Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

समोर दोनचार मावळे, रामदास स्वामी, पाठीशी किंवा आजूबाजूला मासाहेब आपापल्या ठिकाणी स्थानापन्न असायचे. किल्ल्याच्या पायऱ्या वरून एखादी पालखी वर चढत असायची. तिथंच जवळपास एकादी गाय आणि वासरं चरत असायची. एखादं हरीण,मोर,घोडे फिरत असायचे डोंगरावर. जवळच गुहेत बसलेल्या वाघ,सिंव्हांची त्यांना अजिबात भीति वाटायची नाही. किल्ल्याच्या वर आंब्याच्या झाडावर लाल हिरवा आकाशदिवा लटकलेला असायचा. मंद वाऱ्यावर त्याच्या सोनेरी झिरमिळ्या हळुवार डोलत असायच्या. इन्नीचा फराळ जवळजवळ तयार असायचा पण नरक चतुर्दशीची अभ्यंग स्नानं, अंगणातला शेणाचा सडा, त्याच्यावरची रांगोळी, समोरच्या कोटेश्वराचं दर्शन झाल्याशिवाय फराळाची पंगत बसायची नाही. आज धनत्रयोदशी. नानांच्या बरोबर दादा,भाऊ, बाबा, बेबी आणि मी बाजारात जाऊन फटाके, पीअर्सचा छान वासाचा, काचेसारखा दिसणारा साबण,वासाचं तेल,उटणी शेवंतीच्या वेण्या,सगळ्या खरेदीची धमाल उडायची. गावातला एरवी रात्री शांत असणारा खालचा आणि वरचा रस्ता तऱ्हेतऱ्हेच्या वस्तुनि आणि माणसांनी अगदी भरून गेलेला असयचा. रंगी बेरंगी लखलखत्या दिव्यांच्या माळा, अत्तराचा,फुलांचा दरवळ, मुलांचा आणि मोठ्यांचा कोलाहल, वातावरण कसं भारून गेलेलं असायचं. आणि आजच, धनत्रयोदशीला माझा वाढदिवस पण असायचा. वाढदिवस तेव्हा तिथीनच व्हायचे. 'हैप्पी बर्डडे',' बर्डडे केक','क्यानडल' हे शब्द आमच्या आईवडिलांपर्यंत पोचले नव्हते अजून आणि आमचीपण ओळख नव्हती त्या शब्दांशी. रोजच्या भाकरी ऐवजी पोळी आणि सुधारस, मोरंबा यावरच साजरे व्हायचे वाढदिवस. पण आपला वाढदिवस दिवाळीच्या पहिल्या दिवशी असतो हे मला मात्र फार भारी वाटायचं मनातल्या मनात. पण प्रत्येक वाढदिवस हा काही आठवणीत फार जपून ठेवावा असा नसायचाच. पण त्यातला एक मात्र अगदी जपलाय मी मनात.त्या वर्षी बाळकाका, काकू, माई आत्त्या, बिंदूआत्त्या असे सगळे आले होते दिवाळीसाठी. दिवेलागणीची वेळ झालीच होती. सगळी मोठी माणसं बाहेरच्या हॉलमधे हास्यविनोदात रममाण झाली होती. अचानक जोरात हसत खिदळतआम्ही दोघीतीघी बहिणी तिथे गेलो. आल्या भवान्या! इति बाळकाका. त्यावर, अरे, आज धनत्रयोदशी, वाढदिवस नंदाचा ! बिन्दुआत्त्याला आठवलं एकदम. त्याबरोबर लगेच बाळकाकाच्या तोंडून दोन ओळी बाहेर पडल्या. त्याच्या अतिशय गाजलेल्या " वाहतो ही दुर्वांची जुडी" नाटकातल्या

लाविते मी निरांजन
तुळशीच्या पायापाशी
भाग्य घेवूनीया आली
आज धनत्रयोदशी

नाटक अजून बाहेर आल नव्हतं. पण बाळकाकाच्या - बाळ कोल्हटकरांच्या तोंडून त्या ओळी मी तेव्हा ऐकल्या, धनत्रयोदशीला, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. दर वर्षी दिवाळी आली की सगळ्या जुन्या गोष्टींची एक सुबक रांगोळी आपोआपच रंग घेऊन तयार होते मनात आणि आठवतं ते शेणाच्या सड्यानं शुचीर्भूत झालेलं, रांगोळीन नटलेलं अंगण,कोपऱ्यातला तो हिरवा किल्ला,वर आंब्यावर हलके हलके झोके घेणारा आकाशदिवा,मिणमिणत्या पणत्यांची रांग,
फुलबाजानी लखलखणारा आणि फटक्यांनी दुमदुमणारा भवताल. दर वर्षी दिवाळी जुन्या आठवणी घेउन नव्यानं येतच रहाते आम्हा दोघांसाठी, मुलांसाठी,माझ्या नातीसाठी आणि माझ्या साऱ्या साऱ्या जुन्या आणि नव्या मित्र मैत्रीणींसाठी.

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.