Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

काकांनी हातानी थांबण्याची खूण केली. डोक्यावरची मोळी खाली ठेवली आणि तिला दोरीने घट्ट बांधताना विचारलं,
"पहिल्यांदाच चालले का?...सोबत बारकी पोर आहेत म्हणून इचारतो!!"
मी होकार दिल्यावर म्हणाले,
"मग मी येतो संगतीला. तुम्हाला वाट नाही कळली तर जाल दूसरीकड"
असं म्हणून काका आमच्यासोबत निघाले. वय सत्तर होतं. पण इतके काटक होते की ते आम्हाला सहज वर नेतील ह्याची खात्री झाली. गावातील म्हातारी माणस तरुणापेक्षा जास्त सक्षम असतात हे गावागावात फिरून मी अनेकवेळा पाहिलं होत. त्यामुळे काकांच्या मागोमाग आम्ही धूळवाट चढू लागलो. दोन्ही मुले झाडीमधून जाणार्या वाटेवर बागडू लागली. मध्ये दगड येत होते. त्यांना साहस करायची संधी मिळत होती. आणि काकाही जराही न थकता पायवाटेने भराभर चढू लागले. वाटेत त्यांनी आपट्याची पाने तोडून स्वताजवळ ठेवली. हीच पाने आपण दसर्याला सोन म्हणून वाटतो.
" ह्या पानांपासून आम्ही विडी बनवतो" काका सांगू लागले. 
त्यांच्या कमरेला विळा होता. झटकन एका उभ्या फांदीवर मारला आणि ती छाटून आधाराच्या दोन काठ्या बनवल्या. त्याच्या खाली टोक तयार केलं आणि म्हणाले, 
" ही काठी घ्या आधारासाठी. खालच टोक मातीत रुतेल आणि पाय घसरणार नाही. "
मुलांनी हातात काठ्या घेतल्या आणि आम्ही वर चढू लागलो आम्ही वर चढत असताना काही मुला-मुलींचा एक ग्रुप खाली उतरत होता. सकाळचे ९ वाजले होते. ही मुले रात्री गडावर राहिली हे लक्षात आलं. म्हणून मी एकाला विचारलं. तो थांबून म्हणाला. 
" आम्ही मुंबईहून आलो. दर ३१ डिसेंबरला एखाद्या किल्ल्यावर जातो. रात्री चूल पेटवून तिथेच मुक्काम करतो आणि सकाळी खाली येतो. सोबत दारू आणि प्लास्टिक नेत नाही. "
त्याच वाक्य ऐकून काका म्हणाले, 
" वा रं बहादारानो, तिकडं शहरात काहीजण आता शुद्धीवर येत असतील अन तुमी रात्री मंडपात राहिलात. लई बेस केलं"
मीही त्या मुलाच्या पाठीवर शाबासकी दिली. 
गड चढताना काका माहिती सांगत होते. मुरबाडी साग दाखवत होते. स्वच्छ पांढरा बुंधा असलेली झाडे दाखवून त्यांची नावे सांगत होते. हे देशमुख काका लहानपणापासून ह्या झाडांसोबत वाढले. त्यामुळे प्रत्येक झाड त्यांच्याशी जणू बोलत होत. जुनी ओळख होती. अनेक जन्मांच नात होतं. हे भाग्य शहरातील लोकांना कसं मिळणार? ते माणसांशी नात जोडत बसतात आणि शेवटी कोणतच नात उरलं नाही ह्याची खंत हातात उरते.

काकांचे गावात सगळेच नातेवाईक होते आणि गडावर सारी हिरवी मंडळी त्यांच्यावर माया करत उभी होती.

आम्ही धापा टाकत पाहिला टप्पा पार केला. आणि थोडा वेळ बसलो. पण काका उभेच होते. त्यांना थकवा आला नव्हता आणि घामही नव्हता. डायबेटीस-गुडघेदुखीशी त्यांचा कधीच संबंध आला नव्हता. भाजी भाकरी व तांब्याभर पाणी असं जेवण आणि दिवसभर शेतात राबल्यामुळे सत्तरीत ते तरुणासारखे वागत- बोलत होते. 
मग त्यांनी मुलांना कड्याजवळ नेवून खाली दरीत दिसणारं घर दाखवलं. इतक्या वर चढून आलो हे पाहून दोन्ही मुलांना आश्चर्य वाटलं.

