मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

----Unlocked----

@Yashashree Deshpande Angal


 

दिनांक फेब्रुवारी १४, २०२०

आजचा दिवस प्रेमाचा!! सकाळी सकाळीच फुलदाणीत लाल गुलाब पाहिले आणि मनात म्हटलं स्वारीच्या लक्षात आहे म्हणजे! नाहीतर असे "Days" वगैरे पाळणं म्हणजे अतिशय बालिश आणि थिल्लरपणाचं लक्षण आहे अविनाशच्या मते.. टेबलवर आयता चहा आणि पोहे वाट पहात होते (नवऱ्याला लग्नाआधीच स्वयंपाक शिकवल्याबद्दल मनोमन माझ्या दिवंगत सासूबाईंचे आभार मानले ) दिवस छान सुरु झाला. 

संध्याकाळी हॉस्पिटल मधून येताना आठवणीने अविनाशच्या आवडत्या इरफान खानच्या सिनेमाची तिकिटं घेतली. शुक्रवार असल्याने रात्री सिनेमा आणि लज्जतमधली पावभाजी असा फक्कड बेत जमून आमचा Valentine's Day मस्त साजरा झाला. 

 

 

                                                                                                             दिनांक फेब्रुवारी १८, २०२०

गेल्या काही २-३ दिवसांपासून काहीशा चमत्कारिक, भीतीदायक आणि तणावपूर्ण बातम्या कानावर पडायला लागल्या होत्या. बातम्या जरी आंतरराष्ट्रीय थरावर असल्या तरी देशातले वातावरण हळूहळू बदलायला भाग पाडत होत्या. खरंतर अर्वसूचा ७ वीचा अभ्यास (अर्थात मदत हवी असेल तरच; नाहीतर आई-बाबांची लुडबूड नकोच असते त्याला सध्या), रात्रीचा स्वयंपाक, उद्याचा डबा, सासऱ्यांचं पथ्यपाणी, एखादी कौटुंबिक मालिका ह्यातच माझी संध्याकाळ संपून जाते. पण आज आम्ही सगळेचजण हातातली कामं सोडून केवळ टिव्हीवरच्या बातम्याच पहात होतो; पाहून विचारमग्न होत होतो. वेगवेगळ्या वाहिन्या पाहिल्या तरी दाखवली जाणारी बातमी मात्र एकाच विषयाबद्दल होती - "कोरोना - वायरस"

 

 

 

दिनांक फेब्रुवारी २०, २०२०

"परगावातून येणाऱ्यांना थेट Quarantine", "हवेलीतील पाच जणांना कोरोनाची बाधा", "कोविड - १९ चाचणीला प्रशासनाची मान्यता", "तीन दिवस रुग्ण न आढळल्याने मावळवासीयांना दिलासा", "Sanitizer - आवश्यकता की फॅड? "अशा अनेक सकारात्मक आणि नकारात्मक बातम्यांनी वर्तमानपत्रांचे मथळे भरलेले दिसत होते. प्रभातफेरीला जाणारे सासरे आणि त्यांचा मित्रपरिवार ह्यांच्याकडेही सध्या गप्पांचा विषय हाच आहे असे सकाळीच त्यांनी नमूद केले. काल रात्री वाणसामानाची यादी करताना ६ जास्तीचे Sanitizers लिहिले तर चक्क "सगळे संपले" असा SMS आला. 

"हॉस्पिटलमध्ये उद्या संध्याकाळी मीटिंगसाठी जास्त वेळ थांबावं लागेल" असं Head Nurse ने सांगितल्यापासून मन थाऱ्यावर नव्हतंच म्हणा. कशीबशी डायरी संपवून झोपायचा प्रयत्न करते.... 

दिनांक फेब्रुवारी २१, २०२०

सगळं पटपट आवरून वेळेत हॉस्पिटल गाठलं. नेहमीचे सगळे पेशंट बघून झाले. आमचा वॉर्ड ICU म्हणजे तसा critical तरीही आज मात्र वेगळीच धाकधूक वाटत होती. डब्यातली आवडीची चवळीची उसळ घशाखाली उतरत नव्हती. सगळ्या पेशंट्सचे तापमान आणि रक्तदाब routine चेक केले. कशीबशी कामं संपवली. घड्याळातला लहान काटा ५ वर आला आणि आमचा सगळा staff मिटिंग रूम मध्ये जमला. मेघना आत्ताच मॅटर्निटी leave वरून परत आली होती, आत्मारामच्या मुलीचे पुढच्या महिन्यात लग्न असल्यामुळे त्याची सुट्टी लवकरच सुरु होणार होती, शशांक सर तीन महिन्यांपूर्वीच हनीमूनवरून परत आले होते, विमलताईंना थोडा दम्याचा त्रास सुरु झाला होता. सगळ्यांना भंडावून सोडणारा प्रश्न मात्र एकच होता  - "काय सांगणार आहेत आजच्या मीटिंगमध्ये" ?.... 

