Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

मग आम्हाला १२ गुणिले ५ किती असे प्रश्न विचारून हैराण करण्यात आलं. बे पासून १०० पर्यंत पाढे पाठ करायाल लावले. नाहीतर मार ठरलेला असायचा. शिक्षणाला "शिक्षा" का म्हणतात हे आम्हाला दर प्रश्नामागे कळत असे. आम्ही पाढे पाठ केले. पण आज calculator वर बोट दाबताच उत्तरे मिळतात. मग आम्हाला का उगीच घोकंपट्टी करायला लावली. बरं, आम्ही शिकलेलं गणित राजकारण्यांनी साफ चुकीच ठरवलं . दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांसाठी अब्जो रुपये निधी गोळा केला. एकावर किती शून्य ठेवले तर अब्ज होतात ते त्यांना माहित नव्हतं. १ अब्ज रुपये आणि दुष्काळ ग्रस्त शेतकरी असं गणित मांडलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात कमीत कमी १,० ०,००० रुपये पडायला हवे, पण हातात पडले फक्त रुपये ६००.!!! शाळेत नापास होणारे राजकारणी अब्जोंची गणिते चुटकीसरशी सोडवतात आणि आम्ही पाढे पाठ करून करूनसुधा जीवनभर गणित चुकल्यासारखे जगत राहतो. ६ चा वर्ग किती ह्याच उत्तर कधीच सापडलं नाही. आमच्यापैकी जे copy करायचे त्यांचीही उत्तरे चुकत असत. दरवेळी प्रश्नाच नवीन उत्तर येत असे. मग मास्तर चोपून काढत. त्यामुळे " आपल्या आयुष्याच गणित चुकलं आहे" हे आम्हाला बालवयात संपूर्ण जीवन जगण्याआधीच कळलं होतं.

इतिहास हा विषय इतिहासजमा करा अशी आमची छुपी मागणी होती. ह्या इतिहासात शूर पुरुष शौर्य दाखवून गेले आणि त्यांच्या शौर्याच्या तारखा, ठिकाणे पाठ करण्याच काम आमच्यावर सोपवून गेले. १६०० की १७०० की १८०० हेच आठवायचं नाही...तारीख कुठली डोंबल्याची आठवणार!! आमच्या वर्गात बंड्या होता. त्याने क्रांतिकारकांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड केलं मग आपण शाळेविरुद्ध बंड करूया असे क्रांतिकारी विचार गुपचूप व्यक्त केले होते. इतिहासातून बंड्याने योग्य प्रेरणा घेतली होती. तरी तो इतिहासात नापास का होतो असा प्रश्न आम्हाला पडला. पण तेवढ्यात एकाने आपण बंड केलं तर आपल्या हातात शाळेचा दाखला देतील अशी भीती व्यक्त केली. म्हणजे भविष्याचा वेध घेण्याची कला आमच्यात होती. तरीही पालक आणि शिक्षकांना आमच्या भविष्याची चिंता वाटत असे. शिवाय, "शाळेच्या दाखल्याने" आमच्यातील क्रांतिकारक चिरडून टाकला. नाहीतर हल्लीच्या विद्यार्थ्यांना revolutionary म्हणून आमचं नाव पाठ करावं लागलं असतं. हा देश आमच्यासारख्या क्रांतीकारकांना मुकला आणि त्यामागे कारण आहे "शाळेचा दाखला" नावाचा चिटोरा !!

आमच्या वर्गात कल्पना नावाची सुंदर मुलगी होती. आम्ही तिच्याकडे टक लावून पाहायचो. तेवढ्यात सर ओरडायचे- सांगा, कवीने कोणती कल्पना केली आहे? हे कवी लोक फार कल्पना करतात. पण आपल्या कल्पनांमुळे चिमुरड्या मुलांचा काय होईल ही कल्पना कधी करत नसत. हे कवी महाशय फक्त चार ओळींची कविता लिहितात आणि परीक्षेत सांगतात ५० शब्दांमध्ये उत्तर लिहा. कविताच मुळात चार ओळींची, त्यावर ५० शब्द कुठून लिहिणार. मग मी धूर्तपणा करत असे. ती कविता ५० शब्द भरेपर्यंत पुन्हा पुन्हा लिहित असे. मग सर भर वर्गात ५० शब्दात माझ्या धूर्तपणाचे धिंडवडे काढत. माझ्या पाठोपाठ बोकीलला "बोक्या...तू डोळे मिटून पेपर लिहितो का?" असे म्हणून त्याच्या उत्तर पत्रिकेचे जाहीर वाचन होई. कारण बोकील कवितेतून वेगळेच अर्थ काढत असे. ते अर्थ कवीपर्यंत पोहोचले असते तर त्याने सन्यास घेतला असता. निदान पुढच्या पिढ्या तरी वाचल्या असत्या. पण शिक्षणाचे भोग भोगल्याशिवाय मानवी जन्म पूर्ण होत नसतो!!
एकदा बोकीलने कवीने प्रेयसीला चंद्राची उपामा दिली असता त्याचा अर्थ ५० शब्दात लिहिताना भूगोलातील चंद्राचा धडा मध्ये घालून ठेवला. खर तर त्याच्या भूगोलाच्या पाठांतराच मास्तरांनी कौतुक करायला हवं होत. तसं न करता मास्तरांनी बोकीलाला दिवसा चांदण्या दाखवल्या. त्याची भीती बोकीलच्या मनात इतकी बसली कि त्याने भूगोलात चंद्राची माहिती लिहायची हिम्मत केली नाही आणि भूगोलात त्याला "चंद्र" मिळाला. अशी स्थिती असताना भारत चंद्रावर काय घंटा पोहोचणार!!

