मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

माझे संपुर्ण आयुष्य शहरात गेल्यामुळे ग्रामीण मातीचा, शेतीचा किंवा बोलीभाषेचा माझ्याशी सरळ सरळ संबंध नसला तरी लेखक या नात्याने शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही. गावरान भाषेत लिहीण्याचा हा माझा पहीलाच प्रयत्न आहे. माझ्या 'क्षितिज' या लघुकथा संग्रहातील ही कथा वाचकांच्या मनात नक्कीच हुरहुर लावून जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. --श्रीकृष्ण चंद्रकांत कीर 

 लाचार 

सदाशिवची सायकल गावच्या वसाड शिवाराच्या कडेनं जानारी अरूंद पायवाट भराभर मागं सारीत व्हती. तापत्या उनाचे चटके त्येच्या अंगाला जानवत व्हते. व्येगानं पायंडल मारता मारता मधीच कानामागनं वघळनारी घामाची धार त्यो डोईवर बांधलेल्या पंचानं पुसत व्हता. गावच्या येशीवर आसलेला सावकाराचा वाडा आजून त्येच्या नजरेच्या टप्प्यात आला न्हवता. त्येनं मान वर करून आभाळाकडं पाह्यलं. सगळं आभाळ वसाड व्हतं. पावसाळा सुरू होयाला आजून अवकाश आसला तरी शेतीच्या कामांची तयारी आतापासनच करनं भाग व्हतं. आशेचं गाठोडं उराशी कवटाळून त्यो पायानं भराभर सायकलचे पायंडल फिरवित व्हता. मागल्या वर्साचं शेतात जोमानं डोलणारं ऊसाचं पीक त्येच्या नजरेसमूर भिरभिरत व्हतं. पण ऐन येळेला वरूण राजानं दडी मारली आन् उभं पीक पार करपून गेलं व्हतं. सदाशिवची सारी मेहनत वाया गेली व्हती. कर्जाची परतफेड न झाल्यानं गहाणवट ठेवलेला शेतजमीनीचा तुकडा सावकारानं बळकावला हुता. करपलेल्या पीकाकडं भकास नजरेनं बघत रहान्याबिगर त्यो कायबी करू शकला न्हवता.
गतवर्साला जर पावसानं दगा दिला नसता तर सावकाराचं कर्जबी फिटलं आसतं आन् वयात आलेल्या एकुलत्या एका लेकीचं लगीनबी त्यानं उरकून घेतलं आसतं. गेली सलग तीन वरीस त्यो पूनमच्या लग्नाचा इचार करीत व्हता. दर येळेला त्यो मेहनत करी, पन् त्येचं नशीब त्येला साथ देत नव्हतं. दोन वर्सापूर्वी अतिपावसानं त्त्येचं कांद्याचे पूरतं पीक मातीत सडून गेलं व्हतं. त्येच्या आधी गारपीटीनं सळसळनारे दळे पार जमिनदोस्त झाले व्हते. त्येच्या आदल्या वर्साला सदाशिवनं ऊसाची लागवड केली व्हती. पन् जंगली हत्तींनी थैमान घालून पूरतं पीक पायदळी तुडवलं व्हतं. सलग तीन चार वरीस पीकाचं नुकसान झाल्यानं घेतलेल्या कर्जापतुर त्येचं व्याज वाढलं आन् शेवटाला सावकाराकडं गहाणवट ठिवलेला जमिनीचा तुकडा त्येला गमवावा लागला व्हता.
सरकारनं दिलेल्या तुटपुंज्या अनुदानावर आन् मिळल ती बिगारी करून त्येनं वरीसभर कसंबसं आपल्या कुटूंबाचं प्वाट भरलं व्हतं. आता पुनः नेटानं शेतीच्या कामाला लागावं ह्या इराद्यानं त्यो मोठ्या आशेनं सावकाराकडं चालला व्हता. पुनः कर्ज घेयाला...... सदाशिव अशिक्षित हुता. त्या कारणानं बॅकेतनं कर्ज घेयाचं त्येला सुचलं न्हाई. सावकाराच्या कर्जाचं सूद रग्गड आसलं तरी बॅंकेत पन्नास हेलपाटे घालण्यापतुर सावकाराकडं जमिनीची कागदं गहाणवट ठिवली की लगीच कर्ज मिळतं, आसा त्येचा साधा सरळ हिशेब व्हता. गावातले बाकी शेतकरीबी नडीला ह्येच करत व्हते. सदाशिवला इसवास व्हता कि न्हेमीपरमानं या येळेलाबी सावकार कर्जाला न्हाय म्हननार नाय. थोडा कांगावा करील पन् कर्ज दिईल. ह्या खेपेला त्येनं गहाणवट ठिवन्यासाठी र्‍हात्या घराची आन् उरलेल्या शेतजमिनीची कागदं सोबत घेतली व्हती. लांबनच् त्येला सावकाराचा आलिशान वाडा दिसाया लागला. त्येनं आपल्या सायकलचा येग वाढीवला.
वाड्याच्या दगडी कुंपनालगत उभ्या आसलेल्या आंब्याच्या झाडाखाली सदाशिवनं आपली सायकल लावली. डोईवरचा पंचा काढून घामानं थबथबलेलं आपलं त्वांड पुसून कोरडं केलं. झाडाच्या सावलीत येताच वार्‍याच्या गार झुळूकेनं त्येला थोडं बरं वाटलं. त्वांड पुसून झाल्यार पंचा खाद्यावर टाकून सायकलच्या हैंडलला आडकावलेली कापडी पिशवी घिवून त्यो वाड्याच्या दिशेनं वळला. गेटवर उभ्या आसलेल्या अर्जुन पैलवानाला त्येनं लांबनच पाह्यलं. अर्जुन सारखे आनखीन दोन चार पैलवान सावकारानं आश्रयाला ठिवले व्हते. आता इतका मोठा आमीर मानूस म्हनल्यावर त्येला चोराचिलटांची भिती तर असनारच. सदाशिवनं मोठ्या आदबीनं अर्जुन पैलवानाला इचारलं, “सावकार वाड्यावर हायत न्हवं?” अर्जुननं वाड्याच्या लॉनकडं ब्वॉट दाखिवलं. लॉनमधी एका मोठाल्या छत्रीखाली चार खुर्च्या आन् एक गोल तिपाय ठिवलं व्हतं. तिथं सावकार आपल्या बायकोबरूबर खुर्चीत बसून चाय पीत असलेला सदाशिवनं पाह्यलं. बाजूलाच हिशेबाची पोथी काखेत दाबून सावकाराचा मुनिम त्येच्याशी कायतरी बोलत उभा व्हता. अर्जुन पैलवानानं तिथनंच सावकाराला साद दिली, “सरकार, सदाशिव आलाय. तुम्हास्नी भेटायचं म्हनतुया”. सावकारानं सदाशिवकडं पाह्यलं आन् हातानंच त्येला आत येन्यास खुनावलं.
