मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

वरती कडक उन, समोर निरनिराळ्या मशीनची गर्मी, हेल्मेट, जड बूट ...सारच कठीण!! पुरता कातावून निघालो होतो. शेवटची मीटिंग सुद्धा उशीरा पर्यंत चालली. शेवटी मीच वैतागून मीटिंग थांबवली आणि मला मुंबईला जायचं आहे सांगून निघालो. मला खरोखरीच उशीर झाला होता.

आणखी पाउण तासानी नाशिक स्टेशन वर ट्रेन होती आणि माझ रिझर्वेशन होत! इथून स्टेशन पर्यंत ५० -५५ मिनिटाचा प्रवास होता.मी प्रायव्हेट टॅक्सी मध्ये बसलो, आणि ड्रायवर ला हुकुम सोडला “पळव गाडी”. गाडी तिच्या वेगाने पळू लागली. पण मी चिंतेतच होतो वेळेत पोहोचण्याच्या!

संध्याकाळची वेळ असूनही बाहेर प्रचंड गरम होत. दुपारी बहुदा ४०-४५ सेल्सिउस तापमान असणार!!

“ए सी चालू करा” मी ड्रायवरला परत हुकुम केला.

“ए सी चालत नाही साहेब गाडीचा” ... ड्रायवर थंड पणे म्हणाला

“अरे पण मी तर ए सी गाडीचे पैसे दिले होते ना?”...मी आणखी वैतागून

“साहेब पैसे कमी करा, ए सी चालू होणार नाही ” ड्रायवर थंड; मी आणि बाहेरच वातावरण फक्त गरम!!

एरवी मी भांडलो असतो, पण दोनच दिवसापूर्वी सर्दी तापातून उठलो होतो आणि सरळ नाशिकचा दौरा केला. त्यामुळे “कशाला हवा ए सी...?” असा विचार करून गप्प बसलो (लहानपणीची “कोल्ह्याला द्राक्ष आंबट” ची गोष्ट आठवल्या वाचून राहिली नाही) पण सर्दीचा असर अजूनही थोडासा खरोखरीच होता!!

“पोहोचायला किती वेळ लागेल अजून?” ...मी तापत होतो

“५० एक मिनिट लागतील”... परत एकदा थंड ड्रायवर

मला माहित असून विचारल त्याला, आणि स्वतःवरच चरफडलो. कितीही जोरात गेलो तरी तेवढा वेळ लागणारच होता. मी चरफडत होतो. वरती उन्ह, फक्त पांच मिनिटांनी गाडी चुकण्याची शक्यता, मी प्रार्थना करत बसलो, गाडी न चुकण्याची ..

खर तर मिटिंग संपवून पाणी सुद्धा न पीता गाडीत बसलो होतो. मीटिंग मधली तोंडपाटीलकी आणि वर उन्हाळा, तहान तर प्रचंड लागली होती. पण पाण्याची बाटली घ्यायला थांबाव तर अजून उशीर होणार!! मी तहान आवरून बसलो होतो!

स्टेशन आल, पाच मिनिटे उशीर झालाच होता..मी घाई घाई ने सामान घेउन जीव मुठीत धरून धावलो. माझ्या अपेक्षे प्रमाणे प्लॅटफॉर्म पलीकडे होता, जोरात जीन्यावरून धावलो, रेल्वेचे जीने देखील उंच असतात..आपल्याला उशीर झाल्यावर तर ते सिंहगडा सारखे वाटायला लागतात.. मी कसाबसा धडपडत पलीकडे पोहोचलो, आणि इंडिकेटर बघितला.....हुश्श.....गाडी १५ मिनिटे उशीरा धावत होती. देवाने प्रार्थना ऐकली की भारतीय रेल त्यांच्या वेळेला जागली माहित नाही. पण मी नि:श्वास सोडला.

आता मला गाडी मिळणार होती आणि थोडासा वेळ सुद्धा होता. मग आठवलं, आपल्याला प्रचंड तहान लागली आहे. इकडे तिकडे पहिल.. लांब प्लॅटफॉर्म वर एक दुकान दिसल. मी पाय (आणि सामान ) ओढत ओढत तिथपर्यंत पोहोचलो.

“पानी का बोतल” ..मी स्टेशन वर राष्ट्रभाषेचा उपयोग करतो आणि रेल्वेच्या “राष्ट्रभषा का उपयोग करो” या सूचनेच सन्मान करतो.

“ही घ्या” .......दुकानदार मराठीतून (मी मराठी असल्याच तो ओळखतो... गाडी चुकण्याची इतकी भीती बहुदा कोणाच्याच चेहे-यावर नसावी )

बाटली प्रचंड थंड होती.

