मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

मला भावलेलं संगीत

परवा संध्याकाळी सहज घरी आराम करत असताना दूरदर्शनवर छायागीत मध्ये राजकपुरचे जुने गाणे पाहिले तेंव्हा सुखद आश्चर्याचा धक्का बसला. कारण हल्ली दूरदर्शनवर जी गाणी छायागीत मध्ये दाखवतात ती ऐकवत तर नाहीतच पण पहावतही नाहीत. मला तर हे `छायागीत' नसून `वायागीत' आहे असच वाटत. खरंच हे संगीत आहे कि धांगडधिंगा, आपण कुठेतरी भरकटलोय असे वारंवार वाटteते. तो एक असा सुवर्णकाळ होता जेंव्हा शंकर-जयकिशन, ओ.पी. नय्यर, एस.डी. बर्मन, मदनमोहन असे रथीमहारथी संगीतकार या चंदेरी दुनियेस लाभले तर गायकांमध्ये लता, आशा, रफी, मुकेश, मन्ना डे, किशोर व तलत यासारखे सप्तसूर लाभले. हल्लीच्या गाण्यांमध्ये संगीत कुठेतरी हरवलय. जुने गीत, जुने संगीत यांनी लोकप्रियता मिळवली व त्यातील गोडव्याने प्रसिद्धीचा कळस केला पण हल्लीचे संगीत किळस करते हाच काय तो फरक. हे सर्व मोठ्या अधिकाराने सांगण्याइतपत या क्षेत्रात मी वयाने व मानाने मोठा नक्कीच नाही हे मला माहित आहे. परंतु आजची परिस्थिती पहाता खूप खंत वाटते म्हणून एक चाहता या नात्याने हि व्यथा उघडपणे व्यक्त करतो एव्हढेच. या जुन्या संगीताचा अनमोल खजिना जो या थोर कलावंतानी आम्हा तरुण पिढीसाठी सोडलाय तो लुटावा तेवढा अधिकच भरत जातो.

हल्लीच्या चित्रपटातील गाणी हि चित्रपटगृहाबाहेर पडल्यापडल्या विसरायला होतात. त्यातले शब्द सुद्धा नीट आठवत नाहीत. पण जुन्या म्हणजे अगदी १९८० पर्यंतची गाणी नुसत्या धुनेवरून त्यातील शब्द काय पण भाव सुद्धा डोळ्यांसमोर तरळतात. अर्थात त्याचे श्रेय त्या गुणी कलावंतांना द्यायला हवे ज्यांच्या अभिनयाच्या अविष्कारामुळे ते संगीत, ते चित्रपट अजरामर झाले. या गाण्यांमध्ये आधी शब्द घडायचे मग त्याची स्वर रचनेत बांधणी व्हायची. परंतु हल्ली मात्र उलटाच जमाना आहे. इथे संगीतकार गीतकाराला धून ऐकवतो व त्यावर गीतकार मग शब्द गुंफतो. यामुळे काय होते तर या शब्दात जीव, भाव राहत नाहीत. हीच परिस्थिती संगीत वाद्यवृंद ताफ्याची. जुन्या गाण्यांमध्ये जर आपण नीट लक्ष देउन ऐकलत तर असे आढळेल कि, फार तर ४-५ वाद्यांच्या मदतीने अमर गीते जन्मास आली. आजारे अब मेरा दिल पुकारा, - या गाण्यामध्ये तर चक्क मडक्याच्या ठेक्यावर स्वर रचना केली आहे. तरीही या गाण्यांना स्वतःचे असे स्थान व ओळख लाभली. हल्ली वाद्यवृंद कलाकारांचा ताफाच्या ताफा घेऊन ध्वनी प्रदूषणापलीकडे फारसे यश संगीतकारास मिळत नाही. अर्थात यामध्ये काही अपवाद जरूर आहेत. या यशपयशामध्ये थोड्याफार अर्थाने गायक मंडळीही जबाबदार आहेत. हल्लीतर सकाळी स्टुडीओ मध्ये गायक येतो., तेथे त्याची आधीपासूनच वाट पाहत असलेले संगीतकार त्याला चाल ऐकवतात. एक दोन वेळा तालीम होते व लगेच टेक होतो. झाले एकदाचे, यात काय होते तर गायक गाणे म्हणतो पण त्यात भावना नसतात तर ते असतात नुसते शब्द-भावविरहित शब्द.

