पितृपक्ष
पितृपक्ष (भाग १)
आजपासून पितृपक्ष सुरू होतोय, वर्षानुवर्षे घरात सुरू असलेले श्राद्धकर्म ,तर्पण सगळं बघत आलोय त्यामुळे या पक्षाचे महत्व आणि संस्कार खोलवर रुतलेय...
आपल्या पिढीचे ज्ञान आपल्याला असलेच पाहिजे,आपले पूर्वज आपल्यासाठी जे काही करून जातात, त्यांच्या पुण्याचा साठा म्हणा किंवा अगदी द्रव्यरुपातले काही.
लोकं पूर्वजांच्या वस्तूमुळे,वास्तूमूळे किंवा दाग दागिने यांमुळे त्यांना स्मरतात तर काही त्यांच्या कर्मकृत्यांमुळे...
काही दिवसांपूर्वी आई टीव्हीवर प्रवचन ऐकत होती, त्यात पैसा, मोह वगैरे याविषयी बोलणे सुरू होते,प्रवचनकर्ते सांगत होते की इतकं नका कमवू की या जीवनाचा आस्वाद घेताच येणार नाही. जसे आलोय तसेच जायचेय हात रिकामे असू द्या. ज्यांच्यासाठी कमवताय त्यांनी तुम्हाला स्मरावे आणि त्यांच्या येणाऱ्या पिढीनं तुम्हाला आठवावे असं काही आदर्श निर्माण करून घ्या. पुण्याचा साठा वाढवून जा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी....
आई मन लावून प्रवचन बघत होती आणि लगेच सवयीप्रमाणे पुटपुटली, म्हणाली आम्ही तर कधीच रिकामे हात झालोय,आमच्यामागे १ पैश्याची चिंता नाहीये, अगदी रिकामे आहोत फक्त नातवंडांची भरभरून माया, प्रेम, त्यांना आमच्यासाठी वाटणारी काळजी ,ज्या मुलांना शाळेत शिकवलं त्यांच्या शुभेच्छांचा साठा घेऊन जाणार..
मी मिश्किल हासले आणि कर्माला हात लावला, काहीही बोलत बसते म्हणून मी अलमारी उघडली..
अगं खरंच !!जसं तुझ्या बाबांना शाळेतले मुलं, नातवंड स्मरतात तसं मलाही स्मरतील.
आम्ही तुम्हाला खूप काही नाही दिलं ग म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं...
मी म्हटलं आई आता मात्र तू जास्त हळवी होतेय बरं... तू आणि बाबांनी आम्हाला इतकं सुंदर बालपण जगू दिलं, स्वातंत्र्य दिलं, आणि मुख्य म्हणजे खूप वेळ दिला संवाद करायला, आज मुलांजवळ सगळं असतं फक्त आई वडिलांसोबत संवादचं नसतो...
संवाद हा तर खरा मार्ग आहे आपल्या मुलांना, आई वडिलांना, आजी,पणजी, आजोळ,वंशवृक्ष समजून घ्यायचा आणि खरंतर मुलं आपल्या आयुष्यात शिक्षणातून जितकं नाही शिकत तितके ज्ञान त्यांना संवादातून मिळते. व्यावहारिक ज्ञान शेवटी अत्यंत महत्वाचे असतेच.
आई जरा सावरली आणि मग कोथिंबीर निवडायला बसली,मी ही भाजी कापायला घेतली, आमच्या गप्पा सुरु झाल्या. आई बाबा आजी सर्वांबरोबर गप्पा करतांना मलातरी जुन्या गोष्टी ऐकायला कायम आवडायचं, नाती, गोती वगैरे...
काही दिवसांपूर्वी जेव्हा अयोध्येत भूमिपूजन सुरू होते त्यावेळी आई नी मला एक मजेशीर गोष्ट सांगितली जी या आधी कधी तिला ही आठवली नाही ...
अयोध्येचे लाईव्ह सुरू होते तेव्हा मी सहज आईला बोलले,आई आपल्याला जे लाभतंय ही आपल्या पूर्वजांची आपल्या पूर्व जन्मीची पुण्याई आणि आपले कर्म हो ना ग?.. आपल्यासाठी ते किती किती पुण्य साठवून गेलेय आणि आज आपण त्याचा सुंदर उपभोग घेतोय. त्यांच्या काय प्रार्थना असतील ग आपल्यासाठी??
कुलदैवत म्हणून प्रभू रामचंद्र हे माहेर आणि सासर दोन्हीकडे मला लाभलेय...माझ्या माहेरी रामाचं नवरात्र, बऱ्हाणपूरच्या जवळच असलेल्या शहापुरला रामाच्या देवळात आमचे आजोबा सहकुटुंब राहायचे, खापर पणजोबांची (श्री कृष्ण महाराज तोडेवाले)समाधी आहे तिथे, रामदासी परंपरेचं भाग्य लाभलंय कुटुंबाला....
मी आईला म्हटलं तुझ्या माहेरी (काकिर्डें) असं काही नाही ना गं?
तेव्हा आई बोलली माझ्या आईच्या माहेरी होतं ना पण!!
आईचं सारं गोतावळ कऱ्हाडे ब्राह्मण आईची आई माहेरून करकरे मध्यप्रदेशातल्या भिकणगांव जवळ असलेल्या इग्र्या गावातलं तिचं माहेर, इग्र्या आणि टिग्र्या अशी ही दोन गावं अमोर समोर आहे. आजीच्या वडिलांचे म्हणजे करकरे यांचे राममंदिर होते इग्र्याला, वडील लहानपणी वारले आणि आजीच्या आईची म्हणजे लक्ष्मीबाईंची तब्बेतही घसरली आणि नंतर पेंढारकर मामा( लक्ष्मी आजीचं माहेर पेंढारकर) आजीच्या आईला आणि तिच्या मोठ्या बहिणीला भिकणगांवला घेऊन गेले.
मंदिर कुणी सांभाळायाचे ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला... मग आजीच्या आईने त्यावेळी पंचायत बोलावली आणि त्यांना सांगितले इथून या मंदिराची जबाबदारी आणि उत्पन्न सगळं गावाच्या उपयोगात आणावे... आम्ही वरचेवर येत राहू आणि आमच्या रामाला भेटत राहू.. बहुतेक आमच्याहस्ते इतकीच सेवा घ्यायची होती रामरायाला.
असं करत वर्षे झाली,
आजीचे (काकिर्डे)आणि मावशी आजीचे(आठले)लग्न इंदूरला झाले आणि दोघीच अपत्य म्हणून पुढे मावशी आजीने लक्ष्मीआजीचा सांभाळ केला...
तिच्या जाण्याअगोदर तिने मावशी आजीला सांगितले एकदा मला इग्र्याला घेऊन चल एक मागणं राहिलंय रामरायाकडे मागायचं... मावशी आजी घेऊन गेली, तेव्हा आजीने दंडवत घातले आणि म्हणाली रामा माझ्या मुलींना तुझ्या सावलीत जन्म घेता आले, असं राममंदिर असल्याचं भाग्य माझ्या नातवंडांना ,पतवंडांना ही मिळू दे आणि अखंडित सेवा ही घडू दे इतकंच मागणं आहे बस.
पुढे आजीला देवाज्ञा झाली आणि नंतर माझ्या आईचे जन्म झाले, आईचं लग्न रामाचे नवरात्र असलेल्या घरांत झाले आणि मी श्रीरामकुळदैवत असलेल्या घरांत जन्मले...
हे सगळं ऐकून माझे डोळे गच्च भरले आणि आपण जे म्हणतोय ते अगदी खरंय आपल्याला जे मिळतेय ते पूर्वजांचीच पुण्याई आहे...
लक्ष्मी आजीने रामरायाला घातलेले साकडं आईला सासर म्हणून तर मला माहेर म्हणून लाभले... आज पितृपक्षाच्या सुरुवातीस लक्ष्मी आजी आणि आईच्या माहेरच्या सर्व पूर्वजांना,पितरांना माझा नमस्कार....
आता कधी तरी जमलेच भिकणगाव ला जायला तर पणजीच्या इग्र्याला जाऊन त्या रामरायाला दंडवत घालून येईन.
© *सौ धनश्री देसाई(तोडेवाले)*
क्रमश.....


