मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

एका युनिव्हरसिटीची गोष्ट

कदाचित ही गोष्ट आपण आधी ऐकली अथवा वाचलीही असेल.

आपल्या अंतर्यामी दडलेल्या अहंकारामुळे कधी कधी आपण समोरच्या व्यक्तीचे मुल्यमापन कारायला संपुर्णत: चुकत असतो त्याचे हे एक उदाहरणच म्हणावे लागेल.

ही गोष्ट आहे जगप्रसिद्ध अशा हार्वर्ड युनिव्हरसिटीत (विश्वविद्द्यापीठांत) घडलेल्या एका घटनेची!

त्या दिवशीही विश्वविद्द्यापीठांत नेहमीप्रमाणे जोरदार काम चालु होते. विद्द्यार्थ्यांची नांवे नोंदविणे, त्यांची फी जमा करणे, प्राध्यापकांची नेमणुक करणे, अशा एक ना अनेक कामांमध्ये ते विद्द्यापीठ नेहमीप्रमाणेच मग्न होते! युनिव्हरसिटीच्या प्रेसिडॆंटच्या कार्यालयांत रोजचा दिनक्रम चालु होता, पण फार धांवपळ निदान त्यादिवशी तरी नव्हती!

तेव्हढ्यांत कार्यालयाचे दार लोटुन एक करडा ड्रेस घातलेली, मितभाषी स्त्री आपल्या नव-यासहित प्रेसिडेंटच्या कार्यालयांत शिरली. समोर सेक्रेटरीबाई आपाल्या कामांत दंग होत्या. आता कोण तडमडायला आलं आहे अशा त्रासिक चेह-याने सेक्रेटरीने त्या जोडप्याकडे पाहिले. प्रथमदर्शनीच सेक्रेटरीच्या मनांत पहिला विचार आलो तो म्हणजे की ही खेडवळ वाटणारी जोडप्याची ब्याद कशाला बरे ह्या आधुनिक विश्वविद्द्यालयांत आली असावी? अशा मंडळींचा इथे काय संबंध? तेव्हढ्यांत त्या स्त्रीएबरोबर आलेला गृहस्थ अतिशय नम्रपणाने सेक्रेटरीला म्हणाला: "नमस्कार, आम्हा ऊभयतांना प्रेसिडॆंटला भेटायचे आहे"

"प्रेसिडॆंटला? तुम्ही त्यांची भेटायसाठी अपाईंटमेंट घेतली आहे कां?"

त्या गृहस्थाच्या नकारार्थी मान हलविण्याकडे लक्षही न देतां सेक्रेटरी तुटकपणे म्हणाली: " प्रेसिडॆंट पुर्ण दिवस खुप बीझी असतील"

"कांही हरकत नाही, आम्ही थांबु की त्यांच्यासाठी त्यांना दोन मिनिटे वेळ मिळेपर्यंत!"

तो गृहस्थ आणि ती स्त्री कोणतीही तक्रार न करतां वेटींगरूममध्ये शांतपणे वाट पाहात बसली!

सेक्रेटरीने देखील फारसे लक्ष दिले नाही. मनांत म्हणाली: "बसा हं वाट पाहात! बहु या किती वेळ थांबता ते!"

त्यानंतर कांही तास निघुन गेले. ते जोडपं तक्रार करेल आणि मग आपण त्यांना "अपाईंटशिवाय आलं ना, की हे असं होतं बर का?" असं लेक्चर मारुन घरी पाठवू असा विचार करीत त्या सेक्रेटरीने देखील त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही!

ते जोडपं मात्र शांतपणे बसुन वाट पहात होतं! आता मात्र सेक्रेटरीबाईला अजिबात राहावलं नाही! ही माणसं तक्रार करीत नाही तरी यांना किती वेळ बसु द्यायचं? ही ब्याद एकदाची इथुन घालविलेली बरी म्हणुन ती शेवटी प्रेसिडेंटच्या कार्यालयांत गेली आणि त्यांना म्हणाली: "सर, हे एक जोडपं गेले कांही तास तुम्हाला भेटायचं म्हणुन थांबले आहेत. तुम्ही जरा त्यांच्याशी दोन मिनिटं बोलतां कां? म्हणजे ते इथुन टळतील तरी एकदाचे?"

प्रेसिडेंटसाहेबांनी चेह-यावर उसने हास्य आणलं आणि आपला कोट सांवरीत ते बाहेर आले. त्या जोडप्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं नि म्हणाले: "हं बोला! मी काय करु शकतो आपल्यासाठी?"

ते जोडपं मोठ्या अदबीने ऊभे राहिलं! त्यांनी कमरेत वाकुन नमस्कार केला आणि ती स्त्री नम्र आवाजांत त्यांना म्हणाली: "आपण एव्हढे बिझी असुनही आम्हाला भेटायला आलांत त्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद!"

"हो पण आपलं काय काम होतं माझ्याकडॆ?" आवाजातली नाराजी कितीही न दाखविण्याचा यत्न केला तरी ती स्पष्टपणे ऊमटली होती त्यांच्या बोलण्यांत!

