Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

मुंबईत मुतायला जागा मिळत नाही Bangkok करायला कुठे जागा मिळणार? तोही बेत फसला. अनेक शहराचं बरंच काय काय करायचा प्रयत्न झाला. फक्त कल्याण शहराने कधीही कोणाचं अनुकरण केलं नाही. कल्याणकरांचं "कल्याण" व्हाव म्हणून इथे सर्व पक्षांनी प्रयत्न केले.

कल्याण हे ऐतिहासिक शहर. इथे शत्रूने सहज प्रवेश करू नये यासाठी पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. शत्रूला रोखताना काहीवेळा खुद्द कल्याणकरांना घरी येणे कठीण होते हा भाग अलहिदा. पूर्वी कल्याण मधील गणपतींचे देखावे पाहण्यासारखे होते. आज संपूर्ण कल्याण हाच एक देखावा असून तो पाहण्यासाठी अवश्य या. गाडी, बस यात जागा मिळाली नाही तर टपावर बसून या, रस्त्यात येणारे सर्व toll भरा. पण नक्की या. कारण इथे झालेली प्रगती पाहून तुम्ही थक्क व्हाल. सुरुवात करू रस्त्यांपासून. ज्यांची कल्याणमध्ये सत्ता होती त्यांनी रस्ते खणून ठेवले. दिल्लीत त्यांना सत्तेत स्थान मिळाले तेव्हा आणखी रस्ते खणले आणि राज्यात सत्ता मिळाली असताना इतके रस्ते खणले आहेत की आता कुदळ मारायला जागा नाही. कोणी म्हणेल ही कसली प्रगती. टीकाकारांना चांगलं पाहवत नाही. रस्ते खणणे हा प्रगतीचा मार्ग आहे. त्यातून रस्ते निर्मिती होते आणि सत्ताधारींकडे त्याचवेळी चांगल्या गाड्या येतात. ही प्रगती नव्हे काय? शिवाय एक रस्ता वारंवार बांधत राहिल्यामुळे कित्येकांना रोजगार मिळतो.
लोक म्हणतात आम्ही गाड्या चालवायच्या कुठे?
मुळात bike , कार, school बस ही वाहने पेट्रोल-डीझेल जाळून देशाचं नुकसान करतात. प्रदूषण करतात आणि अपघात घडतात. ह्या तिन्ही समस्या टाळण्यासाठी कल्याणमध्ये रस्ताच शिल्लक ठेवला नाही. न बजेगा बास, न बजेगी बासुरी... शिवाय गाडी चालवायला जागा नसल्यामुळे लोक चालत जातील आणि त्यांचा व्यायाम होईल. व्यायामामुळे निरोगी नागरिक तयार होवून देश निरोगी बनेल, असा विचार करण्यात आला आहे.. कल्याण हे देशाचा विचार करणारं शहर आहे. तसेच, कल्याणमध्ये खोदकाम करताना सोन्याचे हंडे सापडले होते. असे हंडे इतर ठिकाणी असू शकतात हा दृष्टीकोन ठेवून रस्तेसुध्धा खणून पहिले आहेत.

कल्याणमध्ये ब्रिटिशांनी पूल बांधला होता. जो आजही टिकून आहे. त्याला कमी लेखण्यासाठी खाडीवर नवीन आणि जास्त उंच पूल बांधण्यात आला. पण लोकांनी त्यावर गाड्या चालवून खड्डे पाडून ठेवले आहेत. जेव्हा कोणत्याही रस्त्यावर खड्डे पडतात तेव्हा सामान्य नागरिक जबाबदार असतात. कारण ते गुळगुळीत रस्त्यांवरून गाड्या चालवून त्याचा सत्यानाश करतात !!

कोकण निर्माण करताना परशुरामाने समुद्राला मागे जायला सांगितलं. कल्याणमध्ये असे कित्येक परशुराम असून त्यांनी खाडीला ढकलून टोलेजंग इमारती बांधल्या. अनेकांना बोलावून बोलावून निवारा दिला. सामान्य नागरिकांना तर कोणीही निवारा देईल. कल्याण मध्ये भिकारी आणि गर्दुले ह्यांना निवारा मिळावा म्हणून लाखो रुपये खर्च करून जागा मिळेल तिथे पूल बांधण्यात आले. गरीबातील गरीब नागरिकाचा इथे विचार केलेला आहे.

इथे गाडीवर फिरते शौचालय चालवण्याचा प्रयत्न झाला होता. पण शौचालय फिरते असल्यामुळे आत गेलेला माणूस बाहेर आल्यावर भर आग्रा रोड वर निघत असे. बनियान, अर्धी चड्डी आणि हातात टमरेल अश्या अवस्थेत त्याला पुन्हा घरी चालत जावे लागे. अशी वेळ शत्रूवरही येवू नये. सामान्य नागरिकावर अशी भयंकर परिस्तिथी ओढवू नये म्हणून फिरते शौचालय बंद केले. ज्यांना फिरते शौचालय ह्या संकल्पनेचा "आतून" अभ्यास करायचा असेल त्यांनी आता धूळ खात पडलेली शौचालये पहावीत... .. विशेष सूचना: पाणी आणण्याची जबादारी अभ्यासकाची राहील. किंबहुना ज्यांना कल्याण मध्ये यायचे आहे त्यांनी स्वताच पाणी घेवून यावे. नाहीतर कल्याणकर पाणी पाजतात आणि आम्हाला पुन्हा पुन्हा शौचालयाला भेट द्यावी लागते अशी मागून टीका करू नये.

