Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

पत्नी म्हणाली " आमच्या गावात नदी होती. माझे बाबा किनार्यावर कलिंगड लावायचे. कलिंगडाला आम्ही दोरे बांधायचो. ते दोरे तोडून कलिंगड मोठं व्हायचं. मला आज खूप आठवण येतेय. असं वाटतं कलिंगड खावं ! "

गरोदर महिलेला डोहाळे लागतात हे सोनावणे ह्यांना माहित होतं. सोनावणेंनी लगेच सायकल काढली.
बाजारात पोहोचले.
फळ वाल्याला विचारलं, " कलिंगड आहे का ?"

फळवाल्याने सोनावणेंना वरून खाली पाहिलं ,

" साहेब, डिसेंबरमध्ये कलिंगड मागणारे तुम्ही एकटेच. कलिंगड मार्च नंतर मिळतं, आता नाही "

मग सोनावणेंनी फळवाल्याला सांगितलं, " मिसेस प्रेग्नंट आहे. तिला कलिंगड खायची इच्छा झाली आहे."

मग तो फळवालाही खुलला, म्हणाला,
" असं सांगाना...एक काम करा. तुम्ही मुंब्रा ते पनवेल रस्त्यावर शिळ फाटा आहे. तिथे जा. तिथे बारा महिने कलिंगड विकतात. "
बदलापूर ते शिळ फाटा अंतर 2७ किलोमिटर होतं. सायकलने जावून परत यायला तीन तास लागणार होते. त्यावेळी आजसारख्या फार रिक्षा नव्हत्या. मग सोनावणेंनी शिळ फाट्याच्या रस्त्यावर सायकल पळवायला सुरुवात केली. कच्चा रस्ता असल्यामुळे पायडल जोरात मारत ते वेगात निघाले.

तब्बल दीड तास सायकल हाणल्यानंतर ते घामाघूम होवून शिळ फाट्यावर पोहोचले. तिथे एका तंबूमध्ये कलिंगडाचा ढीग लावला होता. सोनावणेंनी आधी अनेक वेळा कलिंगड पाहिलं होतं. पण आज त्यांनी डोळा भरून कलिंगड पाहिलं. लगेच एक कलिंगड विकत घेतलं आणि ते प्लास्टिक पिशवीत घालून पिशवी सायकलच्या हँडलला लावली.
शिळ फाट्याकडून ते बदलापूरकडे निघाले. तोवर रात्रीचे ८ वाजले होते. रस्ता खराब होता. तरीही सोनावणे जोर लावून सायकल पळवत होते. अचानक अंधारात " धाप" आवाज झाला.

सोनावणेंनी सायकल थांबवली. पाहतात तर काय- कलिंगडाची पिशवी फाटून ते रस्त्यावर पडलं होतं !!
त्याचे दोन तुकडे झाले होते. सगळी धूळ लागली होती. सोनवणेंना खूप वाईट वाटलं.

बायकोला कलिंगड द्यायचच असं त्यांनी ठरवलं होतं. कारण त्यातून प्रेम दिसून येणार होतं. पण कलिंगड तर फुटलं, मातीत खराब झालं. क्षणभर सोनावणे ह्यांनी मनात काहीतरी विचार केला. अंधारात घड्याळ पाहण्याचा प्रयत्न केला. पण काहीच दिसत नव्हतं.

पुढच्या क्षणाला त्यांनी सायकल वळवली. पुन्हा शिळ फाट्याकडे पळवायला सुरुवात केली. शिळ फाट्यापर्यंत पोहोचायला त्यांना एक तास लागला. तोवर कलिंगड विकणारा तंबू बंद करून निघून गेला होता. पण बाजूचा पानवाला टपरीत बसला होता. त्याची गिऱ्हाइके येत होती. सोनावणे ह्यांनी पानवाल्याला सगळा किस्सा सांगितला किस्सा सांगितला -" प्रेग्नंट बायकोसाठी कलिंगड नेलं. पण ते फुटलं. "
कधी न हसणाऱ्या त्या पानवाल्याच्याही तोंडावर खळी उमटली.

तो टपरीमधून बाहेर आला. कलिंगडाच्या तंबूचा एक पडदा उचलून आत गेला आणि दोन मोठे कलिंगड त्याने आणले. एका गोणीत ते भरले आणि ती गोणी सोनावणेंच्या सायकलला घट्ट बांधून दिली.
मग पानवाला म्हणाला, " दिदी को बोलना. शील फाटेपर तुम्हारा एक भाई पान बेचता है. उसने यह टरबुजा भेजा है. "

सोनावणे ते दोन्ही कलिंगड घेवून पुन्हा बदलापूरकडे निघाले. घरी पोहोचेपर्यंत १२ वाजले. पत्नी काळजी करत बसली होती. पण सोनावणे ह्यांनी इतक्या लांबून कलिंगड आणले हे पाहून तिला खूप आनंद झाला.
कोणीतरी पानवाला मला दीदी म्हणाला आणि त्याने कलिंगड पडू नयेत म्हणून गच्च बांधले हे ऐकून तिचे डोळे भरून आले.

सोनावणेंना मुलगा झाला.
२५ वर्षांनतर त्याची पत्नी प्रेग्नंट राहिली. मग सोनावणेंनी मुलाला आणि सुनेला कलिंगडाचा किस्सा ऐकवला.
मग त्या मुलाने आपल्या प्रेग्नंट पत्नीला सांगितलं ,
" मी तुझ्यासाठी कलिंगड आणतो. "
तिलाही आनंद झाला.

पण बदलापूर मध्ये कलिंगड मिळत असूनही तो मुलगा शिळ फाट्यावर गेला. तिथून कलिंगड आणलं.
बदल इतकाच झाला होता की तो मुलगा चांगल्या रस्त्यावरून बाईक घेवून शिळ फाट्यावर अर्ध्या तासात पोहोचला. त्याला कोणतीही अडचण आली नाही.
पण वडिलांनी सांगितलेला पानवाला तिथे नव्हता.
पाहू न शकलेल्या मामाचे त्याने मनात आभार मानले.
...आणि दोन कलिंगड घेवून तो बदलापूरच्या दिशेने निघाला.

कलिंगड एक मधुर फळ आहे. पण सोनावणे कुटुंबाला त्या फळाने मधुर आठवणही मिळवून दिली आहे.
-निरेन आपटे.