
संगीतकार सी. रामचंद्र ह्यांच्या ‘सरगमी जीवनाचे’ जन्म शताब्दी वर्ष:
‘अक्षरलिपी व छायाचित्रे' ही दोन जुळी भावंडे आहेत असे माझे मत. हे माझ्या रसिक वाचकांना अनेक वर्ष्यापासून माहित आहे. पुण्यात रहाणाऱ्या सिद्धहस्त लेखिका व माझ्या स्नेही सुलभाताई तेरणीकर त्याला अपवाद नाहीत. त्यांनी मला सुचविले, ‘जयंतराव, स्वामी विवेकानंद ह्यांच्या जन्म दिनी म्हणजे, १२ जानेवारी, १९१८ ला जन्मलेल्या संगीतकार सी. रामचंद्र-अण्णांचे, जानेवारी १३, २०१७, पासून जन्म शताब्दी वर्ष सुरु होतंय, तुम्ही त्यांचेवर आठवणवजा स्मरणरंजनात्मक सचित्र लेख लिहावा अशी विनंती आहे.’ हे कळल्यावर मी सी. रामचंद्रांची-अण्णांची सुरीली गाणी हेडसेटवर ऐकायला सुरुवात केली आणि माझ्या स्मृतीपटलावर अण्णांच्या अनेक अविस्मरणीय आठवणी जागृत झाल्या व गत काळातील एकामागून एक चित्र उमटत गेली. तसं पाहिलं तर, अण्णांना दीर्घायुष्य लाभलं नाही. परंतु, थोड्या अवधीतच एका मराठी माणसाने हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ आपल्या उत्कुष्ट संगीतानी गाजविला होता हे निश्चितच भूषणावह व अभिमानास्पद होते. दुर्मिळ हिंदी रेकॉर्डस्-गाण्यांचा संग्राहक असल्याने मिळविण्यासाठी मी नेहमी मुंबईच्या चोर बाजारात जात असे. १९६०-७०चा तो काळ होता. त्यावेळी तेथे सी. रामचंद्रांनी स्वरबद्ध केलेल्या लता मंगेशकरांच्या रेकॉर्ड्स जास्त भावात विकल्या जात असत. मात्र त्या मिळविण्यासाठी चोर बाजारात मला खुप खेपाही माराव्या लागत होत्या. हे सर्व माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसायला लागलं. आणि मी लेखणी हातात घेतली…
हम न तुम्हें भुलायेंगे…

फोटो : रामचंद्र नरहरी चितळकर उर्फ स्वर-सम्राट-संगीतकार सी. रामचंद्र…आम्हा संगीतप्रेमी रसिकांचे अण्णा.
शिवाजी पार्कला हरी निवास समोर केशव भुवनमध्ये रहाणाऱ्या महेश काळण ह्या माझ्या शाळकरी मित्राची, अण्णांची पत्नी, बेन ठाकूर ही मावशी होती. आणि बेनचे वडील त्या बिल्डिंगचे मालक होते. अण्णा मुंबईला आले तेव्हा तेथे ते एक खोली घेऊन रहात होते. शेजारी राहणाऱ्या बेनला ते पेटी शिकवत होते. आणि तेव्हा त्यांचे प्रेम जमले व पुढे लग्न झाले होते. महेश हा शाळेत असतांना शिवाजी पार्क जिमखान्यासमोरच्या अण्णांच्या जुन्या ‘साई प्रसाद’ या घरातील गच्चीवरील जागेत (तेथे अण्णा रहात नसतांना) अभ्यास करायला जात असे. एकदा मी सहज महेशला म्हटले, 'अरे, मला अण्णांची ती जागा पहायची ईच्छा आहे. मला थेथे घेऊन जाशील कां...' महेशला माझ्या संगीत-छंदाची माहिती होती. त्याने मला आनंदाने अण्णांच्या त्या घरी नेले होते. मात्र, तेथे गेलो आणि मी खुप निराश झालो होतो. अण्णांची तेथे कांहीच नांव-निशाणी नव्हती. बसायला कांही टेबल-खुर्च्या होत्या. बस्स, बाकी सर्व मामला सुना-सूना होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतामधील १९५०-६० चा जो अण्णांचा सुवर्णकाळ होता, त्यावेळी त्यांच्या गाण्यांच्या रंगीत तालमी ह्याच Penthouse घरात होत होत्या. आज मी त्या ऐतिहासिक जागेत स्वैरपणे वावरतोय ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्या रिकाम्या जागेत अण्णांसह त्यांचा तो वाद्यवृंद, ते सूर, व गोतावळा माझ्या डोळ्यासमोर आला. त्यावेळी त्या घरासमोर संध्याकाळी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसून आम्ही अण्णांच्या तालमीतील गाणी ऐकत होतो. ती खाली ऐकायला येत असत. कट्ट्यावर बसून त्यांच्या वैभवी काळातील अलबेला, अनारकली, झमेला, सरगम, संगीता, निराला, आझाद, घुंगरू, परछायी, नवरंग, वगैरे गाण्यांच्या रंगीत तालमी चालू असतांना ती गाणी ऐकली होती, अनुभवली होती, जगलो होतो…कालांतराने अण्णांनी सांताक्रूझ येथे 'सरगम' बंगला होता व साई प्रसादची गच्चीवरील जागा इतर संगीतकारांना तालमीसाठी देत होते. त्याचे भाडे ते फक्त १० रुपये घेत असत. त्याच साई प्रसादच्या दुसऱ्या मजल्यावर सुप्रसिद्ध सितार वादक जयराम आचार्य राहात होते. हे सर्व आठवत असतांना महेश नंतर मला एका छोट्याशा खोलीत घेऊन गेला आणि मला अलिबाबाच्या गुहेत गेल्याचे समाधान लाभले. कारण, ती खोली फक्त रेकॉर्ड्सने भरलेली होती. महेशला त्याच्यात गंध नव्हता.’जयु, आता तू त्याचा ताबा घे. तुला ज्या हव्या आहेत त्या रेकॉर्डस् तू घेऊन जा. मी थोड्यावेळाने येतो…’ असं महेशने संगीतल्यावर, त्या खोलीचा मी ताबा घेतला आणि त्या रेकॉर्डस् पाहायला सुरुवात केली. त्यातील रत्न निवडायला मला वेळ लागला नाही. तासाभराने महेश आल्यावर मी तृप्त होऊन सुखाने घरी परतलो होतो. त्यातील कांही लताची व इतर गायकांची गाणी मला चोर बाजारात कधीही मिळाली नव्हती. मला मिळालेल्या रेकॉर्डस् संबंधीची वार्ता जेव्हा माझ्या संग्राहक मित्रांना कळली तेव्हा, ते माझ्या घरी येऊन बघुनही गेले होते. नंतर जेव्हा मी त्या ‘साई प्रसाद'चे दर्शन घेऊन फिरायला जात असे तेव्हा, मला त्या प्रसंगाची आठवण येत असे व मनात हात जोडून मी पुढे जात असे. पुढे शिवाजी पार्क नागरिक संघाजवळ आल्यावर मला अण्णांची पुनः आठवण होत असे त्याचे कारण असे, १९७९ मध्ये शिवाजी पार्क नागरिक संघाने अण्णांचा स्तुत्य असा साठीसमारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. असंख्य रसिकांनी तो हॉल तुडुंब भरला होता व बाहेरही तोबा गर्दी होती. भारावून गेलेल्या भावनाप्रधान अण्णांनी उत्तम भाषण केले होते. दुर्मिळ गाण्यांचे संग्राहक व माझे मित्र विजय नाफडे माझ्याबरोबर तेथे आले होते. अण्णा हे विजयचे नातलग होते. आज अण्णांची आवडती दुर्मिळ संवादिनी-बाजापेटी, विजय नाफडे सांभाळून आहेत.

फोटो: १) शिवाजी पार्क जिमखान्यासमोर साई भक्त अण्णांचे पहिले घर, ‘साई प्रसाद’. जिथे अण्णा शेवटच्या मजल्यावर गाण्याच्या तालमी घेत होते…२) तसेच, समुद्राजवळ घेतलेले दुसरे घर, ‘साई साउली’, जिथे अण्णा शेवटच्या मजल्यावर रहात होते…३) शिवाजी पार्कमधील त्या रहात्या घराजवळ स्काऊट हॉलजवळ असलेले अण्णांचे स्मारक…
खाली: पुण्याला जंगली महाराज रोडवर असलेला अण्णांचा ‘सुना-सुना' ‘सरगम' बंगला व नीलफलक...ही 'सरगम' बंगल्यांची छायाचित्रे अरविंद आपटे ह्यांच्या सौजन्याने.


खाली: मुंबई आकाशवाणीतील कलाकारांसोबत डावीकडून राजा बढे, तिसरे व्ही. जी. जोग, ६वे सी, रामचंद्र, व ७वे तलत महमूद…२) सॅक्सोफ़ोनीस्ट, जो गोमेझ, सी. रामचंद्र, व जॉन गोमेझ. पानांचे Saxophonist...३) नवरंग सिनेमातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी, अण्णा व मान्ना डे...

सुरांच्या गोडव्याला महत्व आहे, रागाच्या विशुद्धतेला नाही. दोन रंगातले दोन विभिन्न स्वर एकत्र करून दिलेली चाल एक उत्तम धून बनते. म्हणून मी कधीही अनवट रंगांच्या वाटेला गेलो नाही. शेवटी ती चाल, गीताचे बोल, भाव, प्रसंग,व संगीत या सर्वांच्या सहाय्याने एकत्रित करून फक्त तीन मिनिटात ते गाणं बसवायचे हे सोपं काम नसे... अण्णा जेव्हा आमचे घरी येत असत तेव्हा ते माझ्या वडिलांशी बोलत असत. परंतु, संगीताविषयी त्यांचा संवाद होत नसे. अण्णा जेव्हा प्रथम आमच्या शिवाजी पार्कच्या घरी आले तेव्हा, दूरदर्शनवर ज्योत्स्ना किरपेकर पुढील आठवड्यात हिंदी सिनेमा कुठला हे सांगत होती. योगायोगाने तो होता अण्णांनी संगीत दिलेला १९५७चा 'बारिश'. आणि गाणं अण्णांनीच गायलेलं होतं, पण, देव आनंद ते पडद्यावर गात होता, ‘दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम...' ते ऐकून अण्णा आनंदले होते व ‘क्या बात है…’ असं म्हणून, तेथेच उभे राहून स्वतः ते गाणं गुणगुणत होते. खरंच, तो प्रसंग अनुभवतांना-पाहतांना मीच भारावून गेलो होतो. अण्णा आमच्या घरी आले की, त्यांना बघायला रस्तावर तोबा गर्दी असायची. असो.

फोटो :१) माणिक वर्मा व अण्णा...२) अण्णा व लताबाई, एका सुरील्या गीतावही चर्चा करतांना...३) गाणं ऐकतांना तल्लीन झालेले अण्णा, आशा भोसले, नौशाद, राजेंद्र कृष्ण, जयकिशन, व इतर...
कांही काळानंतर अण्णांची घसरण सुरु झाली होती. ह्याच सुमारास लताबाईंशीसुद्धा त्यांचे तीव्र मतभेद झाले होते. आणि लताबाई अण्णांकडे गाईनाशा झाल्या होत्या. हे जगजाहीर होतं. चित्रपट सृष्टीशी व लताबाईंशी त्यांचा संबंध दुरावला होता. किंवा अण्णांना त्यांनी खड्यासारखे बाजूला सारले होते. आमच्यासारखे रसिक नेहमी म्हणत, ‘हलवायाला दोष देण्यापेक्षा त्याची मिठाई गोड आहे असं म्हणणं कां जड जातं ह्याला उत्तर नाही.’ शिवाय, प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात हे आम्ही जाणून होतो. तळपत्या सूर्यासमोर प्रतिभेचे सूर्यकिरण निष्प्रभ ठरत गेले. त्यावेळी अस्तित्वाची अस्मितेची लढाई सुरू झल्यावर स्वरांचा ध्रुवतारा लखलख करीत राहिला आणि प्रतिभेचा प्रकाश अस्तंगत होत गेला. मग, कुठल्याच नाजुक धाग्यांना स्थान उरले नाही. तेव्हा, दोष ना कुणाचा...असं म्हणणं उचित ठरेल. परंतु, ‘ओ निर्दई प्रीतम, प्रणय जगा के, हृदय चुरा के, चुप हुए क्यों तुम, ओ निर्दई प्रीतम…’ ह्या 'स्त्री' सिनेमातील गाण्याप्रमाणे दशा होऊनही अण्णा खचले नव्हते. अण्णा स्वभावाने अतिशय दिलदार व मोठया मनाचे होते. निगर्वी अण्णांच्या वागण्यात कुठेही भेदभाव नव्हता. अण्णा आमच्या घरी आले की, रस्त्यावर त्यांना पहायला गर्दी होत असे. एकदा त्यांनी मला फोन करून सांगितले की, मी एका मुलीला तिच्या वडिलांसह तुमच्याकडे पाठवीत आहे. लताचं एक गाणं तिला हवं आहे. ते तिला जरुर द्या. वडिलांबरोबर आलेली ती मुलगी होती, बाल गायिका चारूशिला बेलसरे. १९६१ च्या 'माया' सिनेमातील सलील चौधरीचे 'जारे, चल उड जारे पंछी...' हे लताचं गाणं तिला हवं होतं. ते मिळाल्यावर ती व तिचे वडील बेहद्द खुष झाले होते. त्या टेपमध्ये मी इतर अनेक दुर्मिळ गाणीही तिला भेट म्हणून दिली होती. अण्णांचा दुसऱ्या दिवशी फोन आला व त्यांनीही माझे आभार मानले होते. माझे दोन मोठे भाऊ अमेरिकेत असतात हे अण्णांना कळल्यावर मला म्हणाले होते, 'जयंतराव, अमेरिकेत तुम्ही गेलात तर, सॅन फ्रान्सिकोला जा. मला ते शहर अतिशय आवडतं. सर्वदृष्टीने रोमँटिक आहे…’ समुद्राजवळील ‘साई सावली' ह्या अण्णांच्या घरी मी दोनतीनदा गेलो होतो. ते अर्ध्या चड्डीत मद्यपान करीत बसलेले असत. एकदा अण्णांनी स्वरबद्ध केलेल्या कांही दुर्मिळ रेकॉर्ड्सवर सही घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेली होतो. त्यातील एक लताची खास रेकॉर्ड बघितल्यावर अण्णांना राहवले नाही. ते म्हणले,'मी ही ऐकू कां...?' त्यांनी मग जुन्या ग्रामोफिनवर ती रेकॉर्ड दोन वेळां ऐकली व भावनाप्रधान होऊन डोळे पुसले होते. ती रेकॉर्ड होती, १९५३ च्या ‘झांझर’ ह्या सिनेमातील,'बहारें बेंच डाली...' मुंबईत दूरदर्शनवर अण्णांचा व प्रमिला दातार बरोबर पहिलाच कार्यक्रम होणार होता. त्यासाठी लागणारी कांही गाणी अण्णांनी माझ्याकडून रेकॉर्डिंग करून घेतली होती. त्या दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे मला व वीणाला खास आमंत्रण अण्णांनी न विसरता दिले होते. त्याला आम्ही गेलो होतो. आम्हाला प्रेक्षकात पहिल्याच रांगेत बसविले होते. त्यामुळे कॅमेरा बऱ्याचवेळां आमच्यावरून फिरला होता. घरी आल्यावर अनेकांनी आम्हाला फोन आले होते. कां तर, त्यांना त्याआधी कळविले नाही म्हणून. त्याबरोबर रुखरुखवजा तक्रार करायला ते विसरले नव्हते. कांही वर्ष्यानी मुंबईत गेलो असतां सहजच मी त्या ‘साई सावलीत’ बेनना भेटायला घरी गेलो होतो. मी अमेरिकेतून आलो आहे व अण्णांची माझी ओळख होती हे सांगूनही दार न उघडतांच जाळीतून मला एका तिऱ्हाईत माणसाने बेन आजारी असून त्या कुणालाही भेटायच्या मनःस्थतीतीत नाहीत असे सांगण्यात आले होते. त्यावेळी जड पावालांनी पायऱ्या उतरतांना मला अण्णांची आठवण झाली होती…

