मराठीसंस्कृती.भारत
  Marathi Culture and Festivals

Click here to edit subtitle

Vinayak Damodar Savarkar :  विनायक दामोदर सावरकर

Veer Savarkar  

Birth 28 May 1883 – Death 26 February 1966 

Vinayak Damodar Savarkar, commonly known as Swatantryaveer Savarkar was a fearless freedom fighter, social reformer, writer, dramatist, poet, historian, political leader and philosopher. 

Savarkar's revolutionary activities began while studying in India and England, where he was associated with the India House and founded student societies including Abhinav Bharat Society and the Free India Society, as well as publications espousing the cause of complete Indian independence by revolutionary means.


वीर सावरकर जयंती निमित्य हि लेख मला जरूर वाचा, लेखन : रोहन उमेश पांगारकर१.  लोटी हिंस्त्र सिंहाच्या पंजरी मला , नम्र दास सम चाटील मम पदांगुला ...
कल्लोळी ज्वाळांच्या फेकीशी जरी  ,हटूनि भवती रचिल शीत सुप्रभावली..."
सिंह आपल्या पायांस चाटेल अन ज्वालाही आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही हा कॉन्फिडन्स म्हणावा कि वेडेपणा ! पण ज्यावेळी ध्येय निश्चित आणि वाट ठळक असते त्यावेळेला तर नक्कीच हीच विश्वस्तता असते . 
संध्याकाळची वेळ होती पोरं सोरं खेळताना दिसत होती मात्र त्या खेळातही वेगळेच अनुशासन होते , खेळता खेळताच मुलं मोठ्या मोठ्याने ओरडायची " वंदे मातरम , हर हर महादेव , जय भवानी जय शिवाजी " , हे कसले प्रगल्भ खेळणे तेवढ्यात तो ओरडला "आरती ची वेळ झालीये " . बघता बघता मुलं रांगेत गोळा होऊ लागली आणि घटक्यात आरती सुरु झाली "सुखकर्ता दुखहर्ता ..".मात्र तिथे गणपती कुठेच दिसेना ना कुठला फोटो ना मूर्ती फक्त एक शिवाजी महाराजांचा फोटो होता . आरती संपली अन एका मुलाने त्याला प्रश्न विचारला " अरे  तात्या , आपण शिवाजी महाराजांची आरती का नाही म्हणत रे ? त्याने क्षणभर विचार केला अन वही घेऊन तो बसला आणि दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर सगळे थक्क होऊन बघत राहिले कारण त्याने आरती लिहून आणली होती आणि तो खड्या आवाजात म्हणू लागला 
" श्री जगदंबा जिस्तव शुंभादिक भक्षी ,
दशमुख मर्दुनी जी श्री रघुवर संरक्षी ।
ती पुता भूमाता म्लेंच्छाहिं छळता ,
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ।
जयदेव जयदेव जय जय शिवराया ,
या या अनन्य शरणा आर्या ताराया ।। "
आजूबाजूचे लोक आवासून त्याच्याकडे पाहतच राहिले .
कारण एका 10-12 वर्षीय मुलाला एवढे प्रौढ विचार !
कोण होता हा मुलगा ? कुठून आली एवढी बुद्धीची प्रगल्भता ? 
त्याचे नाव होते विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्याराव .२.  नाशिक येथील भगूर गावी दामोदरपंत आणि राधाबाई सावरकर हे जोडपे राहत होते . त्यांना चार अपत्ये होती 3 दिवे अन 1 पणती असा प्रपंच होता . मोठ्या मुलाचं नाव गणेश मात्र एकंदर तेव्हाची पद्धतच होती की मोठ्या मुलांस बाबा म्हणायचं आणि लहानांस बाळा म्हणून गणेशांस बाबा आणि सर्वात कनिष्ठ अश्या नारायणास बाळा असे नावं पडले पण मग मधल्या विनायकांस का सोडायचे म्हणून त्यांस तात्या हे टोपण नाव अलॉट करण्यात आले . मुले लहान असतानाच राधाबाईंचे देहावसान झाले मग आई आणि बाबा अशी दुहेरी जवाबदारी दामोदरपंतांनी चोख पार पाडली .
तात्या बालपणापासूनच स्वाभिमानी आणि धैर्यवान असा होता . सामान्यतः बाळाचे पाय पाळण्यात दिसतात मात्र ह्या बाळाचे पाय आकाशपाळण्यात दिसले असावेत .
२८ मे १८८३ रोजी जन्मलेल्या या प्रगत बालकाने वयाच्या सोळाव्या वर्षी लाचारीच्या डोहात बुडालेल्या या भारतीय जनतेला शिकवले 
" अधम रक्तरंजितें सुजन पूजिते ,
श्रीस्वातंत्रते भगवती त्वामहं यशोयुतांवंदे ।
जयोस्तुते जयोस्तुते श्री महनमंगले शिवस्पदे शुभदे,
स्वतंत्रते भगवती त्वामहं  यशोयुतांवंदे ।।"
तात्याराव म्हणतायत माझ्या मातृभूमी ला अधमाची म्हणजेच शत्रूच्या रक्ताने अभिषेक करण्या साठी मी कटिबद्ध आहे . बालपणापासूनच सशस्त्र क्रांतिवाचून स्वातंत्र्य नाही हे प्रखर मत तात्यारावांचं होतं.
