंचम स्थानी नेपच्यून आहेच. या नेपच्यूनमुळे मनस्थिती अति भावनाशील होईल. मनाविरुद्ध थोडे काहीही घडले तरी मन अस्वस्थ होईल. पण अध्यात्मात रस असणारांना हा नेपच्यून अनुकुल होईल व उपासनेद्वारे आध्यात्मिक उन्नती करणे शक्य होईल. गूढ संशोधन कार्यासही हा नेपच्यून अनुकुल होईल. या राशीच्या सप्तम स्थानी मंगळ व हर्षल हे दोन्ही ग्रह वैवाहिक जीवनातील सुखात बाधा निर्माण करतील. तसेच भागीदारीत व्यापार-व्यवसाय असणारांनी भागीदारीत संशय, मतभेद आदी कारणांनी बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी. या राशीच्या अष्टम स्थानी राहू असून त्याच्यामुळे वैवाहिक जीवनातील सुखात बाधा येणे संभवते. तसेच वाममार्ग धन मिळविण्याचा प्रयत्न अंगाशी येईल. जपा. श्रद्धा असेल तर शिवोपासना व हनुमान उपासना अनुकुल होईल व दिलासा मिळेल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर “शिवलीलामृत स्तोत्रा”चे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी “हनुमानचालिसा स्तोत्रा”चे पठण करा. त्याशिवाय मनापासून श्रद्धा असेल तर

दररोज सकाळी स्नान करताना ज्यांचे जन्ममनक्षत्र चित्रा आहे त्यांनी “ओम त्वष्टे नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र स्वाती आहे त्यांनी “ओम वायवे नमः:” मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र विशाखा आहे त्यांनी

“ओम इंद्राग्नये नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(८) वृश्चिक - या राशीच्या प्रथम स्थानी केतू असून त्याच्यामुळे सर्व काही अनुकुल असले तरी वाहन धोका संभवतो. जपा. या राशीच्या धनस्थानी धनु राशीत रवि व शुक्र असे दोन ग्रह आहेत. शुक्रामुळे कौटुंबिक सुखसमाधान मिळू शकेल, धनलाभ होणेही संभवते. पण रवि ग्रह महिन्याच्या पूर्वार्धात प्रतिकुल असल्याने वाद, भांडणे व आर्थिक समस्या यामुळे मिळणाऱ्या सुखात बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. काही मंडळींना नेत्रविकार त्रस्त करण्याची शक्यता आहे. येथील रवि महिन्याच्या उत्तरार्धाच्या प्रारंभी या राशीच्या तृतीय स्थानी जात असून शुक्र मात्र महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात तृतीय स्थानी जाईल. या तृतीय स्थानी प्रारंभापासून बुध -गुरु-शनि आहेतच. अशा स्थितीत महिन्याच्या उत्तरार्धात रवि - गुरु-शुक्र हे तिन्ही ग्रह अनुकुल असले तरी बुधामुळे हितशत्रूंच्या त्रासाबरोबरच अकारण शत्रुत्व निर्माण होणेही संभवते. महिन्याच्या उत्तरार्धात रवि ग्रह अनुकुल होत असल्याने या राशीच्या नोकरदार मंडळींना आरोग्यासह सर्व सुखे प्राप्त होतील. नोकरीत वरिष्ठ खूष होतील. काही मंडळींना बढती, काहींना उच्च पद मिळेल; तर कांहींचा सन्मान होणेही संभवते. गुरूमुळे या राशीच्या लेखकांचे लेखन ग्रंथरूपात प्रसिद्ध होईल. यात्रा-प्रवास योग येईल. पण भावंडांकडून मनस्ताप दिला जाण्याची शक्यता आहे. शनि ग्रहामुळे काही मंडळींना अपेक्षेनुसार उत्तम नोकरी किंवा आवडते कार्यक्षेत्र मिळू शकेल. पण भावंडविषयक एखादी चिंता त्रस्त करील. या राशीच्या चतुर्थ स्थानी नेपच्यून असून महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बुध ग्रह या स्थानी येत आहे. नेपच्यूनमुळे घरगुती बाबतीत घोटाळे, गैरसमज निर्माण होण्याची शक्यता दिसते. पण महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बुधामुळे