नववर्षासाठी काही विचार
सुख आणि दुःख
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प निवडून आले त्या सकाळी वार्ताहर परिषदेत रा. ओबामा म्हणाले. “म्हणून काय झाले? आज सकाळी पण सूर्य उगवला आहे!” इतर अनेक देशांप्रमाणे अमेरिकेतील राजकीय आकाशात कधी वसंत बहरतो तर कधी शिशिर गोठवून टाकतो. सिमी व्हॅली मध्ये तर एकाच ऋतूत हवा पण सतत बदलत असते. डिसेंबरमध्ये तीन दिवस मोहावी वाळवंटावरून येणारे सॅंताना वारे सतत चाळीस पन्नास मैल वेगाने धुमाकूळ घालत होते, मग अलास्कावरून येणाऱ्या ढगांतून दोन दिवस थंडगार पावसाची संततधार लागली. पुढच्या दारातील चाफ्याचे झाड अंगात आल्यासारखे गदागदा हलत होते सारखे, आधी वाऱ्याने आणि मग थंडीने. चाफा एक व्यक्ति असती तर सलग पांच दिवस पिंगा घालण्याचे गिनीस बुक रेकॉर्ड घडले असते! अंगणातल्या चाफ्याकडे पाहून काय वाटले ते कविवर्य बी यांची माफी मागून पुढे देत आहे.
चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा गदागदा हलायचा थांबेना
आले सॅन्तानाचे वारे
शुष्क तरी झिंगलेले
रात्रंदिन बिचाऱ्याला फटकारत राहिले
चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा मुक्यानेच कण्हायचा थांबेना
आले अलास्काचे वारे
नभ ढगांनी व्यापले
गार पाऊस झडीनी त्याला हुडहुडे केले
चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा स्वप्न बघायचे काही थांबेना
वारे कंटाळुन गेले
पांगापांग ढग झाले
सूर्य पुन्हा उगवता सारे चित्र पालटले
चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा पानोपानी हंसायचे थांबेना
सकाळच्या प्रसन्न उन्हात चाफ्याकडे बघताना मला वाटले, चाफा तर कोठेही जाऊ शकत नाही. आपल्याला हात पाय आहेत; आपल्याला इतर सर्व प्राण्यांपेक्षा अचाट बुद्धी आहे. तो चाफा वर्षानुवर्षे एका जागी ऊन, पाउस, वारे सहन करीत राहतो; तरी दर उन्हाळ्यात जादूचा स्पर्श झाल्या प्रमाणे सुगंधी ज्योतींसारख्या शेकडो फुलातून बहरून येत आहे. एक मुके झाड वेदना पचवून आनंद देत असते; आपण मात्र दुखः आणि सुख या द्वैतातच अडकून राहतो. त्याच्यापलीकडे काही आहे याची आपल्याला बहुधा कल्पनाच नसते.
सत्, चित्, आनंद
“सत्” ला ना नाव ना रूप. ते आहे म्हणून त्याला सत् म्हणायचे. त्याचा जन्म कधी झाला ते त्यालाच माहीत नाही इतके ते जख्ख म्हातारे! पण सत् आहे कशावरून? हा प्रश्न माझ्या बुद्धीच्या आवाक्यापलीकडचा असल्याने मी अनेक शास्त्रज्ञ, संत, आणि विचारवन्त यांचे “ते आहे” हे म्हणणे ग्राह्य धरतो. ईशावास्य म्हणते की पूर्ण विश्वातून पूर्ण विश्व गेल्यावर जे उरते ते पूर्ण म्हणजे सत्. अवघे विश्व ज्याच्या उदरात लपले आहे ते “पूर्ण” असणारच.
मग “ चित्” काय आहे? असे म्हणतात की सत् ला “मी एक आहे, आणि मला अनेक व्हायचे आहे” ही होणारी जाणीव किंवा तिचा स्फुल्लिंग म्हणजे चित्. ते कसे घडते त्याचा शोध शास्त्रज्ञाना अजून लागलेला नाही. त्या एका ठिणगीशिवाय सत् बृहत् होऊ शकत नाही हे मात्र सर्वजण जाणतात. या चित् मुळेच महा-स्फोटातून विश्व जन्माला आले.
