Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

कारण ठिकाण होतं रायगड किल्ला. ३५० पेक्षा जास्त वर्ष उनपावसाचा मारा सहन करूनही टिकून राहिलेल्या दगडी पायर्यांवर ही मुलगी हातात ताकाची एक किटली, चार ग्लास आणि ग्लास धुवायला बादली घेवून बसली होती. मी ताक घेतलं आणि पिताना तिच्याकडे पाहू लागलो. हाडाची काड झालेली. अजून दुधाचे दात पडले नव्हते आणि पोटाच खळग भरण्यासाठी काबाडकष्ट करू लागली होती. शिवाजी महाराज गेले आणि अश्या असंख्य कष्टकर्यांची रयाच गेली. रायगड भग्न होत गेला आणि ह्यांचं जीवन त्यापेक्षा जास्त भयाण झालं. त्यानंतर अनेक सत्ता आल्या-गेल्या. पण रायगडावर राहणाऱ्या ह्या कष्टाळू लोकांचे कपडे जास्त फाटत गेले.

एकेकाळी ह्या रायगडावर आरोळी उठत असे,
" चल मर्दा, उपस तलवार. शत्रू कोकणात उतरतोय. आमची शेती जळेल अन आया-बहिणीची अब्रूबी शिल्लक रहायची नाही."
मग सपासप तलवारी तळपू लागायच्या.
" जय भवानी, जय शिवाजी....यळकोट यळकोट जय मल्हार"
सगळे रांगडे गडी शत्रूवर तुटून पडायचे.
कांदा भाकर खाणारे मुठभर मावळे दहा हजार फौजेवर काही कळायच्या आधीच हल्ला करायचे. शत्रू तोफेत गोळे भरायला निघायाचा, तोवर मावळ्यांनी अनेकांच्या खांडोळ्या केलेल्या असायच्या. शत्रूच नाही तर महापराक्रम गाजवलेली ती क्रूर तोफसुध्धा शरण यायची. मावळे एका हातात तलवार, आणि एका हातात मृत्यू घेवून फिरत...फक्त महाराजांसाठी!!

"सर, अजून एक ताक घ्या ना, फक्त दहा रुपये" मी भानावर आलो. इतिहास इतिहासजमा झाला आणि वर्तमानात उरली दिवसभर रायगडावर ताक विकत फिरणारी ही कन्या. एक ग्लास ताक पिवून झालं होतं. तरीही अस वाटलं आणखी एक ग्लास पिवूया. कारण त्याबदल्यात तिला जे पैसे द्यावे लागतील, तो फक्त तिचा" profit " नसेल तर कष्टाला दिलेली सलामीही ठरेल.

हल्ली ह्या कष्टाला कोण सलामी देतं? सिनेस्टार्स, क्रिकेट खेळाडू, गायक आणि राजकारणी ह्यांना पद्म पुरस्कार मिळतात आणि दिवसभर उन्हात उभं राहून ताक विकणाऱ्या मुलीला मिळतात एका ग्लासामागे दहा रुपये.
मी तिला विचारलं, "शाळेत जाते का ?"
तिने उत्तर दिलं, "जातो की..आम्ही गडावरची सारी मुलं खाली पाचाडमध्ये शाळेत जातो."
मी थक्क झालो. अंदाजे १५०० पायर्या उतरून- पुन्हा चढून ही मुले शाळेतही जात होती. रायगडाची उंची आहे 1,३५६ मीटर. पण ह्या इवल्याश्या पोरांची कर्तबगारी आहे आसमंताला भिडणारी. ती मोजायची तर मीटरमध्ये मोजता येत नाही. मीटर त्या शाळेत जाणार्या मुलांना मोजावे लागतात, जे school bus मधून शाळेत जातात-येतात... घरपोच!!

इथे रायगडावरील आणि इतर गडांवरील मुले उरलेल्या वेळेत ताक, लिंबू सरबत विकून चार पैसे कमावतात. महाराजांनी चारी बाजूने आक्रमण होतं असूनही स्वराज्य आणलं ते अश्याच गड्यांच्या बळावर...हे जग चालतं ते अश्याच कष्टकर्यांच्या जोरावर.