सूर्याचं तेज , वाऱ्याचा वेग , खडकाने हेवा करावा अशी कठोरता आणि साक्षात वृहस्पतीने शिष्यत्व पत्कारावे अशी बुद्धीची प्रगल्भता यांनी धारण केलेला दैवी अवतार म्हणजे तात्याराव सावरकर कारण कुठला साधा मुलगा वयाच्या 16 व्या वर्षी हि शपथ घेऊ शकत नाही की ,
"मातृभूमीच्या स्वातंत्रतेसाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभारून , त्यासाठी मरेतो झुंझेन "
   "हे मातृभूमी तुजविण जनन ते मरण ,
                          तुजसाठी मरण ते जनन "
          -स्वा. सावरकर३.  विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गांधीजींनी स्वदेशी चळवळ उभी केली होती. आपल्या मातृभूमीबद्दल स्वाभिमानाची भावना भारतीय जनमानसात जागृत होणं अत्यंत महत्वाचं होतं . मात्र सन 1895 ते 1900 च्या काळात प्लेग नावाच्या महादानवाने महाराष्ट्राच्या जनतेचा स्वाभिमान चिरडून टाकला होता . हा आजार अति संसर्गजन्य असल्यामुळे अगदी सपाट्याने आपले जाळे विणत होता . बघता बघता सावरकरांच्या घरात प्लेग शिरला , नारायणराव आणि बाबरावांस प्लेग ची लागण झाली . याचवेळी पुण्यात रँड नावाच्या इंग्रजी ऑफिसरने प्लेग च्या तपासणीच्या नावाखाली गरिबांना छळणे, औषधं उपलब्ध न करून देणे आणि एवढेच नव्हे तर क्रूरकर्मांचा कळस असा की प्लेगच्या गाठी मानेखाली अन मांडीवर होत असल्याने तपासायच्या नावाखाली स्त्रियांच्या अब्रूचा निर्घृण अपमान रँड आणि त्याचे साथी करत होते . यालाच वैतागून पुण्यातील चापेकर बंधूंनी रँड चा वध केला होता मात्र त्यांना इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा सुनावली आणि ह्यामुळेच तात्यारावांनी सशस्त्र क्रांतीची शपथ अष्टभुजामातेसमक्ष घेतली. बाबरावांच्या प्लेगच्या उपचारांमध्ये तिथेच भेटलेल्या म्हसकर आणि पागे या दोन गृहस्तांशी तात्यारावांची भेट झाली . म्हसकर , पागे आणि तात्याराव यांचे क्रांतिकारी विचार आणि मार्ग अगदी सारखे होते आणि यातूनच या तिघांनी 'मित्रमेळा' नावाची गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली . विदेशी वस्तू नाकारून स्वदेशिचा पुरस्कार करण्याचे मित्रमेळ्यात ठरले . मग काही लोकांनी तात्यारावांस घरातून विदेशी कपडे आणून घराबाहेर फेकण्याचे सुचवले मात्र सावरकर कटाक्षाने म्हणाले तसे केल्यास ते कपडे लांबवून वापरणाऱ्या मूर्ख लोकांची भारतात भरतीच आहे त्यापेक्षा विदेशी वस्तुंना तिरडीत ठेऊन मिरवणुकीने नेऊन होळी करूयात,  मग ठरले मात्र असं करण्यासाठी इंग्रजांची रीतसर परवानगी घ्यावी लागणार होती पण इंग्रजही महाचलाख खोपडीचे असल्यामुळे त्यांनी परवानगी तर दिली मात्र सावरकारांस एक अट घातली की जर मिरवणूक काढायची असेल तर एकही शस्त्र आणायचे नाही आणि आश्चर्य म्हणजे सावरकरांनी क्षणभरातच या करारावर सही केली . काही लोकं नाराज झाले आणि तात्यारावांस म्हणाले की " मिरवणूक आणि तीहि होळीची मग अर्थातच शिवीगाळ , नारेबाजी , घोषणा हे सर्व आपसूकच आले आणि जर हे बघून इंग्रजांनी लाठीचार्ज अथवा गोळीबार केला तर काय आपण आपल्या बंधूंना मार खाताना बघत राहाचेय का ? " पण क्षणाचाही विचार न करता तात्याराव शांतपणे म्हणाले की मी एकही हत्यार आणणार नाही म्हणून कबुल केलंय त्यांनी आणलेले वापरणार नाही असं कुठे म्हटलंय ! " कार्यालयात एकचं हास्यकल्लोळ उडाला .
ठरल्याप्रमाणे मिरवणूक सुरळीत पार पडली, होळी च्या वेळी खुद्द लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी सभेला संबोधित केले आणि स्वातंत्र्य आणि स्वाभीमानाच्या ह्या महायज्ञात सावरकरांनी एक मोठी आहुती टाकली . ह्या प्रसंगावरून तात्यारावांचे नेतृत्व , बुद्धिमत्ता आणि संघठन कौशल्य अधोरेखित होते .
(लेखन - रोहन उमेश पांगारकर 
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त लेखमाला

४.  सशस्त्र क्रांतीची शपथ घेतलेल्या तात्यारावांना टिळकांचे मार्गदर्शन लाभावे यांस घडवून आणलेली दैवी योजनाच म्हणावी लागेल . ज्यावेळी तात्याराव काम करायचे , क्रांतिकारकांशी संवाद साधायचे त्यावेळी टिळक त्यांच्या कडे अभिमानाने बघत. टिळकांना हे चांगले ठाऊक होते की सशस्त्र क्रांतीला सर्वात मोठी गरज म्हणजे आधुनिक आणि मुबलक शस्त्रसाठ्याचीच आहे . शॉटगन , कट्टा , पिस्तूल , रिव्हॉल्वर असे काही प्रकार भारतातही उपलब्ध होते मात्र बॉम्ब बनवण्याची कला भारतात नव्हती. इंग्रज सैन्य बॉम्ब इंग्लंड वरून आयात करायचे . बॉम्ब बनवण्याची कृती जर भारतात आणायची असेल तर कुणीतरी इंग्लंड ला जाऊन ती शिकून भारतात यायला हवं. मग असे हिमतीचे , बुद्धीचे आणि महत्वाचे म्हणजे इतका मोठा धोका पत्कारून हे काम कोण करणार ? 