विश्व हे चित् चा विलास आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात. मला वाटते की सच्चिदानंद मधील “आनंद” आपल्या तर्कापलीकडचा, अनाकलनीय नसून चिद्विलास म्हणजेच आनंद, निखळ आनंद आहे. आनंद सजीवसृष्टी-निरपेक्ष आहे. मी पाहतो की सजीवसृष्टी धारण करणारी धरती, पाणी, सूर्यचंद्रतारे (तेज), वायू आणि आकाश ही जी पंचतत्त्वे आहेत तेथे क्षणोक्षणी आनंदभरती असते. सजीवसृष्टीतील वृक्षवल्ली आणि पशुपक्षी तर आनंदयात्री आहेत. पण जीवन उत्क्रांत होत जेव्हा आपण माणसे पायांवर उभे राहिलो तेव्हा पासून आपण निसर्गाला आणि आनंदाला दुरावत गेलो. आपल्या दैनंदिन व्यवहारात ममत्त्व भावनेमुळे सुख-दुःख, आशा-निराशा, अभिलाषा-भंग, लोभ-हिंसा ही दोन बाजू असलेली नाणी चालू लागली. पृथ्वीवरील सजीव-सृष्टी हा एक गोड अपघात आहे. असे अनेक गोड अपघात विश्वात हजारो ग्रहांवर असले तरी त्याच्या एकंदर पसाऱ्यात ते नगण्य आहेत. आनंद हे एकच निखळ, शुद्ध वैश्विक चलन आहे.
आपण मातेच्या गर्भात असतो तेव्हा आपण आणि आनंद यांचे नाते असते. पुढे ते आपण स्वेच्छेने विसरतो, तरी त्याची पुसट आठवण आपल्याला असते. तो आनंद जर परत मिळवायचा असेल तर आपण स्वतः पासून सुरुवात करायला हवी. आपल्या जाणीवेत खोल कुठेतरी आणि बाहेर सर्व सृष्टीत अमर्याद आनंद भरला आहे. त्या दोन्हीच्या मध्ये अडसर आहे तो ममत्त्वामुळे निर्माण झालेल्या सुखदुखः यांच्या, आपपर भावनेच्या पोलादी भिंतीचा.
ममत्त्व म्हणजे मी, माझे इत्यादी. जगातील सर्व धर्म आणि तत्त्वज्ञानी “मी”पणा अथवा स्वार्थ टाकायला सांगतात, ते अशासाठी की तो एक भुलभुलैया आहे. आता तर तंत्रविज्ञानाने निर्माण केलेली इंटरनेट, मोबाईल फोन पासून आय वॉच पर्यंत रोज बाजारात येणारी उपकरणे जणू आपले आवश्यक अवयव बनून त्या अवयवांनी एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे जे जे दिसेल ते आपल्याकडे ओढणे हाच आपला मंत्र झाला आहे. त्यामुळे आपण परस्परापासून दूर तर जात आहोच, पण समाजातील आणि जगातील दुर्बल घटकांना, इतकेच नव्हे तर निसर्गाला लुटणे हाच आपला धर्म झाला आहे. आपण हातपाय असून थोटेपांगळे, डोळे असून आंधळे आणि बुद्धी असून निर्बुद्ध होत आहोत ते यामुळेच. जगातील सर्व समस्या या ममत्त्वा मुळे निर्माण झालेल्या आहेत. वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि पर्यावरणीय समस्या आणि त्यांचे दुष्परिणाम तर भोगून संपवायला हवेत. पण मुळात त्या समस्या उत्पन्न होऊ नयेत यावर अक्सर उपाय आहे आपल्या हातात.
ममत्त्व विसरून आपण कोणावर निरपेक्ष प्रेम करणे हेच खरे प्रेम आणि तोच खरा आनंद. ममत्त्व विसरून आपण एका तरी व्यक्तीसाठी काही करणे म्हणजे आनंद. कोणी विचारेल की एकाने एका व्यक्तीसाठी काही करून काय फरक पडणार आहे? समुद्रकिनाऱ्यावर येऊन तडफडणाऱ्या माशांपैकी एकेक माशाला उचलून समुद्रात सोडणाऱ्या म्हाताऱ्याची गोष्ट सर्वाना ठाऊक आहे. प्रत्यकाने आपले सगळे वर्तन निर्ममत्त्वाने केले तर जग बदलायला वेळ लागणार नाही. ममत्त्व विसरून काही निर्माण करणे- कला, शिल्प, साहित्य पासून व्यक्ति घडवणे- म्हणजे आनंद. ममत्त्व जपून अनेक थोर व्यक्ति समाजासाठी कार्य करत असतात; तेही महत्त्वाचे असले तरी ममत्त्व विसरणे म्हणजे मी आणि इतर यातील भिंत तोडून स्वतःला अमर्याद करणे. ममत्त्व विसरणे म्हणजे सुख आणि दुखः या आणि तत्सम नाण्यांचा आंतबट्ट्याचा धंदा मागे टाकून आनंदाच्या पेठेत एकमेकांना खेंव देणे.
श्रीनिवास
३१ डिसेंबर २०१६