मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

प्रा. मधुकर तोरडमल--माझे बाबा 


२ जुलै २०१७ सांयकाळी ५:२८ वाजता एका पर्वाचा अंत झाला . प्रा. मधुकर तोरडमल , एक जेष्ट कलावंत , लेखक, दिग्दर्शक , नाट्य - चित्रपट अभिनेते होतेच पण त्याच बरोबर अतिशय शिस्तप्रिय, काटेकोर, कडक पण तितकेच हळवे , प्रेमळ , साधेसुधे आमचे पपा होते . मला आठवतय मी लहान असताना रोज संध्याकाळी माझे बोट पकडुन किंवा मला दोन्ही खांद्यांवर बसवुन नगरच्या सिध्दीबागेत फिरायला घेऊन जात असत . कधी कधी टांग्यात बसुन फिरायचाही आमचा कार्यक्रम असायचा . त्यावेळी पपा अहमदनगरच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते . रोज सायकल वरुन काॅलेज मध्ये जात असत आणि रोज संध्याकाळी मी आमच्या वाड्याच्या गेटवर त्यांची वाट पहात उभी रहात असे कारण त्यांच्या साईकलीवर बसुन फिरायला जाण्यात जी मजा असायची त्याच वर्णन करायला माझ्याकडे आज शब्द अपुरे आहेत. पुढे काही वर्षांनी पपांनी मुंबईला स्थाईक व्हायचा निर्णय घेतला कारण प्राध्यापकीमध्ये मध्ये त्यांचे मन लागत नव्हत त्यांच्यातला कलावंत त्याना मुंबानगरीमध्ये बोलवत होता . मी ४ वर्षाची असताना आम्ही नगर सोडल आणि पपांबरोबर मुंबईला आलो . पपा त्याच्या नाट्यसृष्टीमध्ये व्यस्त होत गेले . आम्ही तिघी बहिणी मी, संयुक्ता आणि धाकटी तृप्ती . सगळे पपांना म्हणायचे मामा तुम्हाला मुलगा नाही तेव्हा पपा हसुन म्हणायचे ," मी सगळ्यात भाग्यवान आणि धनवान मनुष्य आहे , माझ्याघरी तिन लक्ष्मी आहेत ."

आमच बालपण अतिशय कडक शिस्तित गेल .. पपा नेहमी त्यांची नाटक, दौरे , चित्रपटांच शुटिंग , लिखाणा मध्ये व्यस्त होते . त्यांना घराकडे किंवा आमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळच मिळायचा नाही कुणी जर विचारल की ,"मामा आता मुली काय शिकतात किंवा कोणत्या वर्गात आहेत ." झाल मग पपांची भयंकर तारांबळ ऊडायची कारण तिन्ही मुलींपैकी कोणती मुलगी कोणत्या वर्गात आहे हेच त्याना आठवायच नाही . मग हसत हसत म्हणायचे ते डिपार्टमेंट माझ्या बायकोच तिच सगळ संभाळते .

दिवसा मागुन दिवस गेले , पपा पण त्यांच्या कामात खुप व्यस्त होते , सतत होणारे प्रयोग, दौरे, प्रवासात बसमध्ये बसणारे धक्के ह्यांचा परिणाम म्हणजे त्यांना साईटीकाचा त्रास सुरु झाला .तरीसुध्दा त्यांनी स्वत:च्या दुखण्याने कुणाचे नुकसान होऊ नये ह्याची काटेकोर पणे दखल घेतली . त्यांच्यामुळे कधी कोणता प्रयोग रद्द व्हावा ही पाळी त्यांनी आणु दिली नाही .

रंगभुमी रंगकर्मींकडून सदैव त्यांच्या कामाबाबत कठोर शिस्त आणि प्रखर निष्ठेची अपेक्षा करते . ह्या कसोट्यांवर उतरणारे रंगकर्मी निश्चितच समाधानी असतात हा त्यांचा प्रचंड विश्वास होता .

