मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

निर्णय 


आपट्यांकडे  दिवाळी च्या पार्टी ला जायचे होते. त्यांची पार्टी म्हणजे १०-१५ लोकं. १६ व्या व्यक्ती ला आमंत्रण द्यायच्या आधी १६ वेळा विचार करून शेवटी नको रे बाबा .... उगाच करंजी चकली लाडू सुद्धा जास्ती करावे लागतील आणि अर्थातच खर्चाला खर्च नकोत असं सांगत आपटे  बाई गप्प बसायच्या.

अगदी पारंपरिक ड्रेस कोड आहे बरं कां .. असं मात्र बजावून सांगितलं होत .

आलमारी उघडून साड्या बघायला सुरुवात केली पण ह्या सगळ्या तर मागच्या वर्ष भरात घालून झाल्या आहे ... उगाच परत तेच फोटो एफ बी आणि इंस्टा वर नको. मग लक्षात आलं कि काही साड्या एका सुटकेस मध्ये आहेंत ज्या हल्ली नेसलेल्या नाहीत .

एक सुंदर हिरवी गार इंदोरी साडी सापडली आणि हीच साडी आज घालायची असं ठरवलं .

आमच्या इकडच्या स्वारींना (सामिनी मालिकेतलं हे नावं आवडलं म्हणून ) म्हणजेच उमेश माझ्या नवऱ्याला पण मॅचिंग लेहेंगा- झब्बा सांगते कारण मागच्या एका पार्टीत चिटणीस बाई आणि त्यांचे मिस्टर अगदी मॅचिंग कपल म्हणून मिरवत होते आणि चिटणीस बाईंचं तर विचारूच नका ... आम्ही कि नाही नेहमीच असं कोऑर्डिनेट करतो ... आणि मग ती कशी भारतात जाऊन बुटीक मध्ये कस्टम मेड करून घेते वगैर वगैरे ...

असो , उमेश ला बजावलं हिरव्या रंगाचा झब्बा घाल म्हणून. नेहमी प्रमाणे नवरदेव आधीच तैयार होऊन गाडीत बसले मी मात्र मॅचींग चपला आणि पर्स शोधत धावत पळतच गाडीत बसले. बघते तर नवरोबा ने नक्की कुठला रंग हिरवा समजून घातला हे भगवंतालाच माहिती असावं ... ह्यांच्या अख्या खानदानाचाच प्रॉब्लेम आहे, सांगितलं ते हमखास करायचं नाही. धूप छाव असा हिरवा निळा आकाशी अशे अनेक रंग असलेला हा झब्बा मला मॅचिंग नक्कीच नाही , इतका राग आला होता नं , पण आता भांडण करून काहीच उपयोग नाही म्हणून गप्प बसले ... दुसऱ्या बायकांचे व्हॉट्सऍप वर सूचना सुरु झाल्या ... लिव्हिंग इन फाईव्ह मिनिट्स , लेफ्ट इत्यादी .

फराळ , जेवण सगळं अगदी सुंदरच होतं, भरपूर पदार्थ होती. जेवण आटोपल्या नंतर नेहमी प्रमाणे गप्पा रंगू लागल्या आणि कुणी काय घातलं आहे , कुठून आणलं आहे , चिटणीस बाई ची कस्टम शिंपीण कशी सुंदर शिवते पुराण सुरु होऊन विषय कधी इकडल्या स्वारींकडे वळला कळलंच नाही .उमेश चा झब्बा साधारण हिरवा निळा आहे असं संदीप म्हणाला .... छे  अजिबात नाही मोरपिशी असं म्हणता येईल त्याची बायको आडवी आली.

मनोज अगदी अमेरिकन इंग्रजीत : आय थिंक इट्स सी ग्रीन , थोडक्यात सांगायचं म्हणजे तो १३ वर्षाचा असताना अमेरिकेत आला तेंव्हा आपल्या भावना इंग्रजीत जास्त चांगल्या व्यक्त होतात असं वाटत असणार. पण ह्या प्रजेच जितकं कौतुक करावं तेवढं कमीच. भारतात अगदी मराठी माध्यमातून शिकत असताना सरळ अमेरिकेतल्या वर्गात भरती झाल्यावर ह्या प्रजेला किती विपरीत परिस्थितीतून जावं लागलं असेल हे मात्र दुसरं कुणी समजूच शकत नाही.

