मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

विकास म्हणजे....


जेव्हा आपल्याला फारसे कळत नसते त्या वयात आपण दळण वळणाच्या साधनांचे महत्व भूगोलामध्ये शिकलेले असतो. मोठे होताना बहुतेकांनी मोठे होण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणूनच जणूकाही भूगोल ‘सोडून’ दिलेला असतो.... अभ्यासातून आणि मनातूनही! तसच काहीसं माझंही झालं होतं. कामा निमित्त माझ्यावर वेल्ह्याच्या एका दुर्गम गावात जायची वेळ आली. आणि तिथे हा भूगोल मला अचानक भेटला कारण त्या गावापर्यंत जायला गाडी जाईल असा रस्ता नव्हता! माझ्यासाठी रस्ता असणे ही इतकी स्वाभाविक बाब होती कि रस्ता नाही हे ऐकल्यावर मला समजून घ्यायला थोडा वेळ लागला! फार तर फार गावात st जात नाही ह्या परिस्थितीची मी कल्पना करू शकत होते म्हणून मी माझी गाडी घेऊनच त्या गावाला जायला आले होते...... पण गाडी असूनही मी गाडीने गावात जाऊ शकत नव्हते कारण गावाला जायला रस्ताच नव्हता!


मी आधीच्या गावातच थांबले, तिथे रस्ता संपत होता. काहीही झालं तरी मी पुढच्या गावाला जायचं ठरवलंच होतं. मग गावातल्याच एका ताईला प्रश्न विचारला, ‘मग लोकं तिथे जातात तरी कसे?’ ‘चालत’ या स्वाभाविक उत्तराने मी एकदम भानावर आले. साधं १०० मीटरवर दळण आणायला जायचं असलं तरी स्कूटर लागणाऱ्या मला ‘हो.... चालतही जाता येतंच की!’ हे पुन्हा मान्य करावं लागलं होतं. तेवढ्यात ती ताई म्हणाली, ‘फार वेळ नाही चालावं लागंत ....पाऊन तासात पोचाल. थोडंच अंतर आहे त्या डोंगरा पल्याड लगेच आहे ते गाव!’ ..... ‘पाऊन तास म्हणजे ...थोडंच?..... तोsss डोंगर म्हणजे थोडंच?.....’ मी मनातल्या मनात म्हंटलं! ..... ‘मला सोबत रस्ता दाखवायला येऊ शकेल का कोणी?’ मी थोडसं आर्जवानच विचारलं. तर ती म्हणाली, ‘कोण नाही येत ...हा एकच तर रस्ता आहे थेट तिथे जातो’ तिने हाताने दाखवलेल्या दिशेला मी बघितले एक डोंगराच्या कडेकडेनं गेलेली एक पाउलवाट दिसली ..... मी मनात म्हंटलं ‘कोण नाही येत.... म्हणूनच तर एकटीला जायची भीती वाटते!..... ‘शहरात राहिल्यामुळे मला ‘माझ्या’ सोबत रहायची सवयच नव्हती. मी वयानं मोठ्ठी झाले असले तरी एकटीला जायला सोबत लागते आहे हे मला या निमिताने नव्यानंच कळले. चुकले तर..?.... असेही वाटून गेले. ....माझा चेहरा बघून ती म्हणाली, ‘बाबू जा रे ताई सोबत... आलास कि तुला गोळी देते’ एवढ्याशा पोराला तिनं माझ्या सोबत यायला सांगितलं. ..... बुडत्याला काडीचा आधार... किती योग्य म्हण आहे याचीही प्रचीती आलीच. आम्ही दोघे चालायला लागलो ..... 