टिळकांसमोर निःशंक सावरकरांचा चेहरा उभा राहिला , मग सावरकरांना कसं पाठवायचं हाच पेच उरला होता कारण सावरकर ह्या कार्याला नाही म्हणणे शक्यच नव्हते त्यामुळे त्यांना त्यांचं मत विचारण्यात वेळ व्यर्थ गेला असता . सावरकर नुकतीच मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते  मग त्यांना बॅरिस्टरकी चे शिक्षण घ्यायला पाठवणे हे अगदी सोयीस्कर कारण होते आणि हे ठरवताच गुजरातच्या श्यामजी कृष्णवर्मांनी तात्यारावांस मॅट्रिक च्या गुणांवर स्कॉलरशिप दिली. मग असा दुग्धशर्करायोग जुळून आल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता सावरकरांस इंग्लंडला पाठवण्याची तयारी सुरु झाली .9 जून 1906 रोजी निघून तात्याराव सावरकर बॅरिस्टर सावरकर होण्यासाठी इंग्लंड मध्ये पोहोचले . तिथे रहाण्याची उत्तम सोय "इंडिया हाऊस " या जागी कृष्णवर्मांनी केली होती . सावरकर हे तिरकं रसायन तिथे आल्यावर त्यांनी इंडिया हाऊस चं नाव "भारत सदन" असं करा हि मागणी केली ,यांच्या कणाकणात क्रांती भरलेली होती हे त्याचं उघड आणि सरळ उदाहरण . सावरकरांना लंडन येथे हि सज्जन आणि देशप्रेमी संगत लाभली . मदनलाल धिंग्रा , हरनाम सिंह , सेनापती बापट हे त्यातलेच काही सहकारी . कॉलेज आणि शिक्षणामध्ये तात्याराव त्यांचं मूळ कार्य विसरले नाहीत . रशियाचे काही विद्यार्थी जे लंडनला वास्तव्यास आहे त्यांना बॉम्ब बनवण्याचे शास्त्र अवगत आहे याची माहिती सावरकरांना लागली . ते तडक त्यांच्या संपर्कात आले , या वेळेला त्यांचे मॅझेनीचे चरित्र आणि सत्तावनचे स्वातंत्र्य समर या दोन पुस्तकांवर लिखाण चालले होते . रशियन शिकण्याच्या नावाखाली सावरकरांनी बॉम्ब बनवणे शिकले आणि 2 हॅन्ड बॉम्ब बनवले देखील आणि एवढेच नव्हे तर एका मध्यरात्री एका बॉम्ब ची जंगलात स्फोट करून चाचणी सुद्धा केली . जोरदार आवाजाने अवघे लंडन दचकले ,संशय येताच ज्यावेळेला इंग्रज पोलिसांनी तपास केला तेव्हा पुराव्याची एक साधी कडीही सापडली नाही.  लंडनजवळील जंगलात गूढ आवाज अशी बातमी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली  याचा पुरावा आजही उपलब्ध आहे . सावरकरांचे काम किती चोख आणि नियोजित होते ह्याची कल्पना तुम्ही या प्रसंगावरून तुम्ही करू शकता . 
(लेखन - रोहन उमेश पांगारकर 
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त लेखमाला५.  लंडनच्या जंगलात झालेला गूढ आवाज आणि माध्यम प्रवाहात सापडलेलीे 'मॅझेनीचे चरीत्र ' आणि 'सत्तावन चे स्वातंत्र्य समर' हि प्रतिबंधित पुस्तकं अश्या काही संशयास्पद घडामोडींमुळे इंग्रज सरकार सावरकरांवर करडी नजर ठेवून होते कारण सावरकरांनी याआधी केलेले क्रांतिकार्य त्यांना हि ठाऊक होते . सावरकर रशियन विद्यार्थ्यांना भेटतात हे समजल्यावर त्यांचा संशय अधिकच बळावला त्यांनी सावरकरांच्या घराच्या झडतीचा आदेश दिला . 
सकाळची वेळ होती सावरकर चहा पीत होते , हातात "सत्तावन चे स्वातंत्र्यसमर " हे पुस्तक होते , घरात ते आणि 'सेनापती' पांडुरंग बापट दोघेच होते . बापटांनी सहज खिडकीतून बघितले आणि कमालीचे दचकले , घाबरतच सावरकारांस म्हणाले ,"बाहेर पोलीस आले आहेत ! " , बॉम्ब समोरच टेबलावर होता आणि सावरकरांच्या हातात प्रतिबंधित पुस्तक होतं म्हणून बापटांचें घाबरणे सहाजिक होते , पण सावरकर मात्र अगदी शांतपणे चष्म्यातून वर बघत , चहाची एक झुरकी घेत म्हणाले ,"येऊ दे ." बापट अधिकच घाबरले आणि म्हणाले , " ओ तात्याराव , अहो काय करताय पकडल्या जाऊ ना , इतक्यातच सासरी जायचेय का ? " ते तुरुंगाला सासर म्हणत .तात्याराव उठले बॉम्ब बाजूच्या खुर्चीवर ठेवला आणि वर एक चादर अंथरली आणि पुन्हा तेच पुस्तक वाचत शांतपणे बसले. 
पोलीसाने दार वाजवले , बापटांनी घाबरतच दार उघडले . सावरकर बसल्या बसल्याच ओरडले ,"कोण आहे ?" 
समोर एक इन्स्पेक्टर आणि एक हवालदार होता . इन्स्पेक्टर कठोरतेचा आव आणत म्हणाला , "तुमच्या घराच्या झडतीचं वॉरंट आहे माझ्याकडे ." सावरकर अगदी शांतपणे म्हणाले ,"गो अहेड !". ती दोघं अधाश्यासारखी शोधू लागली , हवालदार तात्यारावांजवळ आला आणि म्हणाला ,"हातात काय आहे ?" सावरकरांच्या हातात प्रतिबंधित पुस्तक होते , आता मात्र भीतीमुळे बापटांचा चेहरा लाल झाला. पण सावरकरांनी पूर्ण आत्मविश्वासाने ते पुस्तक हवालदाराच्या नाकाला लावलं अन म्हणाले ,"घ्या बघा ! " .हवालदाराने विचार केला इतक्या आत्मविश्वासाने दाखवतोय म्हटल्यावर असंच काहीतरी असेल म्हणून त्याने लक्ष नाही दिले . बापटांनी सुटकेचा निःश्वास सोडला तोच सावरकर पोलिसांस म्हणाले ,"कम ऑन , हॅव अ सीट ." आता तर बापटांचा प्राण कंठाशी आला कारण खुर्ची वर बॉम्ब होता आणि जर हा पोलीस बसला तर स्फोट होणार हे नक्की , ते हळूच तात्यारावांस म्हणाले ," काय करताय ! आज मरायचं नक्की करून आलाय का ? ", सावरकर मिश्किल हसत म्हणाले ,"तेवढंच टेस्टिंग ! ". पोलीस म्हणाला ," ऑन ड्युटी ,नो ओब्लिगेशन्स ! " आणि काहीच न मिळाल्या ने हतबल होऊन तो निघून गेला . 
