मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

सुरुवातीस जरा वाईट वाटायचे! माझ्या मायदेशासाठी मी लढतो आहे हा गुन्हा होतो? कोण हे ब्रिटीश लोक? माझ्या देशांत येतात, आणि माझ्या मातृभुमीसाठी लढणा-या मलाच तुरूंगांत टाकतात? त्यांच्या ताटाखालचे मांजर झालेले, स्वत:ला देशप्रेमी म्हणवुन घेणारे माझेच बंधु बांधव शांततेचा डांगर पीटतात? विश्वाच्या कोणत्याही न्यायालयांत हा अर्ज नेला तरी जे होते आहे ते अन्याय्य आहे हेच ते सांगतील. म्हणुनच कधी कधी प्रकर्षाने वाटते की छेः, या नीच मानहानीत जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे ! आयुष्यभर एखाद्याला एकाच अंधारकोठडीत डांबुन ठेवले ना, तरच कळतील या तीव्र भावना! दिवसभर कोलू फिरवुन, आणि वीस वीस पौंड तेल गाळुन, दररोज संध्याकाळी थकव्याने तोल जात असतांना मी जेव्हां माझ्या कोठडीत परतत असे, त्या प्रत्येक सुर्यास्ताला सामोरे जावुन मी मनांत म्हणत असे, "आता पुरे झाली ही छळणुक! ह्या सा-यांतुन क्षणांत मुक्त व्हावे हे आयुष्य संपवुन!" मग माझे दुसरे मन म्हणयचे: " अरे भेकडा! आतापर्यंत एव्हढा त्याग केला आहेस, जरा मनावर ताबा मिळव आणि ह्या मानापमानाचे जोखड मनावरुन फेकुन दे बघु! योगायोगाने मरणाच्या आधी सुटलास तर ऊरलेले आयुष्य देशसेवेत तरी घालविता येईल असे मरुन जाण्यापेक्षां!" माझे दुसरे मन निग्रही होते. त्याचा नेहमीच विजय होत असे. माझ्यासारखेच मनांत विचार येणारे इतरही राजबंदी तेथे होते!
मी अंदमानला असतांना घडलेली एक घटना! ही गोष्ट आहे ईंदुभूषण राय नांवाच्या एका अगदी तरुण पंचविशीतल्या मुलाची! माझ्यासारखा तोही राजबंदी होता. इंदुभूषण रायला माणिकतोळा कटात १० वर्षे शिक्षा झाली होती. बंदीगृहात असता त्यासही घाण्याची नि इतर कष्टांची रुची माझ्याबरोबरच चाखावी लागली होती.

.अंदमानच्या त्या भयानक तुरूंगांत सगळ्याच गोष्टी "सर्व साधारण" या व्याख्येत बसणा-या नसायच्या! राजबंदीवान आजारी पडला तर त्यास त्या आजारी होण्याचाही एखाद्या अपराधासारखा दंड द्यावा लागे, कारण त्यास लगेच तापात रेच वा जुलाब होत असता, आपले अंथरूण डोक्यावर घेऊन, आपली थाळी हातात घेऊन, दोन-चार-पाच मैल चालत परत त्या सेल्युलर तुरुंगाचे भीषण दार पाहावे लागे नि आत येताच कोठडी बंद होऊन पडावे लागे ! त्या त्रासास इंदुभूषण कंटाळून गेला होता. आजारी पडणे हा देखील ’बारी-कायद्या’प्रमाणे गुन्हा होऊ शकतो ह्याची त्यास प्रथमच जाणीव झाली.

एकदां असेच झाले. बिचा-यास रेच होत होते. जुलाबांनी तो अगदी हैराण होवुन गेला होता. तीन चार मैल तशाच अवस्थेत चालुन आल्यानंतर त्यास बंदीगृहात कोंबण्यात आले. तो येताच बारी म्हणाला - "काय तू परत आलास! तुला काय वाटते की बाहेर काम इनकार केले म्हणजे कारागारात कोठडीत बंद होऊन सुखाने पडता येईल? छट्, जाव इसको कोलूमें ले जाव !" झाले, इंदुभूषण यांस तसेच नेऊन घाण्यास जुंपण्यात आले ! तो बिचारा वैतागून गेला. संधि साधुन आम्ही त्याच्या जवळ गेलो. आजुबाजुस कुणी नाही असे पाहुन आम्ही त्यास पुष्कळ धीर दिला. म्हणालो: "अरे तुला तर दहा वर्षेच शिक्षा आहे, आमचेकडे पहा. आम्हाला तर जन्मठेप ! तु निदान दहा वर्षांनी सुटशील तरी! आम्ही मात्र इथेच कुजत मरणार आहोत. आमचेपेक्षां तुझी स्थिती अधिक चांगली! तेव्हा आमचेकडे पाहून तरी मनास धीर दे." त्याच्या चेह-याकडे पाहातां, आमचे बोलणे त्यास कितपत पटले, याबद्दल मी साशंकच होतो.