हीच परिस्थिती संवादाची. तुम्ही आजचे चित्रपट पाहाल तर असे आढळून येईल कि, दोन कलाकारांतील संवाद नीट ऐकू सुद्धा येत नाही आणि याचे श्रेय जाते ते त्या भडक पार्श्वसंगीताला कि जे घाव घातल्यागत त्या संवादातील शब्दावर आदळतात. पाश्चात्य सिनेमात दूरदर्शनवरील इंग्लिश मालिकांत तुम्हाला फरक जाणवेल. तेथे पार्श्वसंगीत नसल्याने संवाद नीट ऐकू येतातच. आता त्याहून महत्वाचे म्हणजे शृंगाररस. यावर आधारित अनेक प्रेमगीते हिंदी चित्रपट सृष्टीस लाभली. त्यात थोर कलाकारांनी आपल्या अभिनयाने त्यातील निर्मल व उत्त्क्तट प्रेमाचे दर्शन घडविले. उदाहरण द्यावयाचे झाले तर प्यार हुआ इकरार हुआ है.. यात प्यार तर झालेच पण त्या प्रेमाचा इकरार हि झाला. हल्ली आधी प्रेम होते ते इकरारासाठी नव्हे तर त्यातून हिंसा जन्मावी यासाठी.

आजच्या चित्रपटामध्ये एखादा प्रसंग चालू असताना त्यातील कलाकारांचा नाटकी अभिनय व त्या कलाकारांचे नखरे (मला वाटते जे खरे नाही ते नखरे) व कृत्रिमता बघता पुढच्या सर्व कथेची कल्पना आपोआपच येते. कारण त्यांचे एक पक्के फोर्मुलेशन झाले आहे. असे कंटाळवाणे चित्रपट पाहून बाहेर पडताना बहुतेकांच्या मनी घोळत असेल कि अरेरे उगाच खर्च केले. त्यापेक्षा व्हिडिओवर चांगला जुना चित्रपट पहिला असता तर बरे झाले असते. पण त्यामध्ये थोडी अडचण आहे, ती म्हणजे प्रत्येकाकडे व्हिडिओची सोय असेलच असे नाही. तर अशावर माझ्यामते एक जालीम उपाय आहे तो म्हणजे सीडीद्वारा हि जुनी गाणी रसिकतेने ऐकायची व तृप्त व्हायचे. कारण या गाण्यांमध्ये खूप ताकद आहे कि ती गाणी ऐकताना चित्रपटातील प्रसंगही डोळ्यांसमोर तरळतात. तसाच एक दुसरा मार्ग आहे कि ज्यामुळे हि जुनी गीते पुन्हा एकदा आपल्याला ऐकता येतात व तो म्हणजे ऑर्केस्ट्रा व वाद्यवृन्दामुळे. माझा हा जो काही अनुभव आहे त्या जोरावर मी सांगेन कि संगीतासारखा स्वतःला रमवून ठेवणारा दुसरा चांगला मार्ग नाही. यामुळे मनःशांतीसुद्धा लाभते व चित्त प्रसन्न होते. कामावरून घरी परतल्यावर चहाचा घोट घेतघेत जुने हिंदी अथवा मराठी भावगीत ऐकताना घरी येताना लोकलमध्ये झालेला त्रास, धावपळ सर्व विसरून फ्रेश व्हायला होते.

नव्या जुन्या संगीताच्या या जंगी सामन्यामध्ये आपल्या मराठी मायबोलीवर मात्र तितकासा वाईट परिणाम झालेला नाही. वसंत प्रभू, मंगेशकर कुटुंबीय, सुधीर फडके, गजानन वाटवे, लता, आशा, अरुण दाते हि मंडळी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीची व भावगीतांची जबरदस्त ताकद आहे. हल्ली बहुतेक लोक मन रमवण्यासाठी व दगदग धावपळीपासून कंटाळून फ्रेश होण्यासाठी इतर काही मार्ग अवलंबतात. उदाहरणच द्यायचे झाले तर कामावर येताना व घरी परततांना प्रवासात खूपशी मंडळी पत्ते खेळतात. पण यात गैर नाही. पण पुढे याचे रुपांतर बहुतेकवेळा जुगारात होते व त्याने परस्पर संबंधात तणावही वाढतात. याच उलट एखाद्याने घरी परतताना व परतल्यावर या संगीताचा आस्वाद चाखला तर नक्कीच फरक जाणवेल व तोही चांगला. पत्त्यांमध्ये पैसे फुकट घालवण्यापेक्षा त्यातूनच संगीतप्रेमी बनण्याचा प्रयत्न केला तर तो कौतुकास्पद ठरेल.

