इच्छा
सुलभाने जेवणाचं टेबल आवरलं! आता मुलांच्या गृहपाठाच्या वह्या तपासल्या की आपण झोपायला मोकळे आहोत या नुसत्या विचारांनीच तिला बरे वाटले! तिची सात वर्षाची मुलगी अनामिका केव्हांच पेंगायला लागली होती. सुलभाताईंनी नव-याला म्हणजे वसंतला ’अनामिकेला झोपायला घेऊन जा’ अशी नुसती मानेनेच खुण केली. वसंतने देखील कोणतीही खिटखिट न करता ’पडत्या फळाची आज्ञा" पाळली आणि अनामिकेला तो बेडरूममधे झोपाविण्यासाठी घेऊन गेला. झोपेतच अनामिका ’डॅडी स्टोरी, डॅडी स्टोरी’ असं म्हणत होती पण ती ’आधीच पेंगायला लागली आहे तेव्हा आता तिला बेडटाइम स्टोरी सांगुन कशाला वेळ घालवा आणि परत जाग आणा” असा ’सारासार’ विचार करुन तो लागलीच परत फिरला. वसंतने एक ओझरती नजर किचनकडे टाकली आणि किचनकाऊंटरवरचा पसारा साफ करण्यासाठी आपण मदत केली पाहिजे अशा विचारांना तोंडातल्या गमबरोबरच बाहेर फेकुन दिले. त्याचा स्मार्ट फोन-मित्र त्याची आतुरतेने वाट पाहात होता. त्याच्यावर संध्याकाळी खेळत असलेला गेम कधी एकदा पुर्ण करतो असं त्याला झालं होतं!
तेव्हढ्यांत सुलभाचं देखील आवरुन झालं असावं! तिनं आधी तिच्या स्मार्ट फोनवर लॉग ऑन केलं आणि इमैल्स चेक करुन झाल्यावर ती मुलांच्या गृहपाठाचा गठ्ठा घेऊनच डायनिंग टेबलावर बसली. ’चला आता हे एव्हढं काम झालं की मस्तपैकी तण्णाऊन दे” हा विचार दिवसभर काम करुन थकलेल्या आणि आंबुन गेलेल्या शरीराला तर फारच आवडला! वसंत मधुन मधुन सुलभाकडे पाहात होता पण दोघेही आपापल्या कामांत इतके मग्न झाले होते की हातातले काम थांबऊन एकमेकांशी बोलावे असे कुणालाही वाटले नाही! तेव्हढ्यांत वसंतला सुलभाचा अस्पष्ट असा हुंदका ऐकु आला. "अरेच्चा आतां काय झालं हिला?" असा विचार करीत तो जागेवरुनच म्हणाला: "अग ए बाई, आता रडायला काय झालं?"
सुलभा: कांही नाही रे! काल मी माझ्या वर्गातल्या मुलांना गृहपाठ दिला होता तो वाचत होते!
वसंत: बरं मग? त्यांत रडण्यासारखं काय आहे?
सुलभा: सांगते ना! त्यांना मी "तुमची एखादी इच्छा काय" यावर लिहुन आणायला सांगितलं होतं!
वसंत: तुला खरं सांगु का? मला अजुनही कळत नाहीये!
सुलभा: (रडत रडत) अरे त्यातलाच एक गृहपाठ मी वाचते आहे आणि तो वाचुनच मला.....
वसंत: अच्छा अच्छा! आलं लक्षांत! अग असं लिहिलं तरी काय आहे त्यामधे? वाच बघु!
सुलभा: हो वाचते ना! ऐक!
सुलभा वाचु लागली! "आज आमच्या बाईंनी तुमची काय इच्छा आहे ते लिहुन आणायला सांगितलं आहे! मला किनै स्मार्ट फोन व्हायचय! माझ्या मम्मीडॅडीला फोन खुप म्हंजे खुपच आवडतो. त्या फोनची कित्ती काळजी घेतात! कधी कधी तर फोन वाजला ना, की ते हातातलं काम तसंच टाकतात आणि धांवत पळत जाऊन त्यावर बोलतात. मला तर त्यांची ही मज्जा बघायला खुप आवडतं! ते कधी कधी माझ्याशी बोलत असले किंवा खेळत असले तरी तसंच अर्धवट टाकुन निघुन जातात. म्हंजे तो फोन माझ्यापेक्षां किती लकी नाही का? डॅडी ऑफिसमधुन घरी आला की कुण्णाशी बोलत नाही, पण फोनवर मात्र खुप बोलतो. एकदां तर तो मला ऊचलुन घेत होता आणि त्याचा फोन वाजायला लागला! त्याने मला तसच खाली ठेवलं, आणी मी पडले तरी तो थांबला नाही म्हणजे फोन माझ्यापेक्षांही किती महत्वाचा असेल ना! म्हणुनच मला पण फोन व्हायला खुप आवडेल! मग माझी मम्मी आणि डॅडी माझ्याशी खेळतील, त्यांच्या फोनवर नाही खेळणार!. मी जर फोन झाले ना तर मग मी त्यांना फोन इतकीच आवडायला लागेन. कधी कधी ते फोनवर बोलत असले ना आणि मला कांही महत्वाचं सांगायचं असेल ना तर ते मला "गप्प राहा" असं मोठ्यानं ओरडुन सांगतात! मग मी त्यांचा फोन संपण्याची वाट पाहाते. मुलांनी नेहमी आई वडीलांचं ऐकावं अस आमच्या टीचरच सांगतात! अय्या, माझी टीचर म्हणजे माझी मम्मीच-कित्ती फ़नी ना? पण कधी कधी ना नंतर मला अजिबात आठवतच नाही की मला काय सांगायचं होतं ते! आणि मग ते परत ओरडतात की मी त्यांना खुप डिस्टर्ब करते म्हणुन! म्हणुन देवबाप्पा, तु मला फोनच कर, नाही नाही, स्मार्ट फोन कर म्हणजे मम्मीला आणि डॅडीला मी खुप आवडायला लागेन"
ते वाचता वाचतां सुलभा अधिकच भावनाप्रधान झाली आणि हमसाहमसी रडू लागली! वसंतच्याही डोळ्यांत पाणी आलं! आपला अर्धवट झालेला गेम त्याने पॉजवर टाकला. तो डायनिंग टेबलपाशी आला आणि सुलभाला म्हणाला "अग किती छान लिहिलं आहे हे? कुणी लिहिलं आहे?"
सुलभा: आपल्या मुलीनं-अनामिकेनं!
वसंत जागच्या जागीच खिळला! काय बोलावं हेच त्याला कळेना! आपण आरोपीच्या पिंज-यांत ऊभे आहोत आणि आपली मुलगी न्यायाधिश म्हणुन आपल्यापेक्षांही खुप ऊंचीवर बसली आहे आणि आपल्याला शिक्षा सुनावते आहे असं त्याला वाटलं! या आधुनिक ऊपकरणांच्या नादी लागुन आपण आपल्या आई वडीलांच्या कर्तव्याला विसरलो आहोत ह्याची त्याला मनोमन जाणीव झाली. सुलभाची अवस्थाही फारशी वेगळी नव्हती! दोघांनीही आपले स्मार्ट फोन स्विच ऑफ केले आणि अनामिकासमोर ते कधीही न वापरण्याची मनोमन प्रतिज्ञा करुन ते समाधानाने झोपायला गेले!
इच्छा
My Wish या अनामिक लेखनाचे स्वैर मराठीकरण- शशिकांत पानट