संध्याकाळी तेल घेऊन जाताना मी त्यांस गुप्तपणे भेटलो. चारच शब्द बोलू शकलो. तो म्हणाला, तो नेहमीच म्हणे, "छेः या नीच मानहानीत जिवंत राहण्यापेक्षा मेलेले बरे !" मी पुन्हा त्यास धीर दिला नि म्हटले, "स्वदेशासाठी स्वार्थ, प्राण यांचा त्याग करणे हे जसे कर्तव्य, तसेच बंधो ! मानाचाही त्याग करणे हे देखील कर्तव्यच आहे ! तू अजून पंचविशीचे आत-बाहेर माझ्या- सारखाच आहेस. नि माझ्याहून तुला सुटण्याची आशा पुष्कळ आहे ! तर धीर धर. सध्या कष्ट सोसून जग, कारण पुढे सुटताच पुनः देशमातेची सेवा करता यावी". असे घाईघाईने चार शब्द बोलणे झाले. कुणी बोलतांना पाहिले असते तर मला अजुन वीस पौंड तेल काढण्याची शिक्षा झाली असती! स्वातंत्र्याची किंमत रोज क्षणाक्षणाला कळत होती. घामाबरोबरच तेलदेखील गळत राहायचे!

माझ्या अशा बोलण्यावर त्याने तसेच दोन-चार दिवस काढले. त्या दिवसांत तो रोज संध्याकाळी घामाने चिंब झालेला, अंगावर पिसलेल्या खोब-याची भुसी केसापासून पायापर्यंत चिकटलेली, पायात बेडी खळखळत आहे, वीस-वीस पौंड तेलाची बादली उचलून नि खांद्यावर भुसीचे पोते घेऊन वाकत उघडा-वाघडा चाललेला इंदु मला दुरून दिसत असे. आम्ही सगळेच तसे चालत आलो होतो. ह्या अंदमानने आम्हास अकाली वृद्धत्व आणले होते! त्याच्याशी बोलल्यानंतर तो थोडासा स्थिरावला आहे असे मला वाटले. मात्र तो अधिक अबोल झाला आहे असेही मला वाटले. कदाचित त्यास माझे बोलणे पटले असावे! ईंदू खुपच भावनाप्रधान होता हे मात्र बरीक खरे!

अजुन एखादा आठवडा सहज निघुन गेला असावा. एक दिवस सकाळी कोठड्या उघडल्या जाऊन आम्ही जो बाहेर पडतो तो वार्डर गुपचूपपणे मला एका बाजुस घेवुन गेला आणि तो म्हणाला: "मी आपणांस जे सांगणार आहे ते ’मी’ सांगितले असे कुणास सांगणार नसाल तर एक बातमी द्यायची आहे." अर्थात मी त्यास तसे आश्वासन देतांच त्याने मला सांगितले की "इंदु काल फाशी खाऊन मेला !"


माझ्या डोक्यावर घणाघात होतो आहे की काय असे मला वाटत राहिले. अवाक झालो, थक्क होऊन मी उभा राहीलो. काय बोलावे तेही कळेना! किंबहुना मोठ्याने बोलण्याची देखील सोय नव्हती! अडणे तर शक्यच नव्हते! त्या अंदमानने मला शिकविले की ईंग्रजांनी माझे आणि माझ्या देशाचे स्वातंत्र्य तर हिरावुन घेतलेच आहे पण माझ्या सहकारी मित्राच्या मृत्युवर अश्रु ढाळणेही माझ्याकडून हिरावुन घेतले आहे. मोकळेपणी रडतां न येणे यासारखे दु:ख नाही! आता काल संध्याकाळी धडधाकट शरीराचा जो तरुण, कोठडीत बोलत-बोलत बंद झाला. सकाळी उठून पाहताच तो आपल्याच कपड्यास फाडून त्याच्या केलेल्या दोरीने स्वतः फाशी खाल्लेला, मान मोडलेली, जीभ निघालेली, दोनही पाय ढिले लोंबकळते, असा फासाला टांगून वरच्या खिडकीशी मेलेला लोंबत आहे ! त्या मानी तरुणास अपमानास्पद जीवनापेक्षा मरण अधिक सुखकर वाटले.

जिकडे तिकडे काळी छाया पसरलीशी दिसू लागली. त्या तुरुंगात असे फाशी खाऊन कोणी ना कोणी तरी सरासरीने दोन महिन्यांतून एकदा मरत असे. पण राजबंदी असा तोच पहिल्याने फास खाऊन मेला. मन म्हणू लागले,

"विनायका, तुझीही गत एक दिवस अशीच होणार. दहा वर्षांस कंटाळून तो मेला. तुला तर पन्नास वर्षे शिक्षा आहे! म्हणजे तुला मेल्यावाचून सुटकाच नाही."

 - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
[समग्र सावरकर वाङमय - खंड-2, 2001, चरित्र-आत्मवृत्त (भाग-2), माझी जन्मठेप, पान-122-123]

टीप: वरील संदर्भावरुन शक्य असेल तेथे मुळ शब्द तसेच ठेवुन एकपात्री प्रयोगासाठी केलेले रूपांतर

शशिकांत पानट

मानहानी मे ७-२०१५

shahi@panat.org