मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

झाडीपट्टी रंगभूमी


कलावंत, रंगभूमी, नाटके आणि ते पाहणारे सर्वसामान्य प्रेक्षक ही काही कुठल्या एकाच प्रदेशाची मक्तेदारी होऊ शकत नाही. नाटक या मनोरंजनाच्या माध्यमाने खरंतर अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. अगदी संगीत रंगभूमी पासून ते हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या नाटकांना आजही मराठी प्रेक्षक आवर्जून हजेरी लावतो. सिनेमा, दूरचित्रवाणीवरील असंख्य मालिका, संगणकावरील विविध खेळ, सोशल नेट्वर्किंग साईटस अशी एक ना अनेक मनोरंजनाची साधने हाताशी असताना देखील नाटक या प्रकाराला आजही मोठा लोकाश्रय लाभलेला दिसतो. कदाचित प्रत्यक्ष आणि जिवंत अभिनय पाहण्याचे केवळ हेच एक माध्यम असल्यामुळे त्याविषयीची ओढ माणसाच्या मनामधे जास्त असावी. विदर्भाला जसा नैसर्गिक वारसा लाभलेला आहे त्याच बरोबर कलेचा तसेच सांस्कृतिक वारसा सुद्धा या प्रदेशाला लाभला आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, आणि गडचिरोली या प्रदेशाला झाडीपट्टी असे म्हटले जाते. या भागात जंगलांचे प्रमाण लक्षणीय आहे. जंगलाचे अर्थात झाडीचे प्रमाण जास्त असलेली पट्टी म्हणजे भूप्रदेश म्हणजे झाडीपट्टी असे सरळ साधे समीकरण आहे. नक्षलवादी चळवळीमुळे सुद्धा हा प्रदेश कायम चर्चेत असतो. घनदाट जंगले, पाच व्याघ्रप्रकल्प आणि कोष्टी, गोंड, वंजारी, मंजा, धीवर, गोवारी, धनगर, कुणली, माळी, तेली आणि छत्तीसगढी अशा आदिवासी जमातींनी नटलेला हा समृद्ध प्रदेश. इथल्या लोकांची उपजीविका जंगलांवर आणि अर्थातच शेतीवर अवलंबून आहे. नागपूरपासून २०० कि.मी. दूर असलेला हा सारा प्रदेश. या प्रदेशाची अजून एक खासियत म्हणजे इथे मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला नाटकांचा प्रकार – झाडीपट्टी रंगभूमी !! शेतीकामातून थकून भागून घरी आल्यावर चार घटका करमणूक हवीच. त्यांच्यासाठी इथे ही रंगभूमी असून त्यांची नाटके मोठ्या प्रमाणावर बघितली जातात. खूप मोठी आर्थिक उलाढाल या निमित्ताने इथे केली जाते. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा या झाडीपट्टी रंगभूमीवर अवलंबून आहे.


या रंगभूमीवर रीतसर नाटके बसवली जातात. विविध खेडेगावातून या नाटक कंपन्यांना सुपारी दिली जाते आणि त्या कंपन्या आपल्या नाटकाचे खेळ या गावागावातून करत असतात. सुपारी देताना ठरलेल्या बिदागीच्या अर्धी रक्कम द्यावी लागते आणि उरलेली अर्धी रक्कम नाटकाला जो मध्यंतर असतो तेंव्हा द्यावी लागते. जर तेंव्हा ती दिली गेली नाही तर ही मंडळी नाटक तिथेच अर्ध्यावर सोडून निघून जातात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात ही मंडळी आपल्या नाटकांचे प्रयोग या प्रदेशातील गावागावात करत असतात. याच काळात इथे शंकरपट या नावाने बैलगाडा शर्यतींचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. दिवसभर या शर्यती झाल्यावर रात्रीचा प्रवास करणे जंगल असल्यामुळे कायमच धोक्याचे असते. मग या थकलेल्या शेतकरी मंडळींसाठी सुरु होतात नाटके. रात्री अंदाजे ११ वाजल्या नंतर ही नाटके सुरु होतात ती अगदी पहाटे पर्यंत चालू असतात. विनोदी, सामाजिक, राजकीय असे अनेक विषय या नाटकांमधून मांडले जातात. पूर्वीच्या काळी नट, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, वादक अशी अनेक कलाकार मंडळी एकत्र येऊन नाटकांचे सादरीकरण करीत असत. त्यांना जमीनदार, सावकार, व्यापारी असे गावचे सधन लोक पैसे देऊन बोलावत असत आणि मग अख्ख्या गावाला मोफत नाटक बघायची सोय केलेली असे. परंतु बदलत्या आर्थिक-सामाजिक-राजकीय परिस्थितीमध्ये या नाटकांना आता तिकिटे लावली जातात. अगदी २० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत तिकिटाचे दर असतात. १०० रुपये हा दर खुर्चीसाठी आणि इतर दर हे खाली जमिनीवर बसून नाटक पाहण्यासाठी असतात. खूप मोठी आर्थिक उलाढाल या काळात इथे होते. तज्ञांच्या सांगण्यानुसार काही काही नाटकांचा गल्ला जवळ जवळ २ ते ३ लाख एवढा जमा होतो कारण या नाटकांना येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या २-३ हजार एवढी मोठ्ठी सुद्धा असू शकते. सुप्रसिद्ध मॅगसेसे सन्मान मिळवलेले पत्रकार पी.साईनाथ यांनी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार पाच महिन्यात या रंगभूमी वर जवळजवळ २५ कोटींची उलाढाल होत असते. झाडीपट्टी रंगभूमीसाठी नक्कीच ही सन्मानाची गोष्ट आहे.


