
तुकाराम काकांचा इशारा
ही २००५ सालची गोष्ट आहे. मी लोकल ट्रेनची वाट पाहत रेल्वे स्टेशनवर उभा होतो. तेव्हड्यात साधारण साठ वय असलेले तुकाराम काका रेल्वे रूळ ओलांडून पटकन प्लाटफॉर्मवर उडी मारून आले आणि लोकल येताच डब्यात शिरलेसुध्दा. त्यांचा बांधा ताठ होता. अनेक वर्ष बांधकाम खात्यात काम केल्यामुळे अंगातला जोर कायम होता. डोक्यावर सगळे केस पांढरे झाले होते. पण उत्साह तरुणाला लाजवेल असा होता. आम्ही दोघं बाजूलाच बसलो. पाउस पडत होता. तुकाराम काका सांगू लागले,
" मी अंदमानला होतो. तेव्हा समुद्राचं पाणी पोर्ट ब्लेरमध्ये शिरलं. मी जरा वर उभा होतो. मी डोळ्याने ६० फुट उंच लाट पाहिली. पटकन धावत बाजूच्या बिल्डिंगच्या गच्चीवर गेलो, म्हणून वाचलो. "
तुकाराम काकांना लिहिता वाचता येत नव्हता. पण एका बांधकाम कंपनीमध्ये ते काम करत होते. संपूर्ण भारत फिरले होते. 1998 साली गुजरातमध्ये वादळ झालं, तेव्हा ते तिथेच होते. पोरबंदर मध्ये आधी सोसाट्याचा वारा आला. त्या वार्याचा जोर इतका होता की रेल्वे रूळ उखडले गेले आणि वार्याने त्यांना वाकडं केला. हवेची इतकी ताकद पाहून तुकाराम काका हबकून गेले. इतक्यात जोरदार हवेने समुद्रातील पाणी उडवत आणल. ती लाट २० फुट उंच होती. पुन्हा तुकाराम काकांनी बाजूच्या बिल्डिंगमध्ये धाव घेतली. त्याच्या सोबत आणखी काही लोक धावले. सगळ्यांनी गच्ची गाठली. पण अनेक कामगार त्या पाण्यात सापडले आणि ठार झाले. अंदाजे १०,००० जण ठार झाले. तुकाराम काका आणि त्यांच्या सोबत असलेल्या मजुरांनी काही प्रेते टायर मध्ये जाळली.
तुकाराम काका सांगू लागले, " माणूस फार माजला आहे. पाण्याच्या जागेवर बिल्डिंग बांधतो, शहरे उभी करतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मुंबईसुध्दा एक दिवस बुडेल. "
काका बोलले आणि महिनाभरात खरोखरच २६ जुलै उजाडला आणि मुंबई बुडाली.
ट्रेनची वाताहत झाली. ७ दिवस ट्रेन बंद होत्या. ७ दिवसानंतर मी स्टेशनवर तुकाराम काकांना शोधत होतो. पण ते कुठेच दिसले नाहीत. आजपर्यंत दिसले नाहीत. त्यांचं काय झालं? की त्यांच्याही घरात पाणी शिरलं?
२६ जुलै पुन्हा येत आहे. पुराची आठवण येण्यापेक्षा मला तुकाराम काकांची जास्त आठवण येते. कारण आता सगळीकडे नदी, खाडीच पाणी अडवून उंच इमारती उभ्या राहत आहेत. तुकाराम काका म्हणतात तसा माणूस खरच माजला आहे.
आता पूर, भूकंप, वादळ आलं तर किती हाहाकार माजेल.
तुकाराम काकांचा इशारा विसरता येणार नाही.
-निरेन आपटे