आमचा शालेय जीवनात पुर्वजन्मावर विश्वास बसला. मागील जन्मी आपण कोणाच नुकसान केल तर ह्या जन्मी ते भरून द्यावं लागत, ह्यावर आमचा विशास आहे. आमच्या शिक्षकांचं आम्ही गेल्या जन्मी फार मोठा नुकसान केल हे आम्ही ओळखलं होत.

आम्ही एक इयत्ता पास करून पुढे गेलो की झालेल्या चमत्कारामुळे खूप आनंद होत असे. पण पुढची पुस्तके हातात आली की त्यापेक्षा नापास झालो असतो तर बरं झालं असतं असं वाटे. कारण त्यात आणखी अवघड गणित असे. एक १०० मीटरची ट्रेन आणि दुसरी १५० मीटरची ट्रेन एकमेकांसामोरून समांतर रुळावरून ताशी ९० वेगाने आल्या तर त्या किती मिनिटात एकमेकांना पार पाडतील.? आता आली का आफत. ट्रेन मध्ये बसून धावणारी झाडे, हिरवीगार शेते पहायची सोडून बाजूची ट्रेन किती मिनिटाने पार होईल हा विचार कोण करेल? समजा बाजूची ट्रेन १० तासाने जरी गेली तरी आपल्याला काय फरक पडणार आहे. पण नाही....शोधा उत्तर, सोडवा प्रश्न...मला एकदा मनात आलं की त्यापेक्षा दोन्ही ट्रेन एकाच रुळावर समोरासमोर आणा आणि कायमचा प्रश्न सोडवा. पण मी कायमचा प्रश्न सोडवण्याची ही शक्कल व्यक्त केली असती तर मला शिक्षक आणि पालकांनी समोरासमोर घेतलं असतं!! आमचे शिक्षक आणि पालक ह्यांची युती होती. आम्ही मुर्ख, बावळट, बिनडोक, ढ आहोत ह्या एका मुद्यावर ते एकत्र आले होते. युतीचे परिणाम आम्ही तेव्हापासून भोगले आहेत.

. "मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही " असं ठणकावून कोण म्हणालं? या प्रश्नावर मी "गांधीजी" असं उत्तर दिलं. खरं तर ते उत्तर योग्य आहे. कारण shakespeer नावाच्या एका कवीने म्हटलं आहे- नावात काय आहे? त्यामुळे त्या प्रश्नावर कोणतही नाव लिहिलं तरी ते योग्य असायला हवं. पण मास्तरांनी दरवेळी वेगळी नावे लिहितो म्हणून मला वर्गात उभं केलं होतं. मी शाळेत ना शेंगा खाल्ल्या ना टरफले टाकली...तरी मला शिक्षा झाली. खरं तर मी दरवेळी नवे शोध लावत असे. प्रत्येक प्रश्नावर दरवेळी नवी उत्तरे देत असे. पण माझ्यातील संशोधक शाळेनी मारून टाकला. पुढे माझं उत्तर खरं ठरलं. रस्ता, चौक, उड्डाणपूल, विमानतळ ह्याचं नाव काय ठेवायचं ह्या प्रश्नावर एकाच उत्तर येत गेल - गांधी! गांधी! गांधी!

नाही म्हणायला मला रवींद्रनाथ टागोर फार आवडत.कारण त्यांची शाळा झाडांखाली चाले. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला, कोणी फुलांचा सुगंध घेत होत. तेवड्यात एक पालक तिथे आले. टागोरांना म्हणाले- या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का? टागोर म्हणाले- चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. मला त्याची चिंता वाटते. खरं तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावास वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. पण पुस्तक उघडून बसलेली लहान मुले माझ्यासारखी बसली हे पाहून त्यांच्या भवितव्यची चिंता वाटते. ते शरीर आणि मनाला आधीच प्रौढ बनवत आहेत.
आम्हाला टागोर शिक्षक असते तर?
आम्ही कधीच प्रौढ झालो नसतो. आणि आमची पिढी जास्त सृजनशील झाली असती. पण शिक्षणाची "शिक्षा" भोगून आम्ही जरी सुटलो तरी पुढच्या पिढ्यांना ही शिक्षा जास्त कठोर स्वरुपात मिळावी म्हणून पालक स्वत donation द्यायला तयार आहेत!!
मुलानो, "शिक्षा" भोगा, बालपण जाऊदे खड्ड्यात!!
-निरेन आपटे.