ती स्त्री परत एकदा अति नम्रतेने म्हणाली: " आमचा मुलगा या विश्वविद्द्यालयांत एक वर्ष शिकला, त्याला हे विद्द्यालय खुप आवडायचे! दुर्दैवाने एक वर्षापुर्वी तो एका अपघातामध्ये दगावला, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्हाला ह्या विद्द्यालयांत शक्य असल्यास ह्याच कॅंपसवर काहीतरी मेमोरियल बसवायचे आहे"

हे सारे ऐकुन प्रेसिडेंटच्या मनावर फारसा परिणाम झाला आहे असे कांही वाटले नाही. ते कांहीशा कोरडेपणानेच म्हणाले:" मॅडम, अहो ते कसं शक्य आहे? अहो इथे हजारो विद्द्यार्थी शिकतात, त्यांतल्या अशा प्रकारच्या विद्द्यार्थ्यांच्या नांवे आम्ही जर पुतळे ऊभारीत बसलो तर ह्या विद्द्यालयाचे रुपांतर एखाद्या स्मशाभुमीमध्ये व्हायला अजिबात वेळ लागणार नाही! छःए छे ते कांही शक्य होणार नाही! या अपण आता!"

ईतक्या वेळ शांतपणे हे संभाषण ऐकत असलेल्या त्या गृहस्थास कांहीतरी म्हणायचे होते, तेव्हढ्यांत ती स्त्री परत प्रेसिडेंटला म्हणाली: "नाही नाही, आपला कांही तरी गैरसमज होतोय! आम्ही पुतळा वगैरे बसवा म्हणुन सांगत नाही तर आमच्या मुलाच्या नांवे एखादी ईमारत विद्द्यालयास द्यावी असा विचार करतोय!"

ते ऐकतांच प्रेसिडेंटने डोळे फिरविले. आपल्या नुकत्याच घातलेल्या नव्या को-या सुटावरुन हात फिरवित पण वैतागलेल्या स्वरांत तो म्हणाला:" अहो निदान नीट विचार करुन तरी बोला. ईमारत विद्द्यालयाला द्यायची म्हणतां? तुम्हाला कल्पना तरी आहे का एका इमारतीसाठी किती पैसे लागतात त्याची की ऊचलली जीभ आणि लावली टाळ्याला?" खिच्यातुन एक पोर्टेबल कॅलकुटर काढुन त्यावर आंकडे टाकीत प्रेसिडेंट पुढे म्हणाला:" अहो सध्या आमच्या हार्वर्ड कॅंपसवर असलेल्या इमारतींचीच किंमत साडेसात मिलियन डॉलर्स आहे!"

आता एव्हढी आंकडेवारी दिल्यावर तरी ह्या जोडप्याचा आवाज नक्कीच बंद होईल अशी त्याची खात्री होती.

ते सारे ऐकुन ती स्त्री थोडा विचार करीत आपल्या नव-यास म्हणाली:" अहो, एव्हढ्या मोठ्या कॅंपसमधल्या इमारतींची किंमत फक्त साडेसात मिलियन डॉलर्स? असं असेल तर मग आपणच कां एखादी युनिव्हरसिटी सुरु करु नये?"

तिच्या नव-याने संमतीदर्शक मान हलविली. तो प्रेसिडेंट फक्त पाहातच राहिला. मनांत म्हणाला: " ही बाई सांगते काय आणि हा माणुस हो म्हणतोय काय? काय हा वेड्यांचा बाजार? जाऊंदे, ह्यांच्या नादी न लागलेलच बरं!"

ते जोडपं प्रेसिडेंटचे धन्यवाद मानुन जायला निघाले! ती सेक्रेटरी धांवत आली नि म्हणाली: "अहो, जाण्यापुर्वी आमच्या व्हिजीटर बूकमध्ये नांव आणि सही कारायला विसरु नका! आम्हाला रेकॉर्ड ठेवावं लागतं म्हटलं!"

संतीदर्शक माना हलुऊन दोघांनीही सह्या केल्या: मिस्टर ॲन्ड मिसेस लेलॅंड स्टॅनफोर्ड.

दोघांनी दाराबाहेर पावलं टाकली आणि पार्किंग एरियामधल्या आपल्या गाडीपर्यंत चालत जायच्या वेळेत कॅलीफोर्निया राज्यांतल्या पालो आल्टो ह्या शहरामधली जागा त्यांच्या विश्वविद्द्यालयासाठी "स्टॅनफोर्ड युनिव्हरसिटी" हे नांव देऊन मुक्रर देखील केली!

माणसाच्या बाह्यरुपावरुन त्याच्याविषयी पुर्वदुषितग्रह करुन घेणा-या अहंकाराला वास्तविकपणे कुणाच्याच आयुष्यांत स्थान असु नये! मात्र कधी कधी असंही वाटतं की त्या सेक्रेटरीच्या अशा स्वभावदोषामुळेच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मदत होऊन या जगप्रसिद्ध अशा विश्वविद्द्यालयाचा जन्म झाला नाही का? जे होते ते ब-यासाठीच म्हणायचे!

स्टॅनफोर्ड युनिव्हरसिटी

एका मुळ ईंग्रजी कथेचे स्वैर भाषांतर

शशिकांत पानट

shashi@panat.org

805-338-8242 Cell