Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

गावकर्याने हात जोडले आणि म्हणाला, " माझी आई...सीताबाई आजारी आहे. माझ्याकडे थोडे रुपये आहेत. ते तिच्या आजारपणासाठी खर्च करावे लागतील. मला लुटू नका."
सीताबाई नाव ऐकताच दरोडेखोर भावूक होवून म्हणाला,
" अरे, माझ्याही आईच नाव सीताबाई आहे. जा, लवकर जा !"

दुसरा गावकरी मागोमाग येत होता. त्याने हे बोलणं ऐकलं. तो धूर्त होता. दरोडेखोराने त्याला विचारलं, " कोण रे बाबा तू, कुठ चालला?"
धूर्त गावकरी म्हणाला, " माझं नाव. येसाजी...पण मला प्रेमाने सगळे सीताबाई हाक मारतात!!"
सीताबाई नाव ऐकून दरोडेखोर पुन्हा भावूक झाला आणि त्याने येसाजीलाही सोडून दिले.

काळ बदलला. माळराने संपली. पण दरोडेखोर संपले नाहीत. त्यांनी दुसरे मार्ग शोधले. पु. ल. देशपांडे ह्यांचा अंतू बरवा म्हणतो:
" अहो आठ आणे खाल्ले की चौकटीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रीक जेलात घालतात आणि एक लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेम्ब्लीत...लोकनियुक्त प्रतिनिधी !!"
आजही हे वर्णन जसच्या तसं लागू आहे. ह्याच लोकनियुक्त प्रतिनिधींनी उघड दरोडेखोरीचे जे मार्ग सुरु केले त्यातील लगेच समोर आणि अडवा येणारा मार्ग म्हणजे टोल नाका. वर सांगितलेल्या विनोदातील दरोडेखोराला निदान काळीज होतं. टोल नाक्याला काळीज नाही. तिथे computer मध्ये तुम्ही पैसे दिले अशी कमांड दिली तरच आडव गेट उघडतं. ना computer ला काळीज आहे ना राज्यकर्त्यांना !!
तुम्ही टोलवर सीताबाई, गीताबाई किंवा नरेंद्र-देवेंद्र नाव जरी सांगितलं तरी,
" 75 रुपये सुट्टे द्या" अशीच मागणी होईल !!

जेव्हा डेंगू झालेला मुलगा टोल नाक्या पलीकडील हॉस्पिटलमध्ये भरती होतो तेव्हा पालक दिवसातून दहा वेळा घर ते हॉस्पिटल चकरा मारतात. हॉस्पिटलचा खर्च भागवण्यासाठी नातलागांकडून उधार आणतात. पण टोल नाका पैसे घेतल्याशिवाय सोडत नाही. जितक्या वेळा जाल तितक्या वेळा पैसे भरा !!

घरी पाहुणे आले तर त्यादिवशी अर्धा लिटर दूध आणणारं गरीब कुटुंब देवदर्शनाला निघालं की खिसेकापू टोल नाका पैसे वसूल करतो आणि मगच देवदर्शनाला जाऊ देतो. सध्या सामान्य माणसांना वाचवणारा फक्त देव आहे. पण तिथे जावे तर टोल आहेच. टोल चुकवायचा असेल तर मयत होणे हा एकच उपाय आहे. कारण मयताच्या अंगावरच्या कपड्याला खिसा नसतो? टोल वसूल करणार कुठून?
Mall मुळे छोट्या दुकानदारांचा धंदा बुडाला. त्यांनी लांबून घावूक माल आणून चार पैसे जास्त कमवायचे ठरवले तरी टोल वर होणारी लुट सहन करावी लागते.
कोणी जन्माला आला म्हणून जा, नाहीतर मयताला जा...पण आधी टोल भरा.
Sales tax भरा, VAT भरा, service tax भरा...आणि हे भरायला जात असाल तर टोलसुध्दा भरा.
माणूस फक्त कर आणि टोल भरायला जन्माला आला की काय ?
ही सक्तीची वसुली कशासाठी?... देशाच्या विकासासाठी!!. कुठे आहे विकास? टोल नाक्याच्या मागे पुढे खड्डे असतात. एकदा रस्त्याची उजवी बाजू वर उचलतात, मग डावी बाजू खाली गेली की ती वर उचलतात. तोवर रस्त्याच्या उजव्या बाजूला खड्डे पडतात… परत चालले तिथे विकास करायला!! याच रस्त्यांवरून वाहन चालवताना क्लच-गेअर आणि ब्रेकचा जास्त वापर करावा लागतो आणि त्यामुळे जास्त इंधन वाया जातं. एक रिक्षावाला किंवा टेम्पोवाला दिवसाकाठी जितके कमावतो त्यातील काही टक्के भाग खराब रस्त्यांमुळे इंधनावर गमावतो. तो कमवेल काय, गमवेल किती, खाईल काय आणि जगेल कसा?