लॉनमधी जावून सदाशिवनं सावकाराला लवून रामराम केला. “हं, कसं काय येणं केलं सदाशिव”? सावकारानं मिश्कीलपनं हासत इचारताच सदाशिव म्हनला, “सावकार, थोडी निकड व्हती, म्हनूं आलू व्हतु. तुमची किरपा झाली तर आवंदा ऊस उगवायचं म्हनतो”. सदाशिवचं बोल ऐकून सावकारानं आपल्या बोलन्याचा रोख बदलला. “अरे, तू दरवर्षी येवून हात पसरतो आणि कर्ज फेडायचं नाव घेत नाही. इथे बसून पैसे वाटायला मी काय धर्मशाळा उघडली आहे?” सदाशिवच्या तोंडावरले आगतिकतेचे भाव आनखीच गडद झाल्ये. त्यो धीर करून म्हनला, “मागल्या वर्साला पावसानं त्वांड फिरवलं. न्हाईतर तुमचा समदा पैका चुकता केला आसता, बघा”. त्येला मधीच आडवून सावकारानं इचारलं, “तुला सरकार कडून नुकसान भरपाई मिळाली होती ना?” सदाशिव लाचार सुरात म्हनला, “सरकार, नुकसान भरपाई गावली, पन् त्यातनं खताचाबी खर्च निघाला नाय बघा. आरदे पैसे तर त्या सरकारी बाबूंनी लाटले. उरलेले पोराबाळांच्या पोटापान्यास लागले”. सदाशिवची गयावया बघून सावकाराचे बायकूला भवतिक दया आली. ती मधीच सावकाराला म्हनली, “अहो, द्या ना त्याला. बिचारा किती आशेने तुमच्याकडे आला आहे”. सावकाराच्या कपाळावरली शीर ताटरली. त्यो आपल्या बायकूवर डाफरला, “तू आत जा. बाहेरच्या व्यवहारात आपलं नाक खूपसू नको, म्हणून किती वेळा सांगितले आहे. काय करायचे ते मला चांगले समजते. तू शिकवू नको”. सावकाराची बायको हिरमूसली व्हवून तिथनं आत चालती झाली.
सदाशिवनं आशाळभूतपनी पुनः सावकाराची इनवनी केली, “सरकार, काय बी करा, पन् या वक्ताला मदत करा. लई उपकार होतीला. आवंदा पीक न्हाई काढलं तर माझी बायको आणि पोर उपाशी मरतीला. पायजे तर शेत जमीनीसकट घराचीबी कागदं तुमच्याकडं ठिवून घ्या”. बायको तिथनं निघून गेल्यानं भवतिक सावकाराचा राग थोडा वसरला व्हता. “हं, किती पैसे हवे आहेत तुला? पण यावेळी व्याजाचा दर पाच टक्क्यांनी जास्त द्यावा लागेल, चालेल तुला?” सदाशिवनं ‘चालंल’ म्हनून मान हालवीत शेतजमीन आन् घराची कागदं पिशवीतनं काढून सावकाराला दिली. सावकार त्या कागदांवरनं उडती नजर फिरवित सदाशिवला म्हनला, “घर आणि शेतजमीन मिळून पन्नास हजार मिळतील, त्यापेक्षा जास्त देता येणार नाही”. सदाशिवचं तेवढ्या पैशात काम भागनार व्हतं. उगीच जास्त घेवून डोईवर कर्जाचा बोजा कशापायी वाढवायचा, ह्या विचारानं सदाशिवनं मान हालवली. सावकार सदाशिवनं दिल्येली कागदं आपल्या मुनिमाकडे देत त्येला म्हनला, “मुनीमजी, घर आणि जमीनीच्या तारणाचे कागद तयार करून त्याच्यावर सदाशिवचा अंगठा घ्या”. मंग सदाशिवकडं वळून म्हनला, “मी तुला आठ महीन्यांची मुदत देतो. त्या अवधीत तू व्याजासकट कर्ज फेडलेस तर तुझी कागदपत्रे परत मिळतील, लक्षात असू दे”. “तुमी कायबी काळजी करू नका, बघा. ऊस बाजारात इकला की लगीच तुमचं पैकं हाणून दितो”.
मुनिमानं दिलेल्या कागदांवर अंगठ्याचा छाप उमटवून सावकराच्या वाड्यातनं पैसे घिवून सदाशिव घरला निघाला, त्येवा त्येच्या तोंडावरची काळजी बरीचशी वसरली व्हती. डोळ्यात आशेची किरनं चमकत व्हती. परतीचा मार्ग त्येला सुकर वाटत व्हता. भविष्यकाळाचं सपान रंगवीत सदाशिव घराच्या दारात येवून ठेपला, तवा सुर्य माथ्यावर आला व्हता. दारात ठिवलेल्या रांजनातल्या पान्यानं हात पाय धुवत त्येनं आपल्या बायकोला हाक मारली. धन्याचा आवाज ऐकून सुमती पंचा घिवून दारापाशी आली. सदाशिवनं तिच्या हातनं पंचा घेतला आन् पैशाची थैली तिच्याकडं देत तिला म्हनला, “ह्ये आत न्हेवून जपून ठिव. या वर्साला बघ, कसं सोनं पिकीवतो त्ये. पूनमसाठी चांगल्या घरचा पोरगाबी बघू”. सुमतीनं एक दिर्घ श्वास सोडला आन् सदाशिवच्या हातची पिशवी घिऊन घरात जान्यास वळली. गेली चारपाच वरीस ती दोघंबी नवरा बायको ह्येच सपान बघत व्हती आनी नंतर त्यां सपनाचा पार चुराडा व्हत व्हता. देवघरात ठिवलेला लाकडाचा पिटारा तिनं उघडला आनी कपड्याखाली दडवून ठिवलेला पितळेचा डबा भाईर काढला. त्यो डबा म्हणजेच त्येंची सुरक्षित तिजोरी व्हती. सदाशिवनं सावकाराकडनं आणलेले पैसे तिनं डब्यात नीट जपून ठिवले आन् डबा पूना व्हता तसा कपड्यांखाली दडवून पिटारा बंद केला.