खेळांच्या बाबतीत कल्याणमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. खो-खो, कुस्ती, कब्बडी हे खेळ मैदानात नव्हे तर रस्त्यावर खेळतात. रिक्षा, बस, bike , कार चालक आणि चालणारी माणसे एकमेकांशी हे खेळ करत पुढे जातात. शिवाय जिथे मैदान उरलं आहे तिथे एकावेळी १० team क्रिकेट खेळतात. catch पकडताना हा आपल्याच team चा ball आहे का ह्याचा आधी विचार करावा लागतो. मैदानात खेळताना नेमक्या आपल्या team वर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे भावी काळात भारताच्या team मधील सर्व खेळाडू आणि पंच सुध्दा कल्याणचे असणार आहेत. इथे प्रत्येक खेळाडूला पावलोपावली अनुभव दिला जातो. रायगड किंवा वैष्णोदेवी एका दमात चढून दाखवणार्यांना खुले challenge आहे की त्यांनी एका दमात कल्याणमधील शिवाजी चौक ओलांडून दाखवावा. जर ते यशस्वी ठरले तर त्यांचा भर शिवाजी चौकात सत्कार करण्यात येईल..जर तिथे उभं राहायला जागा मिळाली तर...
तसेच सत्कार करताना नारळ दिला जाईल. कारण कल्याणकरांना अनेक वर्षे नारळ मिळत राहिला आहे. त्यामुळे विजेत्याने नारळ स्वीकारावा. शाल मात्र मिळणार नाही. कल्याण मध्ये हवेची झुळूक यायला जागा शिल्लक नाही, शाल घेवून करायचं काय.

श्री मोदी म्हणतात-बारा तास काम करा. कल्याणकर फक्त बारा तास काम करत नाही. तर काम झाल्यावर दोन तासाचा घाम गाळणारा, अत्यंत कष्टाचा प्रवास करतो. शिवाय इथे उंच इमारतीत राहणारे कुत्र्याला फिरण्यासाठी गाडी घेतात त्यामुळे traffic पोलिस कायम कामावर असतात. अधून मधून बेवारस कुजलेली dead body सापडली की ओवर time करतात. एका पोलिसाला त्याच्या मुलाने पाच वर्षातून एकदा पहिले अशी कथा सांगितली जाते. म्हणजे बाबा रात्री उशिरा येवून सकाळी लवकर निघून जात असल्यामुळे मुलाला तो पाच वर्षे दिसलाच नाही.

कल्याण मध्ये शाळा, bear bar - भिकारी आणि गटार असे सगळे गुण्या गोविंदाने एकत्र राहतात. त्यात डास सुध्धा पोटभर खातात. शेतकर्याने आत्महत्या करू नये यासाठी इथे मुळापासून प्रयत्न करण्यात आले आहेत. एकही शेतजमीन शिल्लक ठेवलेली नाही. त्यामुळे शेतकरी नाही आणि त्यांची आत्महत्याही नाही. नाही म्हणायला कल्याण मध्ये आत्महत्या होतात, मंगळसूत्रे रोज चोरली जातात. अनेक गुन्हे होतात. अश्या नतद्रष्ट लोकांना विनंती आहे की जे काही करायचं ते कल्याण बाहेर जाऊन करा, उगाच कल्याणच नाव बदनाम करू नका.

सध्या नवीन मुख्यमंत्री आले आहेत. त्यांनी कल्याणचा दौरा करावा. शक्यतो हवेतून helicopter मधून करावा. कारण रस्त्यावरून दौरा करणार असाल तर आधी तुम्हाला रस्ता बांधावा लागेल आणि लगेच खड्डा पडलेला पाहून "दिल का दौरा" पडण्याची भीती आहे. मुख्यमंत्री महोदय, जनता तुमच्या पाठीशी आहे ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा लोकलने कल्याणला या. जनता फक्त पाठीशी नाही तर पोटाशी, डोक्याशी, छातीशी, पायाशी आहे याचा अनुभव येईल. तुम्हाला सरकार चालवण्यासाठी support पाहिजे तर लोकल मध्ये दाही दिशांनी, दाबून दाबून support मिळेल. एकदा या आणि कल्याणच्या प्रगतीचा formula पहा आणि नाशिक, पुणे , सोलापूर, पंढरपूर इत्यादी शहराचं दुबई, शांघाय, लंडन वगैरे करण्याचा प्रयत्न न करता सर्व शहर आणि गावाचं "कल्याण" करा.

कल्याण हे जगाच्या पाठीवरील एकमेव शहर आहे जिथे "हवेत" विमानतळ बांधण्यात आलं आहे. उगीच कल्याणवर टीका कराल तर टीकाकाराला कल्याणच्या खाडीत बुडवण्यात येईल. मग बाहेर आल्यावर तो स्वतालासुध्दा ओळखू शकणार नाही. आणि तरीही तुम्ही कल्याणला नावे ठेवली तर तुम्हाला सकाळी fast लोकल मधून डोंबिवलीला उतरवण्यात येईल. मग टीका करायला तोंड नव्हे तर हात-पाय सुध्धा शिल्लक राहणार नाही.
-निरेन आपटे.