मित्रसुख व गृहसौख्य मिळू शकेल. पण धननाश होण्याचीही दाट शक्यता आहे. या राशीच्या षष्ठ स्थानी मेष राशीत मंगळ व हर्षल असे दोन ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रह अनारोग्यकारक असून मंगळामुळे उष्णताविकाराचे आजार, रक्तविकार, हृदयविकार अशापैकी एखादा आजार होणे संभवते. जपा. त्याशिवाय काही मंडळींना अपप्रचाराचा त्रास होण्याची शक्यताही दिसते. हर्षलमुळे मनस्थिती अस्थिर, चंचल राहील. शिवाय काहींना मुदतीचा ताप येणे संभवते. सतत अति खोल विचार करू नका. नपेक्षा डोकेदुखी किंवा मेंदूविकार अशापैकी आजार होण्याची शक्यता असते. या राशीच्या सप्तम स्थानी राहू असल्याने मनात कपटी विचार प्रबळ होतील. तसेच वाममार्ग धन मिळविण्याची प्रबळ इच्छा निर्माण होईल. पण या मोहाला बळी पडू नका. होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागणार नाही. शिवाय वैवाहिक जीवनातील सुखात बाधा निर्माण होणेही संभवते. जपा. श्रद्धा असेल तर श्रीगणेश उपासना अनुकुल होईल. दररोज स्नान झाल्यावर श्रीगणेश अथर्वशीर्षाचे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना श्रद्धेने मनापासून ज्यांचे जन्मनक्षत्र विशाखा आहे त्यांनी “ओम इंद्राग्नये नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र अनुराधा आहे त्यांनी “ओम मित्राय नमः:” मंत्राचा व ज्यांचे जन्मनक्षत्र ज्येष्ठा आहे त्यांनी “ओम इंद्राय नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(९) धनु - या राशीच्या व्ययस्थानी केतु असून त्याच्यामुळे स्वभाव चंचल, लहरी असा होण्याची शक्यता आहे. स्वभाव स्थिर व शांत राहण्यासाठी आध्यात्मिक उपासना करा. या राशीच्या प्रथम स्थानी याच राशीत रवि व शुक्र असे दोन ग्रह आहेत. येथील रवि अनारोग्यकारक असून त्याच्यामुळे काहीही कारणाने चिंता व मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. काही मंडळींना आपल्या नियोजित कार्यात पीछेहाट होत असल्याचा अनुभव येईल. काही मंडळींना थकल्यासारखे वाटेल. त्याशिवाय काहींना रक्तदाब, हृदयविकार असे आजारही होणे संभवते.जपा. पण शुक्रामुळे आपेक्षित सुखसमाधान तसेच वैवाहिक जीवनातील सुख लाभेल. येथील रवि महिन्याच्या उत्तरार्धाच्या प्रारंभी व शुक्र महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात या राशीच्या धनस्थानी जात आहे. त्यावेळी रविमुळे कौटुंबिक जीवनात वाद, भांडणे होण्याची शक्यता आहे. जपा. तसेच काही मंडळींना वाढत्या खर्चाची चिंता ,किंवा आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. तसेच काही मंडळींना डोळ्याचे दुखणे त्रस्त करील. प्रथमपासून या धनस्थानी बुध ,गुरु,शनि आहेतच. बुधामुळे धनलाभ होणे संभवते. गुरूमुळे कुटुंबात शुभ घटना घडतील. पण शनीमुळे या सुखात बाधा येण्याची शक्यता आहे. महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात शुक्राच्या अनुकुलतेमुळे परिस्थिती आटोक्यात राहील व कौटुंबिक व वैवाहिक जीवनातील सुखसमाधान लाभेल. काही मंडळींना धनलाभ होणेही शक्य आहे. या राशीच्या तृतीय स्थानी नेपच्यून असून महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बुध ग्रह तृतीय स्थानी जात आहे. येथील नेपच्यूनमुळे मनस्थिती भावनाशील होईल व त्यामुळे अध्यात्मात रस असणारांना उपासनेद्वारे आध्यात्मिक