दुसर्‍या दिवशी फाटे सदाशिव शरातल्या आठवडा बाजाराला जान्यास निघाला. आज त्येला बराच बाजार करायचा हुता. बाजारात जावून त्यानं पयल्यान् शेतीचं बियानं, खत, युरीया, किटकनाशकं ह्येच्या सारखं शेतीला लागनारं गरजेचं सामान इकत घेतलं. मग महीनाभराचे घरात लागनारे जिन्नस घेतले. सुमती आनी पूनमसाठी दोन जोडी लुगडी घेयालाबी त्यो इसरला न्हाई. त्येंच्यासाठी कोरी कापडं घिवून बरेच दीस उलाटले व्हते. त्या दोघी कैक दिवसांपासनं इटाळलेली लुगडीच नेसत व्हत्या. सोतासाठी त्येनं नवीन चप्पलजोड घेतली. त्येच्या जुन्या व्हानांच्ये बूड पार झिजले व्हते. अचानक त्येला आपल्या बैलांची जोडी आठीवली. पोटच्या पोरापरमानं त्यो त्येंच्यावर पिरेम करायचा. कधी बाजारहाट कराया आला कि त्यो त्येंच्यासाठी काय ना काय तरी इकत घेई. कधी गळ्यात बांधायची घंटा, कधी घुंगुरांचा पट्टा तर कधी शिंगांना बांधाया गोंडे. कायच न्हायतर त्येंना खान्यासाठी सुकी पेंड तरी इकत घ्येयाचा. पन् आज त्येची ती बैलजोडी त्येच्याजवळ न्हवती. त्येंना इकताना सदाशिवचं काळीज फाटलं हुतं, पण त्येचाबी न्हाईलाज व्हता. इथं मानसांची खान्याची परवड व्हते, मग त्येंना त्यो काय खायाला घालनार हुता? दुष्काळानं सारीच वाताहात लागली व्हती. ह्याच आठवडा बाजारात आनून त्येनं आपले बैल इकले व्हते. त्या दिवशी त्येला सोताला पंगु झाल्यासारखं वाटलं. बैलांच्या आठवनीनं सदाशिवचे डोळे पानावले. त्येनं सोताच्या मनाला समजावलं. ‘काय हरकत नाय, बिचारे जिथं हायत तिथं त्येंना प्वॉटभर खायाला तरी मिळत आसल. बजारहाट झाल्यावर सारं सामान एका टांग्यात लादून सदाशिव घरी जान्यास निघाला, तवा सुर्य डोईवरूनं पश्चिमेकडं कलला हुता.
वातावरण तापलेलं आसलं तरी आज सदाशिवला उनाचे चटके जानवत न्हवते. त्येच्या डोळ्यांसमूर कोरी लुगडी नसलेले सुमती आनी पूनमचे हासरे चेहरे पिंगा घालीत व्हते. त्येच्या चेहर्‍यावर मिश्कील हासू फुललं. टांगा धावाया लागला तसं सदाशिवच्या घामेजलेल्या अंगाला वारं भिडू लागलं. आनंदाच्या भरात त्येच्या व्हटावर कवी सुजनच्या गान्याच्या वळी नाचाया लागल्या -----
‘कतरा कतरा बहें पसीना एक नये अरमान में।
झूमें धरती, लहरायें पवन जब खिलें खेत खलिहान में’॥
टांगेवाल्यानं हासून सदाशिवकडं पाह्यलं आन् त्योबी त्येच्या सूरात सूर मिसळून गायाला लागला. गान्याच्या नादात त्ये घरापतूर कवा येवून ठेपले, ते त्यांचं त्येनाच उमागलं न्हाय. टागेवाल्याचे भाड्याचे पैसे देवून सदाशिवनं सारं सामान टांग्यातनं खाली उतरवलं. पूनम धुतलेले कपडे आंगनातल्या दोरीवर वाळत घालीत व्हती. ती धावत बापाच्या मदतीला आली. साडी आणि भाजीपाल्याच्या पिशव्या पूनमच्या हातात देऊन सदाशिवनं बाकी सामान घरात आनलं.
सुमती आन् पुनमला साड्या लई आवडल्या व्हत्या. त्येंच्या चेहर्‍यावरला आनंद वसंडून व्हात व्हता. घरात लई दिसांनी हासू फुललं व्हतं. दोघांचा आनंद बघून सदाशिवबी मनातनं सुखावला. पूनम दोन साड्या दोन खांद्यावर टाकून आरशासमोर उभी र्‍हावून मुरडत आसलेली बघून सुमती तिच्यावर डाफरली, “ऐ बये, घडी मोडायच्या आधी साडीला हळदीकुकवाचा टिका तरी लाव. मग काय मुरडायची ती मूरड”. पूनम साड्या घिवून देवघरात गेली. सदाशिव बायकोला म्हनला, “आज जेवनात कायतरी ग्वाड बनीव. उद्यापासनं जमीन कसाया घेया हवी”. “तुमी बाजारातनं भोपळा आनलाय न्हवं, त्येची खीर बनवूं?” सुमतीनं इचारलं. सदाशिव म्हनला, “हां, ह्ये बेस व्हईल बघ”. जेवल्यावर दुपारची वामकुक्षी घ्येवून सदाशिव सांजच्याला शेतावर एक चक्कर टाकून आला.
