मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

आमच्या मागे कुरळ्या केसांचे, हाफ प्यांट घातलेले मयेकर उभे होते. चेहऱ्यावर मनमोकळ हसू. अगदी नारळी-पोफळीच्या बागांसारखं.
आम्ही मयेकरांची "भाऊ" ही गोड हाक ऐकून दुपारचं जेवण मयेकारांकडेच घेतलं.
"भाऊ, आज बोइटा घावाला आहे " असं म्हणून त्यांनी ताटात बोइटा हा मासा वाढला. आम्ही तो पहिल्यांदाच पाहत होतो.
आम्ही पुढील पाचही दिवस मायेकरांकडेच जेवत होतो. मयेकर दोन्ही जेवणाला " भाऊ, सोलकढी देवू का अजून ?" असं आग्रह करत होते.
मुरूडच्या समुद्र किनानार्यावर अप्पा हे वयस्कर मालक "किनारा" गेस्टहौस चालवत होते आणि त्यांनी पुढची मोठी ग्यालरी मयेकरांना खानावळ चालवण्यासाठी दिली होती. मुरूडमध्ये पर्यटक फक्त शनिवार-रविवारी यायचे. आम्ही ते वार टाळले होते. त्यामुळे मयेकरांकडे फक्त आम्हीच गीऱ्हायिक होतो.
त्यांनी मला "भाऊ " आणि पत्नीला " वहिनी " करून टाकलं होतं. आपोआपच मयेकर आमचं नाव-गाव न विचारताही जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखे मनमोकळ्या गप्पा मारत होते.
समोर अथांग सागर पसरलेला होता. त्याच्या लाटांची गाज आमच्यापर्यंत येत होती.
मयेकर सांगू लागले. " समोर समुद्रात एक किल्ला दिसतो. अनेकजण यालाच आधी जंजिरा समजतात. पण हा कांसा किल्ला. कासवासारखी पाठ असलेला खडक इथे होता. सिद्दीच्या जंजिरा किल्ल्यावर ताबा ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. म्हणून या किल्याला कांसा नाव पडलं. पद्मदुर्ग असही नाव किल्ल्याला आहे. पण पर्यटकांना हे माहित नाही. जेव्हा लोक जंजिर्याला जातात तेव्हा त्यांना जंजिरा कोणता ते कळतं.... पण कांसा उध्वस्त झाला. तिथे कोणी जात नाही."
आमची सुट्टी संपली. मयेकरांचा निरोप घेवून आम्ही निघालो.
त्यानंतर ५ वर्षाने पुन्हा मुरुडला गेलो. बसमधून उतरल्यावर सरळ "किनारा" गेस्टहौस गाठलं. पण पाहतो तर काय, "किनारा" बंद पडलं होतं. मनात प्रश्न आला, मयेकर कुठे गेले?
शेजारच्या नारळ पाणी विकणाऱ्याकडे चौकशी केल्यावर त्याने बोट दाखवले. समुद्र किनार्यावर मयेकरांना एक भाड्याने जागा मिळाली होती. वर नारळाची झाडे होती आणि खाली मयेकर झापाच्या घरात खानावळ चालवत होते. त्यादिवशी मुरूडमध्ये चांगली गर्दी जमली होती. त्यामुळे कुरळ्या केसांचे मयेकर भराभर हात चालवत होते. अनेकजण जेवत होते. आम्ही दोघे मयेकरांसमोर उभे राहिलो. पण मयेकरांनी ओळखलं नाही. शेवटी आम्हीच ५ वर्षापूर्वीची ओळख सांगितली. मयेकरांना खूप आनंद झाला. आपल्याला कोणी तरी शोधत आलं हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मग मयेकरांनी आम्हाला पुन्हा एकदा प्रेमाने जेवू घातलं आणि सोलकढीचा आग्रह केला.
उद्या आम्ही सकाळी पहिल्या बसने निघणार हे आम्ही गप्पा मारताना मयेकरांना सांगितलं. तोवर रात्रीचे १० वाजले होते. मयेकरांनी पटापट खानावळ बंद केली आणि आम्ही त्यांचा निरोप घेवून निघालो.
दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही बसमध्ये बसलो होतो. बसची घंटी वाजली आणि इतक्यात मयेकर बस स्थानकात "भाऊ!!" अशी हाक मारत धावत धावत शिरले. त्यांच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी होती. आम्हाला वाटलं आम्ही काल त्यांच्या खानावळीत काहीतरी विसरलो. घाईघाईत त्यांनी खिडकीतून पिशवी माझ्या हातात दिली आणि तोवर बस निघाली. मयेकरांना टाटा करेपर्यंत बस बाहेर पडली.
आम्ही पिशवी उघडून पाहिलं तर आत मुरुडचे पेढे होते. मयेकरांनी ते प्रेमाने भेट म्हणून दिले होते. आम्ही इतक्या वर्षानीही त्यांची आठवण ठेवली याचा त्यांना आनंद झाला होता, म्हणून ते सकाळी पेढे घेवून बस स्थानकावर आले होते. पण बस सुटल्यामुळे आम्हाला त्यांच्याशी दोन शब्दही बोलता आले नाहीत.
तिसर्या वेळी खास मयेकरांना भेटायला आम्ही मुरुडला गेलो. पण मुरुड आरपार बदललं होतं. मुरूडच्या सागरी किनार्याला लोक चौपाटी म्हणू लागले होते. किनार्यावर हॉटेल उभे राहिले होते आणि मयेकरांच्या खानावळीवर एक इमारत उभी राहिली होती. मुरुडचा रस्ता आता पूर्वीसारखा मोकळा राहिला नव्हता. तिथे पार्किंगच्या जागा तयार झाल्या होत्या. या सगळ्या पसार्यात, tourist च्या गर्दीत मयेकर कुठे गेले होते कोणालाही माहित नव्हतं. पानवाल्याला विचारलं, तर तोच उत्तर प्रदेशचा निघाला. मयेकरांची त्याला काय माहिती असणार?
त्या सगळ्या गर्दीत सागरी किनारा आणि मयेकर हरवून गेले होते.
जेवण्यासाठी आम्ही एक हॉटेल निवडलं. वेटर आला तर त्याच्या गळ्यात चक्क टाय लावलेला होता आणि त्याने "सर" म्हणून सुरुवात केली. नंतर त्याने जेवण आणलं खरं पण त्यात मयेकरांसारखा आपलेपणा नव्हता. सोलकढी होती पण ती नारळ-कोकमापेक्षा पाण्याची जास्त होती आणि आणखी सोलकढी घ्या असा आग्रह नव्हता. उलट एक्स्ट्रा सोलकढीला जादा चार्ज पडेल असा इशारा दिला होता.
गाड्या आल्या. पाहुणे tourist झाले. फोन आले, बुकिंग सुरु झालं. हॉटेल आले आणि खानावळ संपली. मुरूडची मुंबई झाली. मयेकर गायब झाले आणि "भाऊ" ही हाकही घेवून गेले. विसंगती अशी की जेव्हा चांगली माणसे होती, तेव्हा फोन नव्हते आणि कॅमेराची सोय नव्हती. आता फोन-कॅमेरा आणि social media आहे तर चांगली माणसे नाहीत. मयेकरांचा फोटो असता तर आज what’s app वरून फिरवला असता. कदाचित मयेकर पुन्हा एकदा सापडले असते आणि
" भाऊ, तुम्ही मला शोधत आलात !!" असं म्हणून त्यांनी आम्हाला पुन्हा आग्रह करून सोलकढी पाजली असती. पुन्हा एकदा पेढे दिले असते.
नाहीतरी हेच खरं आहे की साधीभोळी माणसं ही सोलकढी किंवा पेढे असतात. काही दिवस टिकतात आणि नंतर आठवणी मनाच्या कोपर्यात ठेवून निघून जातात. या आठवणीना भेटायला कोणत्याही पत्त्याची-फोन नंबरची गरज लागत नाही ही परमेश्वराने दिलेली फार मोठी facility आहे !!
-निरेन आपटे