एरवी टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांत असलेली मीटिंग रूम आज जरा अधिकच शांत वाटत होती. डीन सरांनी सुरुवात केली - "तुम्हां सर्वाना सध्याच्या परिस्थितीची जाणीव आहेच आणि आपण 'अत्यावश्यक सेवा' ह्या व्यवसाय श्रेणी मध्ये येत असल्यामुळे आपल्या देशाला सध्या आपली सर्वांत जास्त गरज आहे. Aarati, you would be appointed to look after the Covid - 19 patients…." पुढची सगळी वाक्य अनपेक्षितपणे अपेक्षित होत गेली. माझ्या डोळ्यांसमोर माझ्याही नकळत भगत सिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई असे अनेक चेहरे दिसायला लागले होते आणि त्याचबरोबर एक वेगळेच स्फुरण चढायला लागले होते.  

 

 

 

दिनांक फेब्रुवारी २२, २०२०

आज शनिवार सकाळ!! मागच्या महिन्यात आगाऊ सूचना दिल्यामुळे आजची सुट्टी मंजूर झाली होती पण पुढच्या महिन्यात असलेल्या संगीतरजनीची तिकिटं मात्र refund देऊन रद्द झाली होती. 

अर्वसूने उठल्या उठल्या जाहीर केलं - " पुढच्या सोमवारपासून शाळा नाही"

मी जवळजवळ किंचाळलेच "काय???" 

"अगं आई, म्हणजे आता आम्हांला Online classes मधून शिकवणार, शाळेत जायची गरज नाही" त्याने अगदी मजेत उत्तर दिले. शाळेत न जाण्याचा आनंद मोठ्ठा की कॉम्प्युटर वर हवं तितका वेळ बसता येईल हा आनंद मोठ्ठा ह्याबद्दल कदाचित त्याचं एकमत होत नसावं पण गडी खूष होता हे खरं!! 

अविनाशनेही जाहीर केलं सोमवारपासून "Work from home"!!!! 

सासरे म्हणाले त्यांचा प्रभातफेरी संघ त्यांच्या फेऱ्या आपापल्या गच्चीत स्थलांतरित आणि मोबाईल दुपटीने Recharge करणार आहे. शेजारच्या मालतीवहिनी साखर घेण्याच्या निमित्ताने आल्या आणि टोमणा मारून गेल्या - "आरती, अय्या तू घरी कशी ?? आता तुझी तर डबल शिफ्ट सुरु व्हायला पाहिजे ना ?”

पार्वतीबाईंनी कपबशा विसळता विसळताच घोषणा केली "आरतीताई, आमच्या युनियनने पण कर्फ्यू का काय म्हणत्यात त्यो सुरु केला आहे, त्यामुळे मी काय उद्यापासून कामाला येणार न्हाय बघा" 

आता माझी वेळ होती सगळ्यांना सांगायची की माझा Lockdown तुमच्या सर्वांपेक्षा खूप वेगळा असणार आहे....  

 

  

   

 

दिनांक मार्च २, २०२०

हॉस्पिटल मध्ये नेहमीपेक्षा वेगळी धावपळ सुरु झाली होती. एकाच दिवसात त्या भागात कोरोनाचे ७२ रुग्ण आढळून आले होते. बऱ्याच जणांची लक्षणं जवळपास सारखी होती. आमचे हॉस्पिटल कोविड -१९ चे रुग्ण पहाणाऱ्या केवळ १६ हॉस्पिटलपैकी एक होते. आमचा staff अपुरा पडत होता त्यामुळे बाहेरूनही काही नवीन परिचारिका नेमण्यात आल्या होत्या. सर्वांचा दिवस पहाटेच सुरु झाला होता. नाश्ता वगैरे उरकला. "आपलं उंटासारखं पोट हवं होतं ना" असं मी माझ्याच शिफ्टला असलेल्या अनघाला म्हटलं. कारण पुढचे १० तास जवळजवळ ४० अंश तापमानात अन्न पाण्याविना काढावे लागणार होते. ९. ३० मिनटात PPE ( personal protective equipment) Kit घालून आम्ही सगळे' common हॉल मध्ये दाखल झालो. सर्वानी प्रार्थना म्हटली - 

"इतनी शक्ति हमें देना दाता, मनका विश्वास कमजोर हो ना

हम चलें नेक रस्ते पे, हमसे भूलकर भी कोई भूल हो ना"  

आता मात्र मला युद्धभूमीवर जाणाऱ्या सैनिकासारखे वाटायला लागले होते. कर्मयोग सुरु झाला होता.... 