दुसर्‍या दिवशी भल्या फाटे कुदळ, फावडं, टिकाव आनी दोन घमेली घिवून सदाशिव पूनमला सोबत घिवून शेताकडं निघाला. पूननच्या डोईवर पाण्यानं भरलेला मातीचा घडा आनी हातात पिशवी व्हती. घरापासनं जरा लांब गावाभाईर त्येंचं शिवार व्हतं. आजपासनं रोजचा त्येंचा दीस शेतात उगवनार व्हता आन् शेतातच मावळनार व्हता. तिथं पोचल्यावर सदाशिवानं सारं सामान शेताच्या कडंला उभ्या आसलेल्या चिंचेच्या झाडाखाली ठिवलं. पूनमनं डोईवरचा घडा झाडाच्या सावलीत ठिवला आन् सोबत आणलेलं गोनपाट थोडं वलं करून घड्याभवती गुंडाळलं, जेनेकरून घड्यातलं पानी गार र्‍हाईल. पिशवीतनं तिनं फूलं, नारल आनी अगरबत्तीचं पाकीट भाईर काढलं. सदाशिवनं झाडाखालचा एक दगूड उचलून शेताच्या बांधावर ठिवला. नंतर पूनमच्या हातातलं पूजेचं सामान घिवून दोघा बापलेकीनं मिळून धरणीमायची पूजा केली आनी या वर्साला चांगलं पीक दे, आसं साकडं घातलं. सदाशिवनं दगडावर नारल फोडून नारलाचं पानी आनी खोबर्‍याचे तुकडे करून जमीनीला नैवेद दावला. बाकी नारलाची खिरापत करून परसाद म्हनून दोघांनी खाल्ला, थोडा परसाद सुमतीलाबी ठिवला. पूनमच्या हातनं जमीनीवर टिकावाचा पयला घाव घालून सदाशिवनं शेतीच्या कामाचा मुहरत केला.
गतवर्साच्या दुष्काळानं जमीनीला मोठाल्या भेगा पडल्या व्हत्या. खोदताना सदाशिवला ताकद लावाया लागत व्हती. त्येनं खोदलेल्या मातीची ढिकळं फोडायचं काम पूनम करीत व्हती. जसजसं ऊन तापत व्हतं तशा त्येंच्या अंगातनं घामाच्या धारा वघळत व्हत्या. दीस जरा वर आल्यावर हातातलं काम थोपवून दोघंबी चिचेच्या झाडापाशी आली. मातीच्या घड्यातलं गार पाणी घशाखाली गेल्यावर त्येंच्या कासावलेल्या जीवाला थोडा आराम वाटला. सदाशिवनं जवळच पडलेले तीन दगड रचून तात्पुरती चूल बनवली. पूनमनं झाडाखाली पडलेल्या सुक्या काटक्या गोळा करून आनल्या आनी चूल पेटवून त्येच्यावर चहाचं भांडं ठिवलं. कपाळावरचा घाम पुसत तिनं घरातनं निघताना सोबत घेतलेल्या बाजरीच्या भाकर्‍या, झुणका आनी कांदा पिशवीतनं भाईर काढलं. प्व़ॉटभर न्ह्यारी केल्यावर पूनमनं बनिवलेली बीन दूधाची चाय पिवून दोघंबी पूना कामाला लागली. सुर्य डोईवर येईस्तोवर दोघा बापलेकीनं मिळून अर्धा दळा खोदून पूरा केला. त्येंच्यासाठी घरनं दुपारचं जेवन घिवून येत असलेली सुमती लांबनंच सदाशिवला दिसली आनि त्येच्या चेहर्‍यावर हासू फूललं. तिच्या डोईवर जेवनाची टोपली आन् काखेत पाण्यानं भरलेली घागर व्हती. झाडाखाली येताच सुमतीनं त्या दोघांना जेवनासाठी साद दिली.
अंगमेहनत केल्यानं दोघांनाबी सडकून भूक लागली व्हती. कुदळ आनि टिकाव शेतातच टाकून दोघं झाडाजवळ आली. त्येंचं हात आनि त्वांड धुवून होईस्तोवर सुमतीनं त्येंच्यासाठी दोन ताटात जेवन वाढलं. बाजरीची भाकरी, भात, वरण, भेंडीची भाजी, लसनाची चटनी आनि कांदा आसं भरलेले ताट बघून दोघंबी सुखावली. सदाशिवनं ताटातल्या भाकरीचा चतकोर तोडून त्येच्यावर थोडा भात, वरण, भाजी, चटनी घेवून बाजूला जमिनीवर ठिवला आनि लोट्यातलं पानी वंजळीत घेवून त्येच्या भवती शिंपडून भूमीला भोग लावला. अनायासे त्येला आपल्या बैलांची आठवण झाली. नेहमी त्येंना चारा, पानी दिल्यावर मगच त्यो जेवत व्हता. आज जर त्येची बैलजोडी आसती तर इतकी मेहनत पडली नसती. सरळ बैल जुंपून त्यानं शेत नांगरलं आसतं.
सदाशिवनं पहीला घास कपाळाला लावून तोंडात कोंबला. पूनम खाताखाता सुमतीला म्हनली, ‘’आय, तूबी जेवाया घे ना”. सुमतीनं हासत तिला उत्तर दिलं, “नको, आदुगर तुमी दोघं जेवून घ्या, माघारी म्या जेवते” सदाशिवला ठावूक व्हतं, त्यो जेवल्यावरच सुमती जेवनार व्हती. दोघंबी निमूटपनं जेवू लागली. प्वाट भरल्यावर दोन घास ताटात शिल्लक ठिवून सदाशिव हात धुन्यासाठी उठला. ही त्येची नेहमीची सवय व्हती. तो कधीच आपल्या ताटातलं सारं संपवीत नसे. आपल्या बायकोसाठी प्रेमानं ताटात दोन घास शिल्लक ठेवी. ह्ये त्या दोघा नवरा बायकोचं पिरेमच व्हतं कि सुमती नवऱ्याच्या उष्ट्या ताटातच स्वतःसाठी वाढून घेई आनि त्यानं तिच्यासाठी शिल्लक ठिवलेला पिरमाचा गोड घास आनंदानं घशाखाली उतरवी. दोघांनाबी ह्यात एक आलौकीक सुख मिळत व्हतं. पूनमला ह्ये गुपित कधीच कळलं न्हाई. तिला वाटायचं कि बाबाचे प्वाट भरलं म्हनून त्येच्या ताटात जेवान उरलं आनि आन्न फूकट दवडू नये म्हनून आई त्याच ताटात जेवाया घेती. पूनमचं लगीन झाल्यावर ही गोष्ट आपसूकच तिला उमगनार व्हती.
