नटसम्राट एक असामान्य चित्रपट !
नुकताच नटसम्राट हा चित्रपट बघितला,ओळखीच्या विषयाची अनोखी कलाकृती ! मनावर बिम्बणारा,विचारांना चालना देणारा एक अदभूत अनुभव ! पाणावलेल्या डोळ्यांनी अन भारावलेल्या मनांनी आम्ही चित्रपटगृह सोडले. विचारांचे वादळ चालूच होते. नाना पाटेकरांचा उत्कृष्ट अभिनय हे या सिनेमाचे वैशिष्ट्य होते हे निश्चित. त्यांच्या भूमिकेला अनेक पैलू होते. नाटकांवर, अभिनयावर अतिशय प्रेम करणारा एक उत्तम नट,कुटुंबावर प्रेम करणारा व मुलांवर विश्वास ठेउन भोळसट्पणे आपले घर, पैसे देऊन टाकणारा एक बाप ,दारूचे व्यसन लागलेला एक व्यसनी माणूस,नातीबरोबर लहान होउन तिच्याबरोबर रमणारा,मित्रावर नितांत प्रेम करणारा,बायकोला मानाने वागवून तिच्याशी मिश्किलपणे वागणारा, अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे अतिशय मानी असलेला एक माणुस. हे सगळे अभिनयाचे पैलू त्यांनी अगदी सहजतेने पार पाडले. माझ्या मते हा सिनेमा यशस्वी होण्याचे बरेचसे रहस्य त्याच कथानक व पटकथा,संवाद यात आहे. कुसुमाग्रजांची कथा, किरण यादन्योपावीत,अभिजित देशपांडे व महेश मांजरेकर यांचे संवाद याबद्दल त्यांना त्रिवार वन्दन. या कथानकाच वैशिष्ट्य म्हणजे यातील काही माणसे वागायला चुकली तरी त्यांच्यातले गुणही दाखवले आहेत व नटसम्राट यांचे सगळेच बरोबर होते हे दाखवले नाही.त्यांची दोन्ही मुलं आहे ती परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या मतांनी निर्णय घेत असतात.पण या निर्णयाननी मोठ्या माणसांची मने दुखावली जाताहेत याचा विचार ते करत नाहीत.
सर्व माणसांना एकमेकांना समजून घेण्याची पात्रता नसते व आहे त्या परीस्थ्तीतीत जुळवून घेण्याची क्षमता नसते हाच बोध आहे. शिवाय आपले घर व पैसाअडका आपल्याकडे शेवटपर्यंत बाळगावा असेही यात सुचवलेले आहे. अनेक विचार नकळत मनात येतात. शिव्या या क्वचित प्रेमाने वापरल्या जात असल्या किंवा लावणी हे लोकनृत्य एक उत्तम कलाकृती असली तरी नऊ दहा वर्षाच्या मुलीला शिकवणे योग्य आहे का?पण फक्त यासाठी वेगळे होण्याचा निर्णय घेणे योग्य आहे का? आणि सून म्हणत होती कि ते दुसरीकडे जातील तर नातीच्या सोयीसाठी किंवा आपल्या मानीपणाने घर सोडणे योग्य होते का?मुलीने आपल्या आईवडिलांवर पैसे घेतल्याचा आरोप करणं अतिशय चुकीचे होते पण आपली बायको आजारी असताना भर पावसात निघून जाणं योग्य असतं का?सर्वात अभिमान श्रेष्ठ ठरतो. आपली अडगळ होते आहे अशा परिस्थितीत जगण्यापेक्षा मानाने जगणेच श्रेष्ठ ठरते या संबंधीचे म्हाताऱ्या नवरा बायकोंचे संवाद खूप छान आहेत शिवाय स्वतःच्या मुलांपेक्षा समजूतदार जावई,राजा बुतपॉलिशवाला ,चहा देणारी बाई यांचे प्रेम श्रेष्ठ ठरते. शेवटी हा कलाकार कोणाहीकडे राहायला न जाता त्याच्या आवडीच्या रंगभूमीवर मानाने प्राण सोडतो हा शेवट मनाला भिडतो.खूप आवडतो.