 

 

 

दिनांक मार्च १४, २०२०

आज बऱ्याच दिवसांनी डायरी लिहायला वेळ मिळाला. 

रुग्णांची संख्या वाढत असल्याने आम्हांला हॉस्पिटलमध्येच रहाणे भाग होते. गेले २ आठवडे अक्षरशः यंत्र झालो आहोत आम्ही सगळे. सकाळच्या प्रार्थनेने स्वतःबरोबर कोविड - १९ च्या रुग्णांचे पण मानसिक बळ वाढवायचे. त्यांच्या बेडशीट्स बदलायच्या, त्यांना सक्तीने आंघोळ करायला लावायची, त्यांनी त्यांचा नाश्ता नक्की पूर्ण संपवला आहे ना ह्याची खात्री करायची. त्यांनी गोळी पूर्णपणे गिळल्याशिवाय तिथून हलायचे नाही. तिथून पुढे इंजेकशन्स, स्पंजिंग, सक्शनिंग. सलाईन ड्रीप लावण्यापासून रुग्णांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यापर्यंत्त सगळी कामं विनातक्रार, तो PPE चा निळा डगला घालून करायची. आई-बाबांचा काल रात्री फोन आला आणि जेव्हा त्यांनी प्रेमाने विचारलले - "१० तास खूप असतात ग, मध्ये मध्ये पाणी पीत जा बरं, स्वतःची काळजी घेतेस ना ?" तेव्हा ठोकून उत्तर दिलं - "हो हो"; 

पण खरं तर doffing procedure झाल्यावर म्हणजे चक्क १० तासानंतरच आम्ही पाणी पीत होतो; अगदी आमची आतून भट्टी झाली असली तरी.

सध्या हॉस्पिटल जवळच्या हॉटेल मध्ये आमची व्यवस्था केली आहे. पण बाकीचे काही बघायला, कसलाही विचार करायला उसंत कुठे आहे?! गेल्या १२ दिवसांत घरच्यांची आठवण, PPE Kit मध्ये होणारी उकडपिंडी, आपली टेस्ट पॉझिटिव्ह होणार नाही ना अशी सतत डोक्यावर असलेली टांगती तलवार ह्याचा खूप शीण आला होता.

अचानक नर्सिंगच्या कोर्सच्या अगदी सुरुवातीला वाचलेली Nightingale Pledge आठवली  -

"I shall be loyal to my work and devoted towards the welfare of those committed to my care"……

 

 

दिनांक मार्च २०, २०२०

आज डायरी लिहिण्याचे कारण वेगळेच आहे. गेल्या १२ वर्षांच्या नोकरीमध्ये असंख्य पेशंट्स पाहिले. वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या आजारांनी बेजार झालेले. तरीही साधारणपणे सगळ्यांची शुश्रूषा करण्याचे आमचे काम सरधोपटपणे सारखेच होते. कोणी चिडचिड करायचे, कोणी विनंती करायचे, कोणी खूप आशीर्वाद द्यायचे, कोणी सतत भेदरलेले असायचे. पण मागील काही दिवसांत पाहिलेले रुग्ण वेगळे आहेत, त्यांचा आजार नवीन आहे, त्यांचं एकटेपण नवीन आहे, त्यांच्यावर केले जाणारे उपचार नवीन आहेत आणि त्याउपर स्वतःला जोखिमीत टाकून ह्या सर्वांसाठी असेलला आमच्या सगळ्यांचा आशावादही नवीन आहे. 

