गुढी पाडव्याच्या आठवणी :
मित्रहो, काल शुक्रवारी गुढीपाडव्याचा सण पार पडला. वर्तमानपत्रातल्या बातम्या, फोटोज व फेसबुकमधील पोस्टस यामुळे बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या बालपणी आम्ही आमच्या गावी गुढीपाडव्याचा सण कसा साजरा करायचो त्याच्या आठवणी... माझ्या डायरीतुन...
मराठी वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र. आमचे आबा नविन वर्षाचे पंचाग "निर्णयसागर" विकत आणायचे. तशी निर्णयसागरची परंपरा आमच्या घरात आमच्या दादांच्या( आजोबा) काळापासूनच होती. नविन निर्णयसागरची गुढीपाडव्याच्या दिवशी हळद- कुंकू वाहून पुजा केली जायची. नंतर ते ऊघडून त्याचं वाचन व्हायचं . त्या वर्षाचं वर्षफल काय आहे, संक्त्रांत कोणावर आहे, पाऊस कसा आहे, पावसाच्या वेगवेगळ्या नक्षत्रांची वाहने कोणकोणती आहेत याचं वाचन व्हायचं. आम्हा मुलाना पंचाग कसं वाचायचं हे समजाऊन सांगायचे. नंतर पंचागामद्ये धागा बांधुन ते सर्वाना दिसेल अश्यातऱ्हेने खुंटीवर टांगून ठेवायचे.
चैत्राच्या पहिल्याच दिवशी साजरा होणारा सण म्हणजे गुढीपाडवा. यावेळी ऊन्हाळ्याची सुरुवात झालेली असायची. आंबा, काजु, रातांबा व फणसाची झाडं फळानी लगडलेली असायची. सर्वत्र पांढरा चाफा फुललेला असायचा. आमच्या शेताच्या बांधावर पांढऱ्या चाफ्याची खुप झाडे होती. चैत्रात ती अशी फुलायची की जणू तो पुर्ण परीसरच श्वेतवर्णीय भासायचा.
गुढीपाडव्याच्या दिवशी आई पहाटेच ऊठून कामाला लागायची. अंगणासहित सर्व घर शेणानं सारवून घ्यायची. त्यावर सुंदर रांगोळी काढायची. अंगणात गुढीसाठी पाट ठेवून त्याच्या सभोवताली सुंदर नक्षीदार रांगोळी काढायची. एवढं सगळं झालं की ती स्वयंपाकाच्या तयारीला लागायची.
हे सगळं होईपर्यंत सकाळचे १० वाजलेले असायचे. मग आबा मला घेवून गुढीसाठी बांबूची काठी तोडायला जायचे. आमची बांबूची बरीच बेटं होती. त्यामधून आबानी अगोदरच उंच व मजबुत अशी काठी हेरुन ठेवलेली असायची. आम्ही काठी तोडून घरी आणायचो. आबा ती काठी तासून गुळगुळीत करायचे. नारळाचा काथ्या व पाणी वापरून आम्ही ती काठी स्वच्छ करून घ्यायचो. मी चाफ्याची फुलं गोळा करायचो. आम्ही भावंडे त्यांच्या सुरेख माळा बनवायचो. आई पितळेचा तांब्या लखलखीत घासून- पुसुन आणून द्यायची.आबा घरातलं नवं कोरं वस्त्र घेवून ,त्याच्या निऱ्या पाडून ते काठीला घट्ट बांधायचे. त्यावर चाफ्याच्या फुलांच्या व बत्ताश्यांच्या माळा बांधायचे. हळद व चुना याचं मिश्रण करून आबा तांब्यावर सुरेख नक्षी काढायचे व तो कलश काठीला बांधलेल्या वस्त्र व फुलांच्या हारांवर घट्ट बसवायचे. नंतर अतिशय काळजीपुर्वक गुढी उभी केली जायची. आबा मला म्हणायचे " झिला, वाडीत जावून बघून ये, आपली गुढी सगळ्यात ऊंच असायला पाहीजे. " पण आपली गुढी सर्वांत उंच असणार याबद्दल मला शंका नसायची.
घरात आईने गुढीच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोडधोड केलेलं असायचं. गुढीला नैवेद्य अर्पण केला जायचा. त्याचबरोबर अंगणातील तुळस, पुर्वजांचे स्मरण म्हणून कावळ्यांसाठी, गाय ,ग्रामदैवत व कुलदैवत यानांपण नैवेद्य अर्पण केला जायचा. संध्याकाळी आबा अतिशय काळजीपुर्वक गुढी ऊतरवून ठेवायचे व गुढीपाडव्याचा सण संपायचा.
गुढीपाडव्यानंतर घरी साजरा करता येईल असा एकही सण चैत्र, वैशाख, जेष्ठ व आषाढ या महिन्यात नसायचा , म्हणूनच " गुढीपाडवा ,सणांच्या येतो आडवा " असा वाक्प्रचार मालवणी मुलखात वापरला जायचा.
गेल्यावर्षी, जवळ जवळ २५ वर्षांच्या कालावधीनंतर गुढीपाडव्याच्या सुमारास गावी जाण्याचा योग आला. गेल्या २५ वर्षात माणसांपासून निसर्गापर्यंत सगळेच बदल स्पष्टपणे जाणवण्याएवढे मोठे आहेत. माझ्या बालपणी असलेली शेताच्या बांधावरील पांढऱ्या चाफ्याची झाडं अजुन तशीच आहेत. पण गुढीपाडव्याच्या दिवशी त्यावर एकही फुल नसावं? माणसांमधील बदल समजु शकतो पण निसर्गानेही बदलावं? " चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना" या गाण्यातील ओळींचा प्रत्यय पावलापावलावर येत राहीला.
कुमार गावणकर