सेनापतींच्या जिवात जीव आला आणि ते तात्यारावांस म्हणाले ," थोडक्यात बचावलो रे बाबा !" तात्यारावांनी हसतच बघितलं आणि म्हणाले , " बघितलंस त्याला मी बासायलाच म्हणालो तरीही त्याने ते नाकारले , आपल्या मातृभूमी साठी इतकी कर्तव्यदक्ष आणि स्वाभिमानी पिढी या इंग्रजांनी निपजली म्हणूनच ते आज आपल्या वर राज्य करतायत , आपल्याला जर आपला भारत इतकाच सक्षम बनवायचा असेल तर तरुण मनात स्वाभिमान आणि क्रांतीची भावना जागायलाच हवी नाहीतर आयुष्यभर गुलामीच सहन करावी लागेल ."६.  बॅरिस्टरकीचा अभ्यास करताना सावरकर मूळ काम विसरले नाहीत हे अधोरेखित करणे अत्यंत महत्वाचे आहे. बंगालचे खुदिराम बोस ह्यांच्या पर्यंत दोन बॉम्ब पोहोचवणे गरजेचे होते कारण तिथे 1908 मध्ये ते पहिला स्फोट करणार होते . सावरकरांनी दोन बॉम्ब तर बनवले होते मात्र ते बंगाल पर्यंत पोहोचवणार कसे हा मोठा प्रश्न होता .तुर्तांस नाशिक पर्यंत पोहोचवण्यासाठी सावरकरांनी आखणी केली होती , तिथे भारत भवनात चतुर्भुज नावाचा आचारी होता त्याला भारतात नाशिकला पाठवायचे ठरले पण मग त्याच्या सोबत दहा पिस्तुलं आणि दोन बॉम्ब पाठवायचे कसे ? तर पुस्तकासारखा दिसणारा खोका म्हणजेच बाहेरून पुस्तक आणि आतून पिस्तूल असे दहा पुस्तकं तयार केले आणि भाज्यांच्या पिशव्यांमध्ये बॉम्ब लपवले आणि खाण्याचं सामान घरी जातंय असा नाट्यमय देखावा सावरकरांनी तयार केला आणि चातुर्भुज सोबत शस्त्र नाशकात पोहोचले . 
मात्र आता पुढचा रस्ता कठीण होता , नाशिकहून गुजरातला बॉम्ब नेऊन तिथून पुढे बंगाल ला ते जाणार होते पण गुजरात ला नेण्यासाठी जी योजना बनवली होती ती धोकादायक आणि महाभयंकर होती .
त्यावेळी तात्यारावांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर आणि सौभाग्यवती बाबाराव सावरकर नाशकातच राहत होत्या , त्यांना बॉम्ब घेऊन गुजरात ला जावयांस सांगितले मात्र ते कसे ? तर साडीत बॉम्ब लपवून त्याला गर्भाचा आकार देऊन ट्रेन मध्ये प्रवास करत सुरत येथे जायचे आणि दुसऱ्या क्रांतिकारकांच्या बायकांना तो बॉम्ब सुपूर्द करायचा मग त्या तिथून कलकत्त्यात नेणार होत्या.
पण नाशिक ते सुरत ट्रेन च्या गर्दीत पोटाला बॉम्ब बांधून प्रवास करण्याची हिंमत सावरकर सारख्या दैवी कुटुंबातच असू शकते कारण बॉम्ब ला जरा देखील धक्का लागला तर तो फुटायची पूर्ण शक्यता होती .
दोनही गृहलक्ष्मया आणि सोबत दोन क्रांतिकारक माणसं असा संघ मोहिमेवर निघाला , सोबत असलेली क्रांतिकारक मुलं बरीच दक्षता बाळगत होती , कोणालाही या दोन बायकांच्या जवळ फिरकू देत नव्हती . मात्र सावरकरांच्या घरातील स्त्रियांना अवघडलेलं पाहून पोलिसांना संशय आला कारण तात्याराव लंडनला असताना यामुनाबाईला दिवस गेलेच कसे असा प्रश्न त्यांना पडला, मात्र त्यांचे हात बांधलेले होते वॉरंट नसताना ते स्त्रियांना अटक करण्यास असमर्थ होते मात्र तरीही त्यांनी चोरून पाठलाग केला .
दोन्ही बायका सुरातला पोहोचल्या ,अपेक्षे प्रमाणे दुसऱ्या क्रांतिकारकांच्या बायकां तिथे अगोदरच उपस्थित होत्या , ह्या प्रसंगाचे वर्णन नाशिक पोलिसांनी अगदी रंजक आणि हुबेहूब करून ठेवलेले आहे . पोलीस म्हणतात , " सुरातला गेल्यावर देवकीचा गर्भ यशोदेला गेला ! " 
प्रवासभर सावरकरांच्या स्त्रियांना दिवस गेलेले होते आणि स्टेशनवर पोहोचल्यावर गर्भ गायब झालेला पाहून पोलीस थक्क झाले आणि त्यांनी यामुनाबाईंस विचारले ,"आत्ताच तुम्हाला दिवस गेले होते आणि आता असं , हे कसे ? " मात्र ती ही सावरकरांची भार्या होती , यमुनाबाई तडक म्हणाल्या ," आता गेलेले दिवस काय परत येणारेत ? " आणि हसत त्या दोघी रेल्वेत बसल्या . पुढे बॉम्ब बंगाल ला पोचल्यावर खुदिराम बोस यांनी बंगाल मध्ये इंग्रजांना कानठळ्या बसवल्या .
सावरकांच्या स्त्रियांचे क्रांतिकार्यात योगदान काय ? असे म्हणनाऱ्या समाजकंटकांना हे चोख प्रत्युत्तर आहे. 
मृत्यूला न भिता त्याच्याशीही दोन हात करणारे सावरकर कुटुंब होते .७.  बंगालमध्ये झालेल्या स्फोटांनंतर लंडन मेक चा बॉम्ब इंग्रजांना सापडला आणि पहिलाच संशय सावरकरांवर आला , त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाले . सावरकरांना  लंडन पोलीस अटक करणार तेव्हा ते फ्रांस ला होते तिथे तिथल्या संसदीय सदस्य मॅडम कामा सावरकरांच्या चांगल्या परिचित होत्या त्यांनी सावरकारांस फ्रांसमधेच लपून राहा असे सुचवलेे मात्र त्यांनी लंडनला परत जाण्याचे निश्चित केले आणि मॅडम कामाला त्यांच्या मनातील धाडसी योजना समजावून सांगितली .
सावरकर लंडनला पोहोचताच त्यांना अटक झाली . त्यांना खटल्यासाठी भारतात आणणार होते , खरं तर त्यांचा खटला इंग्लंडलाही चालवता आला असता मात्र तसे केले असते तर सावरकरांचे कोर्टातले प्रत्येक विधान वृत्तपत्रांना छापू द्यावे लागले असते आणि सावरकरांचे विधान छापून आल्यास त्यांनी इंग्रज सरकारची दाणादाण उडवली असती म्हणून भारतात खटला चालणार होता कारण कोर्टातले विधान दाबता येण्यासारखा भारत हा एकच देश असावा . त्यांचे जहाज लंडन वरून निघून फ्रांस मार्गे भारतांस येणार होते .
८ जुलै १९१० चा तो दिवस होता , सकाळचे 4 वाजले होते , सावरकर शांत होते मनात योजना पक्की होती . सावरकरांसाठी ब्रिटिश पोलिसांनी कडक केला बंदोबस्त होता , एक गार्ड नेहमी त्यांच्या मागे नजर ठेवण्यास असायचा . सावरकरांच्या डोक्यातली योजना अशी होती की जहाज फ्रांस जवळून जाताना त्यातून उडी मारून पोहत मार्सेलिसच्या बंदरावर जायचे तिथे मॅडम कामा गाडी घेऊन येणार होत्या . एकदा फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवला कि इंग्रज पोलिस त्यांना अटक नाही करू शकणार .
सावरकर कोठडीतुन उठले आणि हवालदाराला खूण करून शौचास जावयाची परवानगी मागितली , गार्ड ने त्यांच्या बेड्या काढल्या आणि त्यांना घेऊन शौचालयाकडे निघाला , जहाजातील शौचालयांस समोरून एक नजर ठेवण्यासाठी खिडकी होती आणि मागे एक काचेची व्हेंटिलेटर खिडकी होती . सावरकरांनी आपला गाऊन (कोट )काढून समोरील खिडकीवर टांगला जेणेकरून गार्डला आतलं काहीही दिसू नये , आपल्या हातातील कड्याच्या साहाय्याने खिडकी फोडली , फोडल्यावरही त्याला कोपऱ्यांमध्ये काचेची टोकं शिल्लक होती पण त्याचा विचारही नं करता सदरा काढला आणि सावरकारांनी पाण्यात उडी मारली . उघड्या अंगाने काचेतून अंग रखडत ,जखमा अंगावर घेऊन मिठाच्या पाण्यात उडी मारणे हे काम परमशक्तीशाली हिरण्यकश्यपूचा वध करणारा नृसिंह, शत्रूचे सैन्य एकटा अंगावर घेणारा भीमाचा पुत्र घटोत्कच किंवा अवघी पृथ्वी क्षत्रीयहीन करणाऱ्या परशुरामा एवढेच पराक्रमी ,धाडसी आणि दैवी नव्हे का ?
सावरकर रक्ताने भरलेल्या अंगाने पोहतच मार्सेलिस बंदर गाठले तोवर जहाजावर खळबळ माजली होती सावरकांच्या मागे एक बोट घेऊन पोलीस निघाले , अखंड गोळीबारात मृत्यूच्या जबड्यातून सावरकर झपाझप हात मारत होते , बंदरावर पोहोचताच ते पळत बाहेर गेले मात्र अद्याप मॅडम कामांची गाडी आली नव्हती , बऱ्याच पळापळी आणि पाठलागानंतर इंग्रज पोलिसांनी तात्यारावांस पुन्हा पकडले , तात्यारावांनी फ्रांस पोलिसांना ओरडून ओरडून सांगितले की इंग्रज पोलीस फ्रान्सच्या भूमीवर त्यांना अटक करू शकत नाही मात्र त्यांनी एक ऐकले नाही आणि सावरकरांना पुन्हा जहाजावर नेण्यात आले . 
यावेळी झालेली चुकामुक अशी की सावरकर पुन्हा जहाजावर गेले आणि तितक्यात मॅडम कामा गाडी घेऊन आल्या .
या प्रसंगावरून ज्यावेळेला नंतर सावरकरांना पत्रकारांनी विचारले की त्यांना मृत्यूची भीती नाही वाटली का ?
सावरकरांनी आपल्या साहित्यातूनच उत्तर दिले ...
" अट्टाहास करीत जई धर्मधारणी ,
  मृत्यूशीच गाठ घालू मी घुसे रणी,
  अग्नी जाळी मजसी ना खड्ग छेदितो,
  भिउनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो,
  खुळा रिपू तया स्वयें ,
  मृत्यूच्याच भीतीने भिववू मजसी ये ,
।।अनादि मी, अनंत मी, अवद्य मी भला ,
मारील रिपू जगती असा कवण जन्मला ।।"
गीतेचा सार जणू एका वाक्यात सावरकरांनी सांगितला, "मी एक शरीर नसून आत्मा आहे आणि सनातन आहे , मला मृत्यूचे तिळमात्रही भय नाही."
सावरकर हे युवांसाठी एक आदर्श प्रेरणा आहेत .८.  सावरकरांनी मार्सेलिसची ऐतिहासिक उडी मारून साहस तर केले मात्र क्षुल्लक चुकामुकीमुळे पदरी अपयश आले. भारतात खटला चालवला गेला आणि आपल्याला गंमत वाटेल मात्र भारतात नव्हे तर अवघ्या विश्वाच्या क्रांतिकारी इतिहासात अंमलबजावणी तर सोडाच , मात्र जाहीरही झालेली सर्वात मोठी शिक्षा सावरकरांना झालेली आहे , दहा नव्हे वीस नव्हे तर तब्बल पन्नास वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ऐकून सामान्य व्यक्तीच्या पायाखालील जमीन सरकली असती , पण सावरकर मात्र शांत पणे तुरुंगाच्या पायरीशी न्यायाधीशाला म्हणाले ,"Are you sure that you will rule India for 50 more years ? "
अश्या कठोर प्रसंगी हा आत्मविश्वास असणारे सावरकर हे वादळ होते . 
इकडे सावरकर कुटुंबावर बंदी आणली गेली , " सावरकर कुटुंबियांना घरच काय तर खाण्यासाठी ताटही मिळता कामा नये ", असे फर्मान होते .बाबारावांना आधीच अंदमानला पाठवल्या गेलं होतं. या विलक्षण परिस्थितीत सावरकरांच्या घरातील स्त्रिया गोठ्यात राहून , हाताने माती सारवून जमिनीवर जेवायच्या अशी हालअपेष्टा सहन केलेल्या सावरकर कुटुंबियांना नमन करावे तितके कमी आहे . 
शिक्षेसाठी अंदमानला जाण्याअगोदर यमुनाबाई म्हणजेच माई तात्यारावांना भेटायला आल्या . त्यावेळी न रडता पडता तात्याराव माईसाहेबांना म्हणाले ,"अख्या कणीसाला उगवण्यासाठी एका दाण्याला स्वतःला जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं , स्वतःचा संसार सुखी करून आयुष्य जगण्याऐवजी एक संसाराला यज्ञकुंडात आहुती म्हणून अवघ्या देशाचा संसार सुखी करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे ." याची नोंद सावरकरांच्या आणि माईसाहेबांच्याही आत्मचरित्रात आहे . ह्यावेळी सावरकरांचे वय 30 आणि माईसाहेब अवघ्या 26 वर्षांच्या होत्या. 
हा त्याग आणि हि मातृभूमीची सेवा निरंतर जगाच्या स्मरणात राहणार आहे.९.  1911 साली अंदमानच्या तुरुंगात सावरकरांना नेण्यात आले , कैद्यांच्या बेड्या बघूनचं एखाद्याचे हृदय बंद पडावे अशी भयंकर काळ्यापाण्याची शिक्षा आपल्याला पन्नास वर्षे भोगायची आहे हा विचारच पचवणे अवघड आहे .बेड्यांचे विश्लेषण करायचे झाले तर हातात आणि पायात साखळदंड, पायाच्या मध्ये एक लोखंडी सळाख ज्याचे अंतर असे कि दोन्ही पाय जवळ करून चालताचं येऊ नये , धावण्याचा प्रयत्न केल्यास सळाखीचा मार असा बसेल कि कोणीही कळवळून उठेल . 
तात्यारावांचा दिनक्रम असा होता की उठल्यानंतर आठ तास नारळ सोलायचं आणि आठ तास कोलू फिरवून त्यातून तेल काढायचं , नारळाचं तेल काढताना कोलुचा चरक दुप्पट जोराने फिरवावा लागतो आणि हे कार्य आठ तास सलग करणे म्हणजे पोरा सोरांचा खेळ नव्हे . सोळा तासांच्या अथक परिश्रमानंतर सावरकर कैद्यांच्या साक्षरता वर्ग घेत असत , पाचशेच्याही वर संख्येचा वर्ग व्हायचा ,सर्व कैदी खाली मातीवरच बाराखडी गिरवायचे म्हणून सावरकरांनी कैद्यांना आव्हान केले की घरून खाण्याचे पदार्थ मागावण्याऐवजी पुस्तकं मागवा आणि कैद्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला .
एवढेच नव्हे तर तात्यारावांनी तुरुंगात कैद्यांचे वाचनालय काढले आणि त्याअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम देखील घ्यायला सुरुवात केली . दिवस भर इतके व्यस्त असूनही ते रात्री कोठडीत परतल्यावर भिंतींवर कविता लिहायचे , तात्यारावांच्या ह्या सर्व उद्योगांने जेलर खूप वैतागायचा .
त्याने तात्यारावांना अद्दल घडावी म्हणून त्यांच्या कोठडीची भिंत डांबराने रंगवून घेतली त्याला वाटले त्यांच्या कविता मिटवल्याने सावरकर चिडतील आणि गैरवर्तन करतील आणि मग आपण त्यांना मारहाण करू शकतो , मात्र हे सर्व बघितल्यावर सावरकर आनंदी होऊ जेलर ला धन्यवाद म्हणाले आणि सांगितले , " जेलर साहेब , या सर्व  कविता मी अगोदरच पाठ केल्या होत्या आता नवीन लिहिण्याकरिता जागाचं उरली नव्हती , नवीन जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल तुमचे आभार ."
जेलरचा डाव त्याचावरचं उलटवला .
टीप : पुढील लेखात सावरकरांवर टिका करणाऱ्यांच्या माफिनाम्याच्या मुद्द्यावर विश्लेषण करणार आहे .१०.  चार शतकं मागे जाऊन बघितलं तर ज्यावेळेला निझाम , इंग्रज आणि आदिलशाह च्या आईने पाठवलेल्या सरदाराने म्हणजेच अफझल खानाने  स्वराज्याला तिहेरी वेढा घातला होता त्यावेळी खानाचे सैन्यबळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यबळापेक्षा कितीतरी पटीने जास्त होते तसेच खानाकडे आधुनिक शस्त्रसाठाही बराच होता . यावेळी महाराजांनी खानाला पत्र लिहिलं कि "आम्ही घाबरलोय , आपल्या अफाट सैन्यासमोर आमचे मूठभर मावळे काय लढणार ? तुम्हीच आम्हाला भेटायला प्रताप गडावर या ." एवढेच नव्हे तर खान प्रताप गडाच्या पायथ्याशी आल्यावरही त्याला अगोदर भेटण्याचं टाळून त्याला असं भासवलं कि महाराज घाबरलेत आणि खान बेसावध होताच त्याचा काटा काढला, युद्धभूमितील साधा मंत्र आहे की शत्रूला आपल्या कुठल्याही योजनेचा सुगावा लागता कामा नये , द्रोणाचार्यांच्या वेळी अश्वत्थामा मेल्याचं खोटं भासवूनच कृष्णाने द्रोणाचार्यांना युद्धभूमीत परास्त केलं होतं .  "शत्रूशी खोटं आणि आपल्यांशी खरं" हे साधं राजकारण म्हणजेच गनिमी कावा आहे ना ?
जर उत्तर हो असेल तर मग सावरकरांनी काहीही गैर केलं नाही यात तिळमात्रही शंका नाही.
सावरकर तुरुंगात असतानाही क्रांतिकार्य कसे चालवत होते हे तर आपल्याला कळले , मात्र सावरकरांनी तुरुंगातून इंग्रज सरकारला तीन पत्रं लिहिली आणि त्या पत्रांमध्ये त्यांनी इंग्रज सरकारला या तीन गोष्टी म्हटल्या -
1) मी तुरुंगात अगदी नियमित आणि निरंतर तुम्ही दिलेले काम करत आलोय आणि कायमच चांगला व्यवहार ठेवला असल्यामुळे मला इथून मोकळे करा.
2) मी तुरुंगातून सुटल्यावर तुमच्या कुठल्याही कार्यात अडथळा निर्माण करणार नाही.
3) मी तुरुंगातून सुटल्यावर राजकारणात सहभागी होणार नाही .
पण या गोष्टी सावरकारांनी इंग्रजांना फसवण्याकरिता लिहिल्या होत्या हे उघड सत्य आहे . तात्यारावांच्या चरित्रात त्यांनी लिहिलंय कि "मला पन्नास वर्षे तुरुंगात सडत राहिल्यापेक्षा इथून कसेही सुटून पुन्हा माझ्या मातृभूमीच्या सेवेत रुजू होण्यात जास्त रस होता आणि इंग्रजांना मी माघार घेतली आहे हे पटवून देण्याऐवजी माझ्याकडे कुठलाच दुसरा पर्याय शिल्लक नव्हता ."
सावरकरांनी पत्रात लिहिलेले खोटे होते ह्याचा पुरावा एकचं कि 11 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा, 1921 ते 1924 असा तीन वर्षांचा बंदिवास व 1924 ते 1937 पर्यंत राजकारणात सहभाग नाही या अटीवर रत्नागिरीची स्थानबद्धता या सर्वांतून मुक्त होताच 1937 मधेच सावरकरांनी राजकारण पुन्हा सुरु केले आणि त्याच वर्षी अखिल भारतीय हिंदू महासभा या राष्ट्रीय राजकीय पक्षाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले आणि पुन्हा सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते म्हणून क्रांतिकार्य सुरु केले . 
टिकाकारांच्या म्हणण्या प्रमाणे जर सावरकर खरंच घाबरले असते तर ते पुन्हा नव्या आणि दुप्पट शक्तीने क्रांतिकार्यात सहभागी झालेच नसते .एवढेच नव्हे तर सावरकरांनी स्थानबद्धतेत असताना देखील समाजकारणाची एक नवीन उंची गाठली आणि इतकेच नव्हे तर भारताला स्वातंत्र्यमिळवून देण्यात अत्यंत मोठा वाटा उचलला. (तो कसा हे लेखमालेतील पुढील लेखांत वाचा )
मात्र यावरून हे झऱ्यातील शुद्ध जळासारखे स्वच्छ आहे की सावरकरांनी जे त्या पत्रांमधून लिहिले होते तो एक पराक्रमी आणि धाडसी 'गनिमी कावा' च होता कारण
" ने मजसी ने परत मातृभूमीला , सागरा प्राण तळमळला "
हे विलक्षण आणि अत्यंत भावनिक काव्य लिहून मातृभूमीला साद घालणाऱ्या महापुरुषावर शंका घेणे हे चूक नव्हे पाप आहे कारण त्याग काय असतो हे तात्यारावांहून जास्त कोणाला ठाऊक असेल ?
भारतातील महापुरुषांवर राजकारण केल्या पेक्षा त्यांची प्रेरणा घेऊन अभिमान बाळगायला हवा .११.  1924 मध्ये "राजकारणात सहभाग घेणार नाही" आणि "रत्नागिरीच्या बाहेर जाणार नाही" ह्या दोन अटींवर सावरकरांना स्थानबद्ध करण्यात आले , बंधू नारायणराव यांनी डॉक्टरकीची पदवी मिळवली , घर बांधले ,दोन्ही मोठे भाऊ नसताना नारायणवांनीच घर सांभाळले . 
अर्थात स्थानबद्धतेत आल्यावरही सावरकरांनी समाजकारण थांबवले नाही ते विविध विषयांवर समाज प्रबोधन करतच राहिले ,रत्नागिरीत राहून त्यांनी लेखनाच्या माध्यमातून क्रांतिकार्य चालवले तसेच त्यांनी विविध वाङ्मय लिहिले ज्यासाठी त्यांना साहित्य मंडळाचे अध्यक्षपद देखील मिळाले .
या काळात भारताची एकंदर परिस्थिती तर स्वातंत्र्यासाठी अनुकूल होती मात्र पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक शाप तसाच होता तो म्हणजे स्पृश्य - अस्पृश्यतेचा . सावरकरांना हे चांगले ठाऊक होते की जो पर्यंत भारतीय समाज एकत्रित होत नाही , सर्वसमावेशक होत नाही तो पर्यंत स्वातंत्र्य जरी मिळाले तरीही त्याला भारतीय समाज टिकवू शकत नाही . 
सावरकरांनी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली त्यांना चांगल्या सवयी आणि शिक्षणाचे महत्व पटवून दिले .
स्वतःला उच्च जातीचे म्हणवणारे बिनडोक अस्पृश्यांना मंदिरातच काय मंदिराच्या आसपासही येऊ देत नसत . 
सावरकरांनी सर्व अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या लोकांसोबत मंदिरापर्यंत पालखी काढली आणि त्यांना थांबवल्यावर त्या समाजकंटकांना म्हणाले ," देव आणि भक्त यांच्यातील अंतर वाढवणाऱ्यांना देव कधीच पावणार नाही त्यामुळे देवाच्या रस्त्यात येणाऱ्यांना आम्ही संपविण्याआधी तुम्हीच बाजूला व्हा ." आणि सर्व अस्पृश्यांनी मंदिरात पाऊल ठेवले .
इतकेच नव्हे तर रत्नागिरीत त्यांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली ज्या मंदिरात 'भंगी' या सर्वात खालच्या जातीच्या मानल्या जाणाऱ्या माणसाकडून पहिली पूजा करून घेतली तसेच सर्व उत्सवांत संपूर्ण समाजाला एकत्र पंगतीत बसवून जेवण्यास भाग पाडले आणि हळू हळू रत्नागिरीतील जातीभेद संपवला.1937 मध्ये इंग्रज सरकारने सावरकरांची विनाअट मुक्तता केली आणि सावरकर सज्ज झाले आपल्या आयुष्यातले सर्वात मोठे कार्य करायला .गांधीजींनी चले जाव म्हणत गावागावांत स्वातंत्रतेचे आंदोलन उभे केले होते मात्र फक्त तेवढ्यानेच इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य दिले नाही , आज पर्यंत आपण ऐकत आलोय कि Indian revolution was a bloodless revolution मात्र असे म्हणताना आपण ज्यांनी रक्त सांडले अश्या महान क्रांतिवीरांचा निर्घृण अपमान करतो.
(फक्त आणि फक्त अहिंसा आणि चले जाव चळवळीनेच स्वातंत्र्य मिळाले नाही आणि स्वातंत्र्य मिळवण्यात सावरकरांचा केवढा मोठा वाटा होता याचं विश्लेषण उद्याच्या म्हणजेच शेवटच्या लेखांत वाचा)

१२.
स्थानबद्धतेतून मुक्त झाल्याबरोबर सावरकरांनी अवघ्या सहा महिन्यात अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्षपद स्विकारले . तात्यारावांच्या डोक्यात एक योजना तयार होती ज्याने शंभर टक्के स्वातंत्र्य मिळणार होते .
22 जून 1941 रोजी सुभाषचंद्र बोस सावरकर सदनात गुप्त भेटी साठी आले , त्यावेळी सुभाषबाबू यांनी भारताबाहेर मोठी सशस्त्र सेना उभी केली होती . योजना सरळ आणि सोपी होती 'तात्यारावांनी भारता मध्ये सेना तयार करायची आणि सुभाषबाबूंनी भारताबाहेर,
सुभाषबाबूंच्या सेनेनी भारतावर आक्रमण करायचे आणि त्यात सावरकरांच्या सेनेनी सामील व्हायचं आणि इंग्रजांना दुहेरी वेढा घालून धूळ चारायची '.
सावरकर अचानक सर्व युवकांना सैन्यात भरती होण्याचं आव्हान करू लागले. सर्व सावरकरांना प्रश्न विचारीत होते की ,"सरकार इंग्रजांचे , सैन्य इंग्रजांचे तरीही तात्याराव सैन्यात भरती होण्यास का सांगत आहेत ?"
त्यावेळी तात्यारावांच्या मोठ्या सभा व्हायच्या , मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभा त्यातील सर्वात मोठी ज्यात तब्बल आठ लाख युवक सामील झाले होते त्यात तात्याराव जनसामुदायाला म्हणाले ,"अरे! इंग्रज दुसऱ्या महायुद्धाच्या दबावामुळे कोणालाही सैन्यात सामील करतो आहे , शस्त्र देतो आहे . त्याला मनुष्यबळाची गरज आहे आणि आपल्याला शस्त्रबळाची, तुम्ही सैन्यात सामील होऊन बंदुका ताब्यात तर घ्या , त्यांची तोंडे कुठे वळवायची हे नंतर बघू ."
सावरकरांच्या आव्हानामुळे लाखो युवक सैन्यात सामील झाले . योजना अगदी पूर्वनियोजित पद्धतीनेच चालली होती मात्र 1945 मध्ये सुभाषबाबूंचे अपघाती निधन झाले .सावरकर म्हणाले ,"आता माघार नाही " आणि -
भारतातील गावागावात पोहोचलेले गांधीजींचे सत्याग्रही आंदोलन तसेच सैन्यात भरती असलेल्या युवकांनी इंग्रज सरकारशी केलेली बंडखोरी याच्या दुहेरी संगमाने भारताला स्वातंत्र्य मिळाले.
सावरकरांच्या या वाघाच्या वाट्याला पुरावा असा की ज्यावेळी इंग्रज संसदेत भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान ऍडमन ऍटलीने सादर केला त्यावेळी विरोधी पक्ष नेता चर्चिल ने सरकार ला प्रश्न विचारला कि ,"आपल्याकडे सैन्यबळ असल्यावर आपण सत्याग्रहींच्या मानेवर टाच देऊन आपलं राज्य चालवू शकतो मग भारताला स्वातंत्र्य देण्याचा अट्टाहास का ?"
यावर ऍटलीने दिलेल्या साठ पानी भाषणातल्या तीनच ओळींमध्ये चित्र स्पष्ट होतं, त्या तीन गोष्टी अश्या कि -
"1) Indian people are not cooperative to the government.
2) Indian Army is no more loyal to the British empire.
3) We dont have enough armed forces to behold India "
या वरून हे सरळ स्पष्ट होतं की सावरकरांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात महत्वाची आहुती टाकली होती.
15 ऑगस्ट 1947 ला दिल्लीच्याच काय तर मुंबाईच्या सध्या झेंडावंदनाच आमंत्रण देखील तात्यारावांना मिळालं नाही.कुठलेही श्रेय, मान ,सम्मान न घेता केवळ त्याग हेच आयुष्य मानून जगलेल्या या महान क्रांतिवीराचा शेवट प्रयोपवेशन करून व्हावा हे आपलं दुर्दैव आहे .1966 मध्ये हे क्रांतीचे वादळ शमले मात्र सावरकर हा झंझावात सगळ्यांच्या मनात कायम जिवंत राहील आणि युवावर्ग आणि अवघ्या विश्वाला हे महान चरित्र सदैव प्रेरणा देत राहील.
।।वंदे मातरम।।