Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

तरीही जगण्यासाठी खूप काही कराव लागतं, धावपळ-संघर्ष अटळ असतो.
उद्या जगू, परवाही जगू आणि अनेक वर्षे जगू अशी अशा बाळगून रोज, दरक्षण प्रयत्न चालू असतात. मृत्यू निश्चित आहे, पण आशा-आकांक्षा-स्वप्नांना मरण नाही.

एकदा लोणावळा स्टेशनवर बसलो असताना मला लोणावळ्याचे हमाल जवळून पाहता आले. लोणावळा स्टेशनवर फार गर्दी नसते. गाडी येते तेव्हा अनेक लोक येतात. गाडी गेली की सगळ सामसूम. गाडी गेल्यावर चहावाले बिडी पेटवून कोपरा धरतात. वडा पाववाले थोडी झोप काढून घेतात. हे सगळे मावळ भागातले. कष्टकरी. शेतीतून खाण्यापुरत पिकवतात. आणि खर्च चालवण्यासाठी हमाली करतात. गाडी आली की ह्यांची धावपळ सुरु होते, गाडी गेली की एकदम शांत भूमिकेत शिरतात. खरं जीवन जगतात. जोवर जीव आहे तोवर धावायचं. श्वास थांबला की शांत व्हायचं. जीवन काय असतं हे पाहायचं तर हमालांच जीवन पहा. जोवर डोक्यावर बोजा आहे तोवर उचलायचा. नाही मिळाला तर चार सवंगडी जमवायचे आणि स्टेशनवर कुस्ती खेळायची. बोजा असला तरी ठीक, नसला तरी ठीक. लोणावळ्याचे हमाल असेच आहेत. पुण्याकडून किंवा मुंबईकडून ट्रेन येताना दिसली की त्यांच्यात चैतन्य भरत. अंग झाडून ते तयार होतात. कंबरेचा पट्टा आणि हाताचा बिल्ला घट्ट करतात. त्यांच्या लाल डगल्यात जोश भरतो. ट्रेन थांबण्याआधी ते डब्यात शिरतात आणि ट्रेन थांबते तोवर एका गिऱ्हाईकाचं समान डोक्यावर घेवून उतरायला लागतात. ट्रेन इतकाच त्यांच्या कामाचा स्पीड असतो.
मी लोणावळा स्टेशनवर बसलो होतो. सगळ सामसूम होत. दोन कुत्रे कचर्यातून काहीबाही शोधून खात होते. लांबवर पिवळ्या फलकावर लोणावळा लिहिलेलं स्पष्ट दिसत होत. त्याला टेकून एक भिकारी बसला होता. नुकतीच एक ट्रेन निघून गेली होती. त्यामुळे स्टेशन शुन्य अवस्थेत आलं होत. इतक्यात काही हमाल बोजा पोहोचवून पुन्हा स्टेशनवर आले आणि माझ्या बाजूला खाली बसले. पुढची ट्रेन तासभर येणार नव्हती. त्यामुळे ते निवांत झाले. त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.

एकाने सुरुवात केली, " बाळ्या गेला रे, साल्याची लई आठवण येते. दोन तुकडे झाले व्हते त्याच्या body चे"
मी कान टवकारले. कोण बाळ्या, त्याच्या body चे तुकडे झाले?

मग दुसरा हमाल बोलू लागला. " आम्ही चा पिलो आणि बसलो. बाळ्या लई उदास होता. मी इचारलं तसा भडभडा बोलू लागला. म्हनला, आमच घर वळवण मध्ये होत. धरण बांधायचं म्हणून आमाला हाकलल. माझा आज्जा डोंगरगावाकड आला. तिथे त्याने घर बांधल. आता त्याला लई वर्स झाली. आमच घर पडायल आलंय. घूस येते नी समद घर पोखरते. उंदीर बी लई माजले. परवा माझा पोरगा रांगत व्हता अन समोर साप आला. फना उगारून बसला राव. बायडीनी बघितल म्हणून बर. नाहीतर माझा चिंट्या तिथच मेला असता. च्यायला घराची डागडुजी करायला पाहिजे. पण एवढा पैका कुठे घावायाचा? एक गाडी येती तवा एक passenger घावतो. दहा रुपय बी देत नाहीत. च्यामारी, आता दर ट्रेनला दोन-तीन passenger घावले पाहिजे.बाळ्या बोलत व्हता अन पुण्याहून डेक्कन आली. गाडीची शिट्टी ऐकली अन बाळ्या संगती मीबी ट्रेन कड धावलो. त्यादिवशी ट्रेनचा स्पीड जरा ज्यादा व्हता. बाळ्या पहिल्या डब्यात घुसायला गेला. स्पीड लई होता. त्यान दरवाजा बी बराबर पकडला पण पाय सटकला अन तो गेला गाडीखाली. dead body पाहिली तव लई लई रडलो राव. अरं, लाल डगला रक्ताने माखला व्हता. एक पाय तुटून बाजूला पडला व्हता...च्यामारी, त्यादिवशी मी घावलेला passenger सोडला अन बाळ्याची body उचलली. आजवर लई बोजा उचलला. पन बाळ्याची body उचलली तो बोजा साला जलमभर ध्यानात राहील."