फोटो: १) संगीतकारांची एक मैफल: नौशाद, रोशन, सी. रामचंद्र, अनिल बिस्वास, गुलाम महंमद, व मदन मोहन...२) अण्णा व त्याचे जणी दोस्त, गीतकार राजेंद्र कृष्ण...३) 'सरगम'च्या वेळी: पी. एल. संतोषी अण्णा...
ज्याप्रमाणे अण्णा आमच्या घरी येत होते तसेच, माहीमला रहाणारे अण्णांचे मित्र श्रेष्ठ संगीतकार सज्जाद हुसेन हेही माझ्या त्यांची गाणी ऐकायला व रेकॉर्डिंग करायला घरी येत असत. मी जिथे नोकरी करीत होतो त्या Star & Styleच्या ऑफिसमध्ये जेव्हा सज्जादसाहेब कामाला आले होते तेथे माझा परिचय झाला होता. माझ्याकडे आले की, ते अण्णांना भेटून जात असत. सज्जाद हे उत्तम मेंडोलिन वाजवीत असत. अण्णा जेव्हा इंग्लडला गेले होते तेव्हा त्यांनी खास सज्जादसाठी मेंडोलिन वाद्य भेट म्हणून आणले होते. शिवाय, सज्जाद जेव्हा पुण्याला जात होते तेव्हा ते अण्णांच्या 'सरगम' बंगल्यात उतरत असत. तेथे एकदा अण्णांनी त्यांचा कार्यक्रमही केला होता. इतकी त्यांची जवळची दोस्ती होती. सज्जादने एका मुलाखतीत सांगितले होते की, अण्णा हे सर्वोत्तम संगीतकार होते, He was unparalleled music director. सज्जादकडून त्यांची स्तुती म्हणजे, कौतुकास्पदच होते म्हणायचे. १९६१ पासून अण्णांच्या अखेरच्या जीवनापर्यंत, अण्णांचे खाजगी सचिव-चिटणीस म्हणून विश्वासाने काम बघणारे इंदूरचे वसंत पोतदारांनी सांगितले होते. मुंबईत आल्यावर सुरुवातीला हे वसंत पोतदार साई प्रसादच्या गच्चीवरील जागेत राहात होते. अण्णा जेव्हा उच्च शिखरावर होते तेव्हा, वेळ नसल्याने त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत देण्याचे नाकारले होते. त्यावेळी ते निर्मात्यांना सांगत, त्या नाकारलेल्या चित्रपटांना तुम्ही सज्जाद हुसेन ह्यांना करारबद्ध करा. असा अण्णांचा चांगला स्वभाव होता. सुप्रसिद्ध पाकिस्तानी गझल गायक मेहंदी हसन व गुलाम अली हे अण्णांचे व त्यांच्या संगीताचे चाहते होते. मुंबईत आले की ते अण्णांना आपुलकीने भेट असत. सुप्रसिद्ध इनॉक ड्यानियल व मनोहारी हे अण्णांचे संगीत संयोजक तेथे होते. तत्पूर्वी चिक चॉकलेट हे अण्णांचे आवडते वादक व अरेंजर होते. सुरुवातीच्या काळात दहा वर्ष संगीतकार दत्ता डावजेकर हे अण्णांचे सहाय्यक होते.

तसेच, संगीतकार रोशनही अण्णांचे चाहते होते. तेही अण्णांकडे येत असत. एक काळ असा होता की, रोशनना संगीत देण्याचे काम मिळत नव्हते. तेव्हा ते अतिशय नाराज झाले होते व त्यांनी चित्रपट सृष्टीला रामराम करायचे ठरविले होते. त्यावेळी अण्णांनी त्यांना समजावून सांगितले व धीर दिला होता. त्यानंतर रोशनला ‘ताज महाल' हा सिनेमा मिळाला व त्यांच्या संगीत कारकिर्दीला चारचाँद लागले होते व पुनः मागे वळून पाहायला लागले नव्हते. इसाक मुजावरांनी म्हटले होते, ‘मी गेल्यानंतर मला जर थडग्यात अण्णांची गाणी ऐकायला आली तर, मी थडग्यातून त्वरित बाहेर येईन...' अण्णांनी स्वरबद्ध केलेल्या अवीट गाण्यांचा रसिकांवर इतका परिणाम झाला आहे की, ती गाणी कदापि विसरणे शक्य होणार नाही. हाच येथे सांगण्याचा हेतु आहे. असो.
कांही काळ नोकरीसाठी मी अरबस्तानात गेलो होतो. मुंबईत आल्यानंतर मी अमेरिकेत जाण्याच्या गडबडीत होतो. मात्र, त्याआधी अण्णांचे ‘माझ्या जीवनाची सरगम’ हे वादग्रस्थ आत्मचरित्र १२ जानेवारी, १९७७ला इनामदार बंधू प्रकाशनने प्रकाशित केले होते. त्यावेळी पुण्यात डेक्कन जिमखान्यावर त्या पुस्तकाच्या 'अलौकिक प्रतिभेचा संगीतकार' अशा जाहिराती तेथिल फलकावर दिसत असत. ते पुस्तक माझ्याकडे होते. द्रुष्टीआडच्या सृष्टीतील बराचसा भाग त्यामध्ये अण्णांनी खुल्लम-खुल्ला लिहिला होता. कदाचित त्यामुळे त्या पुस्काच्या प्रती बाजारातून लवकरच द्रुष्टीआड झाल्या होत्या व पुनः ते द्रुष्टीला आले नाही. त्याच्या अनेक आख्यायिका

१) गीतकार राजेंद्र कृष्ण, त्यांचा मुलगा व सी. रामचंद्र...२) राजेंद्र कृष्ण, सी. रामचंद्र, व ओम प्रकाश...३) सी. रामचंद्र, मास्तर भगवान, व श्यामा..
खाली: १) डावीकडून तिसरे AVMचे चित्रपट निर्माते एव्ही मयप्पन, राजेंद्र कृष्ण, मदन मोहन, चित्रगुप्त, व सी. रामचंद्र...२) रेकॉर्डिंग स्टुडिओत: अण्णा, लता, व चहा पितांना तलत मेहमूद...३) सुशील कुमार शिंदे, अण्णा, व अनुराधा पौडवाल...

आजही तिखट-मीठ लावून ऐकायला-वाचायला मिळतात व कानावरही येतात. त्या पुस्तकातील अखेरच्या भागात, अण्णांनी लिहिलेले ‘राम व सीता’ ह्यांचे ‘रामायण' कानाला श्रवणीय व सुरीले लागले नाही. त्यातील कांही 'प्रकरणे' वाचतांना मनात अनेक 'प्रश्न' उभे रहातात. आणि कुणावर 'अन्याय' झाला आहे त्याचा अंदाज येतो. मात्र, सुरुवातीच्या काळात अण्णांनी चित्रपट संस्था व चित्रपट काढून त्या व्यवसायात त्यांना अनेक आर्थिक आणि कायदेशीर अडचणी आल्या होत्या. परंतु, त्यातून बाहेर पडून अण्णांनी त्यांच्या 'सुरील्या व सरगमी' जीवनात जे यश मिळविले होते त्यात, लताबाईंचाही भाग तितकाच महत्वाचा होता असे माझे मत. अण्णांचे आत्मचरित्र शब्दांकित केले ते ग.दि.माडगूळकर यांनी. यातील शेवटची दोन वैयक्तिक पण अतिशय नाजूक प्रकरणे किंवा अध्याय अण्णांनी स्वतः लिहिलेली आहेत. कारण गदिमा त्यांना म्हणाले,'हे तुझ्या आयुष्यातील अतिशय नाजूक प्रकरण आहे आणि ते तू अनुभवलेले आहे. तेव्हा यावर तूच लिहिणे चांगले..’ ती लिहिण्यास अण्णांना मदत करणारे होते, त्यांचे अनुभवी खाजगी सचिव वसंत पोतदार. अण्णांच्या चाहत्यांची तहान हे पुस्तक वाचून काही भागली नाही. असेही म्हणणारे चोखंदळ रसिक आहेत. शिवाय, त्या पुस्तकाचा हिंदी व इंगजी मध्ये स्वैर अनुवाद व्हायला हवा असे आजही अनेक रसिकांचे मत आहे. पुस्तक प्रकाशित झाल्यावर वाचक अण्णांना प्रश्न विचारीत, 'अण्णा, तुम्ही तुमच्या फिल्मी करिअर संबंधी त्यात अवाक्षरही कां लिहिले नाही..?' त्यावर अण्णा भडकत व म्हणत, 'माझं जीवन म्हणजे काय फक्त फिल्मी लाईन आहे कां..? 'जीवनाची सरगम' असं शीर्षक असतांना लोक असं मूर्खासारखं कसं विचारतात..?' त्यासाठी आता मला 'माझ्या संगीताची सरगम' हे पुस्तक लिहायला हवं असं म्हणत...दुर्दैवाने ते आता काळाच्या मुखात स्वाहा झालं...असो.

१) अलबेलाच्या वेळी मास्टर भगवान व अण्णा...२) नवरंगच्या वेळी: व्ही. शांताराम व अण्णा...३) सूर व आवाज: अण्णा व लता...
दरम्यान अण्णा अमेरिका-इंग्लंडचा दौरा करून आले होते. तो त्यांचा अखेरचा दौरा ठरला होता. मुंबईला परतल्यावर आजारामुळे ते हॉस्पिटल होते. ज्येष्ठ संगीतज्ञ, वादक, म्युझिक संयोजक केरसी लॉर्ड ह्यांनी अण्णांची एक गंमतीदार आठवण सांगितली होती. रेकॉर्डिंग झाल्यावर अण्णा फर्मान सोडायचे, 'दुधाचा रतीब काय म्हणतोय..? आज कुणाची टर्न आहे...?' (मुरारजी देसाईंच्या राज्यात त्यावेळी दारूबंदी होती) अण्णांची दुधाची बाटली आल्यावर मैफिल मध्यरात्रीपर्यंत येथेच्छ रंगायची. अण्णांच्या अखेरच्या आजारपणात ते उपचार घेत असतांना केरसी लॉर्ड अण्णांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले होते. अण्णांनी केरसीला दुरून येतांना पाहिलं व हातातील ग्लास उंचावून म्हणाले, ‘आओ आओ केरसी, आज सचमुच मै दूधही पी राहा हूं...Please
come and join me..’ नंतर ५ जानेवारी, १९८२ला अण्णा अचानक गेल्याची दुःखद बातमी वाचनात आली. त्यांची शवयात्रा आमच्याच घरावरून गेली होती. त्या शवयात्रेत फक्त बोटावर मोजण्याइतकी माणसे होती. असं ऐकलंय की कुणालाच कळू नये म्हणून अण्णांच्या एका 'हितशत्रूनी' म्हणे अण्णा गेल्याची 'बातमी क्रश' केली होती. हे दुर्दैव होते. अण्णा गेल्यावर संगीतकार ओ. पी. नय्यरने म्हटले होते, 'सी. रामचंद्र इतक्या तोलामोलाचा संगीतकार आजवर भारतात झाला असे मला वाटत नाही. लताबाईंनी विविध संगीतकारांकडे गाणी गायिली. पण, विविध ढंगाची गाणी फक्त सी. रामचंद्र यांनीच लताबाईंकडून गाऊन घेतली होती.’

१) १९५२ मधील ‘शिन शिनाकी बुबलाबू’च्या सेटवर. डावीकडून: बद्रीप्रसाद, नानाभाई भट, मास्टर भगवान, अण्णा, रंजन, व भगवानचे बंधू शंकरराव पालव...२) डावीकडून: मास्टर भगवान, राम कमलानी, व अण्णा...३) जपानच्या दौऱ्यावर: डावीकडचे मास्टर भगवान व पांचवे अण्णा. बाकीचे फिल्म डिस्ट्रिब्युटर्स...
मुंबईला येण्यापूर्वी १९७९ साली अण्णांचा Liverpool, England, मध्ये व परदेशातील शेवटचा Live Program डॉ. श्याम व जयश्री वाडकर ह्यांच्या घरी झाला होता. भाऊसाहेब पाटणकरांची मराठी व उर्दू कवी गालिब यांच्या शायरीवर तो आधारित होता. तेथे अण्णांनी हिंदी-मराठी जुनी गाणी गाऊन तीन तासांचा उत्कृष्ट कार्यक्रम पेश केला होता. तेव्हा पाठारे ह्यांनी तबल्याला साथ दिली होती. त्या अविस्मरणीय व दुर्मिळ कार्यक्रमाची टेप मला Manchesterला राहणाऱ्या डॉ. रवी आपटे ह्यांनी मला पाठविली होती. त्या संपूर्ण कार्यक्रमात अण्णांच्या गाण्यांसह त्यांनी केलेलं निवेदन इतकं माहितीपूर्ण व विनोदी होतं की, त्यामुळे तो कार्यक्रम अत्यंत संस्मरणीय झाला होता. प्रत्येक गोष्टीचा आनंद चाखा व आनंदी राहा तरच जीवनाला अर्थ आहे असे अण्णांनी विनोदाने त्यात नमूद केले होते. दर दीड-दोन वर्ष्यांनी अण्णा परदेशात जात होते. १९८१च्या अखेरीस अण्णा इंग्लंडला गेले होते. नंतर अण्णा Manchesterला रहाणारे माझे स्नेही डॉ. रवी व डॉ. सुलभा आपटे ह्यांच्या घरी गेले होते. तेथे अण्णांनी कांही भजने गायली होती. स्वतः रवीने तबला वाजविला होता. परदेशातील मुक्कामातील अण्णांच्या 'सरगमी जीवनातील' तो अखेरचाच दौरा ठरला असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. अण्णांची तब्बेत बरी नव्हती. लंडनहून मुंबईला परतण्यापूर्वी त्यांच्या स्नेह्यानी एक ज्योतिषाची अण्णांची भेट घालून दिली होती. त्या ज्योतिषाने अण्णांना सांगितले, 'डिसेंबर अखेरीस तुम्हाला बरं वाटून खुप उमेद वाटेल व उत्साह वाढेल. भविष्यकाळ उजळणार परंतु, तुमच्या हाती मात्र कांही लागणार नाही...' मुंबईत आल्यावर २२ डिसेंबरला अण्णांना KEM हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्यावेळी अण्णांनी आपल्या पत्नीला हे भविष्य सांगितले व म्हटलं की. 'ते भविष्य बहुतेक खरं होणार असं दिसतंय...' दुर्दैवाने, ते भविष्य खरं ठरलं. दुर्दैवाने जानेवारी ५, १९८२मध्ये अण्णांना देवाज्ञा झाली. भारतीय चित्रपट सृष्टीतील 'सुरांची दुनिया' अनाथ झाली होती...गेले तेव्हा अण्णा ६४ वर्ष्यांचे होते. त्यासंबंधितचे मला आलेले डॉ. रवी आपटे ह्यांचे भावनिक पत्र वाचावे…
Dear Jayant,
Many thanks for your mail. I have read "Sargam" book long time ago. His stay with us was most wonderful thing in my-our life.
Besides that program, Anna composed 4 Bhajans in my house, with each Bahamans had four different “Chali's” and I played tablawith him. That was the last time any composition Anna recited..!
As soon as he reached Mumbai, he was admitted in KEM Hospital, Parel, by my close dear friend and colleague Prorf. Dr. Ravi Bapat in collapsed state from which Anna never ever recovered and died on the 4th day of his admission. My dear late wife Dr. Mrs. Sulabha Apte (Vaidya) visited him at KEM and had a serious chat with his wife-BEN, who mentioned that he ever composed his last Bhajans in your (my house-in UK) he was bleeding heavily from his back passage, which he never ever mentioned to either of us (myself or my wife) while he was with us. It was very sad thing…
Another wonderful thing was, the Bharat-Ratna, late Pt. Bhimsenji came to my house in July 1982, and gave most memorable concert for 4 hours. I wrote an interesting article called “Dhanya Ananad Din Purna Man-Kamana” (Natya Sangeet), for an a European Diwali Ank.
Also the late Dadasaheb-Bhai Karkhanis from Houston, TX, became close friend of mine in last few years before his sad demise.
Sorry to bore you. Bye.
Regards,
Ravi.
Kent, UKला रहाणारे माझे संगीतप्रेमी मित्र, दत्ता गुमास्ते ह्यांनी अण्णांच्या जन्म शताब्दी निमित्ताने Liverpool, England, जो मध्ये डॉ. श्याम व जयश्री वाडकर ह्यांच्या घरी जो अण्णांचा तीन तासांचा अखेरचा Live Program झाला होता तो दोन भागात दत्ता गुमास्ते ह्यांनी YouTueवर, खास रसिकांसाठी Upload केला आहे. त्याबद्दल दत्ता गुमास्ते ह्यांचा मी अत्यंत आभारी आहे.
कृपया तो येथे ऐकावा: १) https://www.youtube.com/watch?v=HKZFrHRKd7I व २) https://www.youtube.com/watch?v=MFJ2IXvMJG0

Liverpool, England येथे अण्णा कार्यक्रम सादर करतांना: १) रसिकांसमोर अण्णा व तबल्यावर पाठारे...२) ज्यांच्या घरी कार्यक्रम झाला ते डॉ. श्याम व जयश्री वाडकर, त्यांचा मुलगा विनीत व अण्णा...३) मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांसमोर अण्णा...
खाली: १-२-३) तो अविस्मरणीय कार्यक्रम झाल्यानंतर अण्णा…४) डॉ. रवी व डॉ. सुलभा आपटे ह्यांच्यासह अण्णा… ही सर्व दुर्मिळ छायाचित्रे जयश्री वाडकर ह्यांच्या सौजन्याने.

