वि.का.राजवाडे यांना गुरुस्थानी मानून संशोधनाचे काम त्यांनी सुरु केले व आपल्या गुरूंचीच संशोधनाचीच परंपरा पुढे चालविली. आपल्या गुरुंप्रमाणेच महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इतिहासाची रचना करणे हे बेंद्रे यांचे ध्येय होते. महाराष्ट्राच्या 'शास्त्रशुद्ध व वास्तव्बोधी इतिहास' रचनेसाठी इतिहास लेखन कलेची कोणतीही जुनी परंपरा स्वीकारून चालणार नाही तर नवीन परंपरा व पद्धती स्वीकारावयास हवी हीं जाणीव बेंद्रे यांना होती.यासाठी प्रथम साधने जुळविणे 'साधन-निष्पत्ती' होणे आवश्यक आहे हे त्यांनी सांगितले. साधन-निष्पत्ती नंतर उपलब्ध झालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्ण परीक्षण करून इतिहास रचनेचा पाया शुद्ध रचण्याकडे त्यांनी लक्ष दिले. ' जुन्या कागदपत्रांची परीक्षा पक्की व नक्की ' करण्यास त्यांनी महत्व दिलेसन १९२८ मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड "साधन चिकित्सा" हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला.
१९३८ मध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉन यांच्या इच्छेवरून श्री. खेर यांनी खास शिष्यवृत्ती देऊन श्री.वा.सी.बेंद्रे यांना सरकारी " हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर" म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला पाठवले. हीं शिष्यवृत्ती सुमारे दोन वर्षांची होती. तसे पाहीले तर हा कालावधी अल्पसाच होता. हे ध्यानात घेऊन इतरत्र कोठेही वेळ वाया न जाऊ देता त्यांनी सर्व लक्ष साधनांच्या अभ्यासात आणि संकल्पनात खर्च केला. टंक लेखनासारख्या अनुभवाचा त्यांना या प्रसंगी खूप फायदा झाला. दोन वर्षात मराठ्यांच्या विशेषतः संभाजी महाराजांच्या इतिहास विषयक साधनांचे संशोधन व त्या करिता इंडिया हाउस व ब्रिटीश म्युझियम मधील ऐतिहासिक साधनांचे सुमारे २५ खंड होतील एवढी सामुग्री परत आणली. इंग्लंड मधील वास्तव्यामुळे श्री.बेंद्रे यांचे संशोधन- संकलन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले. त्यामुळे त्यांच्या इतिहास विषयक संशोधन कार्यातील ही शिष्यवृत्ती आणि तेथील वास्तव्य हा महाराष्ट्रातील इतिहास संशोधनाचा महत्त्वाचा टप्पाच मानावा लागतो. लंडन मधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची बेंद्रे ह्यांना संधी मिळाली होती. अशी साधने तपासताना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एक बहुमोल ठेवा प्राप्त झाला. तो पर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र "शिवाजी महाराजांचे" चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते .या वरून त्याच आकृतीचे चेहेरे रंगवून मुसलमान पेहराव चढवलेली तथाकथित शिवाजी महाराजांची बरीच चित्रे प्रसारात आली होती. संदर्भ हीन असे महाराजांचे चित्र समाजात पूजिले जात होते.इ.स.१९१९ मध्ये बेंद्रे “संभाजी महाराजांच्या चरित्र” लेखनाची तयारी करीत होते. ग्रंथ चाळताना त्यांच्या समोर मैंकेनझीने संपादित केलेल्या ग्रंथाचे काही भाग होते. त्यात व्हैलेन्टाइन ह्या डच गव्हर्नरने लिहिलेले एक पत्र त्यांच्या हाती पडले. इ.स. १६६३-६४ सुरतेच्या डच बखरीत तो गव्हर्नर होता. त्याच्या आणि महाराजांच्या भेटी प्रसंगी काढून घेतलेले चित्र आणि व्हैलेनटाइनचे पत्र श्री.वा.सी.बेंद्रे ह्यांना ह्या पत्रात मिळाले. इंग्लंड मध्ये या चित्राची त्यांनी खात्री करून घेतली. ह्या चित्राच्या प्राप्तीमुळे श्री.बेंद्रे ह्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची देणगीच मिळाली! शिवाजी महाराजांच्या या चित्रामुळे "इब्राहिमखान" पुस्तकातून हटला गेला. श्री.बेंद्रे यांनी प्राप्त केलेल्या शिवरायांची स्थापना इतिहासाविषयी पुस्तकातून आणि घरा घरातून झाली.
