Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle


सावित्रीबाई ह्यांचे पती महात्मा ज्योतीराव फुले ह्यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींसाठी शाळा सुरु केली होती. समाजाचा तीव्र विरोध होत असूनही तिथे सावित्रीबाई नियमितपणे शिकवायला जात असत. त्यांच्यावर शेण, चिखल आणि दगड फेकण्यात आले. आज आपल्याला विरोध झाला तरी भावी काळात महिला शिक्षणाला देशभर मान्यता मिळेलच आणि विविध क्षेत्रात कर्तबगार महिला तयार होतील हे सावित्रीबाईंनी अचूक हेरलं होतं.

ज्योतीराव आणि सावित्रीबाई ह्यांनी वंचित आणि मुसलमान मुलींसाठी शाळा सुरु करून मुलींना शिक्षित करण्याचा निश्चय केला होता. पुणे व सातारा जिल्हयात सुमारे अठरा शाळा सुरु केल्या. सावित्रीबाई ह्यांनी अनेक शैक्षणिक प्रयोग केले. "साक्षरता अभियान" सुरु करून मुलींची शाळेतील संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. समाजाने त्याला हळूहळू साथ द्यायला सुरुवात केली. लहूजी साळवे ह्यांनी महात्मा फुलेंच्या शाळेत आपली पुतणी मुक्ता हिला दाखल केले होते.

सावित्रीबाईंनी विधवा पुनर्विवाह चळवळीत भाग घेतला होता. (पुढे धोंडो केशव कर्वे ह्यांनी विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ काढले. १८९९ मध्ये त्यांनी अनाथ बालिकाश्रम ह्या संस्थेची स्थापना केली.)

1852 साली जोतीरावांच्या व सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याची दखल सरकारनेही घेतली. शिक्षण खात्याकडून त्या दोघांचा मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सत्कार करण्यात आला.

सावित्रीबाई ह्यांनी स्त्री शिक्षणाचं बीज रोवलं आणि पुढे त्याला अनेक फळे आली.
सावित्रीबाई १० मार्च १८९७ साली हे जग सोडून गेल्या. त्याच्या काही वर्षे आधी म्हणजे आनंदी जोशी ह्या मराठी भारतीय स्त्रीने ११ मार्च १८८६ रोजी वेस्टर्न मेडिसिन मध्ये डॉक्टरची पदवी मिळवली, तीही अमेरिकेत जावून.

डॉक्टर आनंदी जोशी ह्यांचा जीवनप्रवास खडतर होता. त्याकाळी मराठी महिला विदेशात जाते ही संकल्पना समाजाला मान्य नव्हती. अखेरीस आनंदी जोशी ह्यांनी श्रीरामपूर कॉलेज हॉल मध्ये एक सभा घेतली आणि भारतात महिला डॉक्टर असणे किती आवश्यक आहे हे पटवून दिले.

१८८३ साली त्या अमेरिकेत गेल्या University of Pennsylvania येथे शिक्षण घेताना त्यांनी $ 600 डॉलर स्कॉलरशिप मिळवली. डॉक्टर पदवीदान समारंभात पंडिता रमाबाई उपस्थित होत्या. विक्टोरिया राणीने अभिनंदनाचा संदेश पाठवला होता.

त्या भारतात आल्या आणि त्यांची कोल्हापूर एडवर्ड हॉस्पिटल येथे physician-in-charge' पदावर नियुक्ती झाली. पण दुर्दैवाने वयाच्या २२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

पण ह्या दोघींनी क्रांतीला गती दिली आणि आता अनेक कर्तबगार महिला उभ्या राहिल्या. पहिली महिला ट्रेन चालिका सुरेखा यादव ते स्वर्गीय कल्पना चावला, पहिली pilot दूर्बा ब्यानर्जी ते सानिया मिर्झा, माउंट एव्हरेस्ट गाठणारी पहिली बचेंद्री पाल ते मेगासेस विजेता किरण बेदी अशी अनेक नावे आहेत.
आज महिला दिन आहे आणि आम्हाला ह्या सगळ्या कर्तबगार महिलांचा आणि प्रत्येक कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांचा अभिमान आहे.

स्वामी विवेकानंद म्हणतात, " देश घडवण्यासाठी आधी स्त्री घडली पाहिजे "
भारताने हा विचार प्रत्यक्षात राबवायला सुरुवात केली आहे.
-निरेन आपटे.