नाटकाच्या सदरीकरणासाठी एक मोठा लाकडी रंगमंच उभारला जातो. त्याच्या समोरची जमीन खणून मोठ्ठा खड्डा केला जातो आणि त्यात खुर्च्या ठेवल्या जातात जेणेकरून पाठीमागे जमिनीवर बसलेल्या लोकांना खुर्चीवर बसलेले प्रेक्षक मध्ये येऊ नयेत यासाठीची ही सोय असते. नेपथ्य, प्रकाश योजना, ध्वनी योजना अगदी उत्तम केलेली असते. संगीत नाटकांसारखाच वाद्यवृंद रंगमंचाच्या समोर बसलेला असतो. विषय कोणताही असला तरी संगीत आणि गाणी ही त्यात असलीच पाहिजेत असा जणू अलिखित नियमच इथे आहे. शेतकरी आत्महत्या यासारख्या गंभीर विषयावर सुद्धा इथे नाटके सादर केली जातात. रंगमंच उभारणी मध्ये यजमान असलेला सारा गावच सामील झालेला असतो. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक विषय या रंगमंचावरून हाताळले जातात. पूर्वीच्या काळी स्त्रिया नाटकांमधून कामे करीत नसत त्यामुळे स्त्री पार्ट पुरुषच करीत असत परंतु आता स्त्रिया सुद्धा या नाटकांमधून उत्तम भूमिका वठवताना दिसतात. इथले कलाकार काही नाटकाचे प्रशिक्षित नसतात. सतत प्रयोग सादर करून करून ते आपोआपच शिकत जातात. स्टेजच्या पाठीमागे कलाकारांना संवाद सांगण्यासाठी प्रॉँपटर्सची एक फळीच तैनात केलेली असते. रंगभूषा आणि वेशभूषा करण्यासाठी रंगमंचाच्या मागची जागा राखीव असते. ती कानाती आणि पडदे यांनी बंद केलेली असते. थंडी आणि जंगली श्वापदांचे भय यामुळे ही सगळी जागा अशा रीतीने संरक्षित करतात.

इथे येणारा प्रेक्षक सुद्धा अगदी या नाटकांना सरावलेला असतो. कित्येक लोकांनी एकाच नाटकाचे बरेच प्रयोग पाहिलेले असतात, त्यामुळे अनेक संवाद त्यांना अगदी तोंडपाठ झालेले असतात. काही वेळेला जर रंगभूमीवरील नट आपला संवाद विसरला किंवा काही वेगळेच म्हणू लागला तर समोर बसलेले प्रेक्षक त्याला योग्य संवाद लगेच तिथल्या तिथे म्हणून दाखवतात. याचमुळे इथे अनेकदा नाटकांचे शेवट हे मुद्दाम बदललेले असतात. दिग्दर्शकाला हे एक मोठे कामच असते की लोकांना माहिती असलेल्या नाटकाच्या कथानकात अनपेक्षित बदल करून नाटकाचा शेवट वेगळाच करायचा. काहीतरी नाविन्य आणण्याचा हा एक सुंदर प्रयत्न असतो. या नाटकांमध्ये पूर्वी स्थानिक भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. परंतु बदलत्या काळानुसार शहरी भाषेची छाप आता याठिकाणी पाहायला मिळते. काही रंगकर्मींनी, त्यांच्या संस्थांनी आता इथे कायम स्वरूपाचे सभागृह उभारले आहे. बोरकर या कुटुंबातील आता चौथी पिढी या व्यवसायामध्ये कार्यरत आहे. त्या मंडळींनी जवळजवळ १०० नाटके बसवलेली आहेत. लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि व्यवस्थापक असलेलेल श्री. सदानंद बोरकर हे त्या नाटक मंडळाचे अध्वर्यू मानले जातात. या नाटकांचे कार्यक्षेत्र आता केवळ झाडीपट्टी एवढेच राहिले नाहीये. या रंगभूमीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला, जेंव्हा डिसेंबर २००८ मध्ये त्रिचूर, केरळ इथे भरलेल्या सार्क संमेलनात बोरकर मंडळींच्या “आत्महत्या” या नाटकाच्या प्रयोगाचे सादरीकरण झाले. ही रंगभूमी आता झाडीपट्टी या सीमित क्षेत्राच्या कक्षा ओलांडून बाहेर पडली. नक्कीच याची दखल आता महाराष्ट्र घेईल आणि एक संपन्न नाट्यप्रयोग सर्वदूर पोहोचेल अशी आशा करायला हरकत नाही.


आशुतोष बापट