विज्ञान युगात व संशोधनात असे अनेक संदर्भ आहेत व ज्यात असा उल्लेख आहे कि संगीतामुळे खुपसे रोगही बरे होतात तसेच वनस्पतींची वाढ चांगली होते. पूर्वीच्या काळी राजे महाराज्यांनी आपल्या दरबारात गायक ठेवले होते. उदाहरण म्हणजे अकबराच्या दरबारात तानसेनला महत्वाचे स्थान होते. आपल्या मित्राला वाढदिवशी भला मोठा केक अथवा पुष्पगुछ या औपचारिक पद्धतीनं बक्षीस देण्यापेक्षा त्याच्याच आवडीची एखादी सीडी भेट दिली तर योग्य ठरेल व हि गोष्ट कायम स्मरणात राहील. निवेदक म्हणून वाद्यवृंदाच्या कार्यक्रमात मलाही सुखद अनुभव आले. उदाहरण द्यायचे झाले तर आम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी मराठी व हिंदी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम करतो तेव्हा खर तर खूप बर वाटत आणि मग अशाच कार्यक्रमात जेव्हा एखादा प्रेक्षक जुन्या भावगीतांची फरमाईश करतो तेव्हा खरे म्हणजे खूप बरे वाटते आणि मग जुनं ते सोन याची प्रचीती येते. दूरच्या प्रवासामध्ये या गाण्याच्या सहवासामुळे कधीही एकटेपणा जाणवत नाही. स्वतःच मनात गाणे गुणगुणत वेळ कशी निघून जाते हे कळतच नाही. सिगारेट, दारू, गर्द अशा अमली पदार्थांनी स्वतःला व शरीरातील पेशींना व्यसन लावण्यापेक्षा संगीताचे व्यसन जडले तर ते चांगलेच.

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे हल्लीच्या हिंदी चित्रपट गीतात काही निवडक गीतांची स्वररचना खरच चांगली आहे. हि गाणी ऐकताना नाविन्याची अनुभूती होते. खास करून नव्या दमाचे संगीतकार ए. आर. रेहमान, आनंद-मिलिंद तसेच नदीम-श्रवण यांना त्याचे श्रेय जाते. त्यांच्या गाण्यात लाईटमुजीक हा प्रकार आढळल्याने त्यात मेलेडी असते नाहीतर इतर गाणी नुसती कॉमेडी ठरतात.

मला भावलेले संगीत कसे असेल तर जे कानाला गोड वाटेल, त्यात वेगळा ठेका असेल आणि जे ऐकल्याने मन प्रसन्न होईल मग भले त्यात वेगळेपणा का असेना. स्वतःच्या अशा शैलीने व वेगवेगळ्या प्रयत्नाने स्वररचना करणारे एक थोर संगीतकार व गायक या चित्रपटसृष्टीस लाभले ते म्हणजे पं हृदयनाथ मंगेशकर. मला वाटते जो माणूस आपल्या दोन्ही हातांनी काम करतो त्याला कामगार म्हणतात, जो माणूस आपले हात व बुद्धी यांचा मेळ साधतो त्याला कारागीर म्हणतात व जो आपले हात, आपली बुद्धी व आपले मन यांचा त्रिवेणी संगम साधतो त्याला सच्चा कलाकार म्हणतात. सध्याच्या या चंदेरी दुनियेत व संगीतक्षेत्रात गरज आहे ती अशा कलाकारांची.

मला खात्री आहे कि लवकरच अशी वेळ येईल व ती संजीवनी पुन्हा या चंदेरी दुनियेस लाभेल व हा गुलमोहोर पुन्हा एकदा बहरेल.

  • डॉ. हेमंत जोगळेकर
  • मुलुंड (पूर्व), xfvtE-८१