अहमदनगरमधील पुणतांब्याजवळील चितळी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव. या लहानशा गांवात १२ जानेवारी, १९१८ला रामचंद्र नरहरी चितळकर उर्फ अण्णांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. वडिलांची ठिकठिकाणी बदली होत असल्यामुळे त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. गांधर्व महाविद्यालयाचे विनयकराव पटवर्धन आणि नागपूरचे शंकरराव सप्रे ह्यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालयात’ सप्रे ह्यांच्या हाताखाली त्यांनी संगीताचे प्रथम धडे घेतले होते. तेथे अण्णांनी त्वरित उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक मिळविला होता. त्यावेळी शंकरराव सप्रे ह्यांच्याकडे गाणं शिकणारे त्यांचे दोन खास शिष्य होते. ते म्हणजे, अण्णा व वसंतराव देशपांडे. सप्रे हे नागपूरला सीताबर्डी व नवी शुक्रवारी येथे गायन शाळा चालवीत असत. त्यावेळी सप्रे ह्यांच्याकडे नामवंत गायक-वादक येत असत. इयत्ता चौथी पास झालेले अण्णा तेव्हा नवी शुक्रवारीत रहात होते. त्यानंतर आणा मुंबईत आले. तेव्हा सुरुवातीच्या काळात १९३६च्या ‘सैद-ए-हवस’ व १९३७ मधील 'आत्मा तरंग' या सिनेमातही त्यांनी छोट्या भूमिका केल्या होत्या. सोहराब मोदींच्या मिनर्व्हा मुव्हिटोन ह्या चित्रपट संस्थेत अण्णा बिंदू, हबीब खान व मीरसाहेब ह्यांच्या हाताखाली हार्मोनियम वाजवीत होते. तत्पूर्वी अण्णांनी कांही चित्रपटातही भूमिका केल्या होत्या. वामनराव सडोलीकरांच्या ‘नागानंद’मध्ये त्यांना नायकाची भूमिका मिळाली होती. त्यात सहा फुटी अण्णांसोबत चार फुटी आझमबाई ऑफ कोल्हापूर नांवाची नटी होती. संगीत होतं वामनराव सडोलीकर. तसेच, त्या सिनेमात गरुडाची भूमिका गायक श्रीकांत पारगावकर ह्यांचे वडील एकनाथ पारगावकर ह्यांनी केली होती. नंतर १९३८-३९ साली अण्णा व नौशाद हे मुंबईच्या ‘रेनबो’ रेकॉर्डस् कंपनीत नोकरी करीत होते. मास्टर राम चितळकर म्हणून अण्णांनी त्या कंपनीत असतांना ‘प्रभुवर नटविसी…’ व ‘शामा घेऊनी मुरली’ ही भक्ती गीते गायली होती. त्याचे संगीतकार होते सदाशिवराव नेवरेकर व गीतकार होते के. आर. पुरोहित. ह्याच संगीतकार सदाशिव नेवरेकर यांनी बालभूमिका केलेल्या लताला १९४२ च्या ‘किती हंसाल’ या चित्रपटात ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी’ हे गाणे गायची प्रथम संधी दिली होती. दुर्दैवाने कांही कारणास्तव त्यात ते गाणं त्या चित्रपटात समाविष्ट झालं नव्हतं. तसेच, ‘रेनबो’ कंपनीतर्फे नौशादनी 'मिस जोहराबाई'ची कांही गाणी स्वरबद्ध केली होती. हीच 'मिस जोहराबाई' पुढे 'जोहराबाई अंबालावाली' सुप्रसिद्ध गायिका म्हणून ओळखली गेली.
edit text
१) मास्टर भगवान, सी. रामचंद्र, व गोप. हे त्यावेळी त्रिकुट होतं…२) सी. रामचंद्र, अण्णांचे भक्त रोशन, व लता…३) बांसरी वादक मनोहरी व सी. रामचंद्र…
१९३२-३३ चा काळ असेल. सोहराब मोदींच्या मिनर्व्हा मुव्हीटोन स्टुडीओतील एक दृष्य होते. एक्स्ट्रा कलाकारांची वर्दळ चालू होती. बाकी सगळे लगबगीने आपापली कामं करत होते. तिथेच अण्णा एका सह-एक्स्ट्रॊबरोबर बोलत ऊभे होते. अभिनयाचं वेड घेऊन ते मुंबईत आले होते, आणि नाईलाजाने एक्स्ट्रा कलाकार म्हणून ते स्थिरावले होते. कुठेही आपली डाळ शिजत नाहीये हे सहन न झाल्याने अण्णांनी थेट सोहराब मोदींना भेटण्याचे ठरविले. त्यावेळी मोदी साहेबांचा दरारा काही औरच होता. आधीच त्यांचं रुबाबदार खानदानी व्यक्तीमत्व, जबरदस्त आवाज, आणि कडक शिस्त ह्यामुळे लोक त्यांना दबकून असायचे. त्यात ते स्टुडीओचे मालक होते. कांहीसे घाबरतच धाडस करून अण्णा मोदींना भेटले तेव्हा मोदींनी अण्णांना सांगितले होते, 'मला एक्स्ट्रा कलाकार नेहमी लागत नाहीत...' त्यावर अण्णा त्यांना म्हणाले, 'सध्या नोकरी सुटणं मला परवडणारं नाही. मी पडेल ते काम करायला तयार आहे...' ते ऐकतांच मोदीसाहेब अण्णांना म्हणाले,’आम्हाला म्हणजे, संगीतकार मिरसाहेबांना एक हार्मोनियम वादक हवाय, तुम्हाला ते काम जमेल का…?’ ते ऐकतांच अण्णा मोदींना म्हणाले, ‘साहेब, सहज जमेल. कारण मी संगीत शिकलोय. मला एक संधी द्या.' मोदींनी अण्णांकडे रोखून पाहिले आणि लगेच त्यांना सुप्रसिद्ध संगीतकार मीरसाहेब ह्यांना भेटायची आज्ञा दिली होती. त्या क्षणी मोदींना व अण्णांनाही कदाचित कल्पना नसेल की एका संगीतमय युगाची नांदी सुरु होतेय. मग, संगीत विभागात अण्णा जोमाने काम करू लागले होते. मीर साहेब तर अण्णांवर भलतेच खुष झाले होते. एक तर त्यांना किंवा त्यांच्या सहाय्यकांना गाता येत नसे. त्यामुळे गायकाला चाल समजावून सांगण्यातच खुप वेळ जात असे. त्यात मीरसाहेबांना स्वरलिपी पण अवगत नव्हती. त्यामुळे सुचलेली चाल लिहिता येत नसे आणि कहर म्हणजे, मीरसाहेब विसरभोळे होते. त्यामुळे अनेकदा रेकॊर्डिंगच्या आधी तालमीतच ते चाल विसरायचे. अण्णांच्या सुदैवाने तेथील गदारोळात योग्यवेळी अण्णांचा प्रवेश झाला होता. आणि मिरसाहेबांना जणु अल्ला/खुदा भेटल्याचा आनंद झाला होता. अण्णा पेटीवर सराईत होते व चांगले गणारेही असल्याने, चाल ऐकल्यावर ते पटापट स्वरलिपी लिहीत असत. त्यामुळे लवकरच ते मिरसाहेबांचे सहाय्यक बनले होते. ‘न्यू थिएटर्स’ च्या चित्रपटांतल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्यांच्या स्वरलिप्या बनविणे हाही अण्णांचा एक छंद होता. ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ ह्या संस्थेच्या संगीत विभागात हार्मोनियमवादनाचे काम त्यांना मिळाले आणि संगीतदिग्दर्शनाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाल होती. तेथे मीरसाहेबांच्यासह काम करणारे ‘बी. एस. हूगन’ नांवाच्या संगीत कलाकाराशी त्यांचा संबंध आला. हूगन हे पाश्चात्त्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवीत. त्यांच्या संगतीने सी. रामचंद्रांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलांतून इंग्लिश वादकांचे वादन ऐकले. पश्चिमी संगीतातली उडती लय देशी गाण्यांना देता आली तर ती गाणी खूप लोकप्रिय होतील, ह्याचा अंदाज अण्णांना त्यावेळी आला होता. हूगन ह्यांनी तयार केलेल्या गाण्यांच्या चालींच्या स्वरलिप्या तयार करण्याचे काम साहजिकच अण्णांकडे होते. त्या करताना स्वतःला सुचलेले नवीन काही ते त्यांत घुसडून देत. हूगन ह्यांच्याकडून त्याबद्दल कधी आक्षेप आला नाही. मीरसाहेबांचे बनारसी पद्घतीच्या गायकीवर प्रभुत्व होते. गीतकारांकडून गीत मिळाल्यावर अण्णा गाण्याच्या चाली बांधत असत. नंतर स्वतःच्या हस्ताक्षरात ती गाणी लिहितांना मधे तीन ओळी सोडून लिहीत असत. त्या रिकाम्या जागी त्यांना सुचलेल्या चालीची स्वरलिपी लिहून काढीत व लगेच पेटी घेऊन ते गात असत. एका गाण्याच्या चार-पंच चाली ते बांधित असत. इतरांनाही त्या ऐकावीत असत. परंतु, त्यांना आवडलेलीच चाल ते शेवटी निवडीत होते...

१) डावीकडून: जी. एम. दुराणी, अण्णा, लता मंगेशकर, व तलत मेहमूद…२) देखणं व्यक्तिमत्व लाभलेले सी. रामचंद्र…३) डावीकडून उभे: जयकिशन, पं. गोविंदराम, हंसराज बहल, रोशन, महमद शफी, हेमंत कुमार आणि गुलाम महमद. बसलेले: व्ही. बलसारा, सरस्वती राणे, सी. रामचंद्र, अनिल बिश्वास, नौशाद, लता मंगेशकर आणि मदन मोहन…
मीरसाहेबांबरोबर काम करतांना त्यावेळी आणखी एक माणूस अण्णांवर बेहद्द खुष झाले होते ते म्हणजे, दिग्दर्शक मास्टर भगवान पालव. भगवान त्या काळात गल्लाभरू चित्र देणारे यशस्वी दिग्दर्शक समजले जात होते. त्यावेळी चित्रपटात बाबुराव-भगवान, मा.विठ्ठल-भगवान ह्या मारामारी-पटातील तत्कालीन लोकप्रिय जोड्या होत्या. भगवान अनेकदा मीरसाहेबांमुळे खोळंबत असे. असंच एकदा मद्रासला एक काम अडकल्याने मीरसाहेबांनी भगवानला म्हणाले, 'आपण राम चितळकरला-अण्णांना बोलावून घेऊ. अण्णा ती सगळी कामं पटकन करतील...' नंतर अण्णा मद्रासला गेले आणि पटापट स्वरलिपी-लिखाण करून त्यांनी अडकलेली गाडी रूळावर आणली होती. भगवानला एक कामाचा माणूस भेटल्याचा आनंद झाला होता. आणि अण्णांनाही भगवानच्या कामाचा झपाटा आवडला होता. योगायोगाने तेथच त्यांची मैत्री जमली होती. हळुहळू मीरसाहेबांसाठी अण्णा चाली पण रचू लागले होते. 'लाल हवेली' बोलपटासाठी त्याने चक्क नूरजहान आणि सुरेंद्र ह्यांच्यासाठी एक द्वंद्वगीतही स्वरबद्ध केलं होतं. एक दिवस अचानक, भगवानने अण्णांना सांगितलं, 'मला एक तामिळ चित्रं मिळालंय आणि त्याचं संगीत तू करायचंस...' अशा प्रकारे अण्णांना १९४१ साली 'वनमोहीनी' हा पहीला बोलपट मिळाला. त्यानंतर अण्णांनी इतर कांही तमिळ चित्रपटांना संगीत दिलं होतं. पण अण्णांना पुण्या-मुंबईत संधी मिळत नव्हती. अचानक भगवाननेच अण्णांना द्वारका खोसला ह्या निर्मात्याबरोबर गांठ घालून दिली होती. आणि १९४२मध्ये 'सुखी जीवन' हा बोलपट अण्णांना मिळाला. त्याच वेळी खोसलांनी त्याची गाठ जयंत देसाईशी घालून दिली आणि अण्णा 'सम्राट चंद्रगुप्त' चित्रपटाचे संगीतकार बनले होते. ह्याच वेळी निर्माता जयंत देसाई ह्यांनी 'अण्णासाहेब', 'राम चितळकर' ही नावं शोभत नाहीत म्हणून अण्णांना एक नांव दिलं ते होतं, 'सी.रामचंद्र'..! अशा रीतीने १९४३ साली अण्णा संगीतकार सी. रामचंद्र म्हणून जगासमोर आले होते. नायक बनण्याच्या नादात आपली प्रतिभा वाया घालवणाऱ्या अण्णांना, त्यांच्या नियतीनेच नशीबाच्या दाराशी आणून ठेवलं होतं. अनारकलीच्या वेळी जेव्हा अण्णांचे नांव गाजले तेव्हा, त्यांना रस्त्यात गजानन जाहगिदार भेटले. आणि ते अण्णांना म्हणाले, 'बघा, बघा, मदासचा तो संगीतकार सी. रामचंद्र कसा गाजतोय. तसं कांही तरी तुम्ही करा…' आणि ते निघून गेले. अण्णा मनातून मनस्वी हंसले व त्यांनी आकाशाकडे बघून हात जोडले होते…