Petrol -diesel साठी आपल्याला दुसर्या देशांवर अवलंबून राहावं लागतं आणि तरीही आपण खराब रस्त्यांमुळे विनाकारण इंधन जाळतो !! खुद्द टोल नाक्यावर वाहने जमा होतात. Clutch -brake -गेअर ने संथ गतीने पुढे सरकावे लागते. वेळ वाया जातो आणि नाक्यावर अनेक ग्यालन इंधन विनाकारण जळत जातं. एकीकडे टोल लुटतो, दुसरीकडे इंधन वाया जातं. शेवटी नुकसान देशाचं होतं.

NATIONAL HIGHWAY DEVELOPMENT प्रोजेक्टची आकडेवारी पहा." Golden Quadrilateral " रस्त्याचं बांधकाम करताना एका किलो मीटर साठी ४ कोटी रुपये अंदाजित खर्च धरला आहे.
आता महाराष्ट्रात २०१२ मध्ये काही टोल नाक्यावर जमा झालेली रक्कम पहा.
प्रकल्पाचं नाव: Northen Bypass to Barshi Town on temburni kurudwadi Barshi road SH 77
टोलवर जमा झालेली एकूण रक्कम : 7,82,64,896.00
Mumbra - Kausa Bypass Road
टोलवर जमा झालेली एकूण रक्कम :1,22,44,23,365.00
Pune Paud Road SH
जमा झालेली एकूण रक्कम :- 8, 34, 58,258.50
असे एकूण १६९ टोल नाके असून दर वर्षी सरासरी ७५० कोटी रुपये जमा होतात.
भाजप सरकारने मंगलयान पाठवलं फक्त ४५० कोटी रुपयात. ह्या यानाने ६५० मिलिअन किलो मीटर अंतर पार केलं. म्हणजे दर किलो मीटरला ६.७ रुपये खर्च झाला.
महाराष्ट्रात एकूण १८ राष्ट्रीय महामार्ग आणि इतर राज्य महामार्ग आहेत. त्यांची एकूण लांबी आहे 33,705 किलो मीटर.
ह्याचा अर्थ असा झाला की मंगळवार जाणे स्वस्त आहे. पण महाराष्ट्रात फिरणे म्हणजे खिसे कापायला आमंत्रण देण्यासारखे आहे. मंगळ परवडला पण महाराष्ट्रातील प्रवास म्हणजे अमंगल यात्रा आहे !!