“साध पाणी आहे का? थंड नको”..मी दोन दिवसा पूर्वीच्या सर्दी तापाला स्मरून प्रश्न विचारला !

“नाही.. शेवटचा खोका टाकला बर्फात ... साधी बाटली नाही”...दुकानदार

मी थोडासा परत वैतागलो.. पण तहान तर लागली होती

“किती झाले?” मी निमूट विचारले ...

“सोळा”...दुकानदार

मी वीस रुपये पुढे केले.

इतका नन्नाचा पाढा आज ऐकला होता..त्यामुळे “सुटे नाहीत साहेब” हे नशीबात होतच!! पण दुकानदार अजून हुशार निघाला. त्याने सुटे नाहीत सांगताना, समोरच्या गोळ्यांच्या बरणी कडे बोट दाखवलं. मी पाणी पिण्याच्या घाईत होतो, थोडेशी सर्दी होतीच म्हणून म्हटल “विक्स च्या गोळ्या द्या”..त्याने गोळ्या काढून दिल्या. मी पाण्याच्या इतक्या घाईत होतो की त्या न मोजताच खिशात टाकल्या.

पाण्याची बाटली उघडली. घोटभर पाणी प्यालो, पाणी भयंकर थंड होत! मला सर्दीची आठवण होती, तरीही दोन घोट प्यायलो. घसा ओला झाला, तहानेच भर ओसरला, पण मला अजून पाणी हव होत..गरम फार होत होतच. मग विचार केला. थोड थांबूया..सर्दी आहे!! थोड्या वेळाने बाटली मधलं पाणी गरम होईल, मग पिऊया!!

एवढ्यात घोषणा झाली; गाडी आणखी पांच मिनिटे उशीरा येणार होती

त्यामुळे आणखी वेळ होता. मी आता प्लॅटफॉर्मवर बसायची जागा शोधत निघालो. पण उशीरा पोहोचल्यामुळे सगळी बाकडी अगोदरच कुणी धरली होती. शेवटी मी एका बाकडवजा कट्ट्यावर बसायचं ठरवल. थंड पाणी प्यायलाचा परिणाम आता जाणवू लागला. घसा खवखवायला सुरुवात झाली. नाकात हुळहुळ सुद्धा सुरू झाली.

तिथे थोडी जागा होती, तिथेच पडलेल्या वर्तमान पत्राच्या कागदाने थोडीशी पुसत होतो. इतक्यात गुडघ्याला विचित्र स्पर्श जाणवला. विचित्र पण ओळखीचा. प्रत्येक स्टेशन वर असणारी भिकारी मुलं!!

मी वळून पाहिलं, एक आंधळा भिकारी म्हातारा आणि त्याच्या बरोबर त्याची नात शोभेल अशी एक साडेतीन चार वर्षाची मुलगी..त्या मुलीनेच मला हात लावला होता.. आंधळ्याच्या एका हातात काठी आणि दुसरा हात त्या मुलीच्या खांद्यावर होता. त्या मुलीने माझ्या समोर हात पसरला होता.

पूर्वी मी अशी भीक घालत असे, खास करून लहान मूल दिसल की.. पण हल्ल्ली नाही! मला एका प्रसंगांनी सावधान केलंय.

असच एकदा मुंबईत लहान मूल समोर आलं, पोटावर हात ठेवून भीक मागत होत. दुपारची वेळ होती...साहजिकच त्याचा पोटावर हात होता.

मी त्याला म्हटल, “चल समोर वडा पाव खायला देतो”... मूल गप्प उभ राहील...

मी परत म्हटल “अछछा दोन देतो” ..मी...

मुलगा तरीही गप्पच!! पण एके ठिकाणी टक लावून बघत होता ..मी तिथे पाहिलं..वडा पाव च्या गाडीच्या मागे एक हॉटेल होतं..

मी हसून म्हटल “ठीक आहे, तुला पाहिजे ते खा, चल हॉटेलात” ..

पण मुलाचा चेहेरा बदलला,

“पैसे द्या !!” ..मुलगा ..

मला आश्चर्य वाटल, मी चीडलो आणि त्याला हाकलून दिला.