जेवान आटपून सदाशिवनं झाडाखाली थोडी सपाट जागा बघून तिथं आपला पंचा आंथरला आन् उशाला दगड घेवून तो लवंडला. पूनम आपल्या आयजवळ बसून जमिनीवरचे खडे उचलून समोरच्या दगडाला टिपन्याचा सराव करीत व्हती. सुमतीनं आपलं जेवान उराकलं, सारी उष्टी भांडी धुवून व्यवस्थित टोपलीत ठिवली आनि तीबी सदाशिवपाशी येवून बसली. झाडाच्या सावलीत गार वार्‍याची झुळूक अंगाला गोड गुदगुल्या करीत व्हती. झाडाची सावली सोडली तर बाकी सगळीकडे उन रणरणत व्हतं. बाकीच्या शेतकर्‍यांनी आजून शेतीच्या कामांना सुरूवात केली न्हवती. सदाशिवकडं त्येची बैलजोडी आसती तर त्यानंबी इतक्या लवकर शेतीच्या कामाला सुरूवात केली नसती. कोरड्या आभाळाकडं बघत त्यानं सुमतीला इचारलं, “तुला काय वाटतं, आवंदा पाऊस ठिक व्हईल?” सुमतीनं त्येला आश्वस्त केलं, “तुमी आता इतका घाम गाळताय म्हनल्यावर आभाळालाबी पाझर फूटंल बघा. देव सारं बघतुया, त्यो काय इतकाबी निर्दयी न्हाई. त्येच्यावर इसवास ठिवा”. सुमती सदाशिवला धीर देत व्हती, पन् खरंम्हंजी तिच्याबी मनात थोडी धाकधुक व्हतीच. गेल्या तीन चार वर्साचा अनुभव काय बरा न्हवता.
आरदा एक तास सुस्तावल्यावर दोघंबी पुन्हा कामाला लागली, तवा सुर्य डोईवरून पश्चिमेकडं कलला व्हता. सुमतीबी त्येंच्या सोबत काम करू लागली. सांजच्याला सारं सामान घिवून तिघबी घराकडं निघाली तवा आकाशात सुर्यास्ताची लाली पसरली व्हती. घरला पोहोचेपतुर अंधार दाटून आला व्हता. न्हावून तिघंबी ताजितवानी झाली. दिवसभर शेतात राबल्यानं त्येंना रात्रीला मस्त झोप लागली.
आठवडाभर घाम गाळून तिघांनी सारं शेत खोदून काढलं. आता फकस्त एका दळ्याचा कोनाच खोदायचा राह्यला व्हता. त्यादिवशी सांजच्याला खोदता खोदता सदाशिवला आपल्या उघड्या पाठीवर पान्याचा एक थेंब पडल्यासारखं जानवलं. त्येनं कपाळावरला घाम बोटानं निपटून मान वर करून आभाळाकडं पाह्यलं. आकाशात त्येला पावसाचे ढग कुठंबी दिसले न्हाईत. मान हलवून त्यो पुन्हा खोदकाम कराया लागला. थोड्या येळानं सुमतीच्या पाठीवरबी एक टपूर येवून आदळलं. तिनं वर पाह्यलं. काळ्या ढगाचा एक बारीक तुकडा आकाशात तरंगत आसलेला तिला दिसला. ती सदाशिवला म्हनली, “आज भवतिक पाऊसाचं लक्षन दिसतया”. सदाशिव आभाळाक़डं बघत म्हनला, “मला न्हाई तसं वाटत. ह्या तुकड्यातनं कितीसं पानी पाझरनार हाय?”
आरदा तास गेला आसल नसल तोच पूनम एकदम किंचाळली, बाबा, त्ये बघ तिकडे काय त्ये, पावसाचे ढग हायत न्हव त्ये?” दोघांनी पूनमनं दावलेल्या दिशेकडं पाह्यलं, ती दिशा काळ्या ढगांनी पार काळवंडली व्हती. थोड्याच येळात गार वारं अंगाला झोंबू लागलं आन् बघता बघता पावसाची पयली सर आली. दुष्काळानं कोरड्या झालेल्या जिमिनीवर पावसाचे हे भले मोठाले थेंब येवून आदळू लागले. जनू काय कोनी ताशा बडवीत असल्याचा भास व्हत व्हता. तिघांच्या अंगावर पावसाचा मारा होवू लागला. सदाशिव आनि पूनम हात पसरून आभाळाकडं बघत लहान पोरांवानी आरडत नाचू लागली. सुमतीलाबी पावसात भिजायची गंम्मत वाटत व्हती. पयल्या पावसात भिजायची मजा काय न्यारीच आसते, न्हाई?
