मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

महाराष्ट्र वासिनी देवी

नमस्कार माहेरवाशिणींनो! आज संक्रांतीनिमित्त होणाऱ्या हळदीकुंकवाला आपण बहुसंख्येने जमला आहात म्हणून खूप आनंद वाटतो. आणि त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे महाराष्ट्रातील माहेरवाशिणी देवी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांचा सध्या लॉस एंजेलिसला मुक्काम असून त्यांना आपल्या समारंभाला यायचे आमंत्रण देताच त्यांनी स्वीकारले आणि त्याप्रमाणे त्या आज येथे आल्या आहेत. प्रथम मी पुण्यनगर वासिनी तांबडी जोगेश्वरी यांना त्यांनी चार शब्द सांगावे अशी मी विनंती करते.

नमस्कार, तर मी पुण्याची तांबडी जोगेश्वरी, पुण्याची ग्रामदेवता. आम्हा सर्वाना अमेरिकेत येऊन दोन आठवडे झाले. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, नायगारा धबधबा आणि ग्रॅंड केनयन बघून आम्ही लॉस एंजेलिसला आलो आहोत. अमेरिकतील प्रेक्षणीय स्थळे आम्हाला फार आवडली. प्रत्येक ठिकाणी असलेली स्वच्छता, शिस्त वाखाणण्यासारखी आहे. वाटले की आपल्याकडे भारतात या गोष्टी यायला हव्या. खरे सांगू, या प्रवासात सर्वात आनंदाचा अनुभव होता

वॉशिंग्टनला पाहिलेला महिलांचा प्रचंड मोर्चा. तेथे अमेरिकेतील स्त्रीशक्तीचा साक्षात्कारच झाला आम्हाला. नवीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्त्री स्वातंत्र्यावरील हल्ल्या विरुद्ध आणि मेक्सिकन आणि इतर इमिग्रन्ट यांच्याबद्दल त्यांना असलेल्या आकसाविरुद्ध अनेक जणींनी आवाज उठवला. आमची खात्री आहे की ट्रम्प यांच्या जुलुमाविरुद्ध स्त्रीशक्तीचा विजय होईल! असेच मोर्चे म्हणे इतर शहरातच नव्हे तर जगभरातील इतर अनेक शहरात झाले, त्यातून भाग घेणाऱ्या सर्व महिलांना आमचे आशीर्वाद! अशा पद्धतीची मोठी निदर्शने भारतात स्त्रियांनी केली तर हुंडाबळी, बेअब्रू, बलात्कार इत्यादी त्यांच्या तक्रारींकडे सरकारचे लक्ष जाईल!

खरोखर तुम्हा सर्वाना येथे भेटून फार आनंद होत आहे. तुम्ही भारतात याल तेव्हा तेव्हा मुद्दामहून माझ्या दर्शनाला या. खणानारळांनी माझी ओटी नाही भरलीत तरी चालेल. पण गाभाऱ्यात येऊन माझे दर्शन घ्या. मला साधा फुलांचा गजरा पण आवडतो. तुम्हाला मदत करायची असेल तर माझ्या दारात काही उपाशी बंधूभगिनी असतात, त्यांना अन्नवस्त्र द्या. माझ्या देवळाभोवती प्रदक्षिणा घालताना माझा इतिहास केव्हढा आहे ते लक्षात घ्या. पुणे शहर वसायच्या आधीपासून मी येथे आहे. माझे दर्शन झाल्यावर पर्वतीवरील शंकराच्या देवळाबरोबर पार्वतीच्या मंदिराला भेट द्या. माझा उत्सव जसा नवरात्रात असतो तसा पार्वतीदेवीचा चैत्रात असतो. तिलाच अन्नपूर्णा म्हणतात. सन १८८६ सालच्या लंडनच्या दप्तरातला दाखला गंमत म्हणून सांगते. पूर्वी रोममध्ये सुद्धा “मातर मॉन्टाना” म्हणजे पर्वतीवरील देवी होती. तिचे नाव होते अॅना पेरेना. तिचीही जत्रा मार्चमध्ये असते. दीर्घायुष्य आणि सुबत्ता मिळावी म्हणून तिची प्रार्थना करतात. अन्नपूर्णा आणि अॅना पेरेना यातले शब्दसाधर्म्य केवळ योगायोग नाही, कारण तेच दप्तर पुढे म्हणते की स्वप्नातही येणार नाही इतक्या गोष्टी भारताने पश्चिमेला दिल्या आहेत.

पुण्यातील शीतलादेवी, चतुःशृंगी, पद्मावती देवी तसेच महाराष्ट्रातील इतर देवता: माहूरची रेणुकादेवी, आंबेजोगाईची योगेश्वरी, तुळजापूरची तुळजा भवानी, नाशिक जवळील सप्तशृंगी आणि इतरहि देवी आमच्याबरोबर आल्या आहेत, पण त्या साईटसीइंगला गेल्या आहेत! करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि देवासच्या चामुंडा देवी या दोघी मात्र येथे उपस्थित आहेत. 