आश्चर्य चकीत होतच बाजूच्या टॅक्सीमध्ये बसलो. हा सगळा प्रसंग टॅक्सीवाला बघत होता, तो म्हणाला “साब भीक कभी मत देना... बच्चा लोगोंको कुछ नाही मिलता !!..सामने हॉटेल के बाजू में उनका दादा खडा था... उस बच्चे कॉ तो भूक लगा था साब..बच्चा उधर देखके ना बोला.... दादा का हप्ता देनाही पडता है, नही तो शामका खाना भी नही ..उपर से मार भी”...मी दिङमूढ झालो .

टॅक्सी वाल्याने आणखी धक्का दिला “ये बच्चे का दादा तो औरत है”

“क्या?” ..मी

“मस्त मेक अप करके सुबह आती है, फिर गंदा कपडा पहानके खुद भी भीक मांगती है..शाम कॉ बच्चोंका हप्ता जमा करती है और चली जाती है” मी धक्के पचवत होतो.

पण तेव्हा पासून भीक देणं बंद केलंय!!.

पण खरच आंधळा म्हातारा आणि चार वर्षाची मुलगी एवढ्या उन्हाची भीक मागून फसवत असतील? माझा श्वास अडकल्यासारखा झाला.. जाउंदे!! कशाला विचार करा? श्वासाच म्हणाल तर थंड पाणी पिउन बहुदा नाक चोंदत असावं, दोन दिवसा पूर्वीची सर्दी, दुसर काय?

मी आता जागा स्वच्छ करून बसलो, पाण्याची बाटली आणि सामान बाजूला ठेवल. ती दोघ भिकारी मंडळी आता माझ्या मागे बाकावर बसलेल्या वृद्ध जोडप्याकडे भीक मागायला गेली होती. त्यांनी भीक घातली की नाही ते दिसत नव्हत, ते मागे होते ना!! मी गाडीची वाट बघत होतो. माझा श्वास अजूनही चोंदतच होता.

इतक्यात काही तरी बाजूला खुडबुडल!! मी वळून पाहिलं आणि पहातच राहिलो!! त्या भिकारी मुलीने मागन येवून सरळ माझ्या पाण्याच्या बाटलीला हात घालून बाटली उचलली होती. मला काही कळायच्या आत तिने बूच उघडून तोंड लावून पाणी प्यायला सुरुवातही केली. मी रागाने बघायला लागलो, पण नुसता राग नाही... राग, आश्चर्य, कीव सगळ काही एकत्र वाटत होत, त्यामुळे तोंडातून शब्द निघत नव्हता. मी काही बोलत नाही पाहून, मला काही कळलं नसावं अस वाटून मागच्या वृद्ध गृहस्थाने “तुमची बाटली चोरली” अशी बातमी दिली. मला तर ते दिसतच होत. पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. तिने तोंड लावून पाणी प्यायल्यामुळे आता मला त्या बाटलीचा उपयोगही नव्हता !

मी वेड्या सारखा बघत होतो. ती मुलगी म्हाताऱ्या जवळ जावून तीनदा ओरडली “थंडा पानी!... थंडा पानी!!.. थंडा पानी!!!”...आंधळ्या म्हाताऱ्याने चाचपडत बाटलीला हात लावला, आणि त्याच्या सुरकुतल्या चेहेऱ्यावर स्मित आलं. दोघही दोन पाउल पुढे गेली आणि म्हातारा मटकन खालीच जमिनीवर बसला. मुलगीही बसली. मुलीने आता परत बूच उघडल, आणि जवळ जवळ अर्धी बाटली रिकामी केली. म्हाताऱ्याने सावकाश तिला पाणी पिऊ दिले आणि नंतर बाटली घेतली, हळू हळू करून सगळी बाटली संपवली. नंतर ती दोघ भीक मागायला न उठता परत तिथेच शांत सुखावून बसली.

मी दिङमूढ होऊन सार पहात होतो. माझ्या चेहे-यावर अकारण स्मित आलं.

इतक्यात भोंग्याचा आवाज आला. मी वळून पाहिल, गाडी स्टेशन मध्ये शिरत होती. मी सामान उचललं, आणि गाडीत शिरायचं म्हणून मोठ्ठा श्वास घेतला. का कोणास ठावूक, पण मिनिटाभरा पूर्वी अडकलेला श्वास रिकामा झाल्या सारखा वाटला. सर्दी बरी झाली? माहीत नाही. मी दोन पावलं पुढे सरकलो. हात खिशात घातला; हाताला वीक्सच्या गोळ्या लागल्या, सगळ्या त्या पोरीच्या पदरात टाकल्या..मला आता त्यांची गरज नव्हती, माझी सर्दी बहुधा बरी झाली होती. मी सामान उचललं आणि मागे वळून न पाहता डब्यात शिरलो !!

अतुल वेलणकर