१) झांजरच्या सेटवर: पांछी, ओम प्रकाश,केदार शर्मा, अण्णा, व मास्टर भगवान...२) गीतकार राजेंद्र कृष्ण, अण्णा, व लता...३) पुण्यात असलेल्या तांबडी जोगेश्वरी देवळातील प्रमुख पुजारी भाऊ बेंद्रे, अण्णा, व अण्णांचे जिवलग मित्र, पद्माकर जोशी. जानेवारी १३, १९८१...
अशोक कुमारने आपल्या मेव्हण्यांबरोबर, शशिधर मुखर्जींबरोबर, १९४३ साली ‘फिल्मिस्तान’ संस्था सुरु केली होती. त्यांनी प्रकाशित केलेल्या व प्यारेलाल संतोषीने दिग्दर्शित केलेला १९४७ मधील ‘शहनाई’ ह्या चित्रपटातून अण्णांना खरा ब्रेक मिळाला. या या सिनेमाला सुप्रसिद्ध संगीतकार मास्टर गुलाम हैदर प्रथम संगीत देणार होते. परंतु, कामानिमित्ताने अचानक त्यांना लाहोरला जावे लागले. आणि अण्णांना संगीत त्या सिनेमाला संगीत देण्याची संधी मिळाली होती. पाश्चात्य संगीतावर आधारित ‘आना मेरी जान, संडे के संडे’ ह्या त्यांच्या पहिल्याच धमाल गाण्याने संपूर्ण भारतात अण्णांचे नांव संगीतकार व गायक म्हणून लोकप्रिय झाले होते. शहनाईचं संगीत तूफान गाजलं. शहेनाई हा चित्रपट तर ऐतिहासीकच म्हणायला हवा कारण इथेच लताबाई आणि सी.रामचंद्र ह्यांनी प्रथम एकत्र काम केलं. फिल्मिस्तानच्या शशिधर मुखर्जींचा विरोध पत्करून लताबाईंना जवानी की रेल चली जाय रे ह्या गाण्यात संधी दिली. आणि त्यानंतर अण्णांना मागे वळून पहावे लागले नव्हते. अनिल विश्वास एकदा ह्या गाण्याची आठवण सांगताना एकदम म्हणाले होते, ‘राम (अण्णा) सारखा प्रतिभवान संगीतकार मला गुरू का मानतो हे कोडंच आहे, त्याने काही मला असिस्ट केलं नाही का शिकला ही नाही माझ्याकडून काही, पण माझ मेलडी स्कूल मात्र त्याने हर्क्युलसने पृथ्वी पेलावी तसं पेलून धरल’. शहनाईचं संगीत तूफान गाजलं. मुखर्जी ‘मेरी जान मेरी जान’ ऐकून भडकले आणि हे थिल्लर गाणं सिनेमातून काढा असं म्हणाले. ते गाणं कसंबसं राहिलं आणि त्यानेच इतिहास घडवला. अर्थात नंतर पाश्चात्य संगीतातून चोरी-मारी सी.रामचंद्रनेच सुरू केली असा आरोपही त्यांच्यावर केला गेला होता. एक मात्र खरे की, अण्णांनी त्या संगीताचा वापर हिंदी गाण्यात उत्तम प्रकारे केला होता. चांगल्या गोष्टीची नक्कल कां करू नये असे त्यांचे ठाम मत होते. पाश्चिमात्य वाद्यांचा बेमालूम वापर करून निरर्थक वाटणाऱ्या शब्दांची गाणी स्वरबद्ध करण्यात अण्णांची हातोटी होती याद वाद नाही. 'आना मेरी जान, संडे के संडे...', 'गोरे गोरे, वह बांके छोरे...', 'अपलम चपलम...', 'शोला जो भडके...' किंवा 'इना मीना डिका...' अशा धाटणीची गाणी कमालीची लोकप्रिय करून दाखविली तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांच्या भुवयां उंचावल्या होत्या. अफाट लोकप्रिय झालेले 'आना संडे के संडे...' हे गाणं म्हणे त्यावेळी भारतातील सर्व थरातील रसिक मंडळी गात असत. त्यामुळे हिंदी गाण्यात पाश्चिमात्य वाद्यांचे आगमनही अण्णांमुळे झाली असे मानले जाते. त्यावेळच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन त्यांना आवडतील अशी उडत्या चालीची गाणी बनविण्यात आणि ती यशस्वी करून दाखविण्यात अण्णांचा हातखंडा होता. पाश्चात्य संगीताचा वापर गाण्यात करतांना अण्णांनी सहाय्यक म्हणून गोव्याचे संगीतकार घेतले होते. ते होते, ताजच्या बाजूला असलेल्या ग्रीन्स हॉटेल मधील बँड वाजविणाऱ्यांमध्ये सर्व प्रकारची (Percussion) वाद्ये वाजविणारे कावस लॉर्ड, चीक चॉकलेट (AX Vaz) व बी. एस. हूगननी Bongo, Congo, Thumba, Rotodrums आणि ढोलक वाजविले होते. Accostic, Electric, Base and Hawaiian guitar वाजविणारे होते, Bonny D'costa. Cheloवर John Dias होते. Viola वाजविला होता Johnny Gomesने. Violin Oskarने. परंतु, ‘शहनाई' मधीलच ‘मार कटारे मर जाना’ आणि ‘हमारे अंगना बाजे शहनाई’ ह्या अस्सल भारतीय गाण्यांचा विचार कोणीही केला नाही. याचवेळी अण्णांचे गायक म्हणून रफी, अमीरबाई आणि शमशाद बेगम ही नांव पक्की होऊ लागली होती. पी. एल. संतोषी व राजेंद्र कृष्ण हे अण्णांचे आवडते गीतकार व मित्र होते. पी. एल. संतोषी नुसते गीतकारच नव्हते तर सिनेमा दिग्दर्शकही होते. त्यांचे शहनाई, खिडकी, सरगम, व शिनशिनकी बुबलाबू हे अण्णांनी संगीत दिलेले चित्रपट गाण्यांनी गाजले होते. फिल्मिस्तान कंपनीत अण्णा कांही वर्ष मासिक पगारावर नोकरी करीत होते. रणजित स्टुडिओचे मालक रायसाहेब चुनीलाल ह्यांचे पुत्र (संगीतकार) मदन मोहन ह्यांना जेव्हा संगीतकार बनायची ईच्छा झाली होती तेव्हा रायसाहेबांनी मदनमोहनला प्रथम फिल्मिस्तान मध्ये अण्णांच्याकडे संगीताचे धडे घ्यायला पाठविले होते. तेथे ते चार वर्ष म्युझिक रूममध्ये बसून अण्णांचे काम निरखून पाहात होते. पुढे मदनमोहनने संगीत दिलेल्या 'शबिस्तान' चित्रपटाच्या नामावलीत म्युझिक सुपरव्हिजन म्हणून अण्णांचे नांव आहे. तसेच, एस. डी. बर्मनचा १९४६ मधील 'शिकार' हा पहिला सिनेमा जेव्हा रखडला होता तेव्हा त्याच्या निर्मात्याने तो सिनेमा अण्णांना पुरा करायाला सांगितले होते. परंतु, अण्णांनी तसे न करतां बर्मन ह्यांना संगीतासाठी मदत केली होती. आणि दुसरं कारण म्हणजे, त्या वेळी एस. डी. बर्मन ह्यांना पार्श्वसंगीत करता येत नव्हते. शिवाय, रेकॉर्डवर संगीत सचिन देव बर्मन व सहाय्यक सी रामचंद्र असा उल्लेख केल्यामुळे अपमानित अण्णांनी रागाने त्या रेकॉर्ड फोडून टाकल्या होत्या. त्यांच्या करारावर संगीत सुपरव्हिजन म्हणून अण्णांचे नांव होते. हे किती जणांना माहित आहे..? असो.

१) डावीकडून: महमद रफी, सी. रामचंद्र, लता मंगेशकर, मीना शौरी, व नौशाद…२) कलकत्त्यात झालेल्या ‘दूर गगनकी छाओमें…’ ह्या चित्रपटाच्या उदघाट्नच्या वेळी किशोर कुमार, सी. रामचंद्र, व रुक्मा त्रिपाठी…३) महमद रफी, सी. रामचंद्र, लता मंगेशकर, छोटा अनिल मोहिले, व अण्णांचे आवडते वादक व अरेंजर चिक चॉकोलेट. ज्यानी ‘गोरे गोरे वह बांके छोरे...' ह्या गाण्याला ठेका दिला होता...
१९५२ च्या सुमारास अण्णा चित्रपट निर्माते झाले आणि ‘झांझर’ व ‘दुनिया गोल है’ यांची निर्मिती त्यांनी १९५५ मध्ये अभिनेते ओमप्रकाश यांच्याबरोबर ‘न्यू साई प्रॉडक्शन्स’ तर्फे केली होती. त्याचवेळी त्यांचे ‘झमेला, ‘लहरे’ व प्रेमनाथ निर्मित ‘शगूफा' हे तीन बोलपट एकाच वर्षी प्रकाशित झाले होते. पण ते वर्षं स्मरणात राहिलं, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात उत्कृष्ट संगीतनिर्मीतीमुळे. तो बोलपट होता, फिल्मीस्तानचा ‘अनारकली'. पुढे एकदा बोलताना अण्णा म्हणाले होते, ‘झांजर’ सिनेमा हे माझं व लताचं होम प्रोडक्शन होतं…अनारकलीची गाणी हिट होतील हे माहीत असतं तर त्या चाली मी झांजरला दिल्या असत्या…’ अनारकलीतील ‘जमाना ये समझा के हम पीके आए’ ह्या गाण्यावर काम चालू होतं. प्रसंग असा होता की अनारकली अकबरासमोर गाणं सादर करणार अस्ते, पण एक जळणारी तिच्या पेयात दारू मिसळते. अनारकलीच्या ते उशीरा लक्षात येते आणि तो पर्यंत ती अकबराच्या दरबारात पोहोचली असते, आणि तीला गाणं सादर करायचं अस्तं आणि मदीरेचा अंमल सुद्धा लपवायचा अस्तो. शब्द चालीत अलगद बसत होते, पण मुखडयाच्या शेवटची ओळ, ‘जमाना ये समझा के हम पीके आए…’ पी के आए. ह्यात एका अक्षराचं अंतर पडत होतं आणि ते कसं भराव ते सुचत नव्हतं. विचार करून वैतागलेले अण्णा कांही सामान घेऊन घरी गेले. कुलूप उघडताना त्यांना उचक्या येऊ लागल्या आणि ते पुरते हैराण झाले. सामान कसंबसं आत ठेऊन पाणी प्यायले. आणि एकदम सुचलं. पेटी घेऊन ‘जमाना ये समझा के हम पीके आए (उचकी) पी के आए…’ असं म्हटलं आणि आपला प्रश्न सुटला हे लक्षात आलं. मग लगेच लताला घेऊन रेकॉर्डींगही केल. मुखर्जींनी गाणं ऐकलं अणि ते पिसाळले. ही काय फालतूगिरी आहे, उचक्या-बिचक्या काय टाकता असं म्हणाले. पण फिल्मीस्तानने एकदम लो बजेट ठेवल्याने त्यांना काही करता नाही आलं आणि ते गाणं त्या उचकीसकट प्रसिद्ध होऊन हिटही झालं. ही कहाणी ऐकण्यासारखी आहे. फिल्मिस्तानचा ‘अनारकली' दुर्लक्षित करून अण्णा स्वतःच्या 'झांझर'मधील गाण्यांमध्ये जास्त लक्ष देत आहेत असे समजून दिवाळखोरीत जाणाऱ्या फिल्मिस्तान कंपनीने त्यावेळी अण्णांवर कोर्टात फिर्याद केली होती. परंतु, झाले उलटेच. ‘अनारकली’ अण्णांच्या संगीतामुळे सुपर हिट झाला व फिल्मिस्तानला भरपूर आर्थिक लाभ झाल्याने ती कंपनी कर्जमुक्त झाली होती व तो स्टुडिओ आर्थिक अडचणीतून वांचला होता. त्यामुळे फिल्मिस्तानने अण्णांवर कोर्टात केलेली फिर्याद मागे घेतली होती…दुर्दैवाने उत्तम गाणी असूनही अण्णांचा ‘झांझर’ हा सिनेमा दोन आठवड्यात डब्यात गेला होता. अनारकलीचे संगीत प्रथम संगीतकार बसंत प्रकाश ह्यांच्याकडे होते. त्यांनी गीता राय-दत्तचं एक गाणं 'आ जाने वफा...' स्वरबद्ध केलं होतं. ते केल्यानंतर ते अचानक वारल्यामुळे अनारकलीला संगीत देण्याचे काम अण्णांकडे आले होते. अण्णांच्या संगीताने घडलेला इतिहास आपण जाणतां. परंतु, अण्णांनी ते गीता दत्तचे गाणं अनारकलीतून वगळलं नव्हतं. त्यामुळे इतर गाजलेल्या गाण्यांपुढे गीता दत्तचे ते गाणं, ऐकायला जरा वेगळं वाटलं होतं. अण्णांना त्यांनी संगीत दिलेले मनापासून आवडलेले तीन चित्रपट होते. यास्मिन, झांझर, आणि स्त्री. यास्मिनची सर्वच गाणी अविस्मरणीय असूनही तो सिनेमा जास्त चालला नाही याचे दुःख त्यांना अन्याय झाल्याप्रमाणे होते.
खरं म्हटलं तर अण्णांनी 'मूर्तिमंत भिती उभी'ची चाल कधीच ऐकली नव्हती. अनारकलीतील 'यह जिंदगी उसीकी है...' या गाण्याची चाल 'मूर्तिमंत भिती उभी'शी अजिबात संबंधित नव्हती. असे जाणकारांचे मत होते. त्यावर अण्णांनी सांगितलेला किस्सा असा...अण्णा लहान असतांना त्यांचे वडील अंघोळ करतांना 'मूर्तिमंत भिती उभी' हे पद म्हणत असत. परंतु, ते बालगंधर्वांच्या चालीत नसून त्यांच्या स्वतःच्या चालीत ते गात असत. आणि वडिलांची तिच चाल अण्णांच्या डोक्यात होती. ती तशीच्या तशी चाल अण्णांनी आपल्या बुद्धीनुसार वेगळ्या स्वरूपात अनारकलीतील 'यह जिंदगी उसीकी है...' या गाण्याला दिली होती. शिवाय, मराठीतील 'बाळा जो जो रे...' या गाण्याशी मिळती-जुळती चाल या लोरीला मनात ठेऊन अण्णांनी अलबेलातील 'धीरेसे आजारे...' या गाण्याला चाल बांधली होती. त्यावेळी लताबाईंबरोबर तलत मेहमूदला अण्णा घेणार होते. पण, तलत मेहमूद रेकॉर्डिंगच्या वेळी-दिवशी उपलब्ध नव्हता. त्या गाण्याचे चित्रीकरण तलत उपलब्ध होईपर्यंत थांबवणे हे खर्चाचे होते. त्यामुळे अण्णांनी ते गाणं तलतचा आवाज डोळ्यासमोर ठेऊन नाईलाजाने स्वतः गायलं होतं. मात्र, या गाण्याने अलोट लोकप्रियता मिळविली होती.
आणखी एक किस्सा, 'बाल हट्ट आणि अण्णा...' एकदा अण्णा कुटुंबासह दिल्लीला मित्राकडे उतरले होते. तेव्हा एके रात्री मित्राच्या आग्रहावरून अण्णांच्या जुन्या गाण्यांची मैफल अण्णांनी रंगविली होती. मात्र त्यावेळी 'हाथी मेरे साथी...' या चित्रपटातील 'चल चल मेरे हाथी...' या गाण्याची क्रेझ असलेल्या तेथिल लहान मुलांनी अण्णांना ते गाणं म्हणण्याचा हट्ट धरला होता. अण्णांना ते गाणं आणि त्याची चालही माहित नव्हती. पण ते गाणं लक्ष्मीकांत-प्यारेलाल ह्यांनी स्वरबद्ध केले आहे हे कळतांच अण्णांनी लक्ष्मीकांतना मध्यरात्री फोन केला व ते गाणं त्यांच्याकडून ऐकून घेतले व त्या मैफिलीत ते म्हणून दाखविले. अर्थात, मुलं खुष झाली होती...

