Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

त्याच्या धाडसाला अनेकांनी नकार दिला. तरीही त्याने आग्रह करून स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू टोचून घेतले. त्यामुळे डॉक्टरांना संशोधन करता आलं आणि सुदैवाने अतिधाडस करणाऱ्या त्या व्यक्तीला काहीही झालं नाही....
...आज सगळे त्यांना बाबा आमटे नावाने ओळखतात.

जमीनजुमला, नागपूरच्या उच्चभ्रू धरमपेठमध्ये बंगला आणि घरात मोटार असणारे बाबा आमटे एका अर्थाने अवलिया निघाले. एखादं काम करायचं तर टोक गाठायचं हा स्वभाव होता.
एकदा ते रवींद्रनाथ टागोरांना भेटले.
"गीतांजली" समजून घेण्यासाठी बंगाली शिकले. क्रांतिकारक राजगुरुसोबत मैत्री केली.
माजी आमदार आणि वकील विश्वनाथ तामस्कर ह्यांना इंग्रजांनी अटक केल्यानंतर वकील असलेल्या बाबांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला. पण फौजदारी दाव्यांचा त्यांना उबग आला. वकील पंधरा मिनिटांमध्ये चांगले पैसे कमावतो आणि मजुराला बारा तास खपून पोटभर जेवण मिळत नाही हा विरोधाभास त्यांना सहन होत नव्हता.
पुढे बाबांच्या अनेक प्रयत्नांमधून "आनंदवन" उभं राहिलं. कुष्ठरोग्यांवर उपचार सुरु झाले. पण उपचार करणारे डॉक्टर उपचार झाल्यानंतर स्वतःची सायकल लायसॉलने धुवून काढत. ते डॉक्टर फार काळ टिकले नाहीत. मग बाबांनी कुष्ठरोग्यांना कार्यकर्ते बनवून उपचार सुरु केला. विकास आणि प्रकाश ह्या दोघांना डॉक्टर बनवलं.

डॉक्टर विकास आमटे म्हणतात, " आनंदवन ही एक प्रवृत्ती आहे. इथे दुसर्याच्या वेदना जाणून त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारी माणसं आहेत. स्वतःच्या वेदनांवर मात करून नवनिर्माण करण्याचा ध्यास आहे. इथे आत्मनिर्भर बनण्याची जिद्द आहे. " डॉक्टर विकास आमटे ह्यांनी आनंदवनाचं काम कुष्ठरोगापलीकडे विस्तारलं. अनेक प्रकल्प आणि प्रयोग उभे करून ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्याचे मार्ग अवलंबले. आनंदवनात डॉक्टर विकास आणि सहकार्यांनी केलेल्या विविध प्रयोगांमुळे या पुस्तकाला "आनंदवन प्रयोगवन " असं नाव योजलं आहे
वेदनेतून आनंद निर्माण करणारा हा भव्य, थक्क करणारा प्रवास ह्या पुस्तकातून डोळ्यासमोर उभा राहत जातो.
आनंदवनाचा कार्यभार आता कौस्तुभ-शीतल ह्या तिसर्या पिढीकडे आला आहे. आणि देशा-विदेशातील असंख्य हात इथे राबतात.

हा सगळा प्रवास उलगडून दाखवला आहे –
"आनंदवन प्रयोगवन " पुस्तकात.
डॉक्टर आमटेंच्या ह्या पुस्तकाला गौरी कानेटकर ह्यांनी शब्दांकन केल आहे.
समकालीन प्रकाशनाचा हा प्रयोग अनेकांना प्रेरणा देईल आणि आनंदवनात भेट देण्यासाठी प्रवृत्त करेल.
-निरेन आपटे