पावसाचं सारं पानी कोरड्या तहनलेल्या मातीत कुठं झिरपून जात व्हतं, त्ये उमजतच न्हवतं. आकाशातनं व्हनारा गार पान्याचा शिडकाव आन् जिमिनीतनं निघनार्‍या गरम वाफा अंगाला गोड गुदगुल्या करीत व्हत्या. थोड्याच येळात भिजलेल्या मातीतनं निघनारा सुगंध मन रोमांचित कराया लागला. दिवसभर काबाडकष्ट करून आलेला शीण पार कुठल्या कुठं पळाला व्हता. साऱ्या शरीरात शीतलहर घोंघावत व्हती. पावसात आसंच चिंब भिजत रहावं आसं त्येंना वाटत व्हतं. सदाशिवनं पाह्यलं, पावसात भिजल्यानं ओल्या लुगड्यात सुमतीचा घाटदार बांधा उठून दिसत व्हता. त्यानं तिच्याकडं बघत डोळे मिचकावले. सुमतीनं त्येच्या नजरेतले भाव वळखले आन् ती गालातल्या गालात गोड लाजली. बावरून ती चिंचेच्या झाडाखाली आडोशाला गेली, जाता जाता लटक्या रागानं त्येंना म्हनली, “आता पूरे झालं. जास्त भिजू नका, न्हायतर आजारी पडशाला”. खरंतर तिलाबी मनातनं वाटत व्हतं की आपणबी आणखीन पावसात भिजावं. नाचावं, गावं. पण तिनं तसं केलं न्हाई. चिचेच्या झाडाखाली येवून तिनं खांद्यावरचा पदर उतरवून दोन्ही हातानी पिळला आनि त्यानच् आपला चेहरा टिपला. मग अंगाला चिकाटलेलं लुगडं सोडीवता सोडीवता शेतात आनंदानं बागडणार्‍या बापलेकीकडं बघत राह्यली. समाधानाची लकेर तिच्या चेहर्यावर सपष्ट दिसत व्हती.
थोडा येळ पावसात भिजल्यावर सदाशिव चिंचेच्या वळचणीला आला आन् सुमतीला म्हनला, “तू काहून तिथनं आली? पावसात भिजताना तू लई झकास दिसत व्हतीस, बघ”. सुमती लाजून म्हनली, “तुमचं आपलं कायतरीच. डोळं मिचकावताना पोरीनं पायलं बियलं आसतं मग?” सदाशिव काय बोलणार इतक्यात पूनम तिथं आली. पूनम येताच सदाशिवनं बोलण्याचा रोख बदलला, “आता पाऊस थांबायचं काय लक्षान दिसत नाय. चला घराकडं जावू या. तिकडंबी काय परिस्थिती हाय, ती बघाया हवी”, अंधारण्याआदुगर घरी जानं गरजेचं व्हतं. तिघांनी सोबत आणलेलं सारं सामान घेतलं आनि घरची वाट धरली.
पावसानं सुरवात तर चांगली केली व्हती. मुसळधार पावसातनं चालत तिघंबी घरापाशी आली. ओल्या कपड्यानिशी घरात शिरताच तिघं दारातच थबकली. सदाशिवच्या मनातली शंका खरी ठरली व्हती. पावसाचं पानी जागोजागी छपरातनं घरात गळत व्हतं. जिथं जिथं पानी टपकत व्हतं, तिथली कच्ची जमीन पार वली झाली व्हती. एक बेस झालं की पडवीत ठिवलेलं खत, धान्य आनि बाकी भिजनारं सामान सुमतीनं प्लॅस्टीकनं झाकून ठिवलं व्हतं. त्येला पानी लागलं आसतं तर सारं खराब झालं आसतं. खरंम्हंजी सदाशिवनं न्हेमीपरमनं पाऊस सुरू होन्याआदुगरच घराचं छप्पार सारखं केलं व्हतं. तरीबी कुठं ना कुठं कमी ऱ्हायलीच व्हती. सुमती आन् पूनमनं बेगीन पुढं होवून जिथं जिथं पानी गळत व्हतं तिथं घरातली बारीक सारीक भांडी नेवून ठिवली. सदाशिवनं सीढी लावून छपरातनं पानी गळत व्हतं तिथले नळे सारके केले. बरीच म्हेनत केल्यावर शेवटाला छप्पार गळायचं बंद झालं. दरवर्साला पयल्या पावसात हिच गत व्हायची. ही परिस्थिती त्येंच्यासाठी नवीन न्हवती. छप्पार कितीबी ठीक केलं तरी कायना काय तरी कमी ऱ्हायचीच. घरभर ओल पसरल्यानं रात्री निवांत झोपनंबी कठीण होवून गेलं.
सतत चार दिस पाऊस पडत व्हता. शेतात बरंच पानी साटलं व्हतं. या चार दिवसांत तिघांनी मिळून शेतातले गेल्या वर्साच्या पीकाचे उरलेले तण काढून जमीन साफ केली. आता आजू बाजूच्या शेतकर्‍यानीबी शेतीच्या कामाला सुरूवात केली व्हती. चार दिसांनंतर पावसानं थोडी उसंत घेतली. दळ्यातलं पानी थोडं कमी झाल्यावर सदाशिवनं नांगरणी कराया सुरूवात केली. त्येच्याकडे बैलजोड नव्हती, म्हनून दोघं नवरा बायको खांद्यावर नांगराचं जोखड ठिवून खेचत आन् मागनं पूनम नांगराचा फाळ धरी. सुमती जोखडाच्या भाराने थकली कि पूनम बापाला साथ देई आनि सुमती नांगर सांभाळी. अशा तऱ्हेनं लई कष्टानं तिघांनी मिळून पंधरा दिवसांत ऊसाची लावणी पूरी केली.
यावर्साला वरूणराजानंबी त्येंच्यावर किरपा केली आन् ऊसाचं पीक चांगलंच बाळसं धरू लागलं. डोलणारं शिवार बघून आसं वाटायचं कि काळी भूमाय हिरवं लुगडं नेसून साक्षात समोर उभी हाय. सदाशिवला आपल्या घामाचं चीज झाल्याचं जानवत व्हतं. मधीच कधी सदाशिव शेतात जावून किटकनाशकांची फवारणी करी तर कधी खताचा शिडकाव करी. सुमती आनि पूनम दळ्यात उगवणारं मोकाट तण उपटून टाकीत. दिवसागणिक ऊस आपली उंची गाठत व्हता. शेतकरी संघटनेनं यावर्सावला ऊसाचा दर वाढीवन्याची सरकारकडं मागणी केल्याचंबी कानावर येत व्हतं. संघटनेचे अध्यक्ष संजूभाई कुट्टी ऊसाच्या दरवाढीसाठी सरकारवर दबाव टाकीत व्हते. त्याचबरूबर साखरकारखान्यांच्या मालकांसोबतबी बोलनी सुरू व्हती.