तिथून पुढे सुळका सुरु झाला होता. त्यात पायर्या कोरल्या होत्या. गोरखगडाचा हा टप्पा अवघड आहे. कारण अतिशय छोट्या आणि उतरत्या पायर्या आहेत आणि खाली खोल दरी आ वासून बसलेली आहे. त्यामुळे एक तरुणी तिथेच खाली पाणी पीत बसली होती. 
ट्रेकिंगचे कपडे अंगावर होते. शूज होते. काका तिला म्हणाले,
" भ्यालीस व्हय...चल मी तुला दगडी मंडपापर्यंत नेतो. "
असं म्हणून काका खाली वाकले आणि तिला खांद्यावर पाय ठेवायला सांगितला. आजोबांच्या वयाच्या माणसाच्या खांद्यावर ती पाय ठेवत नव्हती. 
शेवटी काका ओरडले, " अग, पोरी. ठेव पाय. मला सवय आहे"
शेवटी तिने त्यांच्या खांद्यावर पाय ठेवला आणि आम्ही सगळे एकमेकांना सांभाळत तो कठीण टप्पा पार केला.
ती तरुणी सांगू लागली, " माझा ग्रुप आधीच वर गेला. पण कडा चढता न आल्यामुळे मी खाली बसले होते."

आणखी दोन सरळसोट कडे पार करून आम्ही मंडपापर्यंत पोहोचलो.
तिथे त्या मुलीची मित्र मंडळी विसावली होती. त्या मुलीला पाहून तिच्या मित्र मंडळीना आश्चर्य वाटलं. मग तिने काकांकडे बोट दाखवून ह्यांनी मला वर आणलं हे सांगितल्यावर सगळेजण काटक काकांकडे कौतुकाने पाहू लागले. तोवर काकांनी हातातील काठीने कुंडातील पाण्यात पडलेल्या प्लास्टिक पिशव्या भराभर खेचून बाहेर काढल्या. गडावर झालेला कचरा त्यांना सहन होत नव्हता. 
आम्ही दगडी मंडपात विसावलो. खूप वेळाने बसायला मिळाल होतं. पण काका अजूनही बसले नव्हते. 
त्यांनी जमेल तितका कचरा गोळा करायला सुरुवात केली. तिथे असलेल्या तरुण मुलांनीही लगेच साथ दिली. सगळ्यांनी मिळून कचरा एका ठिकाणी जमा केला आणि काकांनी माचीस काढून सारा कचरा जाळून टाकला. 
एक माणूस सच्च्या मनाने चांगली कृती करू लागतो तेव्हा इतरजण स्वताहून पुढे येतात. 
" जय भवानी, जय शिवाजी!!" असा सगळ्यांनी पुकारा केला. 
तोवर काकांनी आम्हाला कातळातून थंडगार पाणी काढून दिलं आणि स्वताही ओंजाळीभर पाणी प्यायले. 
गड उतरताना त्यांनी जळणासाठी वाळलेली लाकडं जमा करून एक मोळी बांधली. ती मोळी डोक्यावर घेवून ते सहज उतरत होते आणि आम्ही आधार घेवून खाली येत होतो. 
गडावरून खाली आल्यावर त्यांनी आम्हाला स्वताच्या घरी नेलं. मग आम्ही त्यांच्या सारवलेल्या अंगणात बसून तांदळाची भाकरी आणि झुणका खाल्ला. असा स्वाद याआधी कधीच मिळाला नव्हता. 
खरा महाराष्ट्र हा असा आहे. आर्थिक राजधानी वैगैरे कौतुकात काही अर्थ नाही. 
म्हणून वेळ मिळेल तेव्हा गड-किल्ले चढावेत.
महाराजांनी, अनेक अज्ञात माणसांनी असं काही बांधकाम केलं आहे की अनेक शतके उन पावसाचा मारा झेलून त्यातील कणही झीजला नाही. 
महाराज निरंतर आणि गड किल्ले चिरंतन आहेत. 
नवीन वर्षाचा आरंभ करायला इतकी सुंदर जागा दुसरी कोणती असणार !!