त्याच बोलणं ऐकून सारे हमाल स्तब्ध झाले. माझ्या अंगावर काटा आला. जास्त गीऱ्हायिक मिळवण्यासाठी बाळ्या जीवावर उदार झाला आणि गाडीखाली सापडून मेला.

मी सगळ्या हमालांचे चेहरे पहिले. ते कष्टकरी भेदरले होते. अस वाटत होत, हे आता पुन्हा ट्रेन पकडण्यासाठी कधीही धावणार नाहीत. धावती ट्रेन पकडण्याची हिम्मत तर करणार नाहीतच, उलट हमालाचा धंदा सोडून देतील !! बाळ्यासारखे आपले दोन तुकडे होतील ही भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
" अर, एका टायमाला ५० किलो उचलीन असा गडी हाय मी" अस म्हणणारे हे रांगडे गडी गळून पडले होते.
इतक्यात ट्रेनचा आवाज आला. पलीकडच्या स्टेशनवर ट्रेन येत होती. मी हमालांकडे पहिल. वाटलं, आता हे घाबरून गप्प बसतील. पण नाही. लाल डगला घातलेल्या त्या गड्यांच्या अंगात वारं शिरलं. एकामागून एक उठला. भराभर अंगाला लागलेली धूळ झटकली आणि धडाधड रेल्वे रुळांवर उड्या मारून पलीकडच्या फलाटावर पोहोचला. मिनिटभर उशीर झाला असता, तर येणारी ट्रेन त्यांच्या अंगावरून गेली असती. त्याचं बाळ्या झाला असता.

ट्रेन स्टेशनवर शिरण्याआधी सारे हमाल एक एका डब्यात शिरले. पटापट गिऱ्हाईके शोधली. डोक्यावर बोजा घेवून उतरू लागले.

त्यांनी जीवनाच अजब सत्य उलगडून दाखवल. खाली मरण आ वासून बसलं होत. हात सटकला की मेला. काही मिनिटात dead body बनते. पण मरणाला घाबरून कस चालेल. मरणाला घाबरून मागे फिरलं तर पाठीशी गरिबी आहे. दारिद्र्य आहे. कोणाला घर बांधायचं आहे, कोणाला बहिणीच लग्न लावायचं आहे तर कोणाला मुलाला चांगल्या शिक्षणासाठी पुण्याला पाठवायचं आहे. खाली आ वासून बसलेल्या मरणाला घाबरून मागे फिरलो तर ही स्वप्न पूर्ण होणार कशी? मरण चुकवून गीऱ्हायिक पकडायलाच पाहिजे.

मी मनोमन त्या हमालांना सलाम ठोकला. ना ते फार शिकलेले होते, ना जीवनाच तत्वज्ञान त्यांना कळल होत. पण ते जिवंत होते. आपली dead body होणार आहे हे त्यांना माहित होत. तरी त्याआधी ते कर्तव्य पार पाडत होते.
मरण त्यांना शरण गेल होत.

जेव्हा तुम्हाला हमाल दिसेल, तेव्हा त्याच्याकडून शिका- मरण येणारच आहे, पण घाबरून मी लपून बसणार नाही.

आणि हो, ह्या कष्टकरी हमालांना आदर्श माना. खर्या सुपर स्टारपेक्षा हे जास्त मोठे आहेत. ते बोजा उचलल्याच नाटक करत नाही. खरोखर बोजा उचलून धरती मातेला घामाची सलामी देतात
ते जगायला शिकवतात. मरणाला हुलकावणी देतात.

तुमच्या पैकी उद्या कोणी मोठ्या पदावर पोहोचला तर समस्त हमालांना एखादा मोठा पुरस्कार समर्पित करायला विसरू नका. कारण त्यांना पुरस्कार दिला तर तो त्या पुरस्काराचा सन्मान होईल. कष्टाचा सन्मान होईल.
- निरेन आपटे