आधी मी महालक्ष्मीना आपल्याला त्यांचे मनोगत सांगावे अशी विनंती करते.

करवीर वासिनी महालक्ष्मी

नमस्कार भगिनीनो, आज तुम्हाला भेटून मला फार आनंद होत आहे.

माझे मंदिर चालुक्य राजांनी सहाव्या शतकात बांधले असले तरी इसवी सनापूर्वी पासून, किंबहुना भगवान परशुरामाच्या काळापासून माझे कोल्हापूर परिसरात वास्तव्य आहे. भारतातील बारा मुख्य देवीशक्ती पीठात माझी गणना होते. माझ्यामुळे कोल्हापूरला “दक्षिण काशी” म्हणून ओळखले जाते.

नवरात्रामध्ये माझ्या मंदिरात मोठा उत्सव साजरा होतो. दहाही दिवस वेगवेगळ्या पूजाअर्चा, पालखी, होमहवन, महाप्रसाद आणि संगीताचे कार्यक्रम चालू असतात. दररोज मला वेगवेगळी अलंकारपूजा बांधली जाते. सिंहारूढ, खडीपूजा, हत्तीआरूढ, गरुडारूढ अशा वेगवेगळ्या पूजा मंदिरातील पुजारी बांधतात. कुटुंब म्हंटले की भांडण आलेच, तर माझी बहीण टेंबलाई अशीच एकदा माझ्याशी भांडून रुसून दूर डोंगरावर जाऊन राहिली. ती माझी बहीणच असल्याने पंचमीला माझी पालखी टेंबलाईला भेटण्यासाठी नेली जाते. दिवाळी मध्ये मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव साजरा करतात. तेव्हा विविध पुजांबरोबरच मंदिरातील सर्व दीपमाळा तैलदिव्यांनी पाजळल्या जातात.

साधारणपणे ३१ जानेवारी आणि ९ नोव्हेंबर या दिवशी सूर्याचे मावळते किरण माझ्या मूर्तीच्या पावलापासून ते मस्तकापर्यंत क्रमाक्रमाने पडतात आणि ती शोभा अवर्णनीय दिसते. या उत्सवाला किरणोत्सव म्हणतात. त्यावेळी घंटानाद करीत आरती होते.

भगिनीनो जेव्हा तुम्ही भारतभेटीला याल तव्हा माझ्या दर्शनाला अवश्य या. माझ्या दर्शनाबरोबरच तुम्हाला माझे ऐतिहासिक देऊळ बघण्याचा आनंद मिळेल,

आता आमच्या बरोबर आलेल्या देवासच्या चामुंडा देवी त्यांचे मनोगत सांगतील.

देवासची चामुंडा देवी

मी देवासची माहेरवाशीण. देवास हे नाव पडलं ते देवीचा वास असलेली नगरी म्हणजे देवास. तुळजाभवानी हिचे पण वास्तव्य येथे आहे. तुकोजीराव आणि जिवाजीराव या दोन मराठे सदरांनी प्रथम देवासला राज्य केले. माझे देऊळ एका टेकडीवर आहे. मला “छोटी माता” तर तुळजा भवानीला “बडी माता” असे मालवी भाषेत म्हणतात. माझे देऊळ खूप प्राचीन आहे. माझी मूर्ती एका गुफेत दगडात कोरलेली आहे. माझ्या दर्शनाने भक्तांना फार सुंदर अशी अनुभूती होते असे म्हणतात. देवळाच्या दारावर दोन बाजूना दोन पाषाणाच्या मूर्ती आहेत. ते दोन चोर मंदिरात चोरी करायच्या हेतूने आले असताना मी त्यांना शाप दिला व ते पाषाण झाले. चोरी करणे हे पाप आहे अशी शिकवण त्यांच्या मूर्ती देतात.

या डोंगरावर भक्तांना दोन मजेशीर गोष्टींचा अनुभव घेता येतो. चिंधडादेवी म्हणून एक रुईचे झाड आहे .त्याला भक्तगण आपल्या कपड्यातून एक धागा काढून वाहतात. तेव्हा अंगभर कपड्याला कधीच कमी पडणार नाही असा आशीर्वाद मिळतो. डोंगराच्या कडेकडेला दगड एकमेकांवर ठेवून केलेली घरे दिसतात. हे घर झाले की तुम्ही नवीन घर घेता अशी एक श्रद्धा आहे.

तेव्हा मैत्रिणीनो, तुम्ही माझ्या आणि तुळजाभवानीच्या दर्शनाला जरूर या. देवासचा परिसर तुम्हाला खूप आवडेल. प्रसिद्ध गायक स्व. कुमार गंधर्व मुंबई सोडून त्यांच्या प्रकृतीसाठी देवासलाच आले आणि कायम वस्ती करून राहिले. त्यांचा बंगला माझ्या टेकडीजवळच आहे.

शैलजा माटे, लॉस एंजेलिस