आमच्या वॉर्डात दाखल झालेल्या १०० हून अधिक कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ११ जण आज बरे होऊन आपापल्या घरी जाणार आहेत. एखाद्या आईला आपलं मूल पहिल्यांदा चालायला लागल्यावर किंवा एखादया पक्षिणीला तिचं पिल्लू पहिल्यांदाच घरट्याबाहेर पडल्यावर किंवा एखाद्या कुंभाराला अतिशय निगुतीने केलेल्या मातीच्या भांड्याला सुंदर आकार मिळाल्यावर जो आनंद होईल ना; तशा काहीशा भावना आज उचंबळून आल्या आहेत. खूप दिवसांनी घरी फोन केला आणि भरभरून बोलले.... 

 

दिनांक मार्च २४, २०२०

२२ दिवसांनी हॉस्पिटलच्या बाहेरचं जग पाहिलं. अविनाश घ्यायला आला होता, त्याच्या खांदयावर डोकं ठेवून ढसाढसा रडावं असं वाटून गेलं. PPE Kit च्याशिवाय शरीर तर मोकळं वाटत होतं पण मन मात्र हॉस्पिटल मधल्या स्ट्रेचर्सवर रेंगाळत होतं. "कसे आहेत सगळे" ? असं विचारल्यावर अविनाश शांत हसला. कधीही कुठलाही ताण चेहऱ्यावर दाखवायचा नाही हा त्याचा एक खूप मोठ्ठा गुण होता. स्कूटर बिल्डिंगबाहेरच थांबवली त्याने आणि मला म्हटला "तू पुढे हो". बघते तर काय आमच्या सोसायटीतली सगळी माणसं खाली जमली होती आणि ती सुध्दा ६ - ६ फुटांचं अंतर ठेवून. मालतीवहिनी तर चक्क पंचारती घेऊन आल्या होत्या. सर्वानी मास्क लावल्यामुळे काहीजण चटकन ओळखू आले नाहीत. अर्वसूने धावत येऊन मिठी मारली तेव्हा मात्र माझा बांध फुटला. इतक्या थोड्या दिवसांत तो किती मोठा आणि समजूतदार वाटत होता मला!! सगळ्यांना लांबूनच नमस्कार करून आम्ही तिघे घरी आलो. सासरे अभिमानाने म्हणाले

"सीमेवरचंच काम करून आलीस पोरी!!" 

हात- पाय धुवून स्वयंपाकघरात गेले. घरातल्या तिन्ही "मुलांनी" मी नसताना घर अगदी स्वच्छ ठेवलं होतं. तिघांनी कामं वाटून घेतली होती म्हणे. अर्वसू तर चहा आणि आमटी सुद्धा करायला शिकला होता. माझं लक्ष टेबलावर गेलं. टेबलावर खालच्या फ्लॅट मधल्या सोनालीने स्वतः घरी बनवलेला ब्रेड, समोरच्या छायाताईंनी त्यांच्या गच्चीत नव्याने बनवलेल्या बागेतली भाजी,  क्रोशाच्या सुईने विणलेला रुमाल आणि असं बरंच काही ठेवलेलं होतं. 

सकाळचं रेंगाळणारं मन बाल्कनीत परत आलं. माझ्या घराची क्षितिजं ह्या सोसायटीच्या किती बाहेर विस्तारली होती हे जाणवलं. पण त्याच वेळी सर्वांचं lockdown त्यांनी किती सत्कारणी लावलं आहे ह्या विचारांनी हायसं वाटलं. 

देवा, सर्वाना अशीच सुबुद्धी दे म्हणजे आमच्यासारखे सध्या जीव मुठीत घेऊन काम करणारे Essential workers, नाहक

आपला जीव गमावणार नाहीत.

आनंद, दुःख, काळजी, सकारात्मकता, नैराश्य अशा अनेक संमिश्र भावना दाटून येत होत्या आणि इतक्यात भिंतीवरचं कालनिर्णय दिसलं. उद्या गुढीपाडवा आहे, चला तयारी करायला हवी. खूप दिवसांनी सर्वाना माझ्या हातचा स्वयंपाक करून घालेन. आम्रखंड आणि छोले-पुरी हा बेत ठरवला आणि दरवर्षी म्हणते ती प्रार्थना मनातल्या मनात परत आठवली –

।। ॐ ब्रह्मध्वजाय नम: ।।

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !

प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
गुढी ऊंच ऊभारु विश्र्वासाची , चैतन्याची ।
गुढीला फुले वाहू श्रद्धा आणि सद्भावाची ।
गुढीला माळ घालू साखरेहून गोड शद्बांची ।
नैवेद्यासाठी मात्र गरज आहे सत्कर्मांची ।
 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

@Yashashree Deshpande Angal