प्रगती करणे व मन:शांती मिळविणे शक्य होईल. गूढ संशोधनासही हा नेपच्यून अनुकुल होईल. त्याशिवाय काही मंडळींना जलप्रवासाची तर काहींना परदेशवारीची संधी मिळेल. पण महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बुधामुळे अकारण शत्रुत्व निर्माण होणे, काहींच्याकडून राजद्रोह होणे संभवते. या राशीच्या पंचम स्थानी स्वतः:च्या स्वामित्वाच्या मेष राशीत मंगळ असून सोबत हर्षलही आहे. येथील मंगळामुळे काही मंडळींना स्थावरसंबंधीची समस्या त्रस्त करील. काही मंडळींना संतति -विषयक समस्या त्रस्त करील. काहींना अनारोग्याचा त्रास सहन करावा लागेल. या राशीच्या गर्भवती स्त्रियांनी अकारण दगदग करू नये. येथील हर्षलमुळे उच्च बौद्धिक व शास्त्रीय संशोधन कार्यक्षेत्र असणारांना त्यांच्या कार्यात प्रगती करणे शक्य होईल. या राशीच्या षष्ठ स्थानी वृषभ राशीत राहू असून त्याच्यामुळे अन्य जातिधर्माच्या मंडळींशी व्यावसायिक संबंध आहे अशांना लाभदायक होईल. पण काही मंडळींना पोटाच्या अनारोग्याचा आजार त्रस्त करील. श्रद्धा असेल तर शिवोपासना व श्रीगुरुदेव दत्तात्रेयाची उपासना अनुकुल होईल व दिलासा मिळेल. दररोज स्नान झाल्यावर शिवलीलामृत स्तोत्राचे व बावन्न श्लोकी गुरुचरित्राचे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र मूळ आहे त्यांनी “ ओम निऋतये नमः:” मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वाषाढा आहे त्यांनी “ओम उदकाय नमः:” मंत्राचा व ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तराषाढा आहे त्यांनी “ओम विश्वेदेवाय नमः:”

मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(१०) मकर - या राशीच्या लाभस्थानी केतू असून तो अनुकुल होईल व तो नियोजित कार्यात यश देईल. त्याशिवाय तो धनदायक होणेही संभवते. काही मंडळींना खूप प्रवासाचे योग येतील. सुखसमाधान लाभेल. या राशीच्या व्यय स्थानी महिन्याच्या पूर्वार्धात रवि व शुक्र असून येथील रवि दिनांक १४ पासून व शुक्र दिनांक २७ पासून या राशीच्या प्रथम स्थानी जात आहेत. या रवीमुळे महिन्याच्या पूर्वार्धात प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जावे लागेल. मनोभंग होणेही संभवते. त्याशिवाय शरीरपीडा त्रस्त करील. पण शुक्राच्या अनुकुलतेमुळे मधून मधून मनोनुकुल घटना घडतील व दिलासा मिळेल. या राशीच्या प्रथम स्थानी याच राशीत बुध -गुरु व शनि असे तीन ग्रह आहेत व महिन्याच्या उत्तरार्धात रवि व शुक्र या स्थानी येत आहेत. शनि , बुध व रवि हे तिन्ही ग्रह प्रतिकुल होणार असून त्शनिमुळेया स्वराशीत मंगला अनारोग्य, कुटुंबातील काही व्यक्तींचा दुरावा होणे, नियोजित कार्यात अडथळे, अडचणी निर्माण होणे संभवते. बुधामुळे मनस्थिती चंचल, अस्वस्थ होणे, धननाश होणे, मित्रद्रोह होणे, कुसंगतीची बाधा होणे अशापैकी घटना घडण्याची शक्यता आहे. गुरु ग्रह अनुकुल असला तरी तो नीच राशीत असल्यामुळे आरोग्य बरे राहील, बौद्धिक व संशोधनात्मक कार्यास अनुकुल होईल. महिन्याच्या उत्तरार्धात रवि ग्रहामुळे मनस्ताप, अनारोग्य, चिंता त्रस्त करतील. नियोजित कार्यप्रगतीत पीछेहाट होईल. रक्तदाब, हृदयविकार असे आजार असलेल्यांनी विशेष जपावे. महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात शुक्रामुळे सुखसमाधान लाभेल. या राशीच्या धनस्थानी नेपच्यून असून महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बुध ग्रह या धनस्थानी येत आहे. येथील नेपच्यूनमुळे आर्थिक चिंता व आर्थिक संकटे त्रस्त करतील जपा. महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बुधामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या चतुर्थ स्थानी मेष राशीत मंगळ व हर्षल असे दोन ग्रह असून ते दोन्ही ग्रह प्रतिकुल असल्याचा अनुभव येईल. मंगळामुळे कौटुंबिक जीवनात वाद, भांडणे, गैरसमज निर्माण होतील. त्याशिवाय असमाधानकारक घटना घडण्याची शक्यताही दिसते. हर्षलमुळे कोणाशी पटणार नाही, आहे त्या परिस्थितीत सुखसमाधान लाभणार नाही, सतत तक्रारी करत राहाल. या राशीच्या पंचम स्थानी वृषभ राशीत राहू असून त्याच्यामुळे संततिसुखात बाधा येण्याची शक्यता आहे. या राशीच्या गर्भवती स्त्रियांनी अकारण दगदग करू नये. पण दलाली, कमिशनवर व्यवसाय असणारांना हा राहू अनुकुल व लाभदायक होईल. श्रद्धा असेल तर शिवोपासना व श्रीहनुमान उपासना अनुकुल होईल व दिलासा मिळेल. दररोज स्नान झाल्यावर “शिवलीलामृत” स्तोत्राचे पठण करा. तसेच रात्री झोपी जाण्यापूर्वी “श्रीहनुमानचालिसा” स्तोत्राचे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र उत्तराषाढा आहे त्यांनी “ ओम विश्वेदेवाय नमः: “ मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र श्रवण आहे त्यांनी “ओम विष्णवे नम: “ मंत्राचा व ज्यांचे जन्मनक्षत्र धनिष्ठा आहे त्यांनी “ ओम वसवे नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(११) कुंभ - या राशीच्या लाभस्थानी रवि व शुक्र असून हे दोन्ही ग्रह पूर्णपणे अनुकुल व लाभदायक होतील. रविमुळे नोकरदार मंडळींना बढती, पगारवाढ, कोणास उच्च पद मिळणेही संभवते. स्वतंत्र व्यापार-व्यवसाय असणारांना तो लाभदायक होईल. आरोग्यही उत्तम राहील. शुक्रामुळे सर्व सुखसमाधान लाभेल व धनलाभ होणेही शक्य दिसते. महिन्याच्या उत्तरार्धात हे रवि -शुक्र अनुक्रमे दिनांक १४ व दिनांक २७ रोजी या राशीच्या व्ययस्थानी जातील तेव्हा रवि प्रतिकुल होईल व शुक्र काही प्रमाणात सुखकारक होईल. या व्ययस्थानी बुध -गुरु -शनि आहेतच. बुधामुळे अपयश, मानहानी, अनारोग्य होणे संभवते. शनिमुळे सतत त्रास, संकटे यांना सामोरे जावे लागेल. अध्यात्म, समाजसेवा यांची आवड असेल तर अशा कार्यात प्रगती होईल; पण प्रवासात त्रास, कौटुंबिक सुखात बाधा, अपेक्षाभंग होणे संभवते. रविमुळे शरीरपीडा, मानभंग, प्रतिकुल घटना त्रस्त करतील. पण शुक्रामुळे महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात सुखसमाधान लाभेल. या राशीच्या प्रथम स्थानी नेपच्यून असून महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बुध ग्रह प्रथम स्थानी येत आहे. नेपच्यूनमुळे मनस्थिती अतिशय कोमल होईल व त्यामुळे मानसिक संवेदनाही जलद होतील. त्यामुळे मन उदास होऊन गहिरे नैराश्य येईल. त्यात बुधाच्या प्रतिकुलतेची भर पडेल आणि अधिकच मनस्ताप सहन करावा लागेल. या राशीच्या तृतीय स्थानी मेष या स्वराशीत मंगळ असून सोबत हर्षलही आहे. हे दोन्ही ग्रह अनुकुल असून धैर्य, हिंमत, महत्त्वाकांक्षा वाढेल व कर्तृत्वात भर पडेल. पण एखादी इजाही होणे संभवते. जपा. येथील हर्षलमुळे उच्च बौद्धिक शक्ती, आकलन शक्ती व स्मरणशक्ती प्राप्त होईल. काही मंडळींना परदेशवारीची संधी मिळेल. या राशीच्या चतुर्थ स्थानी राहू असून त्याच्यामुळे कौटुंबिक सुखात बाधा येणे संभवते. या राशीच्या दशम स्थानी केतू असून या केतूमुळे काही मंडळींना हातची नोकरी सोडून नवीन काही करावेसे वाटेल. पण त्यांनी .