मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitleघर निट आवरलं जातं,खरच वापरत नाही आहोत ,त्या वस्तू धड आहेत म्हणुन जमवून ठेवलेल्या असतात ,त्यांनी घर जे काही भरून गेलेले असते; ते जरा रिकामे रिकामे होते. स्वत:साठीच कौतुकाने टाळ्या वाजवाव्या वाटतात,अगदी फेसबुकवर त्यावर एक लेख लिहून टाकावा इतका काहीतरी हुरूप वाटतो!

'दिसामाजी काहीतरी लिहावे, अखंडित ते वाचीत जावे' असे समर्थांनी म्हंटले आहे,त्या चालीवर 'दिसामाजी कपडे लौण्ड्रि करावे अखंडित ते घड्या करावे ' असे माझा आत्मा मला तळमळून सांगत असतो पण हँपर मधला ढीग बाहेर उसळ्या मारून ,लहान मुलाच्यासारख्या 'किलाकारीया' द्यायला लागतो तरी काही हातून लौण्ड्रि घडत नाही. त्यात जर घरात काही दिवस 'चले गये ठानेदार ,अब डर काहेका' वगैरे रेअर सिच्युएशन आल्या तर मग काय विचारायला नको .:)हापिस परगावी गेले कि लौण्ड्रिच काय पण साधी पोळी - भाजी पण दुर्मिळ होऊन जाते.!

एखादी मैत्रिण'गराज डेकोर'(!! )सारख्या विषयावर डोके खाल्ले जाइल इतके मन लावून फोन वर बोलत असते आणि मी 'अम ,वॉव' करत लीविग रूम कडे नजर फ़िरवते. आणि मग लिविंग रूम पासून नजर फिरवते!:)

कालचा पाउस,--कविता वाचत ,खिडकीशी बाहेरचा पाउस न्याहाळत ,मस्त गरम भजी खात साजरा केलेला असतो पण कालची भजी म्हणजे--------------- 'बेसनाची घट्ट झालेली पुटे' ओवन च्या साईड वर 'घोरपडी ' सारखी चिकटून बसलेली असतात,मी मग सफाईचं रणशिंग फुंकलच तर' होता स्क्रबर म्हणून वाचला ओवन' अस मनात येउन अगदी ऐतिहासिक बळ येत! जे बळ चौदा वर्षांपूर्वी या देशात आल्या आल्या खूपच असे! हळु हळु कालौघात बुरुज ढासळत गेले! असो!;)

बाथ टब आणि सिंक बिचारी मोठ्या मुलासारखी शांत असतात पण कार्पेटे आणि फरशा मात्र धाकट्या पोरांसासारखी हुच्च असतात बुवा! त्यांना सारखा मेंटेनन्स लागतों,नाहीतर आपले काही खरे नसते! त्यांची भुणभुण,सारखी जाणवत असते.पक्शि पायाला टोचत असते. त्यामुळे ती कुरकुर पायांना कळते तेंव्हा वेक्कयुमचे धूड धुळीचे,कपट्यांचे,रवा ,साखर,कपड्यांचे टैग अशा असंख्य प्रकारच्या वस्तूना 'खाऊ कि गिळू' करून टाकते!

'माझा खाऊ मला द्या' असे आमच्या गार्बेज कँन वर लिहिलेले नसते,पण त्या ओला खाऊ कि कोरडा खाऊ अश्या यक्ष प्रश्नात नसतात .दोघे कँन करार करून एक जण ओला खातो एक जण कोरडा! त्या इथे इतक्या गलेलठ्ठ का असतात असा मला सुरुवातीला अगदीच वेड्यासारखा प्रश्ण पडायचा. पण आता अज्जिबात नाही हो! सुख आणि गार्बेज कैन जेव्ह्ढे मोठे ना माणसाला ते कमीच वाटतात!

'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' इत्यादी मंत्र डोक्यात जाईपर्यंत आम्ही 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या तत्वाशी चिकटून असतो पण अशी भरभक्कम अवर आवरी झाली ,सफाई झाली की'चित्ती असू द्यावे समाधान' मधले खरे 'समाधान' म्हणजे काय ते कळते.

तर थोडक्यात काय,एक कोळीण, एकदा राजमहालात रहायला जाते ,तिला तिथे काही झोप येत नाही ,कारण काय? तर तिच्या घरात सदैव दर्वळणारा माशांचा वास तिला राज महालात येत नसतो! मग ती एक युक्ती करते ,तिच्या मासे ठेवायच्या पाटीवर पाणि मारून, तीपाटी उशाशी ठे वून झोपी जाते!ती त्या माशांच्या वासाला मिस करत असते!. अहो अतिशयोक्ती उदाहरण आहे हे, पण खरच ,आत्ता या क्षणी घर एव्हढे क्लटरफ्री झाले आहे कि माझी झोपच उडाली आहे,म्हणुन इथे फेसबुकवर येउन क्लटर- पक्षी हे लिखाण करते आहे.!!:)----प्रीती बर्वे