मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

तेव्हा कृष्णाने गोकुळातील सगळ्यांना सांगितलं की आपण सारे मिळून गोवर्धन पर्वत उचलू आणि पावसापासून आपला बचाव करू.

सगळेजण काठ्या घेवून आले. कृष्णानी फक्त करंगळी लावली आणि इतरांनी काठ्या टेकवून गोवर्धन पर्वत उचलला.

ह्याचा अर्थ असा आहे की इतरांचा पुरुषार्थ जागा करणारा कोणीतरी एक असावा लागतो. मग इतरांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते अशक्य कामसुध्दा शक्य करून दाखवू शकतात. आलेली आपत्ती दूर करू शकतात.

एक विश्वासाची करंगळी फार मोठी किमया करते. मी पाठीशी आहे असं जरी कोणी सांगितलं तरी दहा हत्तींचं बळ येतं. मग संकटांवर मात करायला फार वेळ लागत नाही.

कुसुमाग्रजांची एक कविता अगदी अशीच आहे. कवितेमध्ये एका विद्यार्थाची व्यथा कथन केली आहे. घरात पुराचं पाणी घुसल्यामुळे काडीकाडी जमा करून उभं केलेलं घर उध्वस्त झालं. तरीही तो पुन्हा नव्या जिद्दीने उभा राहू पाहत आहे. त्यासाठी सरांकडून पैशांची नव्हे तर पाठीशी उभे राहा इतकीच मागणी करत आहे.
कवितेच शीर्षक आहे :

कणा
ओळखलत का सर मला ! पावसात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी.
क्षणभर बसला, नंतर हसला , बोलला वरती पाहून;

गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून.
माहेरवाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेउनी संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे

खिशा कडे हात जाताच हसत हसत उठला
"पैसे नकोत सर मला जरा एकटे पण वाटला
मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा
पाठी वरती हाथ ठेवून नुसते लढ म्हणा !"
- कवी कुसुमाग्रज

आज मराठी भाषाही अनेक भाषांच्या पुरात अडकली आहे. पण त्यातूनही ती तरेल. कारण खुद्द कुसुमाग्रज तिच्या पाठीशी उभे आहेत