आता मेहेंदळे काकूंनी आपलं मत दिलं : काही तरीच काय ? हा रंग साधारण गवती आहे .. ऐकून मात्र सगळे तीन ताड उडाले! गवती हा रंग असतो हे काहींना प्रथमच कळलं.

नाही हो आई , त्यांची सून पुटपुटली हा रंग ऍक्वा मरीन आहे. अर्थातच तिची सासू किती आगाऊ आहे हे तिला पटवून द्यायचं होतं.

काही तरीच काय.... हा रंग मोरपिशी आहे, मीना म्हणाली, इतक्या वेळ जणू एक डुलकी काढून मोरपीस बघतच जागी झाली असावी, कारण प्रत्येक पार्टीत ती अगदी मोजून मापून बोलत असते.

आमच्या सर्कल मधला एक अति शांत पण आईन्टीन पेक्षा थोडा कमी हुशार असा संदीप आपला फोन घेऊन उमेश कडे येत म्हणाला ही एक ऍप आहे आपण स्कॅन करून ते काय ठरवतं ते बघूया . 

आता मात्र सगळ्यांनाच आपण सांगितलेला रंगच त्या ऍप वर येईल अशी आशा वाटू लागली , स्कॅन केलं आणि उत्तर आलं : लाईट इस नॉट इनफ

आता चक्क उमेश ला हॉल च्या जिन्यावर आकाश कंदिलाच्या खाली उभं करण्यात आलं, उभ्या आयुष्यात कधी असं हि मॉडेलिंग करावं लागेल ह्याची त्याला कल्पनाही नव्हती .

काय गरज आहे ? मी सांगते नं .... हा निळसर हिरवा रंग आहे अशे निर्णायक भाषणं देणारी आणि कुणालाही फारसं बोलूच नं देणारी मुक्ता ने खणखणीत आवाजात घोषणा केली.

इकडच्या स्वारीचं आज काही खरं नव्हतं , अजून बुता सारखा कंदिलाच्या खाली निर्विकार पणे उभं रहाण्या पलीकडे गत्यन्तर नव्हतं .

 जेवण झालं असून सुद्धा एक लाडू तोंडात टाकत बंडू काका नि आपलं लेक्चर सुरु केलं , ते शाळेत प्राध्यापक म्हणून रिटायर झाले होते हे सांगायची गरजच नाही . 

त्याचं असं आहे कुठला हि रंग बघून आपल्या डोळ्यांच्या द्वारे  मस्तिष्कात ती संवेदना पोहोचते आणि ती दोघे एकत्र कार्य करून प्रकाशाला रंगात परिवर्तित करतात ...

आणि पुढे काही सांगणार तितक्यात बेबी काकी ओरडल्या: अहो ही काही शाळा भरलेली नाही आणि आपण रंग कसा बघतो हा प्रश्न नसून हा कुठला रंग आहे हे ठरवायचं आहे , हे न ऐकल्या सारखं करून काकांनी काढता पाय घेतला आणि पुनः एकलाडू खायला गेले .

इकडची स्वारी अजून कंदील खालीच ! मग त्यांचे परम मित्र जे कि वकील आहेत लगेच रेस्क्यू ला आले : त्याच असं आहे आपण सगळ्यांची मतं घेऊन झाली आहे आणि निष्कर्ष असा निघतो कि ह्या झब्ब्यात अनेक रंग दडलेले असून तो नक्की कुठला रंग आहे हा निर्णय आता पुढच्या भेटीत घेतला जाईल , सगळ्यांनी तेंव्हा प्रूफ आणायला विसरू नका . 

मोठ्या मुश्किलीने विषयांतर झाला आणि उमेश सुटला .

घरी येताना मात्र आम्ही दोघेही मौन व्रत धरून होतो . घरी पोहोचल्यावर उमेश ने तो सदरा काढला आणि म्हणाला: भर दिवाळी ची आज होळीच झाली आहे आणि ह्याचं कारण हा ........ रंगाचा झब्बा, आता कधीही हा झब्बा घालणार नाही हा निर्णय त्याने घेतला होता. मी मात्र पुनः विचारात गुंतले कि नक्की हा रंग हिरवा कि निळा कि ........

ऐश्वर्या कोकाटे 
लॉस एन्जेलिस