गप्पा सुरु झाल्या मग मात्र तो लहान असल्याचं मी विसरून गेले एवढ्या प्रगल्भतेच दर्शन झालं. तो अनेकदा या रस्त्यांन एकटा गेलेला होता. ‘दिवसाचं कधी पण भ्यायचं नाही.... पण सांज झाली कि रस्त्यांन येताना सारखी शु लागते.’ म्हणजे भीत भिताही त्याने हा प्रवास केला होता. ...आता तो माझा मार्गदर्शक होता, तरी घाबरलेलं सुद्धा तो प्रामाणिकपणे सांगत होता. वाटेतल्या झाडांची, पक्षांची माहिती देत होता. गावाचे आवाज किती लांब पर्यंत ऐकू येतात ते सांगत होता. ‘आमच्या गावचे आवाज पांगले कि म्होराचे ऐकू येतात ....त्या वळणा वर गेल्यावर गोप्याला आवाज टाकू बघा कसा लगेच यील’ ..... म्हणेपर्यंत वळण आलं. मला वाटत होतं थोडं थांबावं पण अंधाराच्या कल्पनेने सुद्धा मी झपझप पावले टाकायला लागले. बाबूने गोप्याला आवाज टाकला .... खरच थोडं पुढ जाई पर्यंत गोपाल आला .....’का रं काय काम काढलं?’.... ‘न्हाही ताई संग आलो हुतो, त्याना तुमच्या भागाबाईला भेटायचं हाय, नेतो का त्यास्नी?’ त्यांन विचारलं खरं पण मी नुसती कल्पना केली ..... तो खरंच निघून गेला तर...?माझं कसं होणार? ......बुडणाऱ्याची काडी कसली आता तर तोच माझा एकमेव तारणहार वाटायला लागला होता..... मी मध्येच म्हंटलं, ‘नको तू पण थांब आपण जाउच लगेच काम करून. तू असलास कि बरं वाटेल रे मला’ कधी नव्हे ते सगळं खरं एकदम सांगून टाकलं तसं मिश्कील हसून तो म्हणाला ‘ताई तुला पण मग गोळी द्यावी लागेल!’.... ‘देईन देईन तुझ्या सोबत गोपाळला पण देईन!’ एका गोळीची किंमत आयुष्यात मला प्रथमच कळली. गोपाल सांगत होता ‘भागाबाई तर आज घरी न्हाई, तिला माहित होतं का तू येणार म्हणून?’ पण एवढ्या लहान पोराचं ऐकतात होय! असं माझ्या मनात आलं...... मी गेलेच त्याच्या सोबत त्याच्या गावी. भागाबाई खरच घरी नव्हती. मी ही अचानकच न सांगता आले होते. मग गोपाळनी मला त्याच्या घरी नेलं. आईला चहा टाकायला सांगितला. बिन दुधाचा काळा चहा तेव्हा मला फारच आवडला. गोपालची आई सांगत होती, ‘आता या टायमाला कुठलं दुध? अजून म्हशीच्या धारा काढायच्या आहेत’.... 


गावातल्या एकुलत्या एका दुकानात....दुकान कसलं टपरीच होती तिथं, त्यात ना ‘चितळे’ मिळत होतं ना ’कात्रज’ काहीच मिळत नव्हते. धारा काढलं कि ४ तास घरच दूध वापरायची ती मंडळी, लागतं कशाला एवढ दुध? मग बाकीचे डेअरीला पाठवायचे, त्यांन चार पैसे तरी मिळतील हा विचार! ... ती सांगत होती. शहरात आपल्या सारख्यांकडे फ्रीज असल्यामुळे आपण साठवलेलं शिळं दुध वापरतो असं तिला वाटत होतं. ‘भागाबाई येईलच कि, रहा आता’ मी न जाणून विचारले, ‘कधी?’ ‘उदयाला’ ती म्हणाली. मी मनातल्या मनात कल्पना करत होते, माझ्या घरी जर कोणी शेजारचीकडे काम असनाणारी बाई आली तर मी तिला घरात तरी घेईन का? चहा करीन का? घरात दुध नाही असं सांगीन का? आणि कहर म्हणजे रहा असं म्हणीन का?..... मला असे प्रश्न ऐकायचीही लाज वाटली. ....तेवढ्यात गोपाल म्हणाला ‘आमचं घर बघायचं होतं ना? चल दाखवतो’ त्यांन फिरून त्याचं ऐसपैस घर दाखवलं साधारण १५००स्वेअर फुटांच होतं त्याला ते छोटसं वाटत होतं. कच्चं बांधकाम दगड मातीनं लिपलेले होतं. त्यांचाच त्यांनी बांधलेलं.... हौसेन! वाटेत तो सांगत होता. त्याच्या बा कडे पैसे होते पण सिमेंट आणताच येत नव्हतं!...... रस्ता नाही म्हणून पक्क घर बांधायला लागणारं सिमेंटचं जड पोतं तिथपर्यंत पोचू शकत नव्हतं कारण गाडी येत नाही. माझं घर मी घेतलं असलं तरी त्याला लागनारी सिमेंटची गोणी किती जड असते हे मला माहित नव्हतं. ह्या गोपालला माहित होतं ..... त्यांन नि त्याच्या बानं मिळून थोडी थोडी करत काही पोती डोक्यावरून वाहून नेली होती. .....ते सुद्धा ७वीच्या वयात ..... दप्तरा सोबत शाळेतून परतताना!... हे त्यांन वाटेत येताना इतक्या हौसेनं सांगितलं होतं कि मी येते तुझं घर बघायला म्हंटलं होतं. गोपालला त्याचं अप्रूप होतं...... म्हणून फिरून त्यांन घर दाखवलं!