शिवारात डोलणारं ऊसाचं पीक बघून सदाशिवबी आनंदानं डोलत व्हता. पीकाकडं बघून त्यों मनातल्या मनात सपान रंगवीत व्हता. सावकाराचं कर्ज फेडून पूनमचं लगीन या वर्साला व्हईलच आशी त्येला खात्री व्हती. जमलंच तर एखादा बैल इकत घेन्याचाबी त्येच्या मनात इचार व्हता. पूनम लगीन होवून सासरी गेल्यावर जोखडासाठी कमीत कमी एक बैल तरी त्येला लागनार व्हता. इकडं ऊस जोमानं वाढत व्हता आन् तिकडं शेतकरी संघटनेचंबी आंदोलन जोरात सुरू व्हतं. जोवर सरकार आनि साखर कारखानदार ऊसाचा वाढीव दर जाहीर करत न्हाईत तोवर एकबी शेतकरी शेतातला ऊस तोडनार न्हाई, आसं संजूभाई कुट्टीनं जाहीर केलं. सरकार आनि कारखानदार मात्र संघटनेच्या या मागणीकडं जानिवपुर्वक दुर्लक्ष करत व्हते. ज्यामुळं आंदोलन आजूनच चिघळू लागलं. ऊस आता तोडनीला तयार झाला व्हता. पन् संघटनेच्या इरोधात जावून ऊस तोडणी करायची कोणाचीबी बिशाद नव्हती. ह्ये आंदोलन आनखीन किती दिवस चालनार, ह्येचा कायबी अंदमास येत न्हवता.
सतत तीन वरीस नैसर्गिक संकट आन् हत्तींच्या हैदोसानं शेतकरी आदुगरच मेटाकुटीला आले व्हते आन् आता हये नवं मानव निर्मित संकट त्येंच्यासमूर आवासून उभं ठाकलं व्हतं. बाकी शेतकर्‍यां परमानेच सदाशिवचाबी धीर खचत चालला व्हता. यावर्साला देवाच्या किरपेनं शेतात ऊस दिमाखात डोलत व्हता. पन् शेतकरी संघटना आनि सरकार ह्येंच्यातल्या लढाईत बिचारा गरीब शेतकरी मातुर हवालदिल झाला व्हता. ऊसाचं पीक शेतात आडवं होत आसलेलं बघून सदाशिवला आपली सारी मेहनत वाया जातेय की काय, आशी धास्ती वाटू लागली. डोक्यावर सावकाराच्या कर्जाचे ओझेबी व्हतं. शेवटाला एक दोन दिवस वाट बघून नाईलाजानं त्येनं ऊस तोडणीला सुरूवात केली. सारा ऊस तोडून झाला तरीबी संघटनेच्या मागणीवर कायबी तोडगा निघाला नाय. सदाशिवनं हिंम्मत करून तोडलेला सारा ऊस भाड्यांच्या ट्रॅक्टरवर लादला आनि घाबरत घाबरतच ट्रॅक्टरचा ताफा घिवून जवळच्या साखर कारखान्याच्या दिशेनं जाण्यास निघाला. वाटेत त्यो सारखा देवाचा धावा करीत व्हता, कसंबी करून ऊस साखर कारखान्याच्या आवारात पोहचू दे. मधीच वाटेत कुठलं संकट आलं नाय म्हणजे झालं.
आरदा रस्ता पार केला आसंलनसल तोच सदाशिवच्या नशीबानं त्येला पुन: दगा दिला. त्येच्या मनातली शंका खरी ठरली. संघटनेच्या कार्यकरत्यांनी सदाशिवचे ऊसानं भरलेले ट्रॅक्टर आरद्या वाटेतच आडीवले. दिवसभर ट्रॅक्टर रस्त्याच्या कडंला आडकून उभे व्हते. जर अशा तर्‍हेनं ट्रॅक्टर रस्त्यात फसून ऱ्हायले तर सदाशिवला त्येंचं भाडं परवडणारं नव्हतं. सदाशिवनं आंदोलनकर्त्यांची लई इनवनी केली. पन् त्येंचं आसं सांगनं व्हतं कि संघटनेच्या नेत्यांचं सरकार सोबत शेवटाचं खलबत सुरू हाय. आज सांजच्याला काय तो निकाल व्हईल, तोवर त्ये एकबी ट्रॅक्टर तिथनं हालू देणार न्हाईत. सदाशिव हतबल झाला.
सांजच्याला उशिरानं नेत्यांची बैठक संपली. सरकारनं ऊसाला संघटनेने मागितलेला दर देन्यास साफ नकार दिला, ह्ये समजताच आंदोलनकारी जास्तच भडकले. त्येंनी रस्त्यात आडीवलेल्या गाड्यांची नासधूस कराया सुरूवात केली. काही जणांनी ऊसानं भरलेल्या ट्रॅक्टरना आगी लावाया सुरूवात केली. समदा राजकारनाचा डाव चालला हुता. पन् ह्या खेळात बिचारा शेतकरी होरपळून निघत व्हता. सदाशिवची सारी मेहनत त्येच्या डोळ्यांदेखत स्वाहा होत व्हती. घाम गाळून पिकवलेला ऊस आगीत असा धूं धूं करत जळताना बघन्यापलिकडं त्यो कायबी करू शकला नाय. अचानक त्यो जागचा उठला आन् येड लागल्यागत वरडत डोईवरनं काढलेल्या पंचानं आग इझवन्याचा प्रयत्न कराया लागला. आजुबाजुच्या लोकानी त्येला मागं खेचलं नसतं तर त्योबी त्या आगीत व्हरपळून निघला आसता.