कथानक जरी चांगले असले तरी त्याला जिवंत करण्याचे काम कलाकार करतात.नाना पाटेकर यांचे काम उत्तम झाले आहे हे निर्वादित पण या सिनेमात सर्वच कलाकार त्यांच्या भूमिकेत समरस झाले आहेत. बुळचट मुलगा,फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करणारी सून,स्वतःलाच सर्व समजतंय अस वाटणारी मुलगी,नवऱ्याशी एकनिष्ठ असलेली बायको,समजूतदार जावई,नाट्यावर प्रेम असलेला पण यशस्वी न झालेला मित्र,इनामेईतबारे काळजी घेणारा राजा,विठ्ठल सर्वांचीच कामे जिवंत वाटतात.
पदोपदी मांजरेकरांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाची प्रचीती येते. पण प्रसिद्ध नट गणपतराव एकटे रस्याच्या कडेला बसले असताना कुत्र्यावर माया करतात हे दुष्य व म्हातारा म्हातारी रात्री पावसांत निघून जात असतात त्यावेळी गडी विठ्ठल त्यांना पाहतो पण अडवत नाही फक्त नमस्कार करतो हे दृश्य मनाला भिडते.
या चित्रपटाला व त्याच्याशी निगडीत असलेल्या सर्व मंडळीना त्रिवार नमस्कार.
कालच “ नट सम्राट” हा सिनेमा पाहिला आणि मनात अनेक प्रश्न उभे राहिले. म्हातारपण हे सगळ्यांनाच येतं आणि नवीन पिढी बरोबर आपले विचार –आचार जुळून येणं हे ही कठीणच असत, आणि जर का तुम्ही आपल्या कार्यकाळात फारच उच्च पदावर / उच्च सफलता गाठल्या असतील तर हे सगळं आणि कठीणच होतं . मग दोनच उपाय संभवतात: एक तर उरलेले आयुष्य विपरीत परिस्थिती सहन करत , तक्रार करत, अपेक्षा भंग होत असताना पाहत जगायचं आणि दुसरं म्हणजे स्वत:साठी एक सुंदर नवीन जग / वातावरण तैयार करायचे .
एक नवीनच जग जिथे तुम्ही तुमच्या राहून गेलेल्या इच्छा –अपेक्षा पूर्ण करायच्या. आणि ही तैयारी जर म्हातारपण येण्याचा आतच सुरु केली तर उत्तमच. जसं आपण आर्थिक द्रुष्ट्या म्हातारपणाची तैयारी करतो तशीच आपल्या मानसिक स्वास्थ जपण्याची पण पूर्व तैयारी केली तर ? एक नवीन जग म्हणजे कुठला ही एखादा छंद , जो तुम्हाला आनंद देतो, त्याच एक संगठण तैयार करायचं आपल्या मित्र मैत्रिणींसोबत एकत्र येऊन त्याचावर कार्य करायचं , आजच्या काळात किमान इमेलची सोय तरी सगळ्यांकडे असतेच तर त्याचावरच समूह करून आपले विचार मांडायचे, आपले अनुभव लिहून काढायचे आणि ते सुद्धा एखाद्या ब्लॉग वर प्रसिध्द करायचे.
जस जस वय वाढत जात तसं शारीरक क्षमता कमी होते आणि एकट घराच्या बाहेर पडणं, स्वत: वाहन चालवणं कठीण होतं अश्यावेळेस तुम्ही अश्या “ वर्चुअल “ जगात वावरून सुद्धा जीवनाचा आनंद घेऊ शकता. फक्त थोडीशी पूर्व तैयारी करायची म्हणजे हे अवस्थांतर भासणार सुद्धा नाही! आणि मुलं जवळ नाहीत , नातवंड स्वत:च्या जगात असतात , नवीन पिढी ऐकत नाही अश्या परिस्थीतीची आठवण सुद्धा राहणार नाही .ता.क. तुम्हाला तुमचं लिखाण, कलाकृती , संगीत इत्यादी प्रकाशित करायची इच्छा असेल तर ह्या इमेल kokatayash@gmail.com वर पाठवावी. कल्चर डेस्क ह्या पानावर प्रसिध्द केल्या जातील .
ऐश्वर्या कोकाटे