Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

क्षणात,'ये रे ये रे पावसा' म्हणत, कागदाच्या चिमुकल्या होड्या मनातल्या आठवणींवर तरंगायला लागल्या, पिसारा फुलवून आंब्याच्या वनात नाचणारे मोर खुणावू लागले,आणि आंब्याची आठवण आली म्हणून मागच्या चार पिढ्यांवर छाया धरून उभं असलेलं आणि माझ्यासाठी जगातलं सगळ्यात सुंदर असलेलं माझ्या घराच्या अंगणात उभं असलेलं प्रचंड मोठं आंब्याचं झाड डोळ्यापुढे उभं राहिलं. त्याच्या फांद्यांमागे मागे लपलेल्या कोकिळांचे आलाप कानावर आले. झाड पानोपानी मोहोरलेलं दिसतंय .त्याचा दरवळ सगळीकडे कसा भरून राहिलाय आणि माझ्या मनालाही त्यानं व्यापून टाकलंय. कालच महाशिवरात्र होती. आंब्याचा मोहोर शिवरात्रीला महादेवाला वाहायचा असतो. सातारला घराच्या बाहेरच्या पायरीवर उभं राहिलं की समोरच कोटेश्वराचं पेशवेकालीन देउळ दिसतं. लहानपणाची प्रत्येक आठवण त्या देवळाशी जोडलेली आहे.आज या पावसामुळे आठवणींना आलेला मोहोर घेउन माझा जीव त्या शिवाला भेटून आला. 'महाराष्ट्रमित्र' हे नाव अगदी यथार्थपणे धारण करणारं साताऱ्यातलं दीडशेहून अधिक वर्षं उभं असलेलं कोल्हटकराचं घर, आणि त्याला मायेची सावली देणारं आंब्याचं झाड, काळाचा ओघात नाहीसं झालं. काळ्या दगडांनी बांधलेलं कोटेश्वराचं सुबक, सुंदर देऊळ, मात्र कुणा श्रीमंत भक्ताच्या आवडीचा नवा भडक,बटबटीत रंग घेउन अजून उभं आहे.त्याचं हे बाहेरचं रूप आजूबाजूच्या बदललेल्या परिसरात सामाऊनच गेलंय अगदी!घोंगावणारा वारा आणि कोसळणाऱ्या सरींबरोबर गावाकडच्या आठवणी अवती भोवती रुंजी घालायला लागतात. रूप बदललं असलं तरी डोळ्यापुढे उभं राहातं तेच जुनं, देखणं कातीव काळ्या दगडाचं देवालय. घराच्या दारात,आंब्याच्या सावलीत,पायरीवर उभं राहून मान वर,उंच करून बघावा लागणारा कळस आणि माथा झुकवून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर दृष्टीला पडणारं ते शाश्वताचं रूप ! सत्य ,शिव आणि सुंदरतेचं प्रतीक. समईच्या मंद प्रकाशात अंधुक दिसणारी सांबाची पिंड तिथेच उभी असते, देवळाच्या त्या खोल गाभाऱ्यात आणि गाव सोडून दूर गेलेल्या मनात सुद्धा. वर बांधलेल्या घंटेचा नाद चालू असतो आणि या सगळ्यावर राज्य करणारा एक शां…त सूर कानात घुमत मनाला दिलासा देत असतो. ……शंभोsssssss. शिवरात्रीच्या शुभेच्छा