आजवर टोलने जमा केलेली रक्कम जमेस धरली तर मंत्रालयातून निघालेला रस्ता आत्तापर्यंत पृथ्वी प्रदक्षिणा करून पुन्हा मंत्रालयात यायला हवा होता. पण फक्त मंत्रालयाच्या आसपास उत्तम रस्ते असून इतर ठिकाणी चंद्रापेक्षा जास्त खड्डे आहेत. त्याचं पाहिलं कारण आहे- हलक्या दर्जाचं साहित्य वापरलं जातं. एकच रस्ता पुन्हापुन्हा बांधतात. तो खर्च पेलण्यासाठी टोल वसुली दिवसरात्र चालूच असते. हे टोल नाके म्हणजे तळ नसलेले हंडे बनले आहेत. वरून कितीही टाका, खाली तळ नाही त्यामुळे कधीच भरणार नाहीत !!
रस्त्यात खड्डे पडत जातात आणि संबंधितांच्या बँक खात्यात भर पडत जाते....आणि गम्मत अशी की रस्ते खराब होतात पण स्पीड ब्रेकर टिकून राहतात. मागे पुढे रस्ता नसतो आणि स्पीड ब्रेकर तेवढा बरोबर डोक वर काढून बसलेला असतो… ह्या "विकासासाठी" लागणारा निधी अश्या लोकांकडून वसूल केला जातो ज्यांना दोन वेळचं जेवण चैन झाली आहे. सरकारी नोकरीचे दरवाजे बंद होत चालले आहेत आणि खासगी नोकरी hire and fire तत्वावर मिळते. उद्यापासून येवू नका असं खाजगी नोकरीत केव्हाही सांगू शकतात.
शिक्षण महाग, अन्न धान्य महाग,वीज महाग....ह्या महागाईला कंटाळून भारताने सध्याच्या राज्यकर्त्याला निवडून दिले आहे. हे मान्य आहे की सगळी महागाई एकदम कमी होणार नाही. पण टोल भरणारा प्रत्येक नागरिक जेव्हा एखाद खरोखर चांगलं काम करणारी सामाजिक संस्था असते तेव्हा स्वताहून जेव्हडे जमेल तेव्हडे पैसे देतो. आपले पैसे वाया जाणार नाहीत ह्याची त्याला खात्री असते. पण टोल वर पैसे भरतो ते जबरदस्ती केल्यामुळे. आपले पैसे कोणाच्या खात्यात जातात हे त्याला माहित असतं. आपल्याला सरकार लुटत राहणार आणि आपण निमुटपणे लुटमार सहन करायची ही भावना त्याच्या मनात असते. आमच्या देशात आम्ही लुटले जातोय आणि आमच्या पाठीशी कोणी नाही ही सगळीकडे पसरत चाललेली भावना हा फार मोठा सामाजिक घात आहे. तब्बल ६ दशके भारतात सर्वात जास्त निर्मिती झाली आहे ती ह्याच अविश्वासाची !!

जेव्हा विश्वासाचा एक किरण श्री. मोदींच्या रूपाने समोर आला तेव्हा देशाने त्यांच्या हाती सत्ता दिली. महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्या पक्षाने शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेतला. ह्याच शिवाजी महाराजांच्या रायगडाचे दरवाजे बंद झाले होते. तेव्हा हिरकणी बाळासाठी बुरुज उतरून खाली गेली. महाराजांना समजल तेव्हा त्यांनी तिचा सन्मान केला आणि ती ज्या बुरुजावरून उतरली त्याला हिरकणीचा बुरुज नाव पडले. शिवछत्रपतीना स्मरून रस्त्यांवर जबरदस्ती ठोकून ठेवलेले दरवाजे नव्या सरकारने उघडावेत.

महाराजांनी विकासासाठी गोरगरिबांना लुटले नाही. जुलमी व्यापार्यांना सुरत मध्ये जाऊन गाठले आणि त्यांच्यावर छापा घालून खजिना आणला व तो देशहितासाठी वापरला. महाराष्ट्रात असे ढीगभर व्यापारी पडले आहेत. कोणी गावाचं पाणी खेचून cola विकतोय, कोणी शेतकऱ्याचा माल विकला जाऊ नये म्हणून पिझ्झा विकतोय तर कोणी रस्ते नसतानाही गाड्या विकतोय. त्यांचा खिसा पहा. मजबूत कॅश भरली आहे.

त्यांना सर्व सोयी देवून सामन्यांची लुट करणे थांबवा.

नाहीतर आधीचे राज्यकर्ते आणि तुमच्यात काहीच फरक नाही असं नाईलाजाने म्हणावे लागेल!!
-निरेन आपटे