१९५७ साली जेव्हा सिने निर्मितीसाठी फार तंत्र हाती नव्हतं तेव्हा एक सिनेमा निर्माण झाला होता- " दो आंखे बारह हाथ ".
निर्माता-दिग्दर्शक होते व्ही. शांताराम आणि कथा होती गजानन दिगंबर माडगूळकर
ह्यांची.
माडगुळकर ( ग. दि मा आणि बंधू व्यंकटेश व इतर भावंडे )हे तेव्हाच्या औंध प्रांतामध्ये वाढले. माडगुळकर आणि सुधीर फडके ह्यांनी १९५५ ते ५६ साली पुणे आकाशवाणीवरून "गीतरामायण" सादर केले होते. जे फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर गाजले. ह्याच गीतरामायणाचे हिंदी, कानडी, तेलगु, कोकणी, आसामी, उडिया, सिंधी, बंगाली, इंग्लीश अशा नऊ भाषात अनुवाद झाला. ब्रेल लीपिमध्येही ते लिहिण्यात आले.
त्यावेळी औंध प्रांतामध्ये सातार्याजवळ स्वतंत्रपूर नावाचं खुले बंदीगृह होते. बंदीगृह म्हणजे jail . ज्याला भिंती नव्हत्या. माडगूळकरांनी हाच प्रयोग केंद्रस्थानी ठेवून एक कथा रचली. त्याला मानवी मनोव्यापाराची जोड दिली.
सिनेमाची कथा अशी : आदिनाथ नावाचा जेल वार्डन (अभिनेता : व्ही. शांताराम ) सरकारची परवानगी मिळवतो आणि सहा घातक खुन्यांना जेलमधून स्वतःच्या गावातील घरी घेवून जातो.
त्यांना सांगतो, " मी तुमची जेलमधून सुटका केली असली तरी माझ्या घरातून पळून जाणार नाही असा मी तुमच्यावर विश्वास ठेवतो"
सहा आडदांड खुनी चक्क हे ऐकतात आणि आदिनाथ ह्यांच्या शेतात राबू लागतात. आदिनाथ त्यांना कष्टाची भाकर खायला शिकवतो. पण हे सहा जण बाजारात भाजी विकायला जातात तेव्हा एक सावकार गुंडांकडून त्यांना मारहाण करतो. " आम्ही कोणालाही मारणार नाही " हे वचन सहा जणांनी आदिनाथांना दिलेलं असतं. त्यामुळे ते बेशुध्द होईपर्यंत मार खातात. खेळणी विकणारी नायिका (संध्या ) त्यांना बेशुध्द अवस्थेत घरी आणते. तोवर सावकाराने आदिनाथांच्या शेतात जाळपोळ सुरु केलेली असते आणि माजलेले बैल सोडलेले असतात.
एक बैल आदिनाथांना ठार करतो.
नेमका त्याच दिवशी सहा खुन्यांची शिक्षा माफ झाल्याचा आदेश येतो.
सहाजण स्वताच्या घरी जायला निघतात. पण पुन्हा मागे फिरतात आणि आम्ही इथेच राहू आणि जळालेल शेत पुन्हा फुलवू असा निश्चय करतात.
माडगूळकरांनी अनेक उत्तम सिन लिहिले आहेत. आदिनाथ यांच्या घरी सहा कैदी पहिल्या रात्री स्वतःच्या पायाला दोरी, फावडे, कुदळ बांधून झोपतात. कारण त्यांना जेल मध्ये राहिल्यामुळे पायात बेड्या असल्याची सवय असते.
आदिनाथ त्यांना मुक्त सोडतो तेव्हा ते एकदा पळून जाण्याचा प्रयत्न करतात पण आदिनाथांचे डोळे पाहून पुन्हा मागे फिरतात.
सिनेमाला व्ही. शांताराम ह्यांनी इतकं अर्थपूर्ण बनवलं की " दो आंखे बारह हाथ" ला 8th Berlin International Film Festival मध्ये पुरस्कार मिळाला. Samuel Goldwyn Award वर्गवारीत Golden Globe अवार्ड मिळाला.
लता मंगेशकर ह्यांनी गायलेली आणि भरत व्यास ह्यांनी लिहिलेली आणि वसंत देसाई ह्यांनी संगीतबध्द केलेली सर्व गाणी गाजली. त्यातील " ए मालिक तेरे बंदे हम..." आजही रसिकांच्या स्मरणात आहे.
आज आधुनिक तंत्र हाती असून जरी फार दर्जेदार सिनेमे निर्माण होत नसले तरी u tube सारखं माध्यम मिळालं आहे. हा सिनेमा तुम्ही त्यावर पाहू शकता. Black and white असूनही ह्या सिनेमातील व्ही. शांताराम आणि माडगुळकर ह्यांची दृष्टी खरोखर पाहण्यासारखी आहे.
-निरेन आपटे