मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचाल

पुण्यातील हिंगणे या ठिकाणी असलेल्या , ' हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेने १४ जून २०२० ला शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था . महिला सबलीकरणासाठी त्यांना शिक्षित करण्याची आवश्यकता जाणून, त्या काळात म्हणजे १८९६ सालात महिला शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवण्याचें धाडस केले ते कर्मठ विचारसरणीच्या समाजात. त्याकाळी असा निर्णय घेणे म्हणजे विस्तवाशी खेळ होता. परंपरा रूढी यात गुरफटलेल्या समाजाचा विरोध पत्करून त्यांनी स्वतः विधवेशी विवाह करून मगच विधवा विवाह संकल्पनेचा पाठपुरावा केला. आधी केले नि मगच सांगितले. हिंगणे येथे स्त्री शिक्षण संस्था सुरु करून महिलांना शिक्षणासाठी एक पर्याय उपलब्ध करून दिला. या संस्थेच्या स्थापनेत आणि वाढीस महर्षी कर्वे यांच्या योगदानाची दखल घेऊन संस्थेचे नाव 'महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे बदलले. शासनानेही कर्व्यांच्या कार्याची दखल त्यांना १९५८ मध्ये

''भारतरत्न'' या देशातील सर्वोच्च पुरस्काराने गौरवून घेतली. शिक्षणातून महिलांचे सबलीकरण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गेली १२४ वर्ष हि संस्था महिलांना शिक्षित करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सातत्याने झटत आहे. या मातृसंस्थेशी संलग्न ६३ संस्था पुणे, सातारा, वाई , रत्नागिरी, कामशेत, नागपूर आणि वसई येथे कार्यरत आहेत. महर्षी कर्वे यांची – समान संधी देणारा समाज, सामाजिक न्याय, महिलांना समाजात महत्वाचे स्थान देऊ करणारी मानसिकता, त्यांनीही गुणवत्तापूर्वक जीवन जगावे, आचार, विचार, आणि संचार स्वातंत्र्य, यातून त्यांची वैयक्तिक स्वप्नपूर्ती साठी साथ ही विचारधारा संस्थेने गेली सव्वाशे वर्ष जपली आहे. संस्था चालवायला आर्थिक पाठबळ लागते. यासाठी संस्थेने सुरु केलेल्या भाऊबीज निधीला जनतेकडून वाढत प्रतिसाद मिळाला आहे.संस्थेचे आजन्म सेवक दिवंगत गो.ग. चिपळूणकर यांनी १९१९ साली सुरु केलेल्या 'भाऊबीज निधी' योजनेचेही हे शतक महोत्सवी वर्ष आहे. भावाचे कर्तव्य आणि बहिणीचा हक्क याचा सुंदर मिलाफ भाऊबीज निधीच्या संकल्पनेत दिसून येतो. समाजातील व्यक्तींनी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आपल्या ऐपतीप्रमाणे दिलेली प्रेमाची भेट असे या भाऊबीज निधीचे स्वरूप आहे. सध्या संस्थेत पूर्वप्राथमिक, , प्राथमिक, शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा असून ६४ संलग्न संस्थांमधून तीस हजाराचे वर विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. महर्षी कर्वे यांनी १९१६ ला श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना करून महिलांना महिला विद्यापीठाचीच पदवी देण्याची सुरुवात केली. या विद्यापीठानेही आपली यशस्वी शतकी वाटचाल २०१६ ला पूर्ण केली आहे. संस्थेच्या संकुलात “बानुबाई नानावटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग” आणि “बी.एन.सी.ए.” हे स्थापत्यविद्यालय या दोन महिला शिक्षणसंस्था आहेत.

सालाबाद प्रमाणे उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेच्या बकुळ तांबट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन मध्ये शिक्षण घेणाऱ्या पूजा धनराज भोसले याना,'' अण्णांची लेक '' पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. यंदाचा

'' बाया कर्वे'' पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेस दिला जाणार आहे. अशा या सेवाभावी संस्थेस ज्यांना शक्य आहे त्यांनी संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कार्याची पाहणी करावी. हे एक तीर्थक्षेत्रच आहे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे संस्थेच्या भाऊबीज निधीस सढळ हाताने मदत करून या महान कार्यात सहभागी व्हावे.

संस्थेचे संकेत स्थळ: kinsspune@karve-institute.org

भारतीय सौर आषाढ ६शके १९४२ ( २७ जून २०२० )
विजय देवधर
गौरीशंकर, १४ गोवर्धन सोसायटी , वीर सावरकर नगर, पुणे ४११०३७
भ्रमणभाष ९१ ८३०८८०५८९५