जागतिकीकरण प्रकरणात भारतातील महिलांची पूर्वी कधी नव्हती एवढी वाईट स्थिती झाली आहे. सुधारणेच्या नावाखाली अतिशय ओंगळ चित्रण आहे. बाजारपेठेतील जीवघेण्या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी स्त्रीचा हिडिस वापर होत आहे. या वातावरणात आम्ही प्रगतीच्या हाकाट्या पीटत असलो तरी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नुकत्याच घडलेल्या काही घटनांनी समाजमन सुन्न आहे. चारित्र्य जपणे वगैरे विषयांना धाब्यावर बसवण्याचा अनेकांचा छुपा अजेंडा दिसतो. स्त्री सशक्तिकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना पुराणमतवादी ठरवले जाते. प्रगतीच्या पथावर उत्तुंग भरारी घेत असलेली आमची आई-बहिण सुरक्षित नाही हे कटू वाटत असले तरी सत्य आहे. कितीही कठोर कायदे केले तरी जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत स्थिती बदलणार नाही.
पुन्हा आम्हाला जिजाऊ आणि शिवबाचेच स्मरण करावे लागेल. या मातेने समतेचे - ममतेचे राज्य प्रस्थापित करणारा राजा जन्माला घातला. नुसताच जन्म नाही दिला तर त्याच्या व्यक्तिमत्वाचा पैलुनपैलु घडवला. जागतिक महिला दिनाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचारित्राचे स्मरण करणे यापेक्षा दुसरे काहीच औचित्याचे असू शकत नाही. महाराजांच्या बालपणीचा एक प्रसंग. मता बेगम नावाची एक वृद्ध कलावंतीण जिजाऊमातेकडे मदत मागायला आली. वृद्धापकाळाने तिच्याकडे कोणी फिरकायचे नाही. शिवाय बदनाम असल्याने समाजानेही वाळीत टाकलेले. मता बेगमने जिजाऊ समोर हात पसरवले. जिजाऊ मातेने बाळ शिवबाची परिक्षा घेतली. शिवबा, ही मुस्लिम वृद्ध कलावंतीण मदत मागते आहे, तुमचे काय मत आहे ? शिवबा म्हणाले, समाजातील प्रत्येक घटक सुखी रहावा ही जबाबदारी तर आमचीचना ! शिवाय या तर आम्हाला तुमच्याच म्हणजे मातेसमान ! मताजी तुम्ही निर्धास्त असा. यापुढे तुमची काळजी आम्ही घेवू. समाजाच्या शेवटच्या स्तरातील व त्यातही दुर्बल महिलेकडे बघण्याचा महाराजांचा बालावयातील दॄष्टिकोण असा होता.
महाराजांनी सूरत लूटले तेव्हा पतीशिवाय राहणाऱ्या एका विदेशी ख्रीस्त महिलेच्या घरावर महाराजांनी गस्त लाउन तिचे सरंक्षण करायला सांगितले. रणधुमाळीत त्या असहाय्य महिलेला त्रास होता कामा नये, याची काळजी स्वतः महाराजांनी घेतली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या प्रसंगाला ऐतिहासिक आधार नाही, असे अभ्यासक सांगतात. हा प्रसंग घडला असेल तर !! फक्त महाराजच असे वागू शकतात. " अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती ! "
समर्थांनी म्हटले आहे, शिवरायांचे आठवावे रूप - शिवरायांचा आठवावा प्रताप - शिवरायांचा करावा साक्षेप, भूमंडळी ! अशोकवनात बंदिस्त केलेल्या सितेला फसवण्यासाठी मायावी रावणाने रामाचे रूप धारण केले. नुसते रामाचे रूप धारण करताच रावणाला परस्त्री मातेसमान भासू लागली. रामनामाची ही जादू जशी आहे, तसेच महाराजांचे स्मरण हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
शिवछत्रपतींची आई होणे सोपे नव्हते. हे आईपण एकदा मागून संपत नव्हते. शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे मृत्यूशी झुंज होती. प्रत्येक मोहीम यशस्वी होणे म्हणजे महाराजांचा पुनर्जन्म होता. त्यांच्या या पुनरजन्मांच्या वेदना सहन कराव्या लागत होत्या, जिजाऊमासाहेबांना.. न कण्हता, न विव्हळता ! जागतिक महिला दिनाला व तीथी नुसार शिवजयंतीला आपल्या चारित्र्यसंपन्न राजाचे व त्याला घडवणाऱ्या राष्ट्रमातेचे स्मरणच आम्हाला दिशादायक आहे.
- शिवराय कुळकर्णी
8 मार्च 2015