१) डावीकडून: वसंत देसाई, शंकर, अण्णा, व नौशाद...२) पुढे बसलेले: जयकिशन व मदनमोहन. मागे: रोशन, अनिल बिस्वास, हेमंत कुमार, महंमद शफी, व नौशाद...३) अण्णा, रफी, व किशोर कुमार. १९७०मधील ‘रुठा ना करो' या किशोर कुमारच्या सिनेमातील रेकॉडींच्या वेळी…
काळ आहे लता मंगेशकरच्या उदयाचा, १९४७चा. महालक्ष्मी रेसकोर्स जवळ एका खाजगी रेकॉर्डिंग स्टुडिओत संगीतकार सी. रामचंद्र ह्यांच्या सांगण्यावरून त्यांनी वसंतराव जोगळेकर यांच्यासह लताबाईंचा 'मालकंस' रागाचे रेकॉर्डिंग केले होते. त्यांना तबल्यावर साथ देणारे होते श्रीपाद नागेश व सारंगीवर होते पंडित रामनारायण. ह्याची ही फिल्म कांही वर्ष्यापूर्वी एका संग्राहकाच्या हाती लागली. आणि हे दुर्मिळ धन त्याने मला पाठविले होते. यापूर्वी इतरांच्या हाती ती फिल्म जेव्हा लागली तेव्हा ती फिल्म लगेच
YouTubeवर आली. परंतु, त्या फिल्मचा कांही सेकंदाचा शेवटचा भाग मात्र आजतागायत कुणी पाहू शकलेलं नाही. तो
YouTubeवर नाहीये. त्या Videoत शेवटी त्या कलाकारांचे अभिनंदन करायला म्हणून अण्णा घाईने स्टेजवर चढायला जातांना धडपडतात. अगदी थोड्या वेळात गायलेला तो ‘मालकंस' राग केवळ लताबाईच गाऊ शकतील ह्याची अण्णांना पूर्ण खात्री होती. हा त्यांचा विश्वास ते Video
Recording पाहिल्यावर दिसून येतं. महत्वाचं म्हणजे, लताबाईंनी शास्त्रीय संगीतामध्ये न पडण्याचा योग्य निर्णय घेतला होता. असं माझं मत. त्याचवेळी झालेला लता मंगेशकरांचा उदय हा सिनेसृष्टीतील सूर्योदय होता. त्याचा प्रभाव अण्णांवर इतका पडला की, चित्रपट सृष्टीत अण्णांनी निर्मात्यांना सांगून टाकले, ‘माझ्या प्रत्येक गाण्यात स्वरलता ही असणारच...' त्यानंतर चित्रपटसृष्टीत लता व अण्णा ह्यांच्या सुमधुर, सुरील्या, व श्रवणीय गाण्यांनी इतिहास घडविला होता असे म्हणणे योग्य ठरेल. १९५० मधील राजकपूर व रेहानाचा ‘सरगम' हा सिनेमा अण्णांच्या जीवनात संगीताने गाजलेला सिनेमा होता. सरगम वरून आठवण झाली. न्यू जर्सीमधील ‘मराठी विश्व’ या मराठी मंडळ संस्थेसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी, मी व डॉ. मीना नेरुरकरने एकत्रपणे अण्णांवर एक स्मरणरंजनात्मक Audio-Visual चा दर्जेदार कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाला मी ‘सरगम’ असे नांव दिले होते व माझ्या संग्रहातील अण्णांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविले होते. रसिकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्या कार्यक्रमात मी ‘शहनाई' मधलं 'आना संडे के संडे...' हे गाणं दाखविलं होतं. कधीही न पाहिलेलं ते धमाल गाणं ऐकताच सर्व प्रेक्षक आनंदले होते. तो माझा कार्यक्रम पाहिल्यावर माझ्या मित्राच्या सासुबाईंनी मला फोन केला व म्हणाल्या,’जयंतराव, मला अण्णांच्या ‘शहनाई’ सिनेमाची व्हिडिओ टेप (त्यावेळी व्हिडिओ टेपचा जमाना होता) तुझ्याकडे असल्यास पाहायला मिळेल कां..?’ मी त्वरित त्याची कॉपी करून भेट म्हणून त्यांना पाठविली होती. त्या नंतर पुण्याला जाणार होत्या. ती टेप मिळाल्याचा त्यांना मनापासून आनंद झाला होता. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘मी अण्णांच्या पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील ‘सरगम’ बंगल्याच्या (आता हॉटेल सन्मान ने त्याला झाकून टाकले आहे) शेजारी रहाते. अण्णांच्या पत्नी शांताबाई माझ्या चांगल्या स्नेही आहेत. त्यांना मी प्रथम त्या सिनेमासंबंधी विचारले होते. परंतु, त्यांचेकडे तो सिनेमा नव्हता. असो. तुमचे शतशः आभार व धन्यवाद…’ आजही (८४ वर्ष असलेल्या) वयोवृद्ध शांताबाई त्या 'सरगम' बंगल्यात रहाताहेत. Caretaker म्हणून कदम नांवाचे गृहस्थ त्यांच्या सोबतीला आहेत. आपल्या नातवंडांना सांभाळायला अमेरिकेत मुलीकडे त्या येऊनही जात होत्या. त्यावेळी पुण्याच्या आपटे रोडवर काय किंवा दादरच्या शिवाजी पार्कला काय, अण्णा जेव्हा प्रभात फेरीला जात होते तेव्हा किती तरुण मुलींची त्यांनी हृदयें जिंकली असतील त्याचा विचार न करणे योग्य. असो. तुम्हाला कदाचित, ‘सरगम’ सिनेमातील 'तू छेड सखी सरगम...' या सरस्वतीबाई राणे व लताबाईंच्या द्वंद्व गीताच्या अखेरीस वाजविलेला जो व्हायोलिनचा अप्रतिम पीस आहे तो स्मरणात असेल. ते व्हायोलिन वाजविणारे होते सुप्रसिद्ध पं. गजानन कर्नाड. गजाननबुवांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक संगीतकारांकडे व्हायोलिन वाजविले आहे. वानगी दाखल सिनेमांची नांवे द्यायची झाली तर ‘परछायी', 'मुसाफिर', 'उजाला', 'दो आँखे बारह हाथ' व 'संगम' मधील गाणी आठवा. त्यात जो व्हायोलिचा उत्कृष्ट भाग ऐकायला मिळतो तो पं. गजानन कर्नाड ह्यांनी वाजविला आहे. नॅशव्हिल, टेनेसीमध्ये रहाणाऱ्या माझ्या स्नेही, डॉ. शैला शिबाद, ह्यांचे ते काका होत.

१) अण्णांच्या संगीताने गाजलेला चित्रपट, राज कपूर व रेहानच्या 'सरगम'चे पोस्टर... २) 'सरगम' या चित्रपटातील 'तू छेड सखी सरगम...' गाणं पडद्यावर गातांना रेहाना व विजयालक्ष्मी...३) 'तू छेड सखी सरगम...' या गाण्याच्या शेवटी व्हायोलिनचा अप्रतिम सूर वाजविणारे पं. गजानन कर्नाड…ही छायाचित्र त्यांची मुलगी सुज्ञा पाटकर हिच्या सौजन्याने.
खाली: १) मुंबईत वाळकेश्वरला बाणगंगा येथे रहाणारे डॉ. प्रकाश जोशी ह्यांच्या घरी. डावीकडून: अण्णांची पहिली पत्नी बेन, संगीतकार श्रीकांत ठाकरे, मास्टर भगवान, व तबला वादक श्रीपाद जोशी...२) डॉ. प्रकाश जोशी ह्यांच्या घरी…डावीकडून: भीमकाय देह असलेले सुप्रसिद्ध ढोलक वादक लाला गंगावणे, अण्णांची पत्नी बेन, व संगीतकार श्रीकांत ठाकरे…ही छयाचित्रे डॉ. प्रकाश जोशी ह्यांच्या सौजन्याने.

हिंदी चित्रपटसृष्टित जेव्हा अण्णांनी पदार्पण केलं तेव्हा तेथे मराठी सोडून इतर लोकांचे साम्रज्य अधिक प्रमाणात होतं. त्यातून गटबाजी, जाहिरातबाजी व स्पर्धा अधिक प्रमाणात होती. असे असूनही अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यावेळी अण्णांनी त्यांच्या संगीतमय कारकिर्दीत उच्च शिखरावर राहून एकूण १०४ बोलपटांना संगीत दिले होते. हे निश्चितच कौतुकास्पद होतं. अण्णांनी हिंदी सोबतच मराठी, तामिळ, तेलुगू व भोजपुरी चित्रपटांनाही संगीत दिले होते. दाक्षिणात्य निर्मात्यांचा हिंदी चित्रपटांमधील या एकाच माणसावर-अण्णांवर भरवसा राहिला तो कायमचा. सुरूवातीच्या काळात 'आर्. एन्. चितळकर’ या नावाने त्यांनी काही मराठी चित्रपटांत भूमिका केल्या व गाणीही गायिली होती. १९६० च्या दशकात त्यांनी ‘धनंजय’ व 'घरकुल या मराठी चित्रपटांची निर्मिती केली, त्यांना संगीत देउन प्रमुख भूमिकाही केल्या होत्या. १९७० मधील राजा ठाकुरांच्या ‘घरकुल’मधील ‘पप्पा सांगा कुणाचे’ व आशाताईंनी गायलेलं 'मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, मोकळ्या केसांत माझ्या तू जिवाला गुंतवावे...' हे सुरेश भटांचं सेक्सी, सुपरहिट, श्रवणीय गीत-गाणं ऐकल्यावर रसिकांच्या डोळ्यासमोर येणारा तो नाजूक प्रसंग कोण विसरेल..? असं गाणं म्हणजे, माय मराठीला सहज दिलेला मोत्याचा जणू कंठा असं वाटतं. १९६०च्या 'संत निवृत्ती ज्ञानदेव' या मराठी चित्रपटाला अण्णांनी संगीत दिले होते. तसेच, गीतरामायणापाठोपाठ १९६७ मध्ये ग. दि. माडगुळकरांचं कृष्णावर आधारित ‘गीत-गोपाळ’ रसिकांपुढे आलं. गीतरामायणाच्या प्रचंड यशापुढे दुर्दैवाने किंवा योगायोगाने म्हणा, दोन अण्णांनी (गदिमा-चितळकर) योजलेलं हे ‘गीतगोपाळ’ श्रवणीय असूनही रसिकांना पसंत पडलं नव्हतं. त्याची महत्वाची कारणे म्हणजे, 'गीत गोपाळ'मध्ये गीत-रामायणाचं वजन त्यात नव्हतं. शिवाय, अण्णांनी 'गीत गोपाळ'ला चाली देतांना ‘गीत गोपाळ’ हा सिनेमा नाहीये ह्याचं भान ठेवलं नाही. जे, गीत-रामायणाला चाली देताना बाबूजींनी ठेवलं होतं. स्वतंत्रपणे 'गीत-रामायणाचे' कार्यक्रम करतांना तेथे एकमेव गायक बाबुजी व तबला वादक अशा दोनच व्यक्ती होत्या. त्यामुळे आर्थिक फायदा अधिक प्रमाणात बाबुजींना मिळणारा होता. गदिमांनी 'गीत गोपाळ' लिहिण्याचं महत्वाचं कारण म्हणजे, 'गीत रामायणातील' अविस्मरणीय गीतें लिहिल्याबद्दल पुणे आकाशवाणी केंद्राकडून त्यावेळी त्यांना एका गाण्याचे फक्त १५ रुपये मिळत होते. स्वतंत्रपणे 'गीत गोपाळ' लिहून त्याचे कार्यक्रम करून जास्त पैसे मिळतील ही भवना अथवा विचार गदिमांनी प्रामुख्याने ठेवला होता. मात्र 'गीत गोपाळ' कार्यक्रम करतांना अण्णांनी सिनेसंगीताप्रमाणे जास्त वादक कलाकार घेतले होते. त्यामुळे आर्थिक खर्च पाहतां ते निश्चितच परवडणारे नव्हते. म्हणून ‘गीत गोपाळ'च्या कार्यक्रमाला कांही काळातच खंड पडला होता. असे जाणकार म्हणतात. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात सादर झालेल्या गीतगोपाळच्या एक कार्यक्रमात, अण्णांच्या हस्ते सुप्रसिद्ध मास्तर कृष्णराव ह्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी मा. कृष्णराव म्हणाले होते, 'सी. रामचंद्र यातला सी म्हणजे, समुद्र. त्यांचं सांगतिक ज्ञान महासागरासारखं अगाध आहे...' त्यावर अण्णा म्हणले होते, ‘मास्तरांच्या स्वरनियोजनातून मी चाळीस-एक चाली बांधल्या आहेत.’ अनारकलीतील लोकप्रिय 'ये जिंदगी उसकी है...' हे मास्तरांच्या कृपेनेच सुचलं गाणं आहे.

१) दिल्लीत इंदिरा गांधींसमवेत: पुढे जयकिशन, शंकर, व राज कपूर. पाठीमागे: आय. एस. जोहर, आगा, मेहमूद, आणि अण्णा...२) रेकॉर्डिंग सुडीओत: लताबाईंना चाल समजावून सांगतांना...३) अण्णा, महेंद्र कपूर, व गायिका पूर्णिमा…
त्यावेळी सिलोन रेडिओवर संगीतकार आपल्या सिनेमाची व स्वतःच्या गाण्यांची जाहिरात नसली तर सिनेमाचे शेवटचे पार्श्वसंगीत देत नसत. जाहिरात असावी अशी अट घालायचे. म्हणजे, पैसे देऊन सिनेमा संगीत लोकप्रिय करण्याचा धंदा बरचसे संगीतकार करीत होते. हे अण्णांना ते पसंत नव्हतं तसेच पटणारे नव्हते. सर्व बंगाली व इतर संगीतकारांनी त्यांच्या प्रदेशातील मूलभूत गाभा असलेल्या गाण्यांची जशीच्या तशी नक्कल करून गाणी स्वरबद्ध केलेली असत. मात्र अण्णांनी स्वरबद्ध केलेली गाणी ही त्यांची स्वतःची स्वनिर्मिती होती. त्याला शास्त्रीय संगीताची जोड होती. गीतकाराच्या गीतांना योग्य तो न्याय देऊन व तीन मिनिटांचे भान ठेवूनच त्यांनी चाली बांधल्या होत्या. मग, निरनिराळ्या सुरांनी-वाद्यांनी-स्वरांनी त्याला ते साज चढवीत होते. म्हणून त्यांच्या गाण्यातील गोडवा कुठेही कमी न होऊन ती श्रवणीय असत. ही अण्णांची खासियत होती. अण्णांनी संगीत दिलेल्या २६ चित्रपटांनी रजत जयंती साजरी केली होती व ४ चित्रपटांनी स्वर्ण जयंती साजरी केली होती. त्यावेळी हे भाग्य खेमचंद प्रकाश, के. दत्ता अनिल विस्वास, नौशाद, बर्मन, व मदनमोहन ह्यांच्या वाट्याला आलं नव्हतं. तरीही अण्णांना राष्ट्रीय पातळीवर कुठलेच पारितोषिक अथवा उच्चपद मिळाले नव्हते अथवा त्यांचा जाहीर सत्कारही केला गेला नव्हता. अण्णांच्या संगीताने गाजलेल्या अनारकलीतील सर्वच गाणी इतकी अप्रतिम असूनही त्या सिनेमाला व संगीतकार म्हणून अण्णांना पारितोषिक त्यावेळी मिळू नये याला काय म्हणावे..? केवळ संगीताच्या जोरावर एका मराठी माणसाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजविलेल्या व अण्णांनी निर्मित केलेल्या ‘घरकुल’ या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिक मिळूनही, मराठी माणसांनी त्यांचा जाहीर सत्कारही कधी केला नव्हता. हे अण्णांचं दुर्दैव व लांच्छनास्पद होय. तरीही त्याची खंत झाल्याचे त्यांनी कधीही दर्शविले नव्हते. हे विशेष होय. असो.