आज रंगभुमिव्यतिरिक्त दूरचित्रवाणी , मालीका आणि चित्रपटांचे आकर्षण आपल्याला अधिक आहे , हे जरी खरे असले ; तरी तीनही क्षेत्रात आपण मन:पूर्वकतेने काम करु शकत नाही , ही वस्तुस्तिथी आहे . त्यासाठी अग्रक्रम निश्चित करावा आणि त्यानुसारच काम करावे तरच आपण आपल्या कामाला न्याय देऊ शकतो हे त्याचे ठाम मत होते . त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांना खुप चित्रपटांच्या आॅफर येत पण शुटिंगला तारखा दिल्या पर निर्माते अडकतील आणि अन्य कलाकार बसुन राहतील म्हणुन ते नकार देत असत . ते नेहमी सर्वांना आग्रह करीत की रंगकर्मी म्हणुन तुमचे काम सचोटीने , मन:पुर्वक आणि शिस्तीने करा. त्यातुन मिळणारे समाधानच तुम्हला प्रगतीच्या वाटेवर पुढे जाण्यास बळ देईल .

मुलांचे पहिले गुरु त्यांचे जन्मदाते असतात . . माझ्या पपांचा माझ्यावर फार प्रभाव आहे. त्यांनी प्रत्यक्ष असा मला काहीच उपदेश केला नाही .त्यांनी खुप सुखही पाहील आणि खुप दु:ख ही सोसली पण कधी ते सुखाने भारवून गेले नाहीत तर कधी दु:खाने खचुन दीनवाणी झाले नाहीत . त्यांचा हा समतोल मी आयुष्यभर राखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मित्रपरिवारांबरोबर त्यांच्या बैठका होत तेव्हा दाराआडून त्यांच बोलण ऐकत असु त्या बोलण्यातून माझ्या मनावर असे बिंबले की त्यांना खोट बोलणारी माणस अजिबात आवडत नसत . खोट बोलावे लागणे हा ते स्वत:चा अपमान समजत . कुणाचा गैरफायदा घेण्यासाठी किंवा कुणाला फसवून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी किंवा कुणाला संकटात पाडण्यासाठी मी कधीच खोटे बोलत नाही . तसा खोटेपणा करावा लागणे हा मी स्वत:चा अपमान समजोतो . त्यांचे हे बोलणे माझ्या बालमनावर कोरले गेले होते. या बाबतीत माझे वर्तन वडिलांच्यासारखेच ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आलेले आहे.

पपांची रहाणी अतिशय साधी , पांढरा शुभ्र पायजमा , कुडता आणि पायात कोल्हापुरी चप्पल . आयुष्यात त्यांनी कसलीच हौसमौज किंवा थाटमाट केला नाही . पण एका गोष्टीवर प्रचंड प्रेम केल ते म्हणजे त्यांच्या ईंग्रजी , मराठी पुस्तकांचा संग्रह . वाचायचा त्यांना विलक्षण छंद त्यामुळेच की काय साहित्याने त्यांना वयाच्या ऊतारपणातही कायमची साथ दिली . शेवटी शेवटी बसुन कंबर दुखायची , डोळ्यांवर त्राण यायला लागला म्हणुन श्री ऊपेंद्र दाते रोज संध्याकाळी ४ वाजता येऊन विविध कादंबर्या त्यांना वाचुन दाखवायचे . पपा खुप आवडीने ऐकायचे .

पपांची तब्येत २४ मे २०१७ ला बिघडली . त्याना एशियन हार्ट इनस्टीट्युट मध्ये अॅडमिट कराव लागल . किडनीचा त्रास होता . २२ दिवस ICU मध्ये होते . किडनी फक्त ५ ते १० टक्के काम करत होती . पण अशा अवस्थेमध्ये पण दवाखान्यामध्ये त्यांचा प्रचंड दरारा ICU मधले कर्मचारी त्यांच्या आवाजाला अक्षरश: थरथरायचे पण तितकेच त्यांच्यावर प्रेमही करायचे . दवाखान्यातल अळणी जेवण त्यांना अजिबात आवडत नव्हत , त्यांना ICU मध्ये कधी नासिकचा कोंडाजीचा तिखट चमचमीत चिवडा तर कधी जुहू चौपाटीवरची भेळ खायची प्रचंड ईच्छा व्हायची . शेवटी घरी आल्यावर आम्ही त्यांची ही ईच्छा ही पुर्ण केली .