एक असाच मावळा आहे...त्यांच नाव आहे श्री. सुरेश वाडकर. साधारण २० वर्षांपूर्वी वाडकरांनी रायगड एक हजार वेळा सर करायचा निश्चय केला होता. मी ती बातमी वाचली होती. तेव्हापासून मनात कुतूहल होतं. वाडकर कुठे भेटतील? त्यांच्यासोबत गडावर जाता येईल का? आम्ही अनेक गडकिल्ले फिरत असू. तेव्हा कोणीतरी हमखास वाडकरांच नाव घेई. पुढे पत्रकारिता करताना थोरांपासून-चोरांपर्यंत अनेकांना भेटलो. पण वाडकरांची भेट होत नव्हती. मनाच्या एका कोपर्यात वाडकर लपून बसले होते.

रायगड फिरून रोपवे जवळ आलो आणि एका कोपर्यात एक दाढी वाढवलेला माणूस दिसला. अचानक मनाने उचल खाल्ली- हे वाडकर तर नाहीत ना? मी मनात खुश झालो. जर हे वाडकर असतील तर महाराज पावले अस म्हणायचं. मी त्यांच्यासमोर उभा राहिलो आणि नाव विचारलं.
आणि ते म्हणाले-
"मी सुरेश वाडकर, ती खुर्ची ओढा आणि बसा "
साक्षात वाडकर माझ्यासमोर बसले होते आणि चक्क मला सोबत बसायला सांगितलं. माझ्या मुलाला जवळ ओढून घेतलं आणि त्याला म्हणाले, " बघ मी तुला पक्ष्यांचे आवाज काढून दाखवतो." मग त्यांनी भराभर पक्ष्यांचे आवाज काढून दाखवले. आसपास रोपवे ची वाट पाहणारे अनेकजण बसले होते. तेही पक्षी कुठून कुहूकुहू करतायेत ते शोधू लागले.
मग वाडकारांशी मी मस्त गप्पा मारल्या,
ते सांगू लागले, " आजवर मी रायगडावर ८७६ वेळा आलो आहे. आज गुजरात वरून आलेल्या ४० जणांना घेवून आलो आहे. मी रायगडाच्या पायर्या चढून येत असतो तेव्हा पक्ष्यांचे आवाज काढतो आणि अनेक पक्षी गोळा होवून तेही किलबिलाट करतात."
वाडकरांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. अंगात साधा भगवा शर्ट. अंग अगदी सडपातळ पण चेहऱ्यावर महाराजांसारख तेज!!
वाडकरकाका सांगू लागले, " रायगडावर अनेक साप आहेत. मी गेली ४३ वर्षे इथे येतो पण सर्पदंशाच एकही प्रकरण घडलेलं नाही. शिवभक्तांना दंश करू नये हे सापांनासुध्धा समजलं आहे. "
वाडकर किल्ल्याबद्दल सांगत होते. आम्ही प्रत्येक शब्द कानात साठवून घेत होतो. मग त्यांनी सर्पदंशावर औषध कसं तयार करायचं हे ही सांगितलं. तेव्हड्यात कोणीतरी धावत आला. म्हणाला- वाडकरकाका, रोपवे आला. चला, निघूया.
काका लगबगीने उठले. आम्ही घाईघाईत पाया पडलो. पु. लं. देशपांडे म्हणत- धरावेत असे पाय आता मिळत नाहीत.
आम्हाला मिळाले, तेही रायगडावर!!

काकांनी शबनम ब्याग खांद्याला लावली आणि रोपवे मध्ये बसले.
फक्त अवघी १० मिनिटे भेट झाली.
महाराजांना पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभल नाही. पण वाडकरकाका पाहता आले हे ही काही कमी नाही !!
महाराजांनी पदरी फार धन नसूनही अनेक शतके ताठ मानेने उभे राहणारे किल्ले बांधले. ते जपण्यासाठी सरकारी दरबारी अनेक कोटींचा निधी मंजूर होतो. त्या पैशांचा पुढे काय होतं?
किल्ले त्या पैशांमुळे नाही तर वाडकरकाकांमुळे टिकून आहेत. सरळ-सध्या शिवभक्तांच्या प्रेमामुळे टिकून आहेत.
-निरेन आपटे.