तेवढ्यात मी डॉक्टर आहे असं समजून एक म्हातारा जखम बांधायला आला पण माझ्याकडे काहीच नव्हते. त्याची वहाती जखम बघून उगाचच अपराधी वाटले. कोणतरी नवीन माणूस गावात आलंय हे कळल्यावर एव्हाना बरीच माणसं जमली. थोड्यावेळ गप्पा झाल्या. गोपाळच्या आईनं साऱ्यांच्यासाठी चहा केला....माझ्यामुळे तिला करावा लागला... मला कसंसच झालं पण तिला त्याचं काही फारसं वाटलेलं दिसत नव्हतं.


रस्ता नाही म्हणून काय काय अडतं हे मी समजून घेत होते. साधं बँडेज सुद्धा नाही गप्पा ऐकल्यावरही मला वाटलं... त्या गावची अवघडलेली बाळंतीण दवाखान्यात तरी कशी पोचू शकत असेल?...... म्हणून मग ती घरीच देवावरच्या विश्वासानं ‘मोकळी’ होणार! अशा या गावात जीवाच्या अनिश्चिततेन वाटणारंच ना कि २ नको ४ पोरं होऊ देत! त्या दिवशी मला कळलं कि किती मुलं व्हावीत हे गावातल्यांच्या वैचारिक क्षमतेवर अवलंबून नसतं तर जन्मलेलं मुल तिथल्या परिस्थितीत जगण्याच्या प्रोबेबिलीटीवर अवलंबून असतं. रस्ता सुद्धा नाही अशा गावात एकदा पाउल वाटेनं गेल्यावर तासाभरातच मला काय काय कळल..... हे निवडून येणाऱ्या पुढाऱ्याला कळत नसेल का? असा प्रश्न तिथे आलेल्या लोकांना विचारावा असं वाटलं पण माझी हिम्मतच झाली नाही कारण ह्या सगळ्या ‘वेगळ्याच विश्वातल्या’ गोष्टी होत्या. त्या गावातल्या लोकांचं गप्पांमधलं बोलण ऐकताना मला ‘बोललेलं’ ‘समजत नाही’ की ‘परिस्थिती समजत नाही’ हेच काही काळानं कळेनासं झालं होतं म्हणजे प्रश्न भाषेचा आहे का माझ्या आकलनाचा? हेच मला समजेना.


शेवटी मी भागाबाईला मला भेटायला ऑफिसमध्ये येण्याचा निरोप गावात दिला नि बाबुसोबत परतीला निघाले. त्या गावाला जाताना नव्हत तेवढ ‘विकासाचं ओझं’ परतताना मला वाटायला लागलं..... गावात गाडीपाशी आल्यावर शेजारच्या दुकानातून १० रुपयाच्या खूप गोळ्या घेतल्या बाबुला दिल्या. एका वेळी न मागता एवढ्या गोळ्या बघून बाबू एकदम खुश! माझ्यासाठी ती गुरुदक्षिणा होती......’त्यातल्या गोप्याला पण उद्या शाळेत दे बरका!‘ मी आठवणीनं सांगितलं .....त्या क्षणी त्याच्या डोळ्यातली चमक सांगून गेली ..... तू दिली नसतीस तरी आईनं दिलेल्यातली अर्धी गोळी मी त्याला दिलीच असती! ......

एका श्रीमंत भागातून विषण्ण होऊन मी शहराची वाट धरली....... परतीच्या प्रवासात मात्र वाटेत भेटलेल्या प्रत्येक बाईला, तिने न मागता, आपणहून मी पहिल्यांदाच ‘लिफ्ट’ दिली. ....उतरताना त्यातली प्रत्येक जण म्हणत होती, ‘नीट जा गं बाई ..... बया एकटी गाडी चालवताना पहिल्यांदाच पाहिली.... सांभाळून जा बरं!’

सुवर्णा गोखले

*****