दवाखान्यामध्ये त्यांनी खुप हट्टीपणा केला , एखाद्या लहान मुलाप्रमाणे .पपांना फ्रेंच दाढी ठेवायला खुप आवडायच . दवाखान्यात त्यांची दाढी खुप वाढली होती पण दवाखान्यातल्या नाव्ह्याला ते आपल्या दाढीला हात लाऊन देत नव्हते . शेवटी २२ दिवसांनी घरी आल्यावर त्यांचा अकमेव आणि प्रिय न्हावी दत्ता , जे मागची ५० वर्ष त्यांची घरी येऊन कटींग करत होते त्यांनाच आपल्या दाढीला हात लाऊन दिला . अजुन एका व्यक्तिवर पपांनी मनापासुन प्रेम केल ती व्यक्ती म्हणजे मंगल सिंग राय , १८ वर्षांपुर्वी पपांच्या घरी पपांना संभाळायला म्हणुन आला आणि पपांचा लाडका होऊन बसला . पपांचे मंगल शिवाय पान हलत नसे . ICU मध्दे सुध्दा सतत मंगलच्या नावाचा जप चालु असे . मंगलनेही शेवटच्या क्षणापर्यंत पपांची सेवा केली . काही नात्यांची शब्दांमध्ये मोजमापच होऊ शकत नाही ईतकी ती अनमोल असतात .

असे हट्टी पण आवडत्या माणसावर जिवापाड प्रेम करणारे पपा आज आमच्या पासुन दुर गेलेत हे खरच वाटत नाही .

१७ जुन २०१७ ला दवाखान्याची रजा घेऊन आम्ही जड अंत:करणाने पपांना घेऊन घरी आलो . डाॅक्टरांनी आम्हाला कल्पना दिली होती की आता पपांचे शेवटचे काही दिवस आता ऊरले आहेत तेव्हा सगळ त्यांच्या मनाप्रमाणे होऊ द्या. आमच्या डोक्यावरच जणुकाही आभाळच कोसळल. खुप मन घट्ट करुन आम्ही तिघी बहिणी पपांच्या सेवेत गुंतलो .. पहिला आठवडा खुप छान गेला , पपांबरोबर गप्पा गोष्टी , नातवंडांचा , त्यांच्या मित्रमंडळींची वर्दळ . घर अगदी भरुन गेल होत . जो तो आपआपल्या परीने अश्रु लपवत पपांना खुष ठेवायच्या प्रयत्नात . पपांची तब्येत ढासळायला लागली , त्यांनी अन्नपाणी सोडुन दिल . अचानक पणे एका रात्री २ वाजता ऊठुन म्हणाले मला खुप भुक लागली , मला बाजरीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी खायची ईच्छा आहे आम्ही रात्री २ वाजता त्यांना चटणी भाकरी खाऊ घातली ते त्यांच शेवटच अन्न होत त्यानंतर त्यांनी अन्न पाण्याचाही त्याग केला .

काही देणारे तुमची चालू क्षणाची भूक भागेल असे देतात आणि काही तुमची आयुष्यभराची भूक भागेल असे देतात . सुदैवाने मला माझ्या पपांमध्ये दोन्ही प्रकारचे गुरु भेटले. पण वर उल्लेख केलेल्या गुरुंनी म्हणजे माझ्या पपांनी मात्र मला आयुष्यभर पुरेल अशी विद्या , संस्कार दिलेले आहेत . अशा माझ्या अष्टपैलु पपांना भावपुर्वक श्रध्दांजली .
- शर्मिला माहुरकर .