तो विचार मनातून काढून टाकावा. व आहे ती नोकरीच करावी. तेच सुखाचे होईल. श्रद्धा असेल तर शिवोपासना व श्रीहनुमान उपासना अनुकुल होईल व दिलासा मिळेल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर “शिवलीलामृत स्तोत्रा”चे पठण करा. रात्री झोपी जाण्यापूर्वी “हनुमानचालिसा “ स्तोत्राचे पठण करा. त्याशिवाय दररोज स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र धनिष्ठा आहे त्यांनी “ओम वसवे नम: “ मंत्राचा, ज्यांचे जन्मनक्षत्र शततारका आहे त्यांनी “ओम वरुणाय नमः: “ मंत्राचा आणि ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वाभाद्रपदा आहे त्यांनी “ओम अजैकचरणाय नमः:” मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

(१२) मीन - या राशीच्या धनस्थानी मेष या स्वराशीत मंगळ असून सोबत हर्षलही आहे. हे दोन्ही ग्रह प्रतिकुल होणार असून मंगळामुळे आर्थिक समस्या त्रस्त करतील व उष्णताविकाराचे आजार त्रस्त करतील. हर्षलमुळे मनस्थिती अति अस्थिर, चंचल होईल व अविचाराने खर्च करणे, फटकळ बोलणे, विचित्र आचरण होणे संभवते. या राशीच्या तृतीय स्थानी राहू असून तो अनुकूल असला तरी त्याच्यामुळे बंधुसुखात बाधा येण्याची शक्यता आहे. या राशीच्या भाग्य स्थानी केतू असून “वरून कीर्तन, आतून तमाशा” अशा प्रकारचे ढोंगी आचरण होणे संभवते. त्याशिवाय या केतूमुळे संतति सुखात बाधा येण्याची शक्यता आहे. या राशीच्या दशम स्थानी धनु राशीत रवि व शुक्र असून येथील रवि महिन्याच्या संपूर्ण काळात अनुकुल व लाभदायक होईल. या राशीच्या नोकरदार मंडळींना विविध प्रकारचे लाभ होतील. शुक्र ग्रह महिन्याच्या बऱ्याचशा काळात प्रतिकुल होणार असून केवळ महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात अनुकुल व लाभदायक होईल आणि सुखशांती प्राप्त होईल. पण या लाभस्थानी प्रथमपासून बुध--गुरु- शनि हे तीन ग्रह आहेतच. हे तिन्ही ग्रह अनुकुल, सुखकारक व लाभदायक होतील.. केवळ शनीमुळे संततीस त्रास होण्याची शक्यता आहे. बुध ग्रहामुळे सुखसमाधान लाभेल. तसेच धनलाभ व मित्रलाभ होणेही संभवते. गुरु ग्रहामुळे तर सर्व सुखसमाधान मिळेलच. शिवाय या राशीच्या विद्यार्थ्याना शैक्षणिक प्रगती करणेही शक्य होईल. विवाहेच्छूचे विवाह होतील. मित्रवाढ होईल. इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. शनि ग्रह सर्वसाधारण्पणे शुभ होईल. या राशीच्या व्ययस्थानी नेपच्यून असून महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बुध ग्रह या स्थानी येत आहे. येथील नेपच्यून चिंतादायक होईल व त्यामुळे मानसिक व्यग्रता, नैराश्य येईल. श्रद्धा असेल तर श्रीगुरुदेव दत्तात्रेयाची उपासना अनुकुल होईल व मन:शांती लाभेल. दररोज सकाळी स्नान झाल्यावर “बावन्न श्लोकी गुरुचरित्रा”चे पठण करा. त्याशिवाय दररोज सकाळी स्नान करताना मनापासून श्रद्धेने ज्यांचे जन्मनक्षत्र पूर्वाभाद्रपदा आहे त्यांनी “ ओम अजैकचरणाय नमः: “ मंत्राचा, उत्तराभाद्रपदा जन्मनक्षत्र असणारांनी “ओम अहिर्बुद्धन्याय नमः: “ मंत्राचा व रेवती जन्मनक्षत्र असणारांनी “ ओम पूषाय नमः:”

मंत्राचा जप करावा.