१) मद्रासला ‘आझाद’ सिनेमाच्या सेटवर दिलीप कुमारसह अण्णा, ओम प्रकाश, व राजेंद्र कृष्ण...२) अण्णा व त्यांचे सहाय्यक-वादक इनॉक ड्यानियल्स...३) जयकिशन, मास्टर भगवान, राज कपूर, अण्णा, व नौशाद...
१९८२ मध्ये मी अमेरिकेत आल्यावर न्यू यॉर्कला स्थायिक झालो होतो. पूर्वी ब्रुकलिन येथे रहाणारे व नंतर ह्यूस्टन, टेक्सासला स्थायिक झालेले दिवाकर-भाई कारखानीस जे अण्णांचे जिवलग मित्र होते, ते योगायोगाने मला माझ्या एका मित्राकडे भेटले. माझी ओळख झाल्यावर ते म्हणाले, मी तुमच्या वडिलांचा विद्यार्थी होतो. शिवाय, मला जुन्या हिंदी गाण्यांची आवड आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला होता. पहिल्या भेटीतच आमची अधिक जवळीक झाली होती. भाई कारखानीसांची पत्नी लिलीताई, ह्या मुंबईत असतांना शिवाजी पार्कला हरी निवास समोर केशव भुवन येथे अण्णांच्या पहिल्या पत्नी बेन ह्यांच्या शेजारी रहात होत्या. भाई कारखानीस जेव्हा न्यू यॉर्कला रहात होते तेव्हा त्यांनी मुंबईहून येणाऱ्या अनेक कलाकारांचे कार्यक्रम आयोजितच नव्हे तर, त्या सर्वांची ते त्यांच्या घरी राहण्याची सोयही करीत होते. भाई कारखानीस एअर इंडियात अधिकारी पदावर कामाला होते. अण्णांचे त्यांनी कांही खाजगी कार्यक्रम सादर केले होते. अण्णांचा मुक्काम भाईंच्या घरी असायचा. त्यातून भाई व अण्णा ह्यांना मद्यपान करणे आवडत असे. त्यामुळे सूर जुळायला वेळ लागत नसे. भाई कारखानीस सांगत, साई भक्त अण्णा कधीही स्वस्थ बसलेले माझ्या पहाण्यात आले नाहीत. नेहमी कांहीतरी गुणगुणत असत. अण्णांना एखादी चांगली चाल आठवली की त्याचे लगेच कागदावर ते नोटेशन करीत असत व पेटीवर वाजवीत. त्यामुळे सिनेमातील गाणी स्वरबद्ध करतांना अण्णांना कधीही वेळ लगत नसे. यावरून मला दिलीप
कुमार व मीना कुमारीचा १९५५ चा 'आझाद' चा किस्सा आठवला. प्रथम ह्या सिनेमाचे संगीत नौशाद देणार होते. परंतु, मद्रासचे प्रोड्युसर डायरेक्टर एस. एम. नायडू ह्यांना ‘आझाद' हा सिनेमा एका महिन्यात पूर्ण करून हवा होता. नौशादसाहेबांना एक महिना अपुरा होता म्हणून त्यांनी नकार दिला होता. तेव्हा अण्णांना विचारले. अण्णांनी होकार दिला व त्यांना अट अशी घातली की, महिन्याच्या आत मी गाणी करून देईन. परंतु, पैसे मात्र नौशाद घेतात त्याचा दुप्पट द्यावे लागतील. अण्णांच्या अटी मान्य झाल्या होत्या व त्यांनी आझादची सर्व गाणी महिन्यापूर्वीं स्वरबद्ध करून

१) आपल्या वादक साथीदारांसह गाण्याचा मनसोक्त आनंद लुटतांना अण्णा...२) तबला वादक अण्णा जोशी, सुनील गावस्कर, व वाणी जयराम...३) रेल्वे प्रवासात एका स्थानकावर आपल्या वादक कलाकारांसह अण्णा...
दिली होती. त्यानंतरच ते मद्रासहून मुंबईला परतले होते. असे चमत्कार अण्णांनी इतरही चित्रपटात करून दाखविले होते. थोडक्यात, वेळेअभावी कारणे सांगून कुणाचे आर्थिक नुकसान होईल असे अण्णांनी कधीही केले नव्हते. निर्मात्यांकडून अण्णा सिनेमा संगीतासाठी भरपूर पैसे घेत होते. तसेच, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहाय्यक व वाद्य कलाकारांनाही अण्णा भरपूर बिदागी देत असत. त्यावेळी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार त्यांच्या सिनेमात सी. रामचंद्रांचे संगीत हवे असे आग्रहाने सांगत असत. दिलीप कुमारही त्यामध्ये होते. आझाद मधील सर्व गाणी गाजली होती. १९५५च्या आझाद या सिनेमात 'मरना भी मोहब्बत में किसी काम न आया...' ही 'जाधव आणि पार्टी'नी गायलेली जी लोकप्रिय कव्वाली आहे ती अण्णांनी आझाद सिनेमात, जाधव पार्टीला बोलावून जशीच्या तशी चित्रित केली आहे. यावरून आठवण झाली, अण्णांच्या प्रोत्साहनाने पुण्यातल्या तमाशा बारीतून मुंबईत आलेले सव्वा सहा फुटी उंच ‘ढोलकी सम्राट' लाला गंगावणे यांनी अण्णांच्या 'अपलम चपलम...', 'देखोजी बहार आई...', व 'गलीमे आना जाना बंद...' या गाण्यात आपल्या ढोलकीच्या साथीने चार चाँद लावले होते. भाईंनी मला त्यांनी घेतलेल्या दुर्मिळ मुलाखती, कलाकारांची दुर्मिळ छायाचित्रे व वाचायला पुस्तकांसह असंख्य संदर्भही दिले होते. भाई हे स्वतः उत्तम लेखक व वक्ते होते. अमेरिकेत येण्यापूर्वी त्यांनी नैरोबी रेडिओवर कामही केले होते. ह्यूस्टन, टेक्सासला HMVचे चीफ रेकॉर्डिंग इंजिनियर माधवराव माडगावकर हे त्यांच्या मुलाकडे, अजयकडे, रहात होते. अजय हा माझा शाळकरी मित्र होता. भाई कारखानीसही तेथे रहात असल्याने तीन दिवस मी ह्यूस्टनला अजयकडे गेलो होतो. माधवरावांना माझ्या जुन्या गाण्यांच्या आवडीबद्दल माहीत होते. माधवरावांनी HMV मधील बऱ्याच आठवणी सांगून त्याचबरोबर दुर्मिळ छायाचित्रेही मला दिली होती. अण्णांबद्दल ते म्हणाले होते, ‘आमच्या स्टुडिओत अण्णा रेकॉर्डिंगला आले की प्रथम जी. एन. जोशी व माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेटून जात होते. त्यांचा सर्व मामला अत्यंत शिस्तीत असायचा. कुठेही वेळ काढणं त्यांना खपत नसे. रेकॉर्डिंग झालं की, निघून जात…’ माधवरावांनी एक गंमतीदार किस्सा संगितला होता. एकदा अण्णांच्या कोरस रेकॉर्डिंगला सुप्रसिद्ध संगीतकार के. दत्ता व अनिल बिस्वास अण्णांना न सांगता स्टुडिओत आले होते. अण्णांबद्दलची ख्याती त्यांनी ऐकली होती. त्यामुळे नव्याने संगीतकार झालेल्या अण्णांची गंमत म्हणून त्यांना परीक्षा घ्यायची होती. हे माधवरावांना व जी. एन. जोशींना माहित होते. रेकॉर्डिंग सुरु झालं व कोरसमधून अचानक बेसूरा आवाज निघाला. ते ऐकल्यावर अण्णांनी रेकॉर्डिंग ताबतोब थांबवल होतं. नंतर पुनः तोच प्रकार, पुनः थांबलं. त्यावेळी कोरस मधून के. दत्ता व अनिल बिस्वास बाहेर आले व त्यांनी अण्णांना मिठी मारली व म्हणाले, ‘You are genius.., मान गया अण्णा…’ थोडक्यात, अण्णांचा आत्मविश्वास दांडगा होता व,कुठेही तडजोड हा प्रकार नव्हता, Anna was perfectionist…

१) प्रथम ब्रुकलिन, न्यू यॉर्कला नंतर ह्यूस्टन टेक्सासला रहाणारे अण्णांचे जिवलग मित्र, दिवाकर-भाई व पत्नी लिली कारखानीस. घरी आले असतांना…२) कारखानिसांच्या घरी साजरा झालेला अण्णांचा वाढदिवस समारंभ व…३) नंतरचा गाण्याचा कार्यक्रम…ही सर्व छयाचित्रे कै. दिवाकर-भाई कारखानीस ह्यांच्या सौजन्याने.
खाली: १) व २) आनंदात असलेले अण्णा त्यांचा वाढदिवस साजरा करतांना…३) ब्रुकलिन येथे सी फूड-लॉबस्टरच्या दुकानासमोर अण्णा…४) ब्रुकलिन येथे खाडीजवळ अण्णा...

सुमारे १९७०च्या सुमारास अण्णा न्यू यॉर्कला भाई कारखानीसांकडे आल्यावर त्यांचे दोन कार्यक्रम झाले होते. एक होता न्यू यॉर्कच्या महाराष्ट्र मंडळात व दुसरा भाई कारखानीसांच्या घरी ब्रुकलिनला. १९७२ मध्ये न्यू यॉर्क महाराष्ट्र मंडळाने अण्णांचा कार्यक्रम International Church, Riverside, 120 Street, Manhattan Westला येथे केला होता. ज्यांचा हॉल मंडळाला विनामुल्य मिळाला होता. त्यावेळी अण्णा मंडळाच्या अध्यक्ष सविता व अरविंद गोखले ह्यांच्या घरी राहिले होते. कार्यक्रमानंतर अण्णांनी सविताला बरोबर भारतीय दुकानात जाऊन त्यांच्या पत्नीसाठी साड्यांची खरेदीही केली होती. ह्या दोन्ही कार्यक्रमात तबला वाजविणारे होते माझे स्नेही, अरुण तनखीवाले. त्यावेळी अण्णांनी तनखीवाल्यांना सांगितले होते, शास्त्रीय संगीतात गायक हा महत्वाचा असतो. तबला-डग्गा वाजविणारा नव्हे. मात्र, चित्रपट संगीतामध्ये तसं नाही. गायक व तबला किंवा त्याचा ठेका हे दोन्ही महत्वाचे असतात. ते समजून-सांभाळून तुम्ही वाजवा. तनखीवाल्यांनी एक गंमतीचा किस्सा सांगितला होता. अण्णा आले होते तेव्हा भयंकर थंडीचे दिवस होते. त्यामुळे मंडळात झालेल्या त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी डग्गा कडक झाला होता. तो सॉफ्ट व्हावा म्हणून त्यावर मी थोडं गरम पाणी ओतले होते. ते पाहून अण्णा गंमतीने त्यांना म्हणाले, पाणी कशाला ओताहात. ही व्हिस्की त्यावर ओता म्हणजे तो डग्गाही सुरात आवाज देईल. अण्णा व्हिस्की घेऊनच सुरात गात होते. त्यानंतर अण्णा जेव्हा पुनः अमेरिकेत सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश मंत्री ह्यांच्याबरोबर १९७५मध्ये आले तेव्हा, त्यांचे दोन कार्यक्रम फिलाडेल्फियात झाले होते. एक नुसत्या गप्पांचा होता व दुसरा सदाशिव व सुभगा पाठक ह्यांच्या घरी गाण्याचा कार्यक्रम झाला होता. तेथे भगवान जोशी हे तबल्यावर होते. त्या कार्यक्रमात, १९५८च्या 'अमरदीप' सिनेमातील 'देख हमें आवाज न देना...' हे रफी-आशाचे द्वंद्व गीत गाण्यासाठी प्रेक्षकात बसलेल्या महिलांना हे गाणे माझ्याबरोबर गायला कोण तयार आहे असे विचारले होते. त्यावेळी ‘आशा सालकडे’ गायला तयार झाल्या होत्या. न घाबरता त्यांनी अमरदीप सिनेमातील ते द्वंद्व गीत गायले होते व श्रोत्यांची मने जिकली होती. अर्थात जमेल तसं गा असं सांगून अण्णांनी त्यांना सावरून घेतले होते. थोडक्यात, अण्णा स्वभावाने किती साधे व निगर्वी होते हे यावरून दिसून येते. फिलाडेल्फियात रहाणारे माझे स्नेही विनय कसबेकर हे त्यावेळी त्यांची देखभाल घेत होता. अण्णांना त्यांनी न्यू यॉर्क व जवळची शहरे दाखविली होती. विनयने सांगितलेला एक किस्सा अविस्मरणीय आहे. त्यानंतर विनय जेव्हा मुंबईत गेला होता तेव्हा सुधीर फडके ह्यांना भेटला होता. त्यावेळी बाबुजी विनयला घेऊन प्रभादेवीच्या Film Sound Studioत घेऊन गेले होते. योगायोगाने तेथे अण्णांच्या एका गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. अण्णांनी बाबुजींबरोबर जेव्हा विनयला बघितले तेव्हा, 'विनय कसबेकर' असे ओरडून ते रेकॉर्डिंग त्वरित थांबवले व बाहेर येऊन विनयला आनंदाने मिठी मारली होती. विनय म्हणतो, 'जयंत, जे कांही थोडेफार मी अण्णांसाठी केले त्याची जाणीवपूर्वक कदर ह्या थोर माणसाने केली होती. हे मी विसरू शकत नाही. अशी प्रेमळ मैत्रीची खरी दखल घेणारे दाद देणारे फार कमी आहेत…’ सांगायला अभिमान वाटतो, १९६२ पासून फिलाडेल्फियात रहाणाऱ्या विनय कसबेकरने फीलाडेल्फियात Indo American Friendship Society स्थापन केली होती. त्या संस्थेखाली त्यानी किशोर कुमार, हेमंत कुमार, तलत महमुद व इतर अनेक नामवंत कलाकारांना बोलावून Drexel Universityच्या हॉलमध्ये कार्यक्रम सादर केले होते. तसेच, त्यावेळी जवळ राहणाऱ्या चार मराठी मंडळींना एकत्र बोलावून फिलाडेल्फियाचे पहिले महाराष्ट्र मंडळ विनयने स्थापन केले होते. त्याचे अध्यक्ष होते, प्रमोद चेंबूरकर व स्वतः विनय उपाध्यक्ष होता. योगयायोग म्हणजे, विनय व मी मुळचे शिवाजी पार्कला रहाणारे. शिवाय, आम्ही दोघंही जुन्या गाण्यांचे शौकीन…