श्री.वा.सी.बेंद्रे ह्यांनी शिवशाहीच्या अंतरंगात प्रवेश केला आणि ते खोल वर गेले. मालोजी ,शहाजी,शिवाजी,संभाजी,राजाराम,ह्यांच्या संबंधीचे त्यांचे संशोधन त्यांचा आवाका दाखवून देते. श्री. बेंद्रे ह्यांच्या इतिहास संशोधनाला एक आंतरिक संगती आहे. शिवशाहीतील वीरांच्या पराक्रम गाथा,आणि समकालीन मराठी मनाचे विचार ,या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे बेन्द्रेना जाणवल्यामुळे हे शेख मंहमद आणि तुकोबा यांच्या चरित्रांचा धांडोळा घेतात. तुकोबांनी तर त्यांना पूर्ण पछाडले होते असे म्हणायला काही हरकत नाही. शिवाजी हा जरी मराठी राज्याचा केंद्रबिंदु असला तरी तो समजावून घ्यायचा म्हंटला तर मागे शहाजी मालोजी पर्यंत जावे लागते. त्याप्रमाणेच तुकोबाचा अभ्यास करताना श्री. बेंद्रे त्यांची गुरु परंपरेचा शोध घेत बाबाजी केशव राघव ह्या चैतन्य परंपरेतून सूफी परंपरेत घुसले. दुसर्या बाजूला तुकोबाचे संत्तसांगाती आणि शिष्य .ह्यांचाही त्यांनी शोध घेतला. तुकोबाचे अभंग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्वत्र पसरले आहे, ते हुडकून काढून गाथेची चिकित्सक आवृत्ती सिद्ध करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्यांना संत वांग्मयाचाही गाढा अभ्यास होता. संत तुकाराम महाराजांबद्दल ही ह्यांनी केलेले संशोधन फार मोलाचे आहे. देहूदर्शन (१९५१), तुकाराम महाराज ह्यांचे संत सांगाती (१९५८), तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा (१९६०) आणि संत तुकाराम (१९६३) हे त्यांचे ग्रंथ संत तुकाराम महाराजांचा कालखंड व त्यांचे जीवन ह्यावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. संत तुकारामांच्या जीवनाबद्दल असलेल्या अनेक कल्पनांना ह्या ग्रंथामुळे धक्का बसला व तुकारामविषयी अभ्यासाला ह्या ग्रंथांनी एका शास्त्र-शुद्ध बैठक प्रथमच दिली.