रातच्याला बर्याच उशिरानं सदाशिव आपलं लोंबकळतं शरीर मोठ्या हिंमतीनं कसंबसं घराकडं फरफटत घिवून आला. त्यो पुरता काजळीनं माखला व्हता. अंगावर कपड्याची आर्धवट जळलेली लक्तरं लोंबत व्हती. त्येचं ते भयानक रूप बघून सुमती आनि पूनम पार हादरून गेल्या. त्यांनी त्येला आधार देवून कसंतरी घरात घेतलं. घरात शिरताच सदाशिवचं गलितगात्र शरीर धडामकन् बाजल्यावर कोसळलं. त्येची नजर छताला खिळली व्हती. त्यो तोंडातल्या तोंडात कायतरी पुटपुटत व्हता, “समदं संपलं...... समदं संपलं. बेन्यांनी समद्या ऊसाची राखरांगोळी केली. कायबी शिल्लक न्हाई र्‍हायलं. जगन्याचा आधारच संपला. आता ह्ये घर-शिवार सारं सावकार ताब्यात घेईल. जगन्यासाठी उरलंच काय आता? ट्रॅक्टरचं भाडंबी देवू शकनार नाय मी. आता माझ्या लेकीचं लगीन कसं व्हनार? तुम्हास्नी खायाला काय घालू आता मी?”
सदाशिवच्या एकाबी प्रश्नाचं उत्तर सुमती आनि पूनमकडं न्हवतं. ती दोघं त्येला मिठी मारून हमसाहमशी रडत व्हती. त्येंना बेतलेल्या भयानक परिस्थितीची जाणिव व्हती. कशाच्या आधारावर ती दोघं त्येला धीर देनार व्हती? ती दोघंबी पार खचली व्हती. तरीबी सुमती धीर करून जागची उठली आनि सदाशिवसाठी पियाचं पानी घेऊन आली. त्येच्या तोंडाला कोरड पडली व्हती. पूनमनं आधार देत सदाशिवला बाजल्यावर उठून बशिवलं. सुमतीनं पान्याचं गिलास त्येच्या व्हटाला लावलं. पान्याचा एक मोठा घोट घेवून सदाशिवनं गिलास हातात धरला. गिलासाकडे एक टक बघताना त्येच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत व्हते. भवतिक त्यो कसलातरी ठाम निर्णय घेत व्हता.
सदाशिवनं हातातला गिलास बाजल्यावर ठिवला. शेजारी बसलेल्या सुमती आनि पूनमचे हात हातात घेवून त्यानं हळू आवाजात दोघींना इचारलं, तुम्ही दोघी माझ्या सोबत मरायला तैयार हायत. या नरकात यापुढं जगनं माझाच्यानं शक्य हुनार नाय. मी माझं जीवन संपवायचं ठरीवलंय. तुम्हा दोघीस्नी आसं वाऱ्यावर सोडून म्या गेलू तर माझा आत्मा तडफडत ऱ्हाईल.” सदाशिवचा आवाज खोल दरीतनं येत आसल्यावानी वाटत व्हता. सुमतीच्या घश्यातनं हुंदका भाईर पडला. दोघा माय-लेकीनं सदाशिवला मिठी मारली. सदाशिवनं दोघींनाबी छातीशी घट्ट कवटाळलं. त्येच्याबी डोळ्यातनं आसवं पाझरत व्हती.
पूनमनं रडत रडत इचारलं, बाबा, तू असा येड्यावानी का बोलतूया, दुसरा कायबी उपाय नाय काय? सदाशिवनं नकारार्थी मान हालिवली. “परिस्थितीशी म्या लई लडलो पोरी आन् तुमीबी मला चांगली साथ दिलीसा. पन् कायबी उपेग झाला नाय बघ. आता जगन्याचे सगळे मारगच बंद झाले हाईत. मरन्याशिवाय दुसरा उपाय न्हाई. आन् तुला एकटीला ह्या वंगाळ दुनियेत सोडून पन् जाता येत न्हाई.” पूनम, सुमती आनि सदाशिवला आणखीच घट्ट बिलगली. तिला समजत व्हतं कि आई-बाबावीना तिला या दुनियेत जगनं सोपं न्हाई. बराच येळ तिघंबी एक होवून तशीच आसवं ढाळीत ऱ्हायली.
आरदी रात उलटून गेली व्हती. सदाशिवनं दोघींनाबी अलगद बाजूला केलं. त्यो बाजल्यावरनं उठला आनि मागल्या पडवीत ठिवलेला किटकनाशकाचा कैन घेवून आला. येताना सोबत दोन गिलासपन आनले. पूनम सुमतीच्या कुशीत डोकं खुपसून हुंदके देत व्हती आन् सुमती भकास चेहऱ्यानं लेकीच्या डोईवरनं शेवटचा मायेचा हात फिरवित व्हती. सदाशिवनं त्येंच्याकडं बघन्याचं टाळलं. बाजेवरला गिलास उचलून. त्येनं तिन्ही गिलास किटकनाशकानं भरले, तशी पूनम उठून बसली. सदाशिवनं एक गिलास उचलला आनि एका झटक्यात घशात खाली केला. त्येच्या मागोमाग सुमतीनं आन् पूनमनंबी आपआपले गिलास उचलून रिते केले. सदाशिवनं पुन्हा तिन्ही गिलास भरले. भवतिक तिघांपैकी कुनी जिवंत ऱ्हाया नग ह्येची खबरदारी त्यो घेत व्हता.
दुसऱ्या दिवशी सकाळी सदाशिवच्या घराकडें सामसूम बघून शेजारच्यांना शंका आली. आदल्या दिवशी त्याचे ऊसानं भरलेले ट्रॅक्टर जाळल्याचं गावकऱ्यांना म्हाईत आसल्यानं त्यांनी तिकडे धाव घेतली. पन् लई उशीर झाला व्हता. नियतनं आपला डाव साधला हुता. परिस्थितीशी लढता लढता शेवटी हरल्यानं एका शेतकऱ्यानं आपल्या कुटुंबासकट आपलं जीवन संपवलं हुतं. त्येच्या संसाराच्या येलीवर उमललेलं फूल फूलन्या आदुगरचं फांदीवर सुकून गेलं हुतं. पूनमच्या लग्नाचे मनसुबे त्या तिघांच्या चितेबरोबरच राख झाले व्हते. घानेरड्या राजकारनानं घाम गाळून रयतेची खळगी भरनाऱ्या बळीराजाचा त्येच्या कुटुंबासकट वळी घेतला हुता. नंतर थोड्याच दिवसांत सरकारनं ऊसाची दरवाढ जाहीर केली, पन् सदाशिवच्या कुटुंबाच्या त्ये काय कामाचं?