भाई कारखानीस हे अण्णांचे जिवलग मित्र असल्याने हे त्यांनी लिहिलेले अप्रकाशित-प्रकाशित बरेच लिखाणही मला अण्णांच्या पुस्तकांसह वाचायला दिले होते. तसेच, अण्णांच्या ‘माझ्या जीवनाची सरगम’ ह्या वादग्रस्थ पुस्तकाचा जन्म कसा व कुठे झाला त्यांची कहाणी मला भाईंनी त्यावेळी सांगितली होती ती अशी…१९७३-७४ चा काळ होता. भाईंच्या घरी असतांना अण्णांचा वाढदिवस साजरा झाला होता. त्या रात्री कुठेतरी लांब फिरायला जाऊया असे अण्णांनी भाईंना विनंती केली. भाई त्यावेळी न्यू यॉर्कला रहात होते. Upstate New York मधील Catskill Mountain ला कांही मित्रांसह भाई अण्णांना घेऊन गेले होते. तेथे भरपूर पिणे, गप्पा मारणे, व मजा करणे हा उद्देश होता. अण्णांच्या संगीतामधील सुवर्ण काळाची आठवण भाईंनी काढली व ते अण्णांना म्हणाले, 'अण्णा, आता तुम्ही तुमचे आत्मचरित्र लिहायला घ्या...' भावना प्रधान झालेले अण्णा भाईंना म्हणाले, 'अरे, मला लिहिता येत नाही. मी लेखक नाही. आणि समाजा लिहिलेच तर सर्व मामला उघडपणे लिहीन. ही माझी अट राहील. नाहींतर, आता लपविण्यासारखे माझ्या जीवनात काय शिल्लक राहिले आहे..? तू लिहीणार असशील तर, मी उद्यापासून माझी संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात करीन...' त्यावर भाई म्हणाले, 'अण्णा, त्यासाठी तुम्हाला निदान दोन महिने माझ्या घरी राहावे लागेल. मुंबईत गेल्यावर तुम्ही एखादा लेखनिक गांठा व त्याचा श्रीगणेशा करावा. ते सहज शक्य आहे...' अण्णा म्हणाले, 'चांगली कल्पना आहे. पण त्याचे नांव काय द्यायचे..?' भाईंनी लगेच अण्णांना सांगतले, ‘अण्णा, तुमचा सरगम हा संगीताने सर्वात गाजलेला सिनेमा. त्यातील सरस्वतीबाई राणे व लताबाईंचे 'तू छेड सखी सरगम...' हे अप्रतिम गाणं. त्यामुळे 'माझ्या जीवनाची सरगम' हे नांव आत्मचरित्राला द्यावे...' हे ऐकतांच आनंदाने अण्णांसह सर्वांनी त्याला दाद दिली व रिकामे ग्लास मद्याने भरले होते. बाजुला Johnny Walkerच्या किती बाटल्या रिकाम्या झाल्या होत्या त्याचा अंदाज न करणे योग्य. अण्णांनी 'माझ्या जीवनाची सरगम' हे पुस्तक त्यांचा मुलगा यशवंत व मुलगी रेश्मा ह्यांना अर्पण केलं होतं. त्यांच्या लहानपणीचे फोटो देऊन त्यांनी लिहिले होते, ‘यशवंत व रेशमा माझ्या या दोन बाळांना. तसेच, माझ्या असंख्य चाहत्यांना आणि थोड्याशा निंदकांनाही.’ पहिली बायको बेन पासून अण्णांना मुलं झाली नव्हती. पुण्यात असलेल्या शांता ह्या दुसऱ्या बायकोपासून त्यांना यशवंत व रेश्मा ही दोन गुणी मुलं झाली होती. विषय निघाला म्हणून सांगतो. अण्णांनी त्यांच्या चरित्रात लिहिलंय,'माझ्या दोन्ही लग्नात माणसं फक्त दोन किंवा तीन होती. एकेकाचं नशीब असतं.' सरगमच्या अफाट यशानंतर १९५२ला जेव्हा अण्णांनी पुण्यात ‘सरगम’ बांधला तेव्हा, तेथे त्यांची आई व शांताबाई (पूर्वाश्रमीच्या शांता डेके) पण रहात होत्या. मुंबईतील काम संपल्यावर अण्णा शनिवार-रविवारला पुण्यात 'सरगम' या बंगलयात विश्रांतीला जात होते. यशवंत व रेश्मा ह्यांचा जन्म त्या घरातला. चित्रपटसृष्टीतील व्यवसायामुळे अण्णांचं संपूर्ण जीवनचमुळी संगीतमय-फिल्मी होतं. त्यामुळे त्यांच्याकडे चोवीस तास असंख्य मंडळींची वर्दळ असे. त्यातून त्यांना आपल्या घराकडे अथवा संसाराकडे वेळ द्यायला किती फुरसद मिळत असेल ह्याचा विचार न करणेच योग्य. परंतु, अण्णांची ही दोन्ही मुलं वडिलांच्या संगीत क्षेत्रात उतरली नाहीत. त्याचे प्रमुख कारण, मुळात अण्णांनाच मुलांनी संगीत क्षेत्रात पडू नये व त्या दोघांनी यशस्वी डॉक्टर व्हावे अशी त्यांची प्रबळ ईच्छा होती. संगीताची आवड असूनही ती दोन्ही मुलं यशस्वी डॉक्टर झालीत. हे निश्चितच कौतुकास्पद होय. पुण्याहून मेडिकल डॉक्टर झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेत आली. डॉ. यशवंत हा Psychiatrist असून ब्रुकलिनला रहातो व न्यूयॉर्कला, Manhattan येथे वैद्यकीय व्यवसाय करतो. आणि Californiaत Los Angeles मध्ये रहाणारी अण्णांची मुलगी डॉ. रेश्मा बिनीवाले, ही Cardiac Surgeon असून तेथे वैद्यकीय व्यवसाय करते. हे मला पूर्वीच माहित होते. कर्तृत्वान मुलांचे हे यश पाहून आज अण्णांना निश्चितच आनंद झाला असतां. साई-भक्त अण्णा हे धार्मिक होते. लहानपणी यशवंतची मुंज त्यांनी तिरुपतीला जाऊन केली होती. मी ह्या मुलांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मला यश आलं नाही. याचे मला दुःख नाही, किंवा माझी तक्रारही नाही. चुकून माझा हा लेख जर त्यांच्या वाचनात आला तर, त्यातून आम्ही विश्वव्याची कानसेन-रसिक मंडळी, स्वर-सम्राट अण्णांना कधीच विसरूं शकणार नाही हा एकमेव सुमधूर-सुरीला-श्रवणीय सूर त्यातून त्यांना ऐकायला येईल व डोळे पाणावतीलही. आणि यदाकदाचित त्यांनी मला संपर्क केला तर, ‘रसिकांतर्फे देशभर साजऱ्या होणाऱ्या आपल्या जन्मदात्या पित्याच्या जन्मशताब्दीनिमित्त सोहळ्यात (आपल्या कुटुंबांसह) सामील व्हा’ असा मी प्रेमाने सल्ला देईन. असे म्हणतात, अण्णांनी आपल्या मुलीचं नांव पाकिस्तानी गायिका रेश्मा हिच्या नांवावरून ठेवलं होतं. कारण, अण्णांची रेश्मा आवडती गायिका होती. आणि संगीतातील आपल्या अपूर्व यशामुळे कदाचित अण्णांना ‘यशवंत’ हे नांव तर सुचले नसेल..? म्हणतात की, मुंबईच्या घराला घरपण नव्हतं ते अण्णांच्या पुण्यातील घराला होतं. हे अदृश्य धागे कुणाला बरं कळतील..? असो.

१) माझा हा प्रदीर्घ लिहून झाल्यावर पुण्यात 'सरगम' या बंगल्यात रहाणाऱ्या शांताबाई ह्यांना तो लेख स्वाधीन करतांना पुण्यात रहाणारे माझे स्नेही, अरविंद आपटे व अण्णांचे निकटचे स्नेही पद्माकर (PY) जोशी...हे छायाचित्र अरविंद आपटे ह्यांच्या सौजन्याने. २) पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘ गीत गोपाळ'च्या कार्यक्रमात मास्तर कृष्णराव ह्यांचा सत्कार करतांना अण्णा व मागे त्यांचे सचिव वसंत पोतदार...३) अण्णांचे १९६१ पासूनचे वैयक्तिक सचिव-चिटणीस, वसंत पोतदार व अण्णा…
ज्या रस्त्यावर अण्णांचा 'सरगम' बंगला होता, त्या रस्त्याला अण्णांचे नांव पूर्वी दिले होते. त्यानंतर २००३साली पुणे महानगर पालिकेतर्फे अण्णांच्या मृतीदिनी, त्या ‘सरगम’ बंगल्यासमोर अण्णांच्या नीलफलकाचे नामकरण थाटात साजरे केले होते. त्या शुभदिनी अण्णांच्या आठवणींसह तो बंगला अण्णांच्या फोटोंनी सजला होता. 'सरगम' बंगल्यावर त्यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार व रसिक चाहते उपस्थित होते. अण्णांच्या आठवणींनी तेथील वातावरण संस्मरणीय झाले होते. अखेरच्या क्षणी अण्णांनी स्वरबद्ध केलेले व स्वतः गायलेलं त्यांच्या आवडीचे, वसंत निनावे यांचे भावगीत लावले होते, सर्वजण अश्रु आवरत होते, इतरांसह बेन ठाकूर, शांताबाई मोहून गेल्या होत्या, त्या गीताचे शब्द प्रत्ययकारी होते, सर्वांच्या डोळ्यासमोर जणु अण्णा दिसत होते, व गात होते...
'जमले तितुके केले तरीही करणे उरले काही,
नकोस येऊ मरणा अजुनी, जगणे सरले नाही.
ऐकुनिया ही आजवरी जी गायिलीत मी गाणी
हसेल जर का कधी कुणाच्या पापणीतले पाणी
सार्थकता स्वरयात्रेची या याहुन दुसरी नाही
कुणि न गायिले असले गाइन जेव्हा केव्हा गीत
अखेरचे हे मूक होउनी जावे तेंव्हा ओठ
अमर गीत ते युगांतरीचे स्मारक माझे होई …
परंतु, आता मात्र त्या 'सरगमी' बंगल्यात अण्णांनी स्वरबद्ध केलेली गाणी तरी ऐकली जात असतील की नाही, ते कदाचित ईश्वरच जाणे…असो.

१) 'ऐ मेरे वतन के लोगो...' कवी प्रदीप व अण्णा...२) 'ईना मीना डिका...' आशा भोसले व अण्णा...३) 'घरकुल' च्या वेळी: प्रभाकर जोग, अरुण सरनाईक, अण्णा, रंजिता, शं. ना. नवरे, व राजा ठाकूर...
माझी जेव्हा अण्णांशी ओळख झाली त्यानंतर अनेकांनी मला विचारले होते की, 'अरे जयु, अण्णा तुझ्या घरी येऊनही तू रसिकांना पडणारे 'लता शिवाय अण्णा' किंवा 'लता आधीचे अण्णा' हे 'प्रश्न' कसे विचारले नाहीत...?' खरं सांगू, त्याच्याशी माझं कर्तव्य नव्हतं किंवा मी त्या पिंडातील नाही. शिवाय, त्या थोर कलावंताच्या व माझ्या वयात ३० वर्ष्यांचे अंतर होते. शिवाय 'सभ्यता', 'आदर', व 'संस्कार' नांवाची चीज आमच्या घरात पूर्व पारंपरिकपाणे चालत आली होती-आहे. असे मी त्या चोखंदळ व आंबट शौकिनांना सांगत असे. आणि त्यांच्या वैयक्तिक व खाजगी बाबतीत मला रसही नव्हता. मला माहित होतं की हिंदी गाण्यांच्या त्या सुवर्णकाळात, सी. रामचंद्र हे इतर संगीतकारांपेक्षा सर्वात जास्त पैसे-मोबदला घेत असत. आणि आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांना अण्णा जास्त पैसे देत होते. एका मराठी संगीतकारानी हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली हे निश्चितच भूषणावह होते. अण्णांचं ‘उत्कृष्ट संगीत’ व लताचा ‘गोड गळा’ ह्याच्याशी आपलं कर्तव्य असायला पाहिजे. आणि हा ज्याच्या त्याच्या कातडीचा गुण, नाही कां..? असो. अण्णा अत्यंत हळव्या स्वभावाचे व भावीक होते त्याचा हा किस्सा. एकदा अण्णा ट्रेनने मालाड येथे फिल्मिस्तानच्या स्टुडिओत १९४७ सालच्या 'साजन' या चित्रपटाच्या रेकॉर्डींसाठी जात असतांना त्यांचे पैशाचे पाकीट व सोबतच्या पिशवीची चोरी झाली होती. स्टुडिओत गेल्यावर गायिका ललिताबाई देऊळकर ह्यांनी डोळे ओलावलेल्या अण्णांना चिंतेत असलेले पहिले व त्यांना विचारले सर्व ठीक आहे नां. तेव्हा अण्णांनी झालेल्या चोरीची हकीकत त्यांना सांगितली. आणि म्हणाले, 'माझे पैसे गेल्याचे दुःख नाही. परंतु, त्या पिशवीतील माझ्या अनेक गाण्यांचे नोटेशन्स चोरीला गेले ह्याचे मला अतिशय दुःख झाले आहे. वेळ न घेता मी माझी गाणी पटकन कशी रेकॉर्डिंग करतो हे त्या नोटेशन्सवर अवलंबून असायचे. तेच सर्व लंपास झाले होते…’ त्यानंतर साजनमधील ‘हमको तुम्हाराही आसरा...' हे ललिताबाई व महमद रफीचे सुरेल द्वंद्व गीत तेव्हा रेकॉर्डिंग झाले होते. अशोक कुमार व रेहानच्या यांच्या ह्या 'साजन' चित्रपटात अण्णांनी उत्तम संगीत दिले होते. त्यातील ललिताबाई देऊळकर व रफीचे 'हमको तुम्हाराही आसरा...', 'मै हूं जयपूरकी बंजारान...', ललिताबाई, गीता दत्त, व रफीचे 'संभल संभल के जैईयो हो बंजारे...' ही धमाल परंतु, अत्यंत श्रवणीय गाणी अविस्मरणीय होती. त्यावेळी अशोक कुमार स्वतःची गाणी स्वतः गात असे. हे अण्णांना पसंत नव्हते. अशोक कुमार हे फिल्मिस्तानचे मालक व साजनमधील अभिनेते. त्यांना कसे डावलावे हा प्रश्न अण्णांना पडला होता. अशोक कुमार जेव्हा-जेव्हा कामात बिझी असायचे त्याचवेळी खुबीने अण्णा त्यांना गाण्याच्या तालमीसाठी बोलावीत असत. असे अनेकदा झाल्यावर शेवटी अशोक कुमार अण्णांना म्हणाले, 'अण्णा, तुम्ही दुसऱ्या गायकाकडून माझी गाणी गाऊन घ्या...' आणि नेमका हेच अण्णांना हवे होते. त्यांनी लगेच महम्मद रफीकडून साजन मधील गाणी गाऊन घेतली व ती अतिशय गाजली. पुढे अशोक कुमारला कळले की, त्यांना त्यांच्या सिनेमात गायची जरुरी नाही.

खाली: १) अण्णांचे वादग्रस्त आत्मचरित्र-पुस्तक: 'माझ्या जीवनाची सरगम'...आतील अर्पण केलेले पान व त्यावरील मजकूर: 'यशवंत व रेश्मा माझ्या या दोन बाळांना तसेच असंख्य चाहत्यांना व थोड्याशा निंदकांनाही'...कै. दिवाकर-भाई कारखानीस ह्यांच्या सौजन्याने.