त्यांचे दुसरे महायोगदान म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये अत्यंत विपरीत असे समज होते. ते समज दूर करून ,संभाजी राजांचे खरे स्वरूप जनतेपुढे आणण्याचे काम बेंद्रे यांनी केलं. संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली, त्यातील बहुतेक नाटकात संभाजी व्यसनाधीन, बदफैली ,व्यभिचारी, दुर्वतर्नी, असाच नाटककाराने उभा केला होता .श्री बेंद्रे ह्यांना हे भावत नव्हते.संभाजी महाराजांचे चरित्र संशोधित केले पाहिजे हा विचार त्यांच्या मनातबरेच दिवस घोळत असावा. या विषयाकडे श्री बेंद्रे यांचे लक्ष इ.स. १९१८ पासून वेधले गेले. यासाठी ते कोठेही असोत साधने जमवीतच गेले. अखेरीस अडी- अडचणीन वरमात करून परदेशातही शोध घेऊन या विषयासंबंधीची हजारो साधने त्यांनी एकत्रित केली, आणि त्यावर आधारित असा संभाजी महाराजांचा चरित्र ग्रंथ इ.स.१९५८ मध्ये लिहून पूर्ण केला. म्हणजे त्यांची सुमारे ४० वर्षे या विषयासाठी खर्ची पडली.ह्या ग्रंथाने समाजात विलक्षण खळबळ उडवून दिली. त्यातून संभाजी महाराजांची व्यक्तिरेखाच बदलली गेल्यामुळे आधीचे लेखन त्याज्य ठरले. श्री बेंद्रे यांनी सर्व विवेचन साधार आणि संशोधनाच्या पायावर उभे केले. या चरित्रामुळे स्वाभिमानी ,धर्मनिष्ठ ,पराक्रमी,संस्कृत जाणकार अशा संभाजी राजा बद्दलचे सर्व गैरसमज दूर झाले .त्या आधारे संभाजी महाराजांच्या जीवनातील सर्व विसंगती त्यांनी निपटून काढल्या. श्री बेंद्रे यांनी यासाठी ऐतिहासिक कागदाचा चिंटोराही दुर्लक्षित केला नाही. पण त्यामुळे संभाजी महाराजांची पराक्रमी,संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी,धोरणी,मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा उंचावली गेली. हे चरित्र खरया अर्थाने गाजले. अभ्यासकांना पुनरभ्यास करण्यास त्याने प्रवृत्त केले. चरित्रातील नव्या अभ्यासावर आधारित "इथे ओशाळला मृत्यू " किंवा " रायगडाला जेव्हां जाग येते " अशी मनोविज्ञानाचा आधार घेतलेली आणि संभाजी महाराजांची नवीनच व्यक्तिरेखा साकारणारी प्रा.कानेटकरान सारख्यांची नाटके रंगमंचावर यशस्वी होवू लागली.श्री शिवाजी सावंतांच्या 'छाव्याने " हेच दर्शविले.या नव्या कलाकृतीं बरोबर नव्या इतिहास अभ्यासकांना अधिक वाव मिळाला."शिवपुत्र संभाजी" सारख्या पी.एच.डी च्या ग्रंथासाठीही डौ.सौ.कमल गोखले यांनी संशोधनासाठी बेंद्रे यांच्याच संशोधनाचा आधार घेतला.
प्रारंभी संभाजी महाराजांची समाधी तुळजापूर मध्ये आहे असा समज होता. कालांतराने व विषय संदर्भ मिळाल्या नंतर ही मूळ समाधी वडू-बद्रूक येथे असल्याचे श्री बेंद्रे आणि इतर अभ्यासकांच्या ध्यानात आले. या वास्तूची निश्चिती करण्याकरिता श्री. वा.सी.बेंद्रे यांनी संबंधितांना एकत्रित करून वडूला येण्याचे आव्हान केले . या वास्तूची स्थिती दुर्लाक्षित होती. तेथील वृंदावन झाडाझुडपांनी आणि निवडुंग याने पूर्ण झाकून गेले होते.हा सर्व परिसर स्वच्छ करण्यास श्री बेंद्रे यांनी पुढाकार घेतला. वृंदावन मोकळे व स्वच्छ झाले. आणि सत्य प्रकाशात आले. प्रतिवर्षी फाल्गुन व ३० (अमावास्येला) तेथे संभाजी महाराजांचा स्मृतिदिनयोजला जाऊ लागला.संभाजी महाराजांचे भव्य पूर्णाकृती स्मारक उभारण्याचे श्रेय पुण्यातील धरमवीर संभाजी प्रतिष्ठानला मिळाले आहे.येथून प्रतिवर्षी स्मृतिदिनाला असंख्य तरुण आणि इतिहासप्रेमी नागरिक वडू येथील कार्यक्रमाला जात असतात.त्यामुळे वडूचे संभाजी स्मारक (छत्री) नव्या पिढीचे स्फूर्तीस्थान बनले आहे.यामागे सुद्धा श्री वा.सी.बेंद्रे यांचे मोठे योगदान आहे.
बेंद्रे ह्यांचा कुशल संघटक हा गुण त्यांनी महाराष्ट्रेतिहासिक परिषद इतिहास संशोधन मंडळातर्फे इ.स.१९६५ मध्ये सुरु केल्यावर दिसून आला. महाराष्ट्राच्या शास्त्रशुद्ध इतिहास संशोधनास व रचनेस अखिल महाराष्ट्रभर चालना मिळावी,साधन संग्रहाची चर्चा चिकित्सा होऊन त्याचे मूल्यमापन व्हावे व त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या इतिहास रचनेच्या कार्यास व्हावा या हेतूने इतिहास संशोधन मंडळातर्फ महाराष्ट्रेतिहासिक परिषद भरवली.ह्या त्यांच्या आव्हानास चांगला प्रतिसाद मिळाला.महाराष्ट्रातील विद्यापिठे इतिहास परिषद अधिवेशने बोलावण्यास पुढे सरसावली.इ.स.१९६६ पासून १९६८ अखेरपर्यंत त्यांनी महाराष्ट्रैतिहासिक परिषदेची तीन अधिवेशने भरवली. मंडळातील आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत १४ ग्रंथ व भारतीय इतिहास आणि संस्कृती ह्या त्रयीमासिकाचे १०० पृष्ठांचे १९ अंक प्रसिद्ध केले.
श्री. वासुदेवराव बेंद्रे केवळ इतिहास संशोधकच नाहीत ते एक चतुरस्त्र लेखक आहेत. ऐतिहासिक विषयांबरोबरच त्यांनी विविध विषयांवर लेखन केलेले आहे. शीघ्र ध्वनीलेखन पद्धती (मराठी-गुजराथी), स्टेनोग्राफी फॉर इंडिया (इंग्रजी) यासारखी पुस्तकेही लिहिलेली आहेत. भारतीय इतिहास व संस्कृती या त्रैमासिकाचे संपादन ते गेली काही वर्षे करीत आहेत. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांनी अनेक इतिहाससंग्रह इंग्रजी भाषेत लिहिलेले आहेत. "महाराष्ट्र ऑफ शिवशाही पिरीयड" " कॉरनेशन ऑफ शिवाजी दि ग्रेट" "स्टडी ऑफ इन्सिक्र्प्शन" "डाऊन फॉल ऑफ अंग्रेज नेव्ही" वगैरे अनेक ग्रंथाचा निर्देश करता येईल. ते कुशल संघटक आहेत. एके काळी त्यांनी अखिल भारतीय इतिहास परिषदेच्या अधिवेशनाची व्यवस्था कुशलतेने आयोजित करून नामांकित इतिहासकारांकडून शाबासकी मिळवलेली होती. त्यांनी विद्यार्थीसंघटना, ब्रदरहुड स्काऊट संघटना वगैरे विविध स्वरूपाच्या संघटना काढून सामाजिक कार्यात भाग घेतला.
१८९६ ते १९८६ अशी नव्वद वर्षांची त्यांच्या आयुष्याची वाटचाल . सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय माणसाला भारभूत व्हावी अशी ही आयुर्मर्यादा . पण बेंद्रे ह्यांना हे आयुष्य सुद्धा कमीच ठरले . १९७२ मध्ये त्यांनी शिवचरित्र व १९७५ मध्ये राजाराम महाराज चरित्र प्रकाशित करून आपली जीवनावरील निष्ठा आणि प्रवृत्ती-अभिमुखता सिद्ध केली . आपल्या कामावर इतकी निष्ठा असणारा विद्वान विरळाच . आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत बेंद्रे सारख्या महर्षींचा वाटा फार मोठा आहे. बेंद्रे ह्यांचे ध्येय,जिद्द आणि धडपड मात्र आपल्या सर्वांना सदा सर्वकाळ प्रेरणा देत रहातील ह्यात मात्र शंका नाही!