मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

उंबरठा

ह्या गावात माझी शिक्षिका म्हणून नवीनच नियुक्ती झाली होती. नुकतीच एम. एस. सी. करून हि पहिलीच नोकरी होती, तेव्हा निदान एक वर्ष तरी खेडेगावात पोस्टिंग स्वीकारायची होती. 

एक खोली आणि स्वयंपाकघर अशी छोटीशी जागा गावातल्या आतल्या भागात भाड्याने मिळाली होती.

आई बाबा आणि लहान भाऊ घर गोठवायला आले होते. 

घरापासून शाळेच्या रस्ता निर्जन होता तेंव्हा एकटं येण्या-जाण्याची जरा भीती पण वाटायची , आई ने सांगितल्या प्रमाणे हनुमान चालीसा म्हणत म्हणत रोज शाळेंत येणं जाणं सुरु झालं .

घर आणि शाळा ह्या मध्ये दोन शेतं होती, त्या वरुन जाताना मला एक छोटंसं घर दिसायचं , तिथे शेतकरी रहात असावा असं वाटलं, पण कुणी हि कधी बाहेर काम करताना दिसायचं नाही .

मात्र त्या घरा समोरून जाताना खमंग मसाला भाजल्याचा वास यायचा तो वासच इतका चविष्ट वाटायचा कि माझं जेवण झालेलं असून सुद्धा परत भूक लागायची.

मनात प्रश्न पडायचा कि ह्या घरात येताना - जाताना कोणी दिसत नाही मग आत राहतं तरी कोण?

शेवटी माझ्या घर मालकिणीला एकदा विचारलं.

तिन्हे सांगितलं कि एक बाई नुकतीच तिथे भाड्यानी राहायला आली आहे, बहुतेक राजस्थानी / मारवाडी असावी कारण ती डोक्यावर पदर घेऊन आपलं तोंड पण झाकून ठेवते, तिच्या बद्दल कुणालाच काही माहित नाहीये कारण त्या शेताचा आणि घराचा मालक शहरात राहतो आणि हे घर तिने भाड्याने घेतलं आहे. आत्ता पर्यंत तिला गावकर्यांनी दोन - तीनदाच बघितली आहे, ते हि किराणा माल घेताना, पण तीचा चेहरा मात्र कुणीच बघितलेला नाहीये .

हे ऐकून मनात बरेच प्रश्न पडायला लागले, अशा एकांतात असलेल्या घरात एकटी बाई कशी काय राहते, आजुबाजूला नुसती शेती, रात्री पण किती भयाण वाटत असेल? त्या वरून रोज मसाला भाजून स्वतः साठी जेवण सुद्धा करते !

अशे आणखी दोन आठवडे गेले मात्र शाळेच्या रस्तावर रोज सुंदर जेवणाचा वासाची मला आता सवय झाली होती. त्या वासाचा जणू मी आनंदच घ्यायला लागले होते, आज मसाल्या मध्ये काय बरं टाकलं आहे? हा विचार करत करत मी शाळेत कधी पोहोचायची मलाच कळायचे नाही.

एक दिवशी शाळेत जाताना मनात विचार आला कि आपण तिच्या कडे जाऊन ओळख करू या कां ? कळेल तर खरं इतका सुंदर स्वयंपाक करणारी हि बाई आहे कोण ?

आणि मी शेतावर चालत जाऊन तिच्या दारा पर्यंत पोहोचले .......घराच्या उंबरठ्यावर पाय ठेऊन कडी पर्यंत हात गेला पण तसाच परतला कारण आतून त्या बाईचा बोलण्याचा आवाज येत होता ......जणू कोणाशी तरी भांडत असावी असं वाटलं. दार न ठोकता तशीच परतले , आणि मनात प्रश्नांचा गुंता वाढू लागला .

परत काही दिवस गेले आणि मनात पुन्हा विचार आला कि त्या दिवशी तिच्याकडे कोणी पाहुणा आला असेल , तेंव्हा आपण पुन्हा एकदा जाऊन बघायला हरकत नाही. पाय आपोआपच तिच्या घराकडे वळले ..... दारा जवळ गेल्यावर ऐकते तर पुन्हा तेच ! ती कोणाशी तरी भांडत होती, ह्या वेळेला मी जरा ऐकाचा प्रयत्न केला आणि कळालं कि ती हिंदी -मारवाडी भाषेत बोलत होती , ह्या वेळेस ती खूप रागावलेली वाटली आणि काठी ने मारत असावी असं हि वाटलं . आता मी खूपच घाबरले होते आणि शाळेच्या मार्गाला पळतच सुटले , हनुमान चालीसा चा पाठ मोठमोठ्याने सुरु केला. शाळेत पोहोचल्यावर एक पेला भरून पाणी प्यायले आणि मनात निश्चय केला कि आता आपण तिला भेटायच्या भानगडीत पडायचं नाहीं . जर अख्या गावाला ती कोण आहे , कुठून आलीये असले प्रश्न पडत नाही तर मी तरी कशाला विचार करू.

पुन्हा काही दिवस गेले आता मी ठरवल्या प्रमाणे सुन्दर स्वयंपाकाचा वास घेत आणि तिच्या घराकडे आश्चर्याने पाहत सरळ मार्गाने शाळेत जाणं सुरु केलं.

आज नेहमी प्रमाणे शाळेत जायला निघाले आणि आज तो सुंदर वास आलाच नाही! बघते तर तिच्या घरा समोर बरेच गावकरी उभे होते. लगबगीने घरा जवळ गेले तेंव्हा कळलं कि त्या बाई ला पोलीस धरून घेउन गेली आहे, माझ्या अंगावर शहारे आले आणि मी तिच्या दारावर पोहोचले, उंबरठा ओलांडून आत गेले तर बघते एका अराम खुर्चीवर एक बुजगावणं बसवलेलं होतं , बाजूला एक काठी, एक करवत आणि एक चाबूक ठेवलेला होता.

दोन दिवसांनी सगळे प्रश्न सुटले होते. त्या बाईला नवर्यानी खूप त्रास दिला होता तेव्हा तिने त्याचा जीव घेतला होता ..... आणि पळून इकडे आली होती. मात्र तिचा सूड पूर्ण नव्हता झाला म्हणून ती त्या बुजगावण्याला नवरा समजून मारायची.

पण आता मात्र शाळेच्या रस्त्यावर सुंदर जेवणाचा वास कायमच थांबला होता .

ऐश्वर्या कोकाटे