अण्णांनी त्यांच्या आत्मचरित्रात अखेरच्या प्रकरणात लिहिलं आहे की, असेच एकदा जानेवारीत रिपब्लिक डेचा नॅशनल प्रोग्रॅम बघायला दिल्लीला गेलो होतो. पंडित नेहरूंसह हिंदुस्थानातले सर्व नेते त्याला हजर होते. तेथे इतके अप्रतिम कार्यक्रम होते की विचारू नका. साहजिकच एक आर्टिस्ट म्हणून मनात विचार आला, ‘इथे कधीतरी माझा कार्यक्रम होईल कां..? कधीच होणार नाही. देवाने कधी तरी मला चान्स द्यावा इथे कार्यक्रम करण्याचा आमच्या लाडक्या नेत्यांच्या पुढे, असं वाटलं.' भारत-चीन युद्धानिमित्ताने त्यानंतर तेथे झालेल्या 'समरसंगीत' कार्यक्रमात 'वारे चाऊ एन लाई तुझको शरम न आयी. भूल गया क्या वादा अपना. हिंदी चिनी भाई भाई.' त्या कार्यक्रमाला हे एकमेव योग्य असं गाणं मी म्हटलं. आणि ते सर्व श्रोत्यांना अतिशय आवडलं होतं. देशासाठी-जवानांसाठी असलेल्या त्या कार्यक्रमात इतर नामवंत संगीतकारांनी त्यांची फिल्मी-प्रेम गाणी गाऊन घेतली होती. अण्णा हे एकमेव होते की, त्यांनी त्याचा विचार करून त्यावेळेला योग्य व साजेसं ते समरगीत गायलं होतं. आणि वन्समोर घोषणा करून सर्व प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं. कालांतराने अण्णांच्या यशस्वी 'सरगमी' जीवनात अण्णांमुळे जे यशोकिर्तीला आले होते, त्याच 'हितशत्रू' मुळे व बरेच दिवस काम नसल्याने अण्णांची मनःस्थिती बरी नव्हती. आणि मग अण्णांच्या जीवनात न भूतो न भविष्यती असा पुनः उषःकाल उदयाला आला, पुनः स्वर-पहाट उजाडली. अण्णांना दिल्लीचं आमंत्रण आलं. त्यांच्या लाडक्या नेत्यासमोर, पं. नेहरूंसमोर, गाणं सादर करण्याचं…अण्णांनी कवी प्रदीपकडून गीत लिहून घेतलं. आश्चर्य म्हणजे, खुद्द कवी प्रदीप त्या दिवशी दिल्लीला हजर नव्हते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ते गेले होते. शिवाय, ते गाणं म्हणे स्वतः कवी प्रदीपला गायचं होतं... असो. कवी प्रदीपकडून ते गीत मिळवायला अण्णांना खु त्रास पडला होता. त्यासाठी अण्णांना कवी प्रदीप ह्यांच्या घरी अनेक खेपा माराव्या लागल्या होत्या. शेवटी महत्वाकांक्षी, जिद्द, व प्रचंड आत्मविश्वास असलेल्या अण्णांनी कवी प्रदीप कडून ते गीत लिहून घेतले होते. तेव्हा, कुठे कवी प्रदीपने अण्णांना त्याची १०० कडवी लिहून दिली होती. ते गीत होतं, ‘ऐ मरे वतके लोगो...' तो आनंदाचा दिवस होता, २६ जानेवारी १९६३ला दिल्लीला रामलीला मैदानावर पंडित नेहरूंसमोर अण्णांनी स्वरबद्ध केलेलं ‘ऐ मेरे वतनकॆ लोगो…’ हे कवी प्रदीपचे अजरामर समरगीत आधी आशा भोसले व नंतर आयत्यावेळी लता मंगेशकरांच्या सुरील्या कंठातून गाण्याचा. आणि ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ह्या गीताला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. तो क्षण, ते गाणं, व तो प्रसंग ऐतिहासिक होता. अत्यंत हृदयस्पर्शी व प्रेरणादायी असे हे गीत आजही पूर्वीइतकेच लोकप्रिय आणि आवाहक आहे..! मी कुठचं गाणं सादर करणार हे कुणालाच सांगितलं नव्हतं. ते सर्व मुद्दामून गुपित ठेवलं होतं. कार्यक्रम सादर करणाऱ्यालाही ते माहित नव्हतं. कार्यक्रम झाल्या नंतरचा तो संस्मरणीय प्रसंग भावनावश झालेल्या अण्णांनी पुस्तकातील शेवटच्या पानावर असा लिहिला आहे, ‘कार्यक्रमानंतर पंडितजींच्या घरी पार्टी होती. मी तिथे उशिरा पोहोचलो. तर स्वागतासाठी जिन्यावर पंडितजी व इंदिराजी उभे होते. दोघांनी माझे हात धरले व म्हणाले, 'आज आपने हमको रुलाया.' मी कांहीच बोलू शकलो नाही. रडत दूर जाऊन बसलो. फोटो काढणं चालू होतं. मलाही बोलावलं. मी पंडितजींना विनंती केली की, मला फक्त तुमच्याबरोबर एक फोटो पाहिजे. त्यांनी लगेच 'हो' म्हटलं व एक फोटो काढाला. (तो फोटो अण्णांनी त्यांच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर छापला आहे.) सुंदर गाणं लिहिणारा प्रदीप. तोच दिल्लीला आला नाही. दुसरी आशा-बिचारी, हा एकच शब्द. जानेवारी १, १९१८ ते जुलै २७, १९६३ पर्यंतची वाटचाल. काय झालं..? काय झालं नाही..? आयुष्यात सगळेच अपघात. बरे-वाईट. लढाई-घरात, घराबाहेर, धंद्यात. इतकचं नाही, माझ्या मनातसुद्धा. पण काय बरोबर, काय नाही, काय वाईट, कांही माहित नाही. कांहीच समजलं नाही. सुचत नव्हतं कांही. म्हणणं व्हिस्की पीत होतो. सिगरेट पीत होतो. आणि कुठेतरी बघत होतो…लहानपणापासूनचे सगळं चित्र डोळ्यापुढे येत होतं. लहान असतांना सिनेमा बघण्याकरता पानवाल्याची चोरी केली होती. मास्तर शंकरराव सप्रे ह्यांचा मार खाल्ला होता. शंकरराव सप्रे ह्यांनी मला संगीताचा 'श्रीगणेशा' शिकविला, त्यांचे उपकार मी कधीच विसणार नाही. पण सिनेसंगीताचे माझे आणखीही गुरु आहेत. अनिल विश्वास, रामचंद्र बोराल, पंकज मलिक, गोविंदराव टेंबे, मास्तर कृष्णराव, गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश, डी. पी. कोरगावक, पं. अमरनाथ, ह्या सगळ्यांचे सूर ऐकून माळ खूप सुचलं. माझं सिनेसंगीत क्षेत्रातील यश हे ह्या सर्वांच्यामुळे आहे...अशा कितीतरी आठवणी. कितीतरी मुलींशी प्रेम केलं. बऱ्याच वेळी फसलो व बाईवरचा विश्वास उडाला. तेव्हा एका मुलीनेच सावध केलं. वा-वा-! किती टेक्निकलर जीवन..! देवाने सगळं दिलं. पण...
स्वर्गाचे सगळेच गूढ वसले काळाचिया लेखनी,
बोले विश्वसुनी कधी तरि मला सांगेल का ते कुणी II
काळाची जर ही निगूढ लिखिते आम्हा कळाली तरी,
देवा रे-वसुधा क्षणात बनवू प्रत्यक्ष स्वर्गापरी II
‘कटते है दुखमें ये दिन’ (परछायी), ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में’ (शिन शिनाकी बुबला बू), ‘कोई किसीक दिवाना ना बने’ (सरगम), ‘ऐसी मुहब्बतसे हम बाज आये’ (निराला), ‘ऐ प्यार तेरी दुनियासे हम’ (झांझर), ‘अब वो रातें कहां’ (यासिन), ‘ऐ चांद प्यार मेरा तुझसे ये कह रहा है’ (खजाना), ‘काली काली रतीयां’ (घुंगरू), ‘दिल से भुला तुम हमें’ (पतंगा)…अशी किती तरी एकामागून एक काळजाला धक्का देणारी अविस्मरणीय, श्रवणीय, व हृदयस्पर्शी गाणी आठवली की मनात येतं, ही गाणी अण्णांनी त्यांच्या जीवनावर आधारित स्वरबद्ध केली असावीत. आणि मग, कभी न खत्म होनेवाली ये दास्तां, ये जिंदगी, ये कहानी असलेलं, ‘ये जिंदगी उसीकी है '(अनारकली), ह्या गाण्याचे बोल आठवतात… गाण्याच्या अखेरीस सलीमची वाट पाहून अखेरचा श्वास घेतांना कासावीस झालेली ‘अनारकली’ म्हणते,…’ऐ जिंदगी की शाम आ, तुझे गले लगा ऊ मै, तुझी मे डूब जाऊ मैं, बस एक नजर मेरे सनम, अलविदा, अलविदा, अलविदा…’ खरंतर शेवट करणं कठीण पण अलविदा आपल्याला खूप काही देऊन गेलं आहे. एक खरीखुरी भावना, व्याकुळता, आणि उदात्तता याचा हा अपूर्व संगम दुर्मिळ नाही का..?
मागे वळून पाहिलं तर, अण्णांनी त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीला 'अण्णासाहेब' म्हणून 'बहादूर प्रताप', 'मतवाले', व 'मददगार' ह्या चित्रपटांना संगीत दिलं. 'राम चितळकर' म्हणून 'सुखी जीवन', 'बदला', 'मिस्टर झटपट','बहादूर' व 'दोस्ती' ह्या चित्रपटांना संगीत दिलं. आणि ‘श्यामू’ म्हणून 'ये है दुनिया' ह्या चित्रपटांना संगीत दिलं होतं. शिवाय, मराठी चित्रपटातून गायक व अभिनेता म्हणून 'आर. एन्. चितळकर’ नांवानी कामे केली होती. त्याचपतामणे, ‘मास्टर राम चितळकर' म्हणून १९३८-३९ साली कांही भक्ती गीतेही गायली होती. मात्र भारतीय चित्रपटसृष्टीत संगीतकार ‘सी. रामचंद्र' म्हणूनच ते अमर राहिले. अशा बहुरंगी नावांनी संगीतदिग्दर्शन, पार्श्वगायन, व भूमिका करणाऱ्या मराठी माणसाने आम्हा रसिकांना आजन्म तृप्त केलं, भावूक-सहृदय बनवलं, थोडं वेडंही केलं, व जगायला बळ दिलं. तसेच, कांही काळ कां असेना अण्णांशी झालेला माझा परिचय मी कधीही विसरूं शकणार नाही. ज्याप्रमाणे एक काळ मराठी रंगभूमीवर ज्या ‘नट सम्राटाने’ राज्य केलं केलं त्या बाल गंधर्वांच्या ‘मूर्तिमंत भिती उभी…' ह्या नाट्य-गीतामुळे ‘अनारकली’ मधील 'ये जिंदगी उसकी हैं...' हे आजही सर्वाधिक लोकप्रिय असलेलं अजरामर गाणं सुचलं, सर्वांची हृदयं जिंकली, आणि ज्यांनी आपल्या संगीतामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्ण काळात ‘साम्राज्य केलं’ त्या ‘स्वर-सम्राटाला’, ‘सी. रामचंद्रांना’ माझे शतशः प्रणाम व मानाचा मुजरा..!
जयंत विठ्ठल कुळकर्णी
न्यू यॉर्क, अमेरिका.
Tel: 718-565-5720

टीप: आनंदाची बातमी म्हणजे, ख्रिस्तमसच्या दिवशी डिसेंबर २५ला दुपारी ४ ते ५ वाजतां अमेरिकेतील अटलांटा, जॉर्जिया मधील WRFG 89.3FM Radio Stationवर डॉ. आशा भुमकार ह्यांनी पुढील महिन्यात साजरा होणाऱ्या अण्णांच्या जन्म शताब्दी निमित्ताने माझा माहितीपूर्ण Live Interview घेतला होता. त्या कार्यक्रमात अण्णांनी स्वरबद्ध केलेली अनके लोकप्रिय गाणी आशाताईंनी लावली होती. कार्यक्रम अतिशय चांगला झाला आणि त्याला भारतीय व अमेरिकन श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. एक तासाचा हा आदरांजलीचा कार्यक्रम इंग्रजीत सादर केला होता. Proud to mention, they are broadcasting more programs on the same subject during Anna’s centennial year…
तसेच, हा लेख लिहिण्यासाठी मला अण्णांचे अगदी निकटचे खास मित्र आदरणीय कै. दिवाकर-भाई कारखानीस ह्यांची खुप मदत झाली. माझ्या संग्राहक वृत्तीमुळे पूर्वी भाईंनी मला अण्णांच्या अनेक आठवणी सांगितल्या होत्या. अण्णांची बरीचशी दुर्मिळ छयाचित्रे, मुलाखती, कात्रणे, व संदर्भ मला अण्णांच्या पुस्तकासह दिली होती. भाईंप्रमाणे आदरणीय कै. माधवराव माडगावकर, माझे स्नेही छायाचित्रकार कै. मोहन वाघ, व कै. गौतम राजाध्यक्ष ह्यांची मदत, प्रेम, ऋण, आशिर्वाद, व माझ्यावरील विश्वास विसरणे शक्य होणार नाही. त्यांनीही दिलेली कांही दुर्मिळ छायाचित्रे ह्यात समाविष्ट केलेली आहेत. तसेच, बरीचशी दुर्मिळ छायाचित्रे माझ्या संग्रहातील आहेत. आणि ज्यांच्या शिवाय चित्रपट सृष्टीतील पान हलत नाही त्या पुण्यातील माझ्या स्नेही सुलभा तेरणीकर ह्यांनी वेळोवेळो केलेली मदत अधिक मोलाची होती. तसेच, अण्णांचे खाजगी बैठकीतले खास मित्र, पद्माकर (PY) जोशी यांचाही मी मनापासून आभारी आहे. या लेखासाठी जोशीसाहेबांनी त्यांच्या संग्रहातील मला अनेक दुर्मिळ छायाचित्रे दिली व संदर्भासहित अण्णांबद्दलची बरीच माहितीही पुरविली. त्याचबरोबर, मुंबईतील माझे संग्राहक स्नेही डॉ. प्रकाश जोशी व अरुण पुराणिक ह्यांनी केलेली मदत तेव्हडीच मोलाची आहे. तसेच, पुण्यातील माझे स्नेही अरविंद आपटे व माझ्या अनेक हितचिंतक मित्रांनी (मी दिलेल्या त्रासाची तक्रार न करतां) वेळोवेळी केलेली मदत मी विसरू शकत नाही. या सर्वांच्या सहकार्यामुळे या लेखाला ‘साज’ चढून हा लेख ‘लयबद्ध, सुरीला, सप्तसुरी, सरगमी, स्मरणरंजनात्मक, व रोचक’ झाला आहे असं मला प्रामाणिक वाटतं. या सर्व मंडळींचा मी मनापासून आभारी आहे. नजर चुकिने कांही कमी-जास्त झालं असेल तर क्षमस्व. तसेच, हा ऐतिहासिक लेख सर्व रसिक वाचकांच्या पसंतिस उतरेल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.
'दादासाहेब फाळके पारितोषिक' समारंभ

सी. रामचंद्र व सुप्रसिद्ध अभिनेत्री लीला चिटणीस…
प्रिय हितचिंतक,
आपणास खालील नवं वर्ष्याच्या शुभ वार्ता कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे.
या वर्षी जानेवारी १३, २०१७ पासून ते जानेवारी १२, २०१८ पर्यंत साजऱ्या होणाऱ्या संगीतकार सी. रामचंद्र ह्यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्ताने मुंबईतील तीन नामवंत संथांतर्फे ('स्वरयोग', 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवेअरनेस मिशन' व 'द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडियन आर्ट फौंडेशन') स्वरसम्राट सी. रामचंद्र व सुप्रसिद्ध अभिनेत्री लीला चिटणीस ह्या मराठी कलाकारांना त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या क्षेत्रात भूषणास्पद आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मरणोत्तर माननीय 'दादासाहेब फाळके पारितोषिक' देण्यात येणार आहे.
हा अभिनंदनीय समारंभ मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर, गिरगांव, येथे रविवार, मार्च ५, २०१७ला संध्याकाळी ठीक ८ वाजता साजरा होणार आहे. कार्यक्रमाचे निवेदक आहेत सुप्रसिद्ध श्री. मोहन कान्हेरे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला (जयंत व वीणा कुळकर्णी) खास निमंत्रित केले आहे. तसेच, सी. रामचंद्र व लीला चिटणीस ह्यांना दिले जाणारे सन्मानीय 'दादासाहेब फाळके पारितोषिक' आमच्या हस्ते स्विकारले जावे अशी आम्हाला विनंती केली आहे. हा आमचा बहुमान आहे.
त्याचप्रमाणे रविवार, फेब्रुवारी २६, २०१७ला, मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर मध्ये सी. रामचंद्र ह्यांच्या गाण्यांची स्पर्धा आयोजित केली असून त्यातील ५० युवक गायकांमधून दोन उत्तम गायक निवडले जातील आणि ते गायक रविवार, मार्च ५, २०१७ला संघात होणाऱ्या भव्य समारंभात सी. रामचंद्र ह्यांची गाणी सादर करतील. या कार्यक्रमाचे संगीत संयोजक सुप्रसिद्ध संगीतकार श्री. सुरज साठे असतील.
'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवेअरनेस मिशन'चे संस्थापक श्री. चंद्रशेखर पुसाळकर, 'स्वरयोग'चे संस्थापक श्री. प्रदीप देसाई, व ‘द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडियन आर्ट फौंडेशन’चे संस्थापक श्री. विनय वाघ ह्यांनी ही शुभ वार्ता नुकतीच आम्हाला कळविली आहे. या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्त जाहीरपणे लवकरच मुंबईतील सर्व वृत्तपत्रातून प्रसिद्ध होईल.
कृपया अधिक माहितीसाठी श्री. प्रदीप देसाई Cell: 87677 41886 & 98670 65738 आणि श्री. विनय वाघ Res: 2369 5005 & Cell: 98204 71122 ह्यांना संपर्क करावा ही नम्र विनंती. श्री विनय वाघ ह्यांची Website: http://www.waghsculptors.com/
आपण सर्वांनी माझा 'संगीतकार सी. रामचंद्र ह्यांच्या ‘सरगमी जीवनाचे’ जन्म शताब्दी वर्ष' हा प्रदीर्घ लेख वाचाला आहेच. त्याचप्रमाणे, आमच्या स्नेही, लीला चिटणीस ह्यांना 'फाळके' पारितोषिक मिळावे यासाठी भारत सरकार, भारतीय चित्रपट सृष्टी, व अनेक संस्थांना
आम्ही प्रत्यक्ष आणि लेखी कळविले होते. त्यासाठी केलेले अथक श्रम-प्रयत्न आपण जाणतां. असो. सी. रामचंद्र व लीला चिटणीस ह्यांना योग्य असा 'फाळके पुरस्कार' देण्याचा मानस श्री. चंद्रशेखर पुसाळकर, श्री. प्रदीप देसाई व श्री. विनय वाघ ह्यांनी दाखविला त्याबद्दल आम्ही यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद.