Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

कारण त्याशिवाय सरकारी दरबारी आणि सगळ्या कंपन्यामध्ये एक पानही हलत नाही. तरीही लोकांनी ह्या ग्रंथाला धर्मग्रंथ न संबोधून त्याचा घोर अपमान केला आहे. अपमान जोवर घोर होत नाही तोवर त्याला जसं वजन प्राप्त होत नाही तसच रेशन कार्डाच आहे. जोवर तुमचं नाव त्यावर "चढत" नाही तोवर तुम्हाला जगात काही वजन नाही. तुमचं नाव जन्मभर नेहमी खाली जात राहिलं तरी रेशन कार्ड हा एकमेव धर्मग्रंथ आहे जिथे तुमचं नाव "चढतं". जोवर तुम्ही जगातून उतरत नाही आणि तुमचे वारसदार रेशन खात्याला कळवत नाहीत तोवर तुमचं नाव खाली घेतलं जात नाही.

तुमच्या माता-पित्याने तुमचं नाव " राष्ट्रपती" जरी ठेवलं असलं तरी ते रेशन कार्डवर चढायलाच पाहिजे, तरच जगात तुमच्या नावाला किंमत आहे. उद्या तुम्ही खरोखर राष्ट्रपती किंवा पंतप्रधान झालात तरी आधी रेशन कार्ड दाखल करावं लागतं. तुम्ही काहीही झालात तर आधी रेशन कार्ड पाहिजे. समजा तुम्ही बँक ग्राहक बनायला गेलात तरी तुच्याकडे किती रुपये आहेत ह्याला महत्व नाही. आधी रेशन कार्ड दाखवावे लागते. जगातील सर्व धर्मग्रंथ हेच सांगतात की पैसा महत्वाचा नाही...रेशन कार्डही तेच सांगतं. एखादा आयकर खात्यात गेला आणि म्हणाला माझ्याकडे अब्जो रुपये आहेत तर समोर बसलेला कर्मचारी शांतपणे म्हणतो- "रेशन कार्ड दाखवा !!"

शिवाय हा धर्मग्रंथ नुसता सोबत असून चालत नाही तर त्याच्या कॉपीही असाव्या लागतात. जीवन फार कठीण आहे हे कॉपी शिकवते. तुम्ही कोणत्याही कार्यालयात गेलात की रेशन कार्ड दाखवता. लगेच तिथला कर्मचारी ते तुमच्याकडे पुन्हा फेकतो आणि कॉपी आणा असं सांगतो. मग तुम्ही निघत Xerox दुकान शोधायला. मुश्किलीने पहिलं दुकान मिळतं. पण तिथली मशीन नेमकी बंद असते. मग धापा टाकत दुसरं दुकान गाठावे तर तिथे दुकानदार हाताने पुठ्ठा फिरवत बसलेला असतो. तुम्हाला वाटतं, आता पटकन कॉपी मिळणार. म्हणून रेशन कार्ड त्याच्यासमोर ठेवता आणि म्हणता- "चार कॉपी द्या. "
तो शांतपणे सांगतो-" लाईट गेली आहे! "
पुढे तुम्ही काय विचारणार हे त्याला माहित असतं. तो लगेच सांगतो- " गांधी चौकापासून पुढे लाईट आहेत. तिथे जा".
हल्ली गांधी ह्या आडनावाला असं महत्व प्राप्त झालं आहे !!
कुठून लाईट आहेत आणि कुठून नाहीत ही सीमा ठरवताना गांधी आडनाव सोयीचे पडते !!

पण जिथे गांधी नाव येतं तिथे मार्ग सोपा नसतो. एकतर तुम्ही तुमची दुचाकी मागे सोडून आलेले असता. गांधी चौकात जावे तर एक रिक्षा मिळत नाही. शेवटी चालत जावे लागते.
घामाघूम होवून एकदाचा गांधी चौक गाठता. तिथे तुम्ही पाय टाकता आणि नेमकं तिथे लोड शेडींग सुरु होतं व जिथे थोड्या वेळापूर्वी होता तिथे लाईट येते. हा वीज मंडळाचा दोष नसून तुमचा पायगुण चांगला नसतो.... जिथे जाता तिथे लोड शेडींग घेवून जाता. तुम्ही जिथे पाय ठेवता तिथे अंधार होतो!!

मग पुन्हा आल्या पावली परत जावे लागते. ज्या दुकानात पहिल्यांदा गेलेलो असतो तिथेच रेशन कार्ड परत दाखवायला जावे तोवर प्रचंड गर्दी झालेली असते. दुकानात दुकानदार न दिसता सगळ्यांनी टाकलेले रेशन कार्ड दिसतात. बराच वेळ थांबल्यानंतर तुमची एकदाची कॉपी निघते.

ह्या देशात महागाई आहे हा चुकीचा समज आहे. तुम्ही काढलेली कॉपी फक्त १ रुपयात मिळते. तुमच्याकडे असते दहाची नोट. "सुटते द्या!" असं तो दुकानदार खेकसतो. मग आसपासची माणसे दयेने खिशात हात घालून घालून एकदाची सुट्ट्यांची सोय करतात. जेव्हा तुम्हाला एखादा माणूस स्वताहून सुट्टे देतो तेव्हा तो शिवसैनिक किंवा मनसे चा कार्यकर्ता आहे हे डोळे झाकून ओळखा. आणि जो तुमच्यावर खेकसून नेहमी सुट्टे मागतो तो माणूस ? इथे उगीच का दुसर्या पक्ष्यांची नावे घ्यावी?
....तो माणूस मतदान करत नाही असं समजा !!

जिथे जावे तिथे लोड शेडींग होणे, सुट्टे नसणे, रेशन कार्ड हरवणे, ती attested करून घेणे ही सारी लक्षणे सांगतात की तुमचा पायगुण चांगला नाही. हा दोष दूर करण्यासाठी लगेच एखादा ज्योतिषी गाठा. तिथे तुमचं रेशन कार्ड नाही, तर कुंडली मागतात. तीही नसली तरी जे दाखवाल त्यावरून तुमचं भविष्य सांगितलं जातं आणि तुमचा दोष दूर करून दिला जातो. हल्ली अश्याच केसेस फार येवू लागल्याने ज्योतिषांनी त्रंबकेश्वर येथे खास विभाग सुरु करायचा ठरवला आहे असे कळते.

रेशन कार्ड ह्या धर्मग्रंथाला फार फार महत्व आहे. हुशार असाल तर हा ग्रंथ नेहमी सोबत ठेवा. फक्त original नाही तर कॉपीसुध्दा ठेवा. अहो, मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात एका मुलाने मुलगी पसंद असून तिचं रेशन कार्ड दाखवा असं म्हटलं आहे. त्याच्याशी लग्न करायला अनेक मुली तयार होत्या. कारण तो रेशन खात्यातच मोठ्या पदावर होता. एकतर ते पद "खात्याचं". शिवाय सगळ्या नातलगांची जीवनभर रेशन कार्डाची सोय होणार होती. एक पैसा न मोजता !!

रेशन कार्डाचा आणखी एक किस्सा ऐका. एक भुरटा दरोडेखोर तोंडाला काळा कपडा गुंडाळून बँकेत गेला आणि धारदार सुरा दाखवून -" अपुन बँक लुटणे के लिये आयेला है" असं म्हणाला. तेव्हा तिथे बसलेल्याला कर्मचार्याने रेशन कार्ड दाखवा असं ठेवणीतल उत्तर दिलं. तो वेडा दरोडेखोर खरच रेशन कार्ड आणायला गेला. त्या घटनेला आता वर्ष झालं तरी तो परत आलेला नाही.
कारण त्याचं रेशन कार्ड तयार झालंच नव्हतं. ते तयार करण्यासाठी तो खुळ्यासारखा रेशन खात्यात गेला... हातात धारदार सुरा घेवून!! तिथे त्याला ह्या टेबलावरून त्या टेबलावर इतकं फिरवलं की शेवटी त्याचा हात सुरा पकडून दुखायला लागला आणि त्याने सुरा टाकून अहिंसेचा मार्ग स्वीकारला. रेशन खात्यासमोर उपोषणाला बसला. जोवर कार्ड देत नाहीत तोवर मी उपाशी बसणार असं त्याने जाहीर केलं. तेव्हा एक हुशार माणसाने त्याला सांगितलं की कार्ड मिळाल्यावरही उपास करावा लागतो, मग कशाला उगीच कार्डसाठी उपास करतो !!

रेशन कार्डावर जे लिहितात ते फक्त medical store मधलाच वाचू शकतो. कारण डॉक्टरांनी अगम्य अक्षरात लिहिलेल्या गोळ्या त्याला बरोबर ओळखण्याची सवय असते. माझ्या रेशन कार्डावर काहीतरी मजकूर लिहिला होता. तो कळावा म्हणून मी एका medical store मध्ये गेलो. त्याला रेशन कार्ड दाखवले. त्याने एक नजर फिरवली आणि खालचा drawer उघडून पटकन एक जेलुसील काढून दिली.
मी प्रचंड आश्चर्याने रेशन कार्डावर बोट ठेवून विचारलं- "हे जेलुसील लिहिलं आहे?"
Medical वाला म्हणाला, " काय लिहिलं आहे ते कळत नाही. जेव्हा काय लिहिलं आहे हे आम्हाला कळत नाही तेव्हा आम्ही जेलुसील देतो!!"
त्याच्या उत्तरावर मी खूप चिडलो.
तेव्हा तो म्हणाला, " चिडल्यामुळे acidity होते. जेलुसील खा"

रेशन कार्ड हा धर्मग्रंथ महिलांसाठी फार मोलाचा आहे. कारण त्याचा रंग बदलत असला तरी वय बदलत नाही. एकदा लिहिलं की कायम टिकून राहत. माझ्या एका मित्राचं रेशन कार्डावर वय आहे २२. पत्नीच वय आहे ४२. मुलाच वय आहे. १६. जे स्वताला गणितज्ञ समजतात त्यांनी हे गणित सोडून दाखवावे. रेशन कार्ड नुसार मित्राला ६ व्या वर्षी मुलगा झाला आहे.
असा कागदोपत्री चमत्कारही ह्या धर्मग्रंथात करून दाखवला जातो.
ज्याप्रमाणे एखाद्या धर्माग्रंथावरून प्रेरणा घेवून पुढे अनेकजण लिहित जातात अगदी तसेच ह्या धर्मग्रंथाबाबत घडले आहे. हा धर्मग्रंथ सोप्या भाषेत समजावा म्हणून आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, license इत्यादी ग्रंथ लिहिण्यात आले.
पण ह्या सगळ्यांसाठी आधी मूळ धर्मग्रंथ असणे आवश्यक आहे.
ज्याच्याकडे हा धर्मग्रंथ नाही, तो या जगात देहाने जिवंत असला तरी त्याला जिवंत आहे असं मानलं जात नाही.
आणि आपण जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्याने कॉपी देणे आवश्यक आहे.
सर्व धर्मग्रंथात देव आहे असं सांगतात. रेशन कार्डमध्ये फक्त सांगत नाहीत तर सदर व्यक्ती, तिचा पत्ता, लिंग असा पूर्ण तपशील दिला जातो. उद्या देव जरी आला आणि mobile connection घ्यायला गेला तरी त्याला रेशन कार्ड दाखवावेच लागेल.
खुद्द देवालाही पुरावा देण्यासाठी भाग पाडण्याची ताकद ह्